हमीद अन्सारी यांची मुक्ताफळे

0
40

रविवारची पत्रे
राज्यसभेत भावपूर्ण निरोप दिल्यानंतर हमीदसाहेब मनातील आणि कॉंग्रेसला अनुकूल वाक्य वदले. ‘‘भारतात मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.’’ हमीद साहेब, आपण दहा वर्षे उपराष्ट्रपती पद उपभोगले कारण आपण सुरक्षित होते म्हणूनच ना! वाक्याचा कर्ता करविता कोण असेल? झाकीर हुसेन, फखरूद्दीन अली महमद यांच्यासारखे राष्ट्रपती झालेत. पाकिस्तानात झाला का कुणी हिंदू राष्ट्राध्यक्ष? तेथे तर फक्त ४ टक्केच हिंदू राहिले. भारतात सर्वच मुस्लिम सुरक्षित आहेत. कारण भारताची संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. इराण, इराक, सिरीया, लेबॅनन, अल्जेरिया, मोरोक्को या मुस्लिमबहुल राष्ट्रात सुद्धा इतके मुस्लिम सुरक्षित नाहीत. ओवैसी, अबु आझमी, अहमद पटेल, गुलाबनबी आझाद यांची जहाल टीका हिंदू पचवितात. मुस्लिम हिरो असलेले सिनेमे हिंदू आवडीने पाहतात. इफ्तार पार्टीत राजकीय पक्ष आवडीने भाग घेतात. ईदच्या वेळेस ईदमुबारक म्हणतात. जगात ५८ मुस्लिम देश आहेत. भारताइतके मुस्लिम कोणत्याच देशात सुरक्षित नाहीत.
‘‘अहो हमीद साहेब, नेपाळमधील मुस्लिमांवर चांगलीच बंधने आहेत. तेथील हिंदू त्यांच्या बद्दल अर्वाच्य वाक्य कधीही उच्चारीत नाहीत. मात्र इंडोनेशियातील मुस्लिम आणि हिंदू गुण्यागोविंदाने राहतात. हिंदूच्या बाली बेटात मुस्लिमांना त्रास नाही. हे मी स्वत: बाली बेटातील मुक्कामात अनुभवले आहे. भारतात सर्वच राजकीय पक्ष मुस्लिमांचा सन्मान करतात. इतका सन्मान, लाड, इतकी चांगली वागणूक असताना मुस्लिमांनी अयोध्येला होते तेथेच राममंदिर बांधण्याकरिता स्वखुषीने परवानगी दिली तर बिघडले कोठे? कोर्टाचं कामच नाही. परंतु काही स्वार्थी राजकीय नेते मुस्लिमांना फारच चढवतात. त्यानुसार प्रस्तुत वाक्य उच्चारले असावे.
प्रा. प्रभाकर अंबाडकर
९८८१००९६४२

सोनियाजी, डॉ. हेडगेवार, आप्पाजी जोशी यांची नावे ऐकलीत काय?
ऑगस्ट क्रान्ती (९ ऑगस्ट) दिनी पंतप्रधान मोदी भारताला स्वातंत्र मिळवून देणार्‍या क्रांतिकारक आणि देशभक्तांची नावे संसदेत घेऊन नतमस्तक होत होते. त्यांच्या कल्पनेचा भारत आज त्यांना उभा करायचाय. देश झपाट्याने विकासाकडे चालला असून, त्याचे प्रत्यंतर २०२२ मध्ये आपण पाहू शकता, असा आशावादी दृष्टिकोन त्यांनी मांडला. नेमके त्याचवेळी आपण रा. स्व. संघाला लक्ष्य करून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात या लोकांचा काडीचाही संबंध नव्हता, असे खोटे विधान केले. हे ऐकून सोनियाजी आपली कीव करावीशी वाटते.
संघसंस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. यवतमाळ जवळ त्यांनी देशभक्त मंडळींना घेऊन ‘जंगल सत्याग्रह’ केला होता. आप्पाजी जोशी हे महात्मा गांधींचे सहकारी होते. विदर्भ कॉंग्रेसची धुरा त्याकाळी आप्पाजींच्या खांद्यावर होती. विलायती कपड्यांची होळी करीत ते गावोगाव फिरलेत. याची कल्पना आपणाला नाही. आणि तसेही भारताचा इतिहास आपणाला कसा माहीत होणार? आपणाला इटालीचाच इतिहास माहीत नाही तर भारताचा रणसंग्राम कसा माहीत होणार?
सोनियाजी! स्वा. सावरकर सम्मेलनाच्या दृष्टीने युरोप प्रवासात असताना मी आमच्या सावरकर भक्तांसोबत पॅरिसला हॉटेल कॅपिटल इन मध्ये २ दिवस वास्तव्यास होतो. त्याचवेळी आपली संपूर्ण माहिती हस्तगत करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. झाकली मूठ सव्वालाखाचीच असू द्या. उगाच भाजपा, संघाची काहीही माहिती नसताना तोंडसुख घेऊ नका. तेथील ‘पोस्टा’ हॉटेलचे आपले काय संबंध होते? याची रेकॉर्ड वाजविण्याची वेळ आणू नका आणि नेहरू-गांधींची सत्ता गेल्यामुळे देशभक्तीचा आव आणू नका. ‘आयत्या बिळावर नागोबा’ असूनही भारतात आपणाला व आपल्या लेकराला (राहुल) मानानं जगायला मिळालं, हेच भारतीयांचे उपकार समजा. लिहून वाचलेल्या भाषणापेक्षा तुम्हाला आपले स्वत:चे विचार मांडता येत नाहीत, तरी भारतीयांनी आपणाला २० वर्षे नागरिकत्वही न स्विकारता देशात राहू दिले याविषयी आभार माना. संघाची तुुलना करण्याची आपली औकात नाही, हे ध्यानात घ्या.
किशोर वैद्य
९३७०९९८७०२

तिन्ही ठिकाणी संघ स्वयंसेवक
देशाच्या सर्वोच्च पदावर आजच्या युगात संघाचे स्वयंसेवक आहेत. सर्वोच्च पद प्राप्त करणे हे संघाच्या स्वयंसेवकाचे ध्येय मुळीच नव्हते, नाही. हिंदूराष्ट्राला परम् वैभवाचे स्थान प्राप्त करून देणे हेच संघाचे परम् ध्येय आहे. ‘भारत केवळ जमिनीचा तुकडा नाही भारत ही माता आहे.’ या राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेले संघ स्वयंसेवक समरसतेचा भाव घेऊन आपल्या कार्यक्षेत्रात निष्ठापूर्वक राष्ट्रकार्य करीत आहेत. संघ स्वयंसेवकाचे कार्यक्षेत्र कोणतेही असो. सामाजिक असो, राजकीय असो, सांस्कृतिक, क्रीडा, आर्थिक किंवा विदेशातील दायित्व असो, सर्वच कार्यक्षेत्रात संघ स्वयंसेवक निर्भिडपणे कार्य करीत आहेत. आजही संघ स्वयंसेवक आपल्या प्राणाची बाजी लावून संघ कार्य करीत आहेत. केरळमध्ये संघस्वयंसेवकांची मोठ्या प्रमाणात हत्या झाली. केरळमध्ये बलिदान झालेल्या संघ स्वयंसेवकाचे बलिदान वाया जाणार नाही. राष्ट्रविरोधी विचारांचा अंत होण्याचा नगारा वाजू लागला आहे. भारत भाग्याचा महासूर्य दशदिशांस तळपू लागला असून राष्ट्रविरोधी विचारांचा सर्वनाश होण्याच्या मार्गावर आहे.
राष्ट्रविरोधी इस्लामिक आतंकवाद तोंड काळे करून भारतीय सैन्यावर दगडफेक करीत आहे. भारताला आर्थिक गुलाम करू पाहणार्‍या चिन्यांची आमच्या शूर सैनिकांनी डोकलाममध्ये चांगलीच मुस्कटदाबी केली. काही दिवसातच भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून चीनचे आर्थिक नुकसान करण्याचा चंग बांधला. संघस्वयंसेवकांच्या राष्ट्रनिष्ठेमुळे संपूर्ण विश्‍व भारताच्या पाठीशी समर्थपणे उभे आहे. देशात विकास, समृद्धीचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशा राष्ट्रीय एकात्मतेच्या वातावरणात जातीवाद, भ्रष्टाचार, विघटनवादी, व्यक्तिवादी विचाराला थारा राहिला नाही. राष्ट्रभावना आधी महत्त्वाची हे लक्षात असावी. म्हणूनच संघ स्वयंसेवक म्हणतो. ‘‘मातृचरण की सेवा मे अब, जीवन अर्पित करना है| राह यही है लक्ष्य यही है, हमे निरंतर चलना है|
अमोल तपासे
नागपूर

गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ!
सार्वजनिक गणेशोत्सव, भाऊ रंगारी आणि लोकमान्य टिळक यावर एकत्रित रीत्या अनेक महाभागांनी आपली लेखणी चालविली, अजूनही चालवीत राहतील. विषय पुण्यातला, म्हणून महापौर मुक्ता टिळक यांनाही वादात आणले. यात एका मुद्याला बगल दिली गेली, ती म्हणजे, ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात कोणताही कायदा न मोडता लोकांना एकत्र आणण्यासाठी लोकमान्यांनी या उत्सवाकडे दिलेले लक्ष! तोच गाभा ठेवून त्यांनी या प्रथेची सुरुवात आणि जोपासना व प्रसार केला, हेच त्यांचे वेगळेपण आणि ओरिजिनालिटी! याबद्दल दुमत असण्याचे कारणच नसावे. तेव्हा स्वातंत्र्यलढ्यासाठी ‘गणेशोत्सव’ उत्सवाच्या माध्यमाचा मार्ग अवलंबिणारे लो. टिळक हेच या उत्सवाचे खरे संस्थापक, हे निर्विवाद सत्य कोणालाही नाकारता येणार नाही.
यासंबंधी अधिक चर्वितचर्वण करण्याची गरजच नाही आणि विषय वाढवायचा असेलच तर मग अजून मागे जाऊन पेशवेकाळात तसेच सांगली संस्थानाचा गणेशोत्सव विचारात घ्यावे लागतील, की ज्यांची सुरुवात १९ व्या शतकाच्या सुरुवातीला किंवा आधीच झालेली लक्षात येईल. मग इतर सगळे वाद बंदच होतील आणि पुन्हा स्वातंत्र्यप्राप्तीच्या हेतूने सुरुवात केलेल्या गणेशोत्सवाचे जनक म्हणून ‘लोकमान्य टिळक’ हेच नाव पुढे येईल. तेव्हा यंदा १२५ वर्षे पूर्ण करणार्‍या, स्वातंत्र्यप्राप्तीच्या हेतूने सुरू झालेल्या गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य टिळकांनीच रोवली, यावर दुमत नसावे.
महात्मा गांधींनी चरखा-टकळी हातात घेतली त्या आधी भारतात, नव्हे हिंदुस्थानात, कापूस-सूत-विणकाम हे शब्दच नव्हते की विणकरांचा व्यवसाय नव्हता? मग त्यांचेच नाव आणि चित्र खादी-ग्रामोद्योगसंबंधी कॅलेंडर, डायरी यावर कशाला हवे? भारतातल्या कोणाही सूतउद्योग-कर्मचार्‍याचे चित्र चालायला काय हरकत असावी? गांधी हे पेशाने वकील होते, विणकर नव्हते, हे विसरता कामा नये!
पण, स्वदेशीचा मुद्दा आणि देशातील बर्‍याच लोकांना ज्ञात असलेला व्यवसाय म्हणून गांधींनी तो आंदोलनासाठी वापरला. लोकमान्यांनी हा असा विचार बर्‍याच आधी केला, एवढाच फरक!
प्रमोद द. बापट
९८२३२७७४३९

दारूच्या दुकानांसाठी अभ्यास समिती!
न्यायालयाच्या आदेशानुसार बंद झालेली दारू दुकाने पुन्हा सुरू करण्यासाठी अभ्यास समिती नेमण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला आहे. ही दारूची दुकाने बंद झाल्यामुळे अवैध दारूविक्री वाढल्याचे पालकमंत्र्यांचे होमवर्क आहे. याचाच अर्थ, कायदा व सुव्यवस्था राखण्यात शासन अपयशी ठरत आहे, अशी कबुली पालकमंत्र्यांना द्यायची आहे का? वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक घरे सुखावली असतील. त्या घरांतील महिलांना, मुलांना अतिशय आनंद झाला असेल. परंतु, दुर्दैवाने पालकमंत्र्यांना या घरांतील सुख-आनंद दिसला नाही. तो अधिक वाढवण्यासाठी अभ्यास समिती नेमावी, असेही त्यांना वाटत नाही. एका चांगल्या न्यायालयीन आदेशाला हरताळ फासण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महसुलाचे मोठ्या प्रमाणाावर नुकसान होते, असे एक कारण सांगितले जाते. त्यासाठी उपाय म्हणून न्यायालयाचे आदेश अशा प्रकारे फिरविण्यापेक्षा, सरकारने न्यायालयांना काही विषयांवर निर्णय देण्यास मज्जाव करावा किंवा सरकारला विचारून न्यायालयाने निर्णय द्यावा, हे उत्तम!
पिनाक दलाल
नागपूर

शासकीय वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा वाढवावा
आजही आपल्या देशात शासकीय वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालये सर्वोच्च दर्जाची मानली जातात. असे असतानाही या महाविद्यालयांची संख्या वाढवण्यात आली नाही. यामागे राजकीय नेत्यांना कुरण उपलब्ध करून देण्याचाच सरकारचा उद्देश राहत आला आहे असे वाटते. खरे तर शिक्षणासारखे मूलभूत गरजेचे क्षेत्र खासगीकरणापासून अलिप्त राहायला हवे होते. परंतु, आजवर अनेक सरकारे आली आणि गेली. मात्र, सर्वांना गुणवत्तापूर्ण, समान आणि मोफत शिक्षण देण्यासंदर्भात फारशी पावले उचलण्यात आली नव्हती. उलट शिक्षणक्षेत्रात खासगीकरणाला प्रोत्साहन देण्याचेच प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे दुर्लक्ष केले गेते. परंतु, हे दुर्लक्ष संबंधित विद्यार्थ्याच्या कारकीर्दीवर कसा विपरीत परिणाम करू शकते, याचा विचार व्हायला पाहिजे. असे शिक्षण फक्त धनदांडग्यांसाठीच राहिले आहे. विशेषत: ऐपत असणार्‍यांनी खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घ्यायचे आणि तिथून पदव्या घेऊन समाजातील जिवांचे भवितव्य ठरवायचे, असा हा सारा प्रकार वाटतो.
सरकारी महाविद्यालये चालवण्याचा खर्च सरकार पेलू शकत नाही, असे कारण सांगितले जाते. परंतु, हे खरे कारण नाही. या महाविद्यालयांची संख्या वाढवल्यानंतर येणारा वाढीव खर्च पेलणे सरकारला कठीण नाही.
प्रा. मधुकर चुटे
नागपूर

एक छद्मी युद्ध!
समोरासमोरच्या लढाईत भारतासमोर आपला निभाव लागू शकत नाही, याची खात्री पटल्यामुळे पाकिस्तान, चीन-अरब देशांच्या मदतीने, भारतातील त्यांच्या हस्तकांकरवी भारताबरोबर छद्मी युद्ध खेळत आहे.
दुसरे छद्मी युद्ध! : समोरासमोरच्या निवडणूक लढाईत भाजपाप्रणीत रालोआसमोर आपला निभाव लागू शकत नाही, याची खात्री पटल्यामुळे कॉंग्रेसप्रणीत संपुआ, पाकिस्तान-चीन-अरब देशांच्या मदतीने, भारतातील त्यांच्या हस्तकांकरवी रालोआबरोबर छद्मी युद्ध खेळत आहे. असहिष्णुता, असुरक्षितता, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, पुरस्कार वापसी, नॉट इन माय नेम, गोहत्या समर्थन, गोरक्षाविरोध, अतिरेकी-नक्षलवादी-राष्ट्रद्रोही शक्तींना सक्रिय पाठबळ… अशी नानाविध हत्यारं वापरून मोदी सरकारला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करणे, जमलेच तर युद्धात ढकलून पराभूत करणे आणि त्यातून पुन्हा सत्तेवर येणे, हा कॉंग्रेस-डाव्यांचा कावा आहे. तशी सेटिंग झालेली आहे, अशी शंका घ्यायला भरपूर वाव आहे. यांच्या हालचाली संशयास्पद आहेत. अर्थात, या षडयंत्रात त्यांना यश येणार नाहीच. कारण आता राष्ट्रभक्त नागरिक जागा झाला आहे, हे त्यांनी पक्के ध्यानात ठेवावे. वंदे मातरम्!
सोमनाथ देविदास देशमाने
९४२१६३६२९१

‘ब्लू व्हेल गेम’चे थैमान
ब्लू व्हेल गेमने सध्या भारतात थैमान घातले आहे. या गेमने केव्हा शिरकाव केला हे समजलेच नाही. मुलांचे जीव जायला लागले व आम्हाला जाग आली. रशियात मानसशास्त्राच्या एका व्यक्तीला शाळेतून काढून टाकले व त्याने सूड भावनेने हा खेळ निर्माण केला. सध्या तो तुरुंगात असला, तरी या गेमचे व्हायरस जगभर पसरले आहे. हा गेम मोबाईल, व्ही. डी.ओ. या साह्याने खेळता येतो. हा गेम खेळायला पैसे लागत नाही. या गेमची सुरुवात सकाळी ४.३० वाजता होते. तुम्हाला ५० दिवस गेमने सांगितल्याप्रमाणे काम करावे लागते. खेळामध्ये प्रथम उंच इमारत वगैरे कुणाचेही सहकार्य न घेता चढणे नंतर हाता-पायावर ब्लेडने जखमा करणे, आईवडिलांना नाकारणे व शेवटी आत्महत्या करणे. पुन्हा पुन्हा बघितले की हा गेम खेळण्यास आपण प्रवृत्त होतो व व्यसन जडते. इतर व्यसने लक्षात येतात परंतु या खेळाचा शेवट झाल्यावरच लक्षात येते. हा गेम लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत खेळल्या जातो. अनेकांनी आत्महत्या केल्यात. मुंबईत एका १६ वर्षांच्या मुलीने उंच इमारतीवरून उडी घेऊन गेमचा शेवट केला.
आजकाल कुटुंब मर्यादित आहे. आईवडील दोघेही कामावर जातात. घरातील अपत्य मोबाईलवर किंवा व्ही. डी. ओ. गेम खेळून स्वत:चे मनोरंजन करतात. खेळण्यात एवढे मग्न होतात की, त्यांना जेवणाचे सुद्धा भान रहात नाही. आजची मुले हुशार व जिज्ञासूवृत्तीचे आहेत. त्यातून या खेळाची लागवड होते. पूर्वी मोबाईल नव्हते. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलांवर घरच्यांचेच नव्हे तर शाळेतील शिक्षक समाजातील लोकांचे लक्ष असायचे. आजच्या फास्ट जीवनात कुणालाच कुणासाठी वेळ नाही. कुणी काही सांगितले तर त्यावर विचार करण्याची मानसिकता नाही. पालकांनो! या ब्लू व्हेल गेमपासून तुमच्या पाल्यांना दूर ठेवा. ते मोबाईलवर कोणते गेम खेळतात यावर नजर असू द्या. मुलांचा मोबाईल चेक करणे म्हणजे त्यावर अविश्‍वास दाखविणे नव्हे. आता तर सरकारनेच हा गेम लोड होणार नाही, अशी व्यवस्था सर्व नेट संस्थांनी करावी, असे आवाहन केले आहे.
निर्मला गांधी
९४२१७८०२९०