सामना व ग्लोबल टाइम्समध्ये ‘मोदीस्पर्धा!’

0
105

दिल्ली दिनांक
चिनी सेनेचा ग्लोबल्स टाइम्स नरेंद्र मोदी यांच्यावर एवढी जहाल टीका का करीत आहे? या प्रश्‍नाचे उत्तर आहे, सामना आणि ग्लोबल्स टाइम्स यांच्यात स्पर्धा सुरू आहे. मोदी यांच्यावर जहाल टीका कोण करतो, याची ही स्पर्धा आहे. यात कधी सामना बाजी मारतो, तर कधी ग्लोबल टाइम्स! या दोन्ही वृत्तपत्रांमध्ये एक समानता आहे. दोन्ही वृत्तपत्रे- मुखपत्रे आहेत. एक बीजिंगमधील सेनेचे आणि दुसरे मुंबईतील सेनेचे!
लष्करी कारवायांचा प्रचार केला जात नाही, हे साधे भानही ग्लोबल टाइम्सला राहिलेेले नाही. चीनच्या सीमावर्ती भागात युद्धतयारी केली जात आहे, रक्तपेढ्या सीमावर्ती भागात हलविल्या जात आहेत, असा प्रचार ग्लोबल टाइम्सकडून केला जात आहे आणि त्याच वेळी मोदी हे भारताला युद्धाकडे नेत आहेत, असा आरोपही लावला जात आहे. म्हणजे रक्तपेढ्या स्थापन करीत आहे चिनी सेना आणि भारताला युद्धाकडे नेत आहेत नरेंद्र मोदी! अर्थात, ग्लोबल टाइम्सचा हा प्रचार आहे. अगदी याच धर्तीवर सामनाचा प्रचार सुरू आहे. सामनाकारांना प्रत्येक ठिकाणी मोदी दिसतात. पण, मोदी सरकारमधून बाहेर पडण्याचे साहस त्यांना होत नाही.
मोदी थंड
चीनचा थयथयाट सुरू असताना, मोदी १५ ऑगस्टच्या भाषणात त्याला उत्तर देतील, असे काहींना वाटत होते. मात्र, मोदी या विषयावर काहीच बोलणार नाहीत, असे स्पष्ट जाणवत होते. मोदी, डोकलाम प्रकरणी एक अक्षरही बोलले नाहीत. मोदी यांनी आपल्या भाषणात चीन व पाकिस्तान यांचा उल्लेखही केला नाही. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणजे पीएलएचा वर्धापनदिन साजरा करताना चिनी राष्ट्रपती झी जिनपिंग लष्करी गणवेषात होते. हाती बंदूक घेऊन ते तेथूनच सीमेवर जाणार असे वाटत होते. मात्र, झी जिनपिंग सीमेवर म्हणजे डोकलामला न जाता आपल्या महालात परतले. नंतर १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनासाठी चीनचे उपपंतप्रधान उपस्थित होते. चीन-पाकिस्तान मैत्री कशी पोलादी आहे, असे दोन्ही देशांकडून सांगितले गेले. मोदी यांनी याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही, हे बरे केले. आपल्या सैन्याची, आपल्या धमक्यांची भारत दखल घेत नाही, याचे चीनला खरे दु:ख आहे. आपल्या कोणत्याच विधानाचा भारतावर परिणाम होत नाही, याची जाणीव झाल्याने तो दररोज नवनव्या तंत्राचा अवलंब करत आहे. त्यातूनच त्याने, आमच्या रक्तपेढ्या सीमावर्ती भागात नेल्या जात असल्याचे वृत्त प्रसारित केले. आता आम्ही स्ट्रेचर नेत आहोत, बँडेज नेत आहोत, ऑक्सिजनचे सिंलेडर नेत आहेत, अशा बातम्या देणार आणि त्या प्रसिद्ध झाल्या की सामनाकार, पाहा! मोदीजी! चीन कशी तयारी करीत आहे, तुमची तयारी आहे काय, असा लेख लिहिणार! सामना असो की ग्लोबल टाइम्स, या दोन्हींचा मोदींवर परिणाम होणार नाही. कारण, युद्धाची तयारी अग्रलेख लिहून होत नसते, ती करण्याचे स्थान वेगळे असते, हे मोदी जाणून आहेत.
माघारीची संधी
श्यामसरण हे भारताचे माजी पररराष्ट्र सचिव आहेत. काही काळ ते भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही होते. त्यांनी चीनबाबत फार चांगले आकलन केले आहे. चीन डोकलाममध्ये काहीही करणार नाही, तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई करू शकतो, असे प्रतिपादन केले आहे. जे योग्य आहे. भारताने भूतानमध्ये सैन्य तैनात केले आहे, मग आम्ही काश्मीरमध्ये करू, अशी चीनची भूमिका आहेच. त्यानुसार चीन पाकसीमेवर काहीतरी गडबड करण्याची शक्यता असल्याचे श्यामसरण यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेला अनेकांचा पाठिंबा आहे. कारण, डोकलामध्ये काहीही करणे चीनला परवडणारे नाही. तेथे सरळसरळ युद्ध सुरू होईल. चीन ते सुरू करण्याच्या तयारीत नाही.
डोलकाममध्ये लवकरच हिवाळा सुरू होईल. चीन त्याची प्रतीक्षा करीत असल्याचे म्हटले जाते. एकदा का हिवाळा सुरू झाला की, मग आपोआपच वातावरण निवळते. रस्त्याचे बांधकाम बंद होेते. चीनची साधनसामुग्री माघारी बोलविली जाते आणि भारतीय सैन्यही मागे घेतले जाते. चीन नेमक्या या स्थितीची वाट पाहात आहे. तोपर्यंत आपल्या सैनिकांचे-जनतेचे मनोरंजन करण्यासाठी ग्लोबल टाइम्समधून धमकीतंत्र सुरू ठेवले जात आहे- अगदी आपल्या सामनाकारांप्रमाणे!
मर्मावर बोट!
मोदी यांनी आपल्या भाषणात काश्मीर समस्येच्या मर्मावर बोट ठेवले- ‘‘काश्मीर समस्या, ना गालीसे, ना गोलीसे, गले लगानेसे हल होगी.’’ असे विधान त्यांनी आपल्या भाषणात केले. जे अगदी नेमके आहे. काश्मीरमध्ये हिंसाचार करणार्‍यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे, तो केलाही जात आहे. मात्र, सोबतच काश्मिरी जनतेच्या दु:खावर मलम लावण्याची गरज आहे, त्यांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्याची गरज आहे, असे त्यांनी सुचविले आहे. पंतप्रधानांच्या १५ ऑगस्टच्या भाषणाचा हा सर्वात महत्त्वाचा भाग असल्याचे मानले जाते. भारताचे युद्ध फक्त अतिरेक्यांशी आहे, काश्मिरी जनतेशी नाही, असे पंतप्रधानांना एक प्रकारे सुचवायचे आहे.
ताजी चाचणी
कोणत्याही सरकारची- नेत्याची लोकप्रियता वर्ष-दोन वर्षांनंतर ओसरू लागते, असा आजवरचा इतिहास आहे. मोदी त्याला अपवाद ठरावेत. ताज्या जनमत चाचणीने ते दाखवून दिले आहे. आज निवडणुका झाल्यास मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला २९८, तर भाजपा आघाडीला ३४९ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जानेवारी महिन्यातील चाचणीत भाजपा आघाडीला ३३० जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. म्हणजे मागील वर्षभरात मोदींच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांनी नेहरू-इंदिरा गांधींनाही मागे टाकले आहे! मोदी सरकारचे चौथे वर्ष सुरू झाले असले, तरी त्यांच्या लोकप्रियतेला आहोटी लागण्याचे सोडा, ती दिवसेंदिवस वाढत आहे आणि ही एक आश्‍चर्यकारक बाब आहे. दुसरीकडे, कॉंग्रेसच्या जागा तीन वर्षांत तीनने वाढतील असे सांगण्यात आले आहे. २०१४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. २०१७ च्या या चाचणीत कॉंग्रेसला ४७ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कॉंग्रेसच्या प्रगतीचा हाच क्रम राहिल्यास, लोकसभा निवडणुकीत पक्षाला अर्धशतकही गाठता येणार नाही, तर भाजपा मात्र तिहेरी शतक गाठू शकते. पण…
अर्थात, हे झाले जनमत चाचणीचे. १२५ कोटींच्या देशात १२ हजार लोकांच्या चाचण्या घेऊन निष्कर्ष काढण्यात आले आहेत. अशा चाचण्यांवरून जनमताचा कल कळतो, कौल नाही. २०१९ चा कौल मोदी यांना मिळू शकतो. आज तरी देशातील वातावरण तसे आहे. समर्थ नेतृत्व व स्वच्छ नेतृत्व या दोन कसोट्यांवर भाजपा व मोदी यांना नव्याने जनादेश मिळू शकतो. जी राज्ये भाजपाची म्हणून ओळखली जातात, तेथे भाजपा आजच शिखरावर आहे. उत्तरप्रदेश, हरयाणा, दिल्ली, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक या ठिकाणी भाजपासमोरील आव्हान आपल्या जागा कायम ठेवण्याचे आहे. मात्र, केरळ, ओरिसा, तामिळनाडू, पंजाब, बंगाल या राज्यांत भाजपाच्या कामगिरीत सुधारणा होऊ शकते. जनमताचे काही सांगता येत नाही. जनमताचा लंबक कधी एकीकडे असतो, तर काही काळात तो दुसरीकडे गेेलेला असतो. मधली स्थिती त्याला माहीत नसते. २०१७ मध्ये आजतरी जनमताचा लंबक भाजपाकडे, मोदींकडे निश्‍चित, निर्विवाद, निर्णायकपणे झुकला आहे…!
रवींद्र दाणी