वर्धेत महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनचा राज्यस्तरीय मेळावा

0
146

तभा वृत्तसेवा
वर्धा, १३ ऑक्टोबर
महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनच्यावतीने राज्यस्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते ४ वाजेपर्यंत स्थानिक आकरे मंगल कार्यालय आर्वी रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्याचे उद्घाटन वित्त, नियोजन व वनमंत्री तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी ममोकाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष रमेश पाटील राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, भाजपा महामंत्री रामदास आंबटकर, खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, विदर्भ प्रांत संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, रवींद्र हिंमते उपस्थित राहतील.
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग मागील फरकासह द्यावा, रा. प. कामगारांना राज्य सरकारी कर्मचारी घोषित करावे. दिवाळीपूर्वी ५ हजार अंतरीम वाढ पगारात लागू करावी, दिवाळी भेट म्हणून सर्व कामगारांना ५ हजार रुपये द्यावे, कनिष्ठ कामगारांना मागील आर्थिक लाभ देऊन कनिष्ठ कामगार पद्धत रद्द करावी, चालक-वाहक-यांत्रिक व इतर प्रवर्गातील कामगारांना न्याय द्यावा. तसेच वाहकाचे अपहार प्रकरणी निघालेेले दंडात्मक परिपत्रक रद्द करावे, निवृत्त कामगारांना ५०० रुपये भरून वार्षिक प्रवास पास द्यावी, महिला कामगारांना शासनाच्या धर्तीवर सोई सवलती द्याव्यात, शिस्त व आवेदन पद्धती अधिकार्‍यांचा मनमानी कारभार बंद करावा. चालक-वाहकांना उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता कायम स्वरूपी लागू करावा. कर्मचार्‍यांचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख व वारसदारास अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी, या मागण्या मेळाव्यातून करण्यात येणार आहेत. मेळाव्याला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विठ्ठल फाळके, दिलीप पंचगडे, रवी सातपुते, विकास वरघणे, सचिन चांदेकर, मोहित पात्रीकर, किशोर लोणारे, आशिष बाळसराफ, आदींनी केले आहे.