गाईच्या शेणापासून डास निर्मूलक धूपबत्ती

0
262

•गाय आहे तर काय नाही..!
नितीन शिरसाट
बुलढाणा, २३ ऑगस्ट
कुणी चुकीचे वागले तर ‘तुझी अक्कल काय शेण खाला गेली होती का?’ असे विचारले जाते, मात्र अक्कल असेल शेणाचा उपयोगही अमृतासारखा करता येतो, याचा प्रत्यय जलंब येथील शेतकरी उद्धव नेरकर यांनी दिला आहे. गोवंश पालनातून मच्छर पळविणार्‍या सुरभी मच्छर कॉईलची निर्मिती शिवाय धुपबत्ती, दंन्तमंजन, गोनाईल, चेहर्‍यासाठी रूपनिखार, डोकेदुखी साठी सुरभी बामची निर्मिती करून स्वदेशी गोसेवा प्रकल्प त्यांनी सुरू केला आहे. सुशिक्षित तरूणांना स्वदेशीच्या माध्यमातून स्वयंरोजगार देणारा हा प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यातील जलंब येथे सुरू करण्यात आला आहे. सुरभी सेवा बहुउद्देंशीय संस्थेच्या माध्यमातून सहा वर्षांपासून शिक्षा, स्वाथ्य, सदाचार, स्वालंबन, स्वदेश या आधारावर सेंद्रीय शेती ग्रामउद्योगच्या माध्यमातून अनेक युवकांना प्रशिक्षण दिले जात आहे.
उद्धव नेरकर यांच्याकडे वडिलोपार्जीत नऊ एकर कोरडवाहु शेती आहे. सोयाबीन, तूर, मुग व इतर पारंपारीक पिके घेण्याकडेच त्यांचा कल असायचा. मात्र उद्धव यांचे वडील नागपुरातल्या प्रसिद्ध गोअनुसंधान संस्थेत व्यवस्थापक असल्याने त्यांच्याकडे गोपूजा, गोसंस्काराचे वातावरण आहे. एम. ए. अर्थशास्त्र पर्यतचे शिक्षण घेऊन उद्धव हे शेती व शेतीपूरक व्यवसायातून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल याच प्रयत्नात असायचे. नानाजी देशमुख यांच्या शिक्षा, सदाचार, स्वालंबन या विचाराने प्रेरित होऊन कृषीउद्योजक होण्याचे स्वप्न उद्धव नेरकर यांनी छोट्या प्रकल्पातून साकार केले आहे.
देशी गायीच्या गोमुत्र तथा कडुलिंबाच्या पानाच्या भुकटीचा वापर करत किड नियंत्रणाचा यशस्वी प्रयोगसुद्धा ते करत आले आहेत. उद्धव पुर्णपणे सेंद्रीय शेती करतात. त्यांनी प्राकृतिक चिकित्साविषयक अभ्यासक्रम नवी दिल्लील येथून केला आहे. दरम्यानच्या काळात कुणीतरी त्यांना कुटीर उद्योगांच्या प्रशिक्षणासाठी मार्गदर्शनासाठी प्रसिद्ध असणार्‍या वर्धा येथील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था (एमगिरी) या संस्थेविषयी माहिती दिली. पूर्वीच्या काळी मच्छर, माशा घालण्यासाठी गावखेड्यात शेणाची गोवरी, कडुनिंबाचा पाला, राळ आदीचा वापर करत. याच संकल्पनेचा आधार येत उद्धव यांनी एमगिरीमध्ये पर्यावरणपुरक गायीच्या शेण, गोमुत्रापासून बनणार्‍या मच्छर, कॉईलचा लघु उद्योगाचे प्रशिक्षण घेतले.
गावात आल्यानंतर गावालगत त्यांनी सेंद्रीय पद्धतीच्या शेण व गोमुत्राचा वापर करून जैविक खताची निर्मिती करून भाजीपाला वर त्याचा प्रयोग केला. आज रोजी या जागेत ते दहा देशी गायींचे संगोपन करतात. मच्छर कॉईल युनिटसाठी लागणारा कच्चा माल जसे की, गायीचे शेण, गोमुत्र, कडुनिंबाचा पाला निंबोळ्या आदीची साठवणूकसुद्धा याच ठिकाणी करतात. त्यातून वीस जणांना स्वयंरोजगार उपलब्ध झाला आहे. सेंद्रीय शेतीसाठीचे शेणखत तथा याच आवारात उभे केलेले गांडुळखत युनिटदेखील ते चालवतात.