बाप्पा, बाप्पा! १० एकरात ‘गणपतिधाम’

0
70

एक हजार मूर्तीं, इमारतही गणपतीच्याच आकारची
प्रफुल्ल व्यास
वर्धा, २४ ऑगस्ट
भक्ती ही वेडच असते… त्याने डोळे उघडे ठेऊन पाहिले तरीही त्याला श्रीगणेशच दिसायचा अन् डोळे बंद केले तरीही आत हृदयाच्या गाभार्‍यात गणेश मूर्तीच दिसायची! गेला तिथे तो गणेशमूर्ती शोधायचा अन् मग ती घरी आणायचा. जगाच्या पाठीवर अनेक देशात तो बाप्पांसह अन् बाप्पांसाठी फिरला. त्याची ओळखच मूळात ‘गणपतीवाला’ं अशीच झाली.
‘गणपतीधाम’ साकारण्याच्या कल्पनेने तो झंकारला. २००३ मध्ये ब्ल्यू प्रिंट तयार झाली. गणेशाचा २१ हा शुभ अंक लक्षात घेऊन २०२१ मध्ये नॅशनल कल्चरल पार्क या संकल्पनेतून जिल्ह्यात जगाच्या पाठीवर एकमात्र ठरणारे गणपतीधाम साकारण्याचा संकल्पच गणपतीवाल्या वर्ध्यातील समीर शेंडे या उच्च शिक्षण घेतलेल्या युवकाने केला आहे.
शिक्षण बी.ई ऑटोमोबाईल, बीए गांधीयन थॉटमध्ये… मृदूभाषी असलेले वर्ध्यातील समीर शेंडे यांना चवथ्या वर्गापासूनच मातीच्या गणपती मूर्ती बनवण्याचा छंद लागला. पुढे एनसीसी कॅम्पसाठी गेला तिथून त्याने गणपतीची मूर्ती सोबत आणली. तीन प्रकारची माती आणि कापसापासून नव्याने गणपती मूर्ती तयार करून त्या तो संग्रहालयात ठेवू लागला. दरम्यान, त्याच्याकडे देश-विदेशातील गणपतीच्या मूर्तीही जमा होऊ लागल्या. त्या मूर्तींचे देश-विदेशात १५ ठिकाणी प्रदर्शन भरविले. २०००-०१ मध्ये टिटवाळा येथे गजानन महाराज पुंड शास्त्री यांची भेट झाली. त्यांच्या मार्गदर्शनानंतर खरा त्याची गणेशभक्ती ध्यास आणि अभ्यास या दोन पातळ्यांवर गतीमान झाली. २००५च्या ‘गणेशकोषा’त त्याचा गणेशभक्त म्हणून उल्लेख झाला. हा कोष राम शेवाळकर यांनी घरी बोलवून भेट दिला. त्याच्याकडे शेकडो गणेशमूर्ती जमा झाल्या. पैकी काही अभ्यासकांना दिल्या. आता त्याच्याकडे विदेशी मूर्तींसह ३५० आहेत. काही मूर्ती आपण रामटेक येथील रामधाम येथेही भेट दिल्या. गणपतीची संपूर्ण माहिती असलेले मंगलमूर्ती हे पुस्तकही त्यांनी लिहिले.
जगभरात गणेशस्थळांना भेटी दिल्यावर या प्रकल्पाची कल्पना त्याच्या डोक्यात आली. त्यातून ‘नॅशनल कल्चरल पार्क’ची संकल्पना साकारली. या पार्कची इमारत गणपतीच्या आकाराची असेल. गणपतीच्या दोन्ही पायाजवळ पाणी, डाव्या पायातून त्या इमारतीत प्रवेश करून उजव्या पायातून बाहेर निघता येईल. या इमारतीचे मुख्य आकर्षण गणपतीच असेल सोबत जगाला अध्यात्म सांगणारे २१ संत, १० सांस्कृतिक शहरे, भारतातील १० वास्तू, दहा मंदिर, भारतीय वेशभूषा… म्हणजे या पार्कमध्ये संपूर्ण भारत सामावलेला असेल. त्यासाठी शासनापासून सर्वच स्तरावर त्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जुन्या गणपती मंदिरांमध्ये गणपतीचे संग्रहालय तयार करायचे असेल त्यांना आपण मदत करू, असे समीर म्हणाला. गणपती संग्रहालयासाठी शिर्डी संस्थानेही जागा उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

SHARE
Previous articleअग्रलेख
Next article