नचिकेता ः एक तेजस्वी युवक

0
51

कल्पवृक्ष
कठोपनिषदात नचिकेता या एका तेजस्वी बालकाची गोष्ट आहे. कदाचित जगातील तो पहिला संशोधक असावा! प्रचंड निर्धाराने तो साक्षात यमाला वश करतो आणि आत्मज्ञानाचे रहस्य प्राप्त करतो. या दोघांमधला संवाद भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया आहे. विवेकानंद म्हणाले होते, नचिकेतासारखे बोटावर मोजण्याइतके तरुण तयार झाले तर या देशाचा इतिहास बदलेल.
नचिकेताचे वडील उद्दालक यांनी एकदा विश्‍वजित नावाचा यज्ञ केला. या यज्ञात सर्व संपत्ती दान करायची असते. त्या काळात गायी हेच मुख्य धन होते. उद्दालकाने अनेक गायी दान केल्या. पण, दान केलेल्या गायी दूध न देणार्‍या, वांझ व निरुपयोगी आहेत, हे नचिकेताच्या लक्षात आले. वडिलांनी चांगल्या गायी व संपत्ती लपवून ठेवली आहे. सर्वस्व दान केल्याचे ते नाटक करत आहेत. खोटा मोठेपणा मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा अप्रामाणिकपणा नचिकेताला अमान्य आहे. साधारणतः आपण पाहतो अप्रामाणिकपणा कुटुंबातच शिकवला जातो. वडील मोबाईलवर खोटे बोलत आहेत, हे मुलगा पाहात असतो. नंतर तोही तसेच करतो. पण, नचिकेता मात्र वेगळ्या पद्धतीने हे वडिलांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतो, तो म्हणतो, ‘‘पिताजी, यज्ञात सर्वस्व दान करायचे असते ना? मग तुम्ही मला कुणाला दान करणार आहात?’’ या प्रश्‍नाने तरी वडिलांना चूक कळेल, असे त्याला वाटते. पण, वडील दुर्लक्ष करतात. तो पुन:पुन्हा तोच प्रश्‍न विचारतो. शेवटी त्यांना राग येतो. ते म्हणतात, ‘‘मृत्यवे त्वा ददामीति- जा तुला मृत्यूला दान देतो.’’ आपणही रागाने कधी म्हणतोच, ‘‘जा, मर एकदाचा.’’ उद्दालक एक प्रस्थापित व्यवस्था आहे. नचिकेता त्या व्यवस्थेचा खरा चेहरा समोर आणणारा नव्या रक्ताचा बंडखोर आहे. सत्य बोलणार्‍यांना नेहमीच अशा क्रोधाचा सामना करावा लागतो. बहुदा ते आपल्या परिवारातीलच असतात, हे नचिकेतापासून व्हाया महाभारत आजपर्यंत घडत आले आहे. भीष्म, द्रोणासारखा नचिकेता मौन बाळगत नाही.
वडिलांचे शब्द आज्ञा मानून तो निर्भयपणे साक्षात यमाकडे जातो. वडील अडवतात. तो पुन्हा त्यांना आठवण करून देतो. आपल्या पूर्वजांनी कधीही शब्द मोडला नाही. तुम्हाला शब्द मोडू देणार नाही. शेवटी त्यांना परवानगी द्यावीच लागते. यमापासून सगळे दूर पळतात. पण, नचिकेता मात्र यमाकडेच प्रवासाला निघाला. तेथे पाहोचल्यानंतर यम बाहेर गेला असल्याचे त्याला कळले. चला, बरे झाले, असे म्हणून तो परत आला नाही. यमाला भेटल्याशिवाय परत जायचेच नाही, असा त्याचा दृढनिश्‍चय होता. तीन दिवस अन्नपाण्यावाचून यमाची वाट पाहात तो तेथे दरवाजातच बसला. जवळपास कुठे खाण्यापिण्याची सोय होते का, हे पाहण्यासाठी तो गेला नाही. यमाची भेट होईपर्यंत काहीही ग्रहण करणार नसल्याचे त्याने सांगितले. एकच मिशन, एकच ध्यास त्याच्या डोळ्यांसमोर होता. यमाला, आल्यानंतर सर्व माहिती कळली. त्याचा वज्रनिर्धार पाहून तो प्रसन्न झाला. तीन दिवस अन्न सेवन न करता आपल्याकडे या अतिथीने निवास केला. त्यामुळे यमाने त्याला तीन वर मागण्यास सांगितले. पहिला वर मागताना नचिकेता म्हणाला, ‘‘माझ्या वडिलांचा क्रोध शांत व्हावा. माझ्यावरचे त्यांचे प्रेम कायम राहावे. त्यांचे कल्याण व्हावे.’’ यमाने हा वर दिला. नंतर नचिकेता म्हणाला, ‘‘स्वर्गातील लोक दुःखापासून मुक्त असतात. आनंद उपभोगतात. त्याचे कारण म्हणजे अग्निविद्या. ती अग्निविद्या मला सांगा.’’ यमाने त्याला अग्निविद्येचे रहस्य उलगडून सांगितले. यमानेही मोठ्या तपस्येने ती विद्या प्राप्त केली होती. त्यामुळे सहजपणे द्यायला तो तयार नव्हता. पण, नचिकेताच्या आग्रहामुळे त्याला द्यावी लागली.
इतकेच नव्हे, तर ही विद्या नचिकेताच्याच नावाने प्रसिद्ध होईल, असा वर दिला. नचिकेताने स्वतःकरिता काहीही मागितले नाही. पहिला वर वडिलांकरिता होता. दुसरा समाजाकरिता होता. समाजात स्वर्ग निर्माण करायचा असेल, प्रगती करायची असेल, तर ऊर्जेची आवश्यकता असते. ऊर्जा आणि ते निर्माण करण्याचे तंत्रज्ञान म्हणजे अग्निविद्या.
नचिकेताच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे यम प्रसन्न होता. नचिकेताच्या संयमित, शांत, नम्र, तरीही ठाम विचारांमुळे तो प्रभावित झाला. त्याने तिसरा वर मागण्याची सूचना केली. नचिकेता म्हणाला, ‘‘मला जन्ममृत्यूचे रहस्य सांगा. या समग्र अस्तित्वाच्या मागे कोणते तत्त्व आहे? मला आत्मतत्त्वाचे ज्ञान हवे आहे.’’ हा वर ऐकून यम थक्क झाला. यम म्हणाला, ‘‘हा वर सोडून तू दुसरा कोणताही वर माग.’’ पण नचिकेताने साफ नकार दिला. यमाने त्याची कठोर परीक्षा घेण्याचे ठरवले.यमाने आयुष्य, संपत्ती, गायी, हत्ती, घोडे, सुवर्ण, भूमी असे कितीतरी पर्याय त्याच्यासमोर ठेवले. पण, नचिकेताने नकार दिला. पृथ्वीचे साम्राज्य, स्वर्गातील अप्सरा देतो, असेही सांगितले. पण, नचिकेता आपल्या भूमिकेपासून जराही ढळला नाही. कोणत्याही मोहाला बळी पडला नाही. ज्ञान मिळविण्याची तीव्रतम उत्कट इच्छा पाहून शेवटी यमाने त्याला आत्मज्ञान दिले. येथूनच खर्‍या अर्थाने कठोपनिषदाला प्रारंभ होतो. ही गोष्ट वाचताना भगवान बुद्ध आणि भगवान महावीराची आठवण होते. ज्ञानप्राप्तीकरिता दोघांनीही सत्ता व राजमहालाचा त्याग केला होता. मनुष्यासमोर रोजच श्रेयस (श्रेष्ठ) आणि प्रेयस (प्रिय) असा संघर्ष उभा राहतो. जो श्रेयसची निवड करतो, त्याचे जीवन सार्थक होते. प्रेयसची निवड करणारा फक्त उपभोगाच्या वाटेवर जातो. प्रेयसपासून सुरू झालेला यम-नचिकेताचा संवाद आत्मतत्त्वापर्यंत जाऊन पोहोचतो.  मृत्यूवरही विजय मिळवणारे, साहसी, दृढनिश्‍चयी, चंगळवादात न फसणारे, समाजाच्या विकासाकरिता तंत्रज्ञान हस्तगत करणारे, आत्मज्ञानी म्हणजे आत्मिक विकासाचे सर्वोच्च शिखर गाठणारे, नचिकेतासारखे तेजस्वी युवक ही कोणत्याही राष्ट्राची गरज असते.
रवींद्र देशपांडे 
८८८८८०३४११