भेद मनातून हद्दपार व्हावा…!

0
64

चौफेर
मागासले फक्तआम्हीच आहोत? छे! सारे जगच त्या वळणावर जगते आहे. सामाजिक भेदाचे जे रंग कधीकाळी इथल्या समाजाने अनुभवले अन् उर्वरित जगाने आमची छी, थू केली, त्या कथित प्रगत देशांना अजूनही वर्णभेदाच्या भिंती तोडून बाहेर येता आलेले नाही, ही तर वस्तुस्थिती आहे. अमेरिकेत कायदा तयार झाला, तरी वर्णाने काळ्े असलेल्या माणसांची परिस्थिती फार सुधारल्याचे चित्र नाही अन् मुस्लिम देशात पुरुषांच्या तुलनेत महिलांची अवस्था उन्नत झाल्याचे दृश्यही बघायला मिळत नाही. तिकडे निम्न दर्जाची कामे प्रामुख्याने काळ्या माणसाच्याच वाट्याला येतात अन् कित्येक देशात महिलांच्या शिक्षणाचा अधिकार अगदी एकविसाव्या शतकातही मान्यताप्राप्त ठरलेला नाही. सान-थोर, गरीब-श्रीमंत, ग्रामीण-शहरी, काळा-गोरा या भेदाला तर कुठलाच समाज अपवाद नाही. देश कुठलाही असू देत, गरिबांच्या वाट्याला येणारी हेळसांड कुठे टळली आहे? वॉशिंग्टनमधल्या सार्वजनिक बागांमधून दिसणारी भिकार्‍यांची गर्दी अन् भारतातल्या सिग्नल्सवर गाड्या थांबल्या की काचांच्या आत डोकावण्याचा प्रयत्न करणारे हतबल चेहरे, यात अंतर कुठल्या फुटपट्‌टीने मोजायचे? भारतीय समाजमनात रुजलेली जातिभेदाची भावना हद्दपार करण्याचे प्रयत्न गेली कित्येक वर्षे चालले आहेत. हा समाज त्या दृष्टीने सकारात्मकही आहे. पण, स्वत:ला जगाच्या सर्वोच्च स्थानी मानणार्‍या देशांमध्ये तरी मनामनांत रुजलेला भेदभाव संपलाय् कुठे अद्याप?
परवा मॅनहॅटनमधल्या एका हॉटेलमध्ये एका चिनी माणसाची वेटरद्वारे टर उडविली जाण्याचा प्रकार घडल्यानंतर समोर आलेले माफीनामा प्रकरण अन् त्यानंतर झालेली त्या वेटरची हकालपट्‌टी… सारेच अजब आहे. खरे ना? अमेरिकेतल्या एका शहरातल्या एका कोपर्‍यावरच्या रेस्टॉरंटमध्ये येऊन बसलेल्या एका चिनी ग्राहकाबद्दल तिथल्या एका सामान्य वेटरच्या मनात एवढा दुस्वास असण्याचे कारण काय असावे? बसके नाक, वर आलेले डोळे, फुगलेले गाल… मानवी शरीराच्या या नैसर्गिक ठेवणीवर एका वेटरने हसावे? पण, मग अफ्रिकेतल्या गडद काळ्या रंगांच्या माणसांकडे पाहून तर हसत नाही कुणीच. हो! त्यांच्याशी भेदभाव होतो. त्यांना कामे निम्न दर्जाची दिली जातात, अगदी त्यांना गुलामासारखेही वागवले गेले कधीकाळी. असे असले तरीही त्यांचा रंग हा कुणाच्या हसण्याचा विषय झाला नाही कधी. मग मॅनहॅटनच्या कॉर्नरस्टोन कॅफेमध्ये बसलेल्या त्या ग्राहकावर त्या वेटरला का हसावेसे वाटावे? त्याच्या पावतीवर नाव लिहिण्याऐवजी ‘चिंग चॉंग’ असे काहीसे खरडण्याची गरज त्याला का वाटावी? की चिनी माणसांबद्दलचा द्वेष यानिमित्ताने त्याच्या वागण्या-बोलण्यातून व्यक्त झाला?
जाती-धर्मावर असो वा मग वर्ण-भाषांवर आधारलेली, भेदभावाची भावना मुळात अंकुरते ती मनात. एकदा ती तिथे घट्‌ट रुजली की, मग या पद्धतीने व्यक्त होत राहते- जागोजागी. त्याला अपवाद ना कुठल्या बड्या पदावरील व्यक्ती राहात, ना कुठल्याशा हॉटेलमधला वेटर. अन्यथा, दोन पैशाची नोकरी करणारा एक वेटर, चीनमधून अमेरिकेत जाऊ शकणार्‍या अन् पैसे खर्च करण्याची कुवत असल्याने या बड्या हॉटेलमध्ये जाऊन हव्या त्या पदार्थांची ऑर्डर देणार्‍या व्यक्तीचा, त्याला बोचेल अशा पद्धतीने अवमान करण्याची हिमंत कुठल्या बळावर करतो? खुद्द अमेरिकेतही, भेद शंभर टक्के संपण्याइतकी प्रगती आजतारखेला झाली नसली, तरी त्याची दखल घेण्याइतका जागरूक तो देश नक्कीच आहे. बहुधा म्हणूनच एका वेटरने केलेली एका ग्राहकाची वर्णाधारित थट्‌टा हा त्यांच्यासाठी कारवाईचा विषय ठरला. माध्यमजगतात त्याची ‘बातमी’ झाली. हॉटेल मालकाने त्याच्या स्तरावर कारवाई करत त्या वेटरला नोकरीतून कमी केले. जे घडले ते खचीतच योग्य नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत, झाल्या प्रकाराबाबत जाहीर माफी मागितली. ना कुणी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली, ना सरकार दरबारी त्यावर चर्चा झाली. सजग नागरिकांनी त्यांच्याच स्तरावर प्रकरण हाताळले. अगदी न्याय करून, शिक्षा ठोठावून मोकळे झाले लोक अन् कामालाही लागले पुढच्या. आपल्या देशात घडू शकेल कधी असे?
आपल्या देशात असा चमत्कार घडू शकेल का, या प्रश्‍नाचा विचार करण्यापूर्वी, तिथे हे कसे आणि का घडू शकले, याचा विचार आपल्याला करावा लागेल. भेदभाव कुठल्याही प्रकारचा असो, संपविण्यासाठीचे कायदे अस्तित्वात असले तरी भेदाची भावना अजूनही मनामनांत कायम असल्याचे वास्तव तिथे सर्वांनीच मान्य केले आहे. अगदी खुल्या मनाने. इतकेच नव्हे, तर हा भेदभाव संपला पाहिजे, नव्हे, समूळ नष्ट झाला पाहिजे, याबाबतही त्यांच्या मनात यत्किंचितही शंका नाही. आपली अडचण नेमकी इथेच आहे. आपल्याकडे भेद संपविण्याची भाषा सारेच बोलतात, तो प्रत्यक्षात संपविण्याचे प्रयत्न मात्र काही मोजके लोकच करतात. हा भेद अस्तित्वात असणे, ही काहींची राजकीय गरज ठरली आहे. कायदा म्हणाल तर तो त्यांच्याप्रमाणेच आपणही तयार केला आहे. पण, ती शासकीय पातळीवरची प्रकिया झाली. समाजातील भेद कायदेशीर रीत्या अमान्य करण्याची जबाबदारी सरकारने त्यांच्या स्तरावर पार पाडली. आता तो प्रत्यक्षात नष्ट करण्याची जबाबदारी समाजाची आहे. पण, आपला समाज खरंच तयार आहे त्यासाठी?
इतके प्रयत्न करून, प्रचंड प्रमाणात पैसा ओतूनही भारतात ख्रिस्तीकरणाची मोहीम पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी का होत नाही, याबाबत १९८४ मध्ये व्हॅटिकन सिटीमध्ये झालेल्या धर्ममार्तंडांच्या चर्चेतून एक बाब स्पष्ट झाली ती ही की, भारतीय समाज एका धर्माशी, त्यांच्या संस्कृतीशी बांधला गेला आहे. ती नाळ इतकी मजबूत आहे की, पैशाच्या लोभातून कुणी ख्रिश्‍चन धर्म स्वीकारला, तरी त्याच्या घरातल्या देव्हार्‍यात इतर देवांसोबत येशूलाही स्थान मिळते, एवढेच. पण, ख्रिस्तीकरणाचे मनसुबे रचणार्‍यांना तर तिथे फक्त येशूची एकच प्रतिमा हवी आहे. तसे घडायचे असेल तर या समाजात जातीची बीजं नव्यानं पेरा. त्यांच्या मनात आपल्या जातीचा दुरभिमान इतक्या प्रकर्षानं निर्माण करा की ‘आपल्या’ सोडून इतर जातीचा माणूसच काय, अगदी साधू-संत, देवादिकही तुच्छ वाटावेत प्रत्येकाला. असे घडले तरच ख्रिस्तीकरण सोपे होईल… मग देवघरात येशूच्या पंक्तीत इतर देव असणार नाहीत… आपल्या समाजात दिवसागणिक वाढत चाललेला जातिपातीचा विखार ख्रिस्तीकरणाच्या मोहिमेला साह्यभूत तर ठरत नाहीय् ना…?
श्रीमंत माणसं घरातल्या नोकरांशी चांगलं वागत नाही. बरं स्त्री-पुरुषांमधला भेद नोंदवला तरी बायका घरातल्या मोलकरणीशी खूप आस्थेनं वागतात असंतरी कुठाय्? तामिळींच्या मनातल्या हिंदीच्या द्वेषाला उतरण लागेल कधीतरी? कुठल्यातरी मंदिरात महिलांना, कुठेतरी दलितांना प्रवेश नाकारण्याचे दिवस मागे टाकण्याचा निर्णय मॅनहॅटनमधल्या ‘त्या’ हॉटेल मालकाच्या धर्तीवर समाजधुरीणांनीच घ्यावा आता. त्यासाठी मोर्चे काढण्याची संधीतरी कशाला द्यायची उगाच कुणाला? आणि हो! भेदाची ही भावना सर्वदूर, समूळ संपावी. दलित-सवर्णांमधली दरी संपली पाहिजे म्हणणार्‍यांनी शिया-सुन्नींमधल्या संबंधांकडेही लक्ष द्यावे कधीतरी. धर्मांतरित अन् मूळ ख्रिश्‍चनांसाठी प्रार्थनाघरच काय दफनभूमीही ‘वेगळी’ हवी म्हणणार्‍यांना कसे संपवता येतील समाजातले भेद?
तर सांगायचा मुद्दा एवढाच की, मनाच्या कुठल्याशा कोपर्‍यात घट्‌ट रुजून बसला असल्याने भेद सर्वदूर विखुरला आहे. अगदी जगाच्या कानाकोपर्‍यात. तो संपविण्याचे कायदेही सगळीकडे आहेत आणि आश्‍चर्य असे की, एवढे कठोर नियम अस्तित्वात असले, तरी हा भेद संपत मात्र नाही तो नाहीच! कारण भेदाची ही भावना कायद्याने संपणार नाहीच कधी. प्रत्येकाच्या मनातून तिची हकालपट्‌टी व्हावी लागेल. तसे घडले तर समाजातून ती हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही…
सुनील कुहीकर
९८८१७१७८३३