साप्ताहिक राशिभविष्य

0
461

२७ ऑगस्ट  ते २ सप्टेंबर २०१७
मेष- प्रकृतीची काळजी घ्या
या आठवड्याच्या प्रारंभी आपला राशीस्वामी मंगळ राश्यंतर करून सिंह राशीत रवी, बुध व राहू यांच्या सोबतीला जात आहे. हा मंगळ अस्तंगत आहे व या राश्यंतरानंतर त्याची व शनीची परस्परांवर दृष्टी येणार आहे.  हा योग आपल्या पंचम व अष्टम स्थानातून होत असल्याने तो संतती, काही हृदयरोगी, छाती व श्‍वसनाचे अन्य विकार असणार्‍यांसाठी हानिकारक ठरणार आहे. त्यामुळे प्रकृतीची पुरेपूर काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे रस्त्यावर आपली काळजी घ्यावी. वाहने सांभाळून चालवावी. नोकरी-व्यवसायात समाधानाची स्थिती राहील. कुटुंबातून सहकार्य मिळेल. शुभ दिनांक- २७,३१,१,२.

वृषभ- मानापमानाच्या घटना
आपल्या व्ययेश मंगळाचे आठवड्याच्या सुरुवातीलाच राश्यंतर होत असून तो सुखस्थानी रवी-राहू-बुध यांच्या सोबतीला जात आहे. भरीसभर म्हमजे सुखस्थानात जमलेल्या या पापग्रहांच्या चौकडीवर शनीच्या दृष्टीची भर पडत आहे. शनी व मंगळ परस्परांवर पाप-दृष्टी ठेवणार असल्याने घरातील वातावरणात सौहार्द्र कायम राखण्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर येऊन ठेपणार आहे. नोकरी-व्यवसायात देखील काहीशी तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. आपला राशीस्वामी शुक्र पराक्रमात असल्यामुळे त्याची भाग्य स्थानावर दृष्टी येत आहे. तो आपल्याला मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रम- उत्सवांमध्ये सक्रिय होण्यास सुचवीत आहे. शुभ दिनांक- २७,२८,२९,३०.

मिथुन- कर्तव्यपूर्तीत खरे उतराल
आपला राशीस्वामी बुध पराक्रम स्थानात रवी व राहूच्या कचाट्यात सापडला असतानाच या आठवड्याच्या प्रारंभी लाभेश मंगळ देखील तेथे पोहचत आहे. त्यातच शनिची त्या सार्‍यांवर दृष्टी राहणार असून मंगळही शनीशी वैर करणार आहे. अस्तंगत असल्यामुळे आपला राशीस्वामी बुध सध्या क्षीण आहे. तो आठवड्याच्या शेवटी उदित होईल. मात्र तोपर्यंतचा काळ आपणांस मानहानी, अपरिमित दगदग, मानापमानाचे प्रसंग, मानसिक त्रागा, मोठा खर्च आणि सारे करूनही असमाधानाचा राहील असे दिसते. लाभेशाच्या सहयोगाने आर्थिक स्थिती उत्तम राहील, आणि सारे खर्च आपण लीलया उचलू शकाल. शुभ दिनांक- २७,२९,३१,१.

 कर्क- प्रासंगिक धार्ष्ट्य आवश्यक
आपला राशीस्वामी चंद्र या आठवड्यात सुखस्थानातून भ्रमण सुरू करीत असतानाच धनस्थानात रवी-बुध-राहू व या आठवड्याच्या सुरुवातीसच तेथे येणार्‍या मंगळाची जमघट राहणार आहे. ही. पाप-चौकडी शनिच्या दृष्टीने अधिकच तीव्र ठरणार असून मंगळ शनीला चिथावणी देणार आहे. अशात राशीस्थानी असलेला लाभेश शुक्र आपणास काहीसा हळवा बनवू शकतो. कुटुंबातील सदस्य, मित्रवर्ग आणि कार्यक्षेत्रातील सारे सहकारी आपल्या बाजूस उभे राहणार आहेत. नोकरी-व्यवसायात उत्तम प्रगती होईल. वाढत्या खर्चामुळे मात्र आर्थिक बाजू सांभाळावी लागेल. शुभ दिनांक- २९,३०,३१,२.

सिंह- मोठ्या उलथापालथी संभव
आपला राशीस्वामी रवी राहू व बुध यांच्यासोबत राशीस्थानी असतानाच आठवड्याच्या प्रारंभीच भाग्येश मंगळ देखील राश्यंतर करून तेथे पोहोचणार आहे. ही स्थिती लाभावह असली तरी आपल्या राशीतील या ग्रहांशी शत्रुत्व पत्करणार्‍या शनीची दृष्टी देखील राशी व या ग्रहांवर येत आहे. सर्वप्रथम आपणास सर्वप्रकारच्या शारीरिक व मानसिक ताणतणावापासून दूर राहण्याची गरज आहे. कौटुंबिक वातावरण सांभाळावे लागेल. कुटुंबात आजारपणे, तणाव, मतभेद निर्माण होतील. काही आर्थिक पेच देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सतर्क रहावे. आरोग्याची काळजी घ्यावी. वाहने सांभाळून चालवावीत.  शुभ दिनांक- २७,२८,१,२

कन्या-  विशेष कामातून आर्थिक लाभ
आपला राशीस्वामी बुध व्यय स्थानात रवी व राहूच्या कचाट्यात सापडला असतानाच आठवड्याच्या प्रारंभी लाभेश मंगळ देखील तेथे पोहचत आहे. शनीची या सार्‍यांवर दृष्टी राहणार असून मंगळही शनीशी वैर करणार आहे. अस्तंगत राशीस्वामी बुध क्षीण असला तरी तो आठवड्याच्या शेवटी उदित होईल. राशीस्थानी असलेला गुरू ही सारी विपरीत स्थिती सांभाळून घेण्याचा प्रयत्न करेल. धनस्थानातून सुरू होणारे चंद्राचे भ्रमण अनुकूल आहे. एकंदर स्थिती पाहता हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा ठरण्याची शक्यता आहे. धनस्थानी असलेला चंद्र व लाभात असलेला धनेश शुक्र हे आपली आर्थिक बाजू उत्तम राखतील.  काहींना विशेष इन्सेटिव्ह त्यांनी दिलेल्या विशेष कामाचा मोबदला म्हणून आर्थिक लाभ होऊ शकतो. शुभ दिनांक- २७,२९,३१,१.

तुला- आकस्मिक मोठा खर्च
राशीस्वामी शुक्र दशमात असून आपल्या राशीतूनच चंद्र या आठवड्याच्या भ्रमणाला सुरुवात करणार आहे. अशातच धनेश मंगळाचे आठवड्याच्या सुरुवातीलाच राश्यंतर होत असून तो लाभस्थानी रवी-राहू-बुध यांच्या सोबतीला जात आहे. येथे जमलेल्या या पापग्रहांच्या चौकडीवर धनस्थानातून शनीच्या दृष्टीची भर पडणार आहे. शनी व मंगळ परस्परांवर पाप-दृष्टी ठेवणार असल्याने कुटुंबात काहीशी नाराजी, विपरीत स्थिती, आर्थिक ओढाताण, आजारपणे अशी स्थिती निर्माण होऊ शकते. सुखस्थानापर्यंत होणारे चंद्राचे भ्रमण आपणास या आठवड्यात मानसिक आधार देत राहील.   शुभ दिनांक- २७,२८,२९,३०.

वृश्‍चिक-  संततीस उत्तम योग
या आठवड्याच्या प्रारंभी आपला राशीस्वामी मंगळ राश्यंतर करून दशमातील सिंह राशीत रवी, बुध व राहू यांच्या सोबतीला जात आहे. हा मंगळ अस्तंगत आहे व या राश्यंतरानंतर त्याची व शनीची परस्परांवर दृष्टी येणार आहे. हा योग आपल्या राशीतून व दशम स्थानातून होत असल्याने तो विशेषतः नोकरी व व्यवसायासाठी हानिकारक ठरणार आहे. याकाळात प्रकृतीची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. शनी-मंगळाच्या या योगामुळेच आपल्याला छोट्या-मोठ्या अपघातांचे भय राहू शकते. मित्रमंडळी आणि कुटुंबातून उत्तम सहकार्य मिळेल. शुभ दिनांक- २७,३१,१,२.

धनु-  खर्चवाढीसह विपरीत स्थिती
आपला राशीस्वामी गुरू दशम स्थानात आहे, तर चंद्र आपल्या लाभस्थानातून धनस्थानापर्यंत या आठवड्यात भ्रमण करणार आहे. दरम्यान आपल्या अष्टम स्थानात असलेला मंगळ या आठवड्याच्या सुरुवातीलाच राश्यंतर करून भाग्यस्तानी रवी, बुध, राहू यांच्या सोबतीला जाणार आहे. अष्टमातून तो हटल्याने आरोग्यासंबंधीचा धोका दूर होणार असला तरी शनीसोबत होणारा त्याचा कुयोग आपणांस खर्चवाढीसह काही विपरीत योग देऊ शकतो. साधारणतः कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची आजारपणे, छोटा-मोठा अपघात, अचानक प्रवास योग, एखादी आकस्मिक स्थिती यासाठी आपल्याला प्रसंगी मोठी आर्थिक तरतूद करावी लागू शकते.  शुभ दिनांक- २७,२८,३१,१

मकर- आर्थिक पेच संभवतो
लाभस्थानात वक्री असलेला आपला राशीस्वामी शनि नुकताच मार्गी झाला आहे, तर चंद्र या आठवड्यात दशमातून आपल्या राशीपर्यंत प्रवास करणार आहे. आपल्या अष्टमस्थानात असलेल्या रवी, बुध आणि राहू या त्रिकुटात आता मंगळ देखील राश्यंतर करून सामील होणार आहे. या चौघांशी शत्रुत्व असलेल्या शनीची त्यांच्यावर दृष्टी येणार आहे, तर मंगळही शनीवर दृष्टी ठेवून त्याला खिजवणार आहे. ही सारी स्थिती अष्टमातून होत असल्याने आरोग्यास अपायकारक आहे. ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याबाबत देखील काळजीची स्थिती निर्माण होऊ शकते. शुभ दिनांक- २८,२९,३०,२.

 कुंभ-  मनाचा तोल ढळू नये
दशमस्थानात वक्री असलेला आपला राशीस्वामी शनि नुकताच मार्गी झाला आहे, तर चंद्र या आठवड्यात भाग्यस्थानातून आपल्या व्ययस्थानापर्यंत प्रवास करणार आहे. सप्तमस्थानात असलेल्या रवी, बुध व राहू या तिघांमध्ये आता मंगळ देखील राश्यंतर करून सामील होणार आहे. या चौघांशी शत्रुत्व असलेल्या शनीची त्यांच्यावर दृष्टी येणार आहे, तर मंगळही शनीवर दृष्टी ठेवून त्याला उचकवणार आहे. ही सारी स्थिती सप्तमातून होत असल्याने ती आपणांस अनेकदृष्टीने हानिकारक ठरणार आहे. शारीरिक, मानसिक व व्यावसायिक तणाव निर्माण होऊ शकतो. मनाचा तोल राखण्याची गरज आहे. शुभ दिनांक- २७, २८,२९,३०.

मीन- कार्यक्षेत्रात तणावाची स्थिती
आपला राशीस्वामी गुरू अध्यापही सप्तम स्थानात आहे, तर चंद्र आपल्या अष्टमस्थानातून लाभस्थानापर्यंत या आठवड्यात भ्रमण करणार आहे. दरम्यान आपल्या पंचम स्थानात असलेला मंगळ या आठवड्याच्या सुरुवातीलाच राश्यंतर करून षष्ठस्थानी रवी, बुध व राहू यांच्या सोबतीला जाणार आहे. तेथे त्याच्यावर येणार्‍या शनीच्या दृष्टीसह मंगळाचा शनिसोबत कुयोग होत आहे. ही स्थिती आरोग्याच्या स्थानातून निर्माण होत असल्याने काहीशी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात तणावाची स्थिती निर्माण होण्यासह आपणांस खर्चवाढ देखील संभवते.   शुभ दिनांक- २९,३०,३१,१•
– मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६