रविवारची पत्रे

0
40

वृक्षप्रेमी श्रीगणेश
आपल्याकडील एकही देवता अशी नाही की, ती वृक्षवल्लीची प्रेमी नाही! ‘अवदसा’ किंवा ‘मुंजा’ यासारख्या अगदी क्षुद्र देवता घेतल्या तरी त्यांचे वास्तव्य पिंपळासारख्या वृक्षावर असते, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मग ॐकार गणेशासारखे मंगलकार दैवत वनस्पतीप्रेमी असणारच, यात काय शंका? ब्रह्मस्पति सूक्त, गणपती अथर्वशीर्ष, गणेशसहस्रनाम, गणपतीच्या पूजा वगैरे गणपतीच्या संदर्भातील वाङ्‌मयात वेगवेगळ्या स्वरूपात वनस्पती आलेली आहे. मानवाने वनस्पतीवर प्रेम करावे, इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या स्वरूपात त्यावर संशोधन करावे, हेच या मागील प्रयोजन आहे. म्हणजेच त्याच्याकडून बुद्धिदात्या गणपतीची डोळस पूजा व्हावी. याला गणेशाच्या पूजेतील एकवीस पत्री व एकवीस पुष्प पूजा यासुद्धा अपवाद मानता कामा नयेत. या २१ पत्रीच्या म्हणजेच वनस्पतींच्या उत्पत्तीच्या काही पौराणिक कथा आहेत, तर काही आख्यायिका आहेत. त्यांचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की, मानवाने वृक्षवल्लीवर मनापासून प्रेम करावे, हाच त्यातील सांगावा आहे.
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महाराष्ट्रात घरोघरी प्रतिष्ठापना करण्यासाठी आणलेल्या मृतिकेच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करताना गुरुजी एक एक पत्रीचे नाव उच्चारतात आणि आपण ती त्या मूर्तीला वाहतो. अशा या पत्रींची संख्या २१ असून, या दिवशी गणपतीला त्या प्रिय ठरलेल्या आहेत. वास्तविक बेल, तुळस गणपतीला एरव्ही वाहात नाहीत. पण, या दिवशी मात्र त्याला आवर्जून वाहतात.
पुष्प पूजा : गणपतीची २१ नावे उच्चारून जशी त्याला २१ पत्री वाहण्यात येते, तसे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपतीच्या मूर्तीची पूजा करताना त्याची २१ नावे उच्चारून २१ प्रकारची फुलेही वाहण्यात येतात.
अशा प्रकारे गणेश चतुर्थीला २१ निरनिराळ्या पत्री गणेशाला वाहतात. पूजेतील साहित्य, पत्री व फुले ही सर्व औषधी आहेत. यावरून धर्म आणि विज्ञान यांचा पूर्वीपासून किती निकटचा संबंध होता हे स्पष्ट होते. बाजारात किंवा आपल्या आसपास पत्री व पुष्पे उपलब्ध आहेत म्हणून किंवा आपल्या पूर्वसुरींनी सांगितले आहे म्हणून त्या वाहण्यापेक्षा त्यांचे महत्त्व माहीत करून घेऊन त्या गणपतीला सश्रद्ध मनाने अर्पण केल्या, तर ती सर्वार्थाने पूजा होईल.
प्र. जा. कुळकर्णी
९७६६६१६७७४

रा. स्व. संघ आणि विरोधक
नियती कशी सूड घेते बघा, देशाच्या प्रथम पंतप्रधानांनी ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ६५-७० वर्षांपूर्वी अरबी समुद्रात बुडवून टाकण्याची घोषणा केली होती, त्याच संघाचे अनेक स्वयंसेवक, प्रचारक आज देशाच्या अनेक राज्यांच्या मुख्यमंत्रिपदावर आणि केंद्र आणि राज्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदावर विराजमान असून प्रभावीपणे शासन करीत आहेत.
२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत देशाच्या पंतप्रधानपदावर एक संघाचा प्रचारक दोन तृतीयांश बहुमतांनी विजयी होऊन न केवळ देशाचा सर्वश्रेष्ठ प्रभावी पंतप्रधान म्हणून कार्यरत आहे तर अखिल विश्‍वात एक अत्यंत कर्तबगार, प्रभावशाली राजनीतिज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. अनेक लहान-मोठ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी त्यांची वैयक्तिक मैत्री आहे आणि त्यांनी त्यांचा विश्‍वासही संपादन केला आहे.
२५ जुलैला संघाचेच एक स्वयंसेवक देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपतिपदावर विराजमान झाले, तर दुसर्‍या स्वयंसेवकाने ५ ऑगस्टला देशाच्या दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वोच्च पदाचा म्हणजेच उपराष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पराजित उमेदवाराने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, त्यांची वैचारिक लढाई सुरूच राहणार आहे. मॅडमची आणि त्यांच्या पक्षाची वैचारिक क्षमता आणि पात्रता देशाची बहुसंख्य जनता मागील ६०-६२ वर्षांपासून अनुभवत आहे. त्या पक्षाच्या पूर्ण बहुमताच्या सरकारांनी मागील १० दशके अखंडित शासन नव्हे तर कुशासन करून देशाला खोल खाईत लोटले आहे. राज्यकर्त्यांना आणि पक्षनेत्यांना लक्षाधीश, अब्जाधीश होण्यास मदत करून राष्ट्राला कंगाल करण्याशिवाय दुसरं काय साध्य केलं? त्याचं बक्षीस म्हणून २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत यूपीसारख्या सर्वात मोठ्या राज्यातून मात्र २ आणि संपूर्ण देशातून केवळ ४४ खासदार लोकसभेत पोहोचू शकले.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनो, आता तरी आत्मचिंतन करा आणि ऊठसूठ उगाच मोदी आणि संघाच्या नावाने बोटं मोडणं बंद करा. मोदी सरकारला ‘सब का साथ सब का विकास’ या त्यांच्या घोषित ध्येयाप्रमाणे राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकरिता शासन करू द्या.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राजकारणाशी काही देणं घेणं नाही. राष्ट्राची परमोच्च उन्नती हे एकमेव ध्येय समोर ठेवून मागील ९२ वर्षांपासून समाजात प्राचीन भारतीय श्रेष्ठ मूल्यांची जोपासना करीत एक आदर्श, राष्ट्रभक्ती परिपूर्ण एकसंध समाज निर्माण करण्याच्या प्रक्रियेत निरपेक्ष भावनेने, प्रसिद्धी आणि पैशाच्या मोहात न पडता कार्यरत आहे. एक स्वयंसेवक म्हणून माझा तो अनुभव आहे.
‘राहुल गांधींनो,’ ‘मायांनो,’ ‘ममतांनो’ आणि अन्य संघ फोबियाने ग्रासितांनो, देशात घडणार्‍या कोणत्याही घटनेला राजनैतिक लाभ प्राप्त करण्याच्या स्वार्थी इराद्याने संघाशी जोडून संघाला नाहक बदनाम करण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका. तुम्हाला प्रामाणिकपणे संघ जाणून घ्यायचा असेल तर संघाचा स्वयंसेवकच काय संघाचा अधिकारीही तुमचे स्वागत करील कारण संघ जाणतो ते फक्त माणसे जोडणे, तोडणे नव्हे.
भास्कर बळवंत शेष
सोनेगाव, नागपूर

मृत्यूचे राजकारण नको नेताजींची देशभक्ती जपा
देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस एक प्रखर देशभक्त. आझाद हिंद सेनेचे संस्थापक. स्वातंत्र्ययुद्धातील त्यांची कामगिरी केवळ अतुलनीय आहे. आयसीएसची सनदी नोकरी सोडून देशासाठी बलिदान देणारे ते राष्ट्रपुरुष. १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात त्यांचे निधन झाले. परंतु त्यांचे हे अपघाती निधन देश-विदेशातील अनेकांना मान्य नाही. यावर गेल्या ६० वर्षांपासून अनेक मतमतांतरे आहेत. काहींच्या मते सुभाषबाबू स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हयात होते. यासाठी भारत सरकारने १९५६ मध्ये शहानवाज कमिटी व १९७० मध्ये खोसला कमिशन नेमले. त्यांनी नेताजींचा मृत्यू १९४५ मध्ये विमान अपघातात झाल्याचा निर्वाळा दिला. पण, पुढे त्यावर अनेक आक्षेप घेण्यात आले. सन १९९९ मध्ये नेमलेल्या मुखर्जी कमिशनने वरील दोन कमिशनचे म्हणणे अमान्य करून नेताजी १९४७ साली जिवंत होते असा अहवाल दिला.
नुकत्याच फ्रेंच रिपोर्टनुसार पॅरिसस्थित इतिहासकार बी. पी. मोरेने दावा केला की, नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झालाच नाही. वरील कोणताही दावा विचारात घेतला तरी नेताजी सुभाषचंद्र बोस आज या जगात नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या मृत्यूचे राजकारण करणे वा संशोधन करणे ही या देेशभक्ताची कुचंबणाच होय. या सर्व राजकारणी व संशोधकांनी आता हे संशोधन बंद करून फालतू अहवाल देऊ नयेत. तसेच जनतेची दिशाभूलही करू नये. त्यापेक्षा त्यांनी नेताजींच्या देशभक्तीचे आचरण करावे व आजच्या तरुण पिढीला त्यांचे चरित्र समजावून देऊन देशप्रेमाचे धडे शिकवावेत. हीच नेताजींना खरी श्रद्धांजली होईल.
साहेबराव घोगरे
८१४९८७४०४६

आईची तुलनाच नाही
माता म्हणजे आई, मम्मी, मॉम, मॉं. नावे अनेक पण रूप एकच. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो. गोरखनाथ गोकर्णातून, मच्छिंद्रनाथ ढिगार्‍यांतून जन्माला आले. आईशिवाय अपत्य नाही. गाईशिवाय वासरू व पक्षिणीशिवाय पिल्लू. सर्वांची आईची माया सारखीच. घास मुखीचा मुखी घालुनी घार उडे आकाशी परि नजर पिलावरी. जनावर पाडसाला चाटून चाटून १ तासात स्वतंत्रपणे बागडण्यास सक्षम करतात. फरक एवढाच इतर प्राणी सक्षम होताच आई-वडिलांना विसरतात व माणसाला आयुष्यभर ते लक्षात असते. शाप आहे की वरदान देव जाणे. मातेची अनेक रूपे आहेत.
जन्मदाती-जिच्या उदरातून आम्ही जन्म घेतो ती जन्मदात्री जीवघेण्या कळा सोसून आम्हाला जग दाखवते. लेकाच्या सुखासाठी माय सासरी नांदते. यशोदा मॉं-देवकीचा कान्हा यशोदादारी वाढला. खूपदा आई मुलाला जन्म देते, परंतु काही कारणाने त्याचे पालनपोषण करू शकत नाही. जी सांभाळते ती यशोदामाता. दूधमाता-ज्या स्त्रिया बाळाला स्तनपान करू शकत नाही त्या खूपदा दुसर्‍या बाईकडून अंगावर पाजून घेतात. संभाजी राजे भोसले यांना धाराईने दूध पाजले. धाराई दूधमाता होती.
सरोगेट माता आधुनिक युगातील महत्त्वाचा सुखद शोध. एखादी स्त्री गर्भधारण करण्यास असमर्थ असेल तर दुसर्‍या स्त्रीचे गर्भाजय भाड्याने घेऊन त्यात बीजारोपण करणे तिला सरोगेट माता म्हणतात. अपत्याला जन्म देण्याइतकाच तिचा गर्भाशी संबध. बाळ जन्माला घेतात. नाळेचे नाते संपले. गोमाता – गोमाता म्हणजे गाय. ज्यांना आईचे दूध मिळत नाही त्यांना गाईचे दूध म्हणजे गाईचा पान्हा सरळ मुलांच्या तोंडात सोडतात. पूर्वी बहुतेक घरी गोमाता, गोधन असायचे. धरणीमातेचे महत्त्वही अबाधित आहे. बीज अंकुरले पोटी, ती धरणीमाता. तुम्हाला आयुष्यभर हीच माता पोसते. धान्ये, फळे, भाजीपाला जीवनभर तीच पुरविते. तिच्या ठिकाणी धर्मभेद, जातीभेद, श्रीमंत-गरीब असा भेदभाव नाही. पृथ्वीवरील प्रत्येकाची ती माता आहे. म्हणूनच काही लोक प्रात:काली उठताच धरणीमातेला वंदन करतात. संतांना माउली म्हणतात. ज्ञानेश्‍वर माउली, गजानन माउली. लेकाच्या म्हणजे भक्तांच्या हाकेला धावून येती ती माउली, आई. म्हणूनच तिच्या चरणी मस्तक ठेवताच डोळ्यात आसवे येतात. मन गहिवरून जाते. जगत्‌माता म्हणजे जगदंबा, दुर्गामाता सारख्या अन्य माता. आमच्या जीवनाचा आधारस्तंभ. माता जन्म देते. जगत्‌माता जीवन घडविते, जीवन जगण्यास मदत करते. म्हणूनच तिची आरती, दुर्गाउत्सव, नवरात्र, लक्ष्मीपूजन वगैरे सण उत्साहाने साजरे करतो. ती आमच्या जीवनाची सारथी आहे. भारत माता जीवनाचा आत्मा. ती पारतंत्र्यात असताना तिला स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. कुणाचा भाऊ, कुणाचा पती, कुणाचा मुलगा कामी आला. अजूनही अनेक जवान तिच्या रक्षणासाठी दिवस-रात्र तत्पर असतात. नौदल, पायदळ, वायुदलाची सेवा करताना स्वत:ला धन्य मानतात. कुठलीही सभा असो, १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला भारत माता की जय या घोषनेने आसमंत दणाणून जातो. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, आसरा दिला भारत मातेने. आपल्या जीवनात भारत मातेचे अनन्य स्थान आहे. मुलाने कितीही त्रास दिला, तिला विकायला निघाला, तरी भारत माता तिच्या कुशीतून आम्हाला दूर करीत नाही. ‘सागरा प्राण तळमळला,’ या ओळीने अजूनही अंगावर काटा उभा राहतो.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी किंवा मातेसारखे दैवत सार्‍या जगती नाही. आईला वृद्धाश्रमात ठेवतात ते करंटे. जो आईला मान देतो तो जीवनात सदैव सुखी. ज्याला मातेची लाज वाटते तो लाजिरवाणा पुत्र. पुत्र असून वांझोटी माता. जगातील समस्त मातांना त्रिवार प्रणाम.
निर्मला गांधी
९४२१७८०२९०

माझ्या स्वप्नातील शाळा
शाळा म्हणजे समाजमनाचा आरसा असावा, समाजमनाचं प्रतिबिंब त्यात उमटावं असं अपेक्षित असते. समाजमन हे आदर्श व्यक्तिमत्त्वांसमोर झुकत असते. हे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याचे सामर्थ्य शाळांमध्ये असते. शाळेमध्ये निर्माण होणारी पिढी ही त्या देशाची संपत्ती असते. आजची बालके ही आपल्या देशाचे भवितव्य असतात. त्यामुळे प्रत्येक विद्यालय हे देशाचा पाया रचणारे चालते बोलते विद्यापीठच असते.
या देशातून इंग्रजांचे राज्य जाऊन ७० वर्षे झाली, पण इंग्रजी विषयाचे नको तितके आकर्षण आपल्यामध्ये निर्माण झाले. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. माझा मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकला की तो जीवनात यशस्वी होईल, अशी पालकांची मानसिकता झाली आहे. त्याला शासनाचे धोरण, मराठी शाळेप्रती उदासीनता व काही शिक्षकांची कृतीसुद्धा जबाबदार आहे. पालकांनासुद्धा माझा मुलगा इंग्रजी शाळेतच शिकावा असे वाटणे हे या शिक्षण व्यवस्थेचे अपयश आहे असे वाटते.
कोणतीही शाळा म्हटली की, त्यांना शासनाने ठरवून दिलेल्या चौकटीत अध्ययन- अध्यापन करावे लागते. पण, मला वाटते की, शाळेने या चौकटीत स्वत:ला बांधून न घेता मनुष्याला प्रत्यक्ष जीवन जगत असताना होणार्‍या संघर्षाचा सामना करण्याची क्षमता आपल्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा पाया घातला गेला पाहिजे. निरोगी शरीरात सुदृढ मन वास करते. त्यामुळे शाळेत येणार्‍या प्रत्येक बालकाचे शरीर हे सुदृढ असले पाहिजे. त्यासाठी शाळेने विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहात शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित झाले आहे. प्रत्येक मुलगा हा शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे, टिकला पाहिजे व शिकला पाहिजे यासाठी विशेष काळजी प्रत्येक स्तरावर घेण्यात येत आहे. ई लर्निंग व ज्ञानरचनावादी अध्ययन- अध्यापनाच्या काळात शिक्षकांना अधिक तयारीनिशी स्मार्ट राहण्याची पाळी आली आहे. तरच तो मुलांना योग्य शिक्षण देऊ शकेल.
कोणत्याही शाळेचा मुख्याध्यापक हा त्या शाळेचा कणा असतो. ती शाळा कशी प्रगतिपथावर राहील त्याचा ध्यास त्यांच्या मनामध्ये असावा. सोबत काम करणारा शिक्षक वर्गदेखील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणार्‍या मुख्याध्यापकांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तन मन धनाने प्रयत्न करणारा असावा. त्यामुळे मानसिक समाधानासोबत अत्युच्य आनंदाचा क्षण प्रत्येकाला उपभोगता येईल. एका अर्थाने हे पवित्र क्षेत्र आहे. फक्त पोट भरण्याचे साधन नसून जीवनातील हा एक महायज्ञ आहे. यात प्रत्येक शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांप्रती समर्पणाच्या समिधा अर्पण करण्याचा भाव मनात आणून प्रत्यक्ष कृती केली तर आपल्या विद्यार्थ्यांचे व आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही एवढे निश्‍चित.
गजानन तुकाराम कासावार
९८२३२२०५५०

आम्हाला खरेच स्वातंत्र्य मिळाले काय?
आम्हांस स्वातंत्र्य मिळून आज सत्तर वर्षे पूर्ण झालीत, पण आम्ही खर्‍या अर्थाने आजही स्वतंत्र झालो नाहीत. देशात लूटमार, बलात्कार, भ्रष्टाचार, शोषण, शैक्षणिक लूटमार, अपराध, आत्महत्या, हुंडाबळी, साम्प्रदायिक दंगे, राजनीतिक घटता स्तर इत्यादी फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आम्ही किती जण हे सर्व प्रकार थांबविण्यास जातीने विरोध किंवा प्रयत्न करतो? आम्ही फक्त उदाहरण देतो या देशांत असं होतं, त्या देशात तसं होत. अरे, तुमचे हात कुणी पकडले? सुरुवात तर करा. अगदी आपल्या घरापासून लहान लहान संकल्प करा. मी लाच घेणार नाही, देणार नाही. कुठेही गुन्हेविषयक घटना घडत असेल, गतिविधी होत असेल त्याला विरोध करीन, कुणाचाही अधिकार, हक्क मारणार नाही, पुढारी लोकांना जाब विचारीन, वशिला लावणार नाही, भुकेल्यांना अन्न देईन, आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही इत्यादी. किती लोकांनी असा संकल्प घेतला आहे? आज देशाला खर्‍या अर्थाने धोका अशिक्षित आणि कामगारवर्गापासून नाहीच, तर खरा धोका देशाच्या उच्च सुशिक्षित लोकांपासून आहे. आमचा भारत, आमचे स्वातंत्र्य, आमची स्वप्ने, आमचा विकास, आमचा सन्मान केवळ आमच्याच हातात आहे. सुरुवात करू या. स्वप्नांची पूर्ती होईलच, खरे स्वातंत्र्य दूर नाहीच. प्रत्यक्ष कृतीची गरज आहे.
सुनील पाटोळे
९७७६०३८८५०