एलिस गेटीचे प्रस्थ

0
88

विश्‍वसंचार
‘गणानां त्वा गणपतिं हवामहे’ इतक्या स्पष्ट शब्दांत त्याचा उल्लेख ‘ऋग्वेद’ या आद्यग्रंथात असूनही आम्ही त्याला पाचव्या-सहाव्या शतकातला देव म्हणत राहणार आहोत का? आणि तेही एलिस गेटीच्या आधारावर? गोर्‍या लोकांंचं संशोधन हेच खरं मानण्याची ही गुलामी मनोवृत्ती आम्ही कधी सोडणार आहोत?
गणपती उत्सवाचे दिवस आले की, विचारवंत लोक अस्वस्थ होतात. विचारवंत म्हटलं की ते डावे असणार, हे वेगळं सांगायला नकोच. अत्यंत सफाईदार भाषेत ते गणपती हे दैवत कसं राक्षस, यक्ष, भूत इत्यादी कनिष्ठ श्रेणीतून उत्क्रांत होत देवपदाला पोहोचलं आहे, ते सांगणार. अनार्य किंवा द्रविड लोकांचं हे आवडतं दैवत. खरं पाहता विघ्नकर म्हणजे विघ्न आणणारं होतं; आक्रमक आणि विजेत्या आर्य लोकांनी त्याला विघ्नहर म्हणजे विघ्न निवारण करणारा बनवून आपल्या संस्कृतीत कसं सामावून घेतलं, हे ते आवर्जून सांगणार. म्हणजे मुद्दा काय, तर ज्या गणपतीचा उत्सव तुम्ही लोक (म्हणजे तुम्ही-आम्ही सर्वसामान्य हिंदू) इतक्या उत्साहाने करता, तो गणपती तुमचा नाहीच मुळी. तो भुताखेतांमधून उत्क्रांत होऊन देवत्व पावलेला एक कनिष्ठ प्रतीचा देव आहे. आता या प्रतिपादनाला पुरावा काय, तर ते एलिस गेटी या बाईंच्या ग्रंथाकडे बोट दाखविणार.
गणेशोत्सवाचे दिवस आले की, विविध वृत्तपत्रं, मासिकं, साप्ताहिकांच्या खास पुरवण्या-विशेषांक निघतात. त्यात अनेक पत्रकार, अभ्यासक, लेखक सामान्यत: सश्रद्ध, धार्मिक असे हिंदूच असतात. पण तरीही त्यांच्या लिखाणात सामान्यत: एक मुद्दा येतोच की, हत्तीचं डोकं असणारा, मोठ्या पोटाचा गणपती हा देव, साधारण इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून हिंदू धर्मीयांमध्ये देव म्हणून मान्यता पावला. या प्रतिपादनाला पुरावा काय? तर हे ही लोक पुन्हा एलिस गेटीच्या ग्रंथाकडेच बोट दाखविणार, म्हणजे हिंदू धर्माची आणि देवदेवतांची टिंगल करणारे विचारवंत आणि हिंदू धर्मावर सामान्यत: प्रेमकरणारे सर्वसामान्य लोक, दोघेही गणपती या देवाबद्दल बोलण्या-लिहिण्यासाठी एलिस गेटी या एकाच लेखिकेच्या ग्रंथाचा आधार घेतात. अशी आहे तरी कोण ही महान विदुषी? आणि आहे तरी काय तिचा हा गणपतीविषयक महान संशोधन ग्रंथ?
‘गणेशा-अ मोनोग्राफ ऑन द एलिफंट-फेस्ड गॉड’ अशा नावाचा एलिस गेटी लिखित ग्रंथ १९३६ साली ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या क्लॅरेंडन प्रेसने काढलेला दिसतो. भारतातल्या मुन्शीराम मनोहरलाल, नवी दिल्ली या सुप्रसिद्ध प्रकाशन संस्थेने १९७१ साली दुसरी आणि १९९७ साली तिसरी अशा या ग्रंथाच्या आवृत्त्या काढलेल्या दिसतात. यापैकी १९९७ सालची तिसरी आवृत्ती इंटरनेटवरून ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध आहे, असं दिसतं.
परंतु, या तीनही आवृत्त्यांमध्ये एलिस गेटी या लेखिकेची कोणतीही वैयक्तिक माहिती दिलेली नाही. लेखनाच्या एकंदर स्वरूपावरून हा ग्रंथ म्हणजे पीएचडीचा संशोधन प्रबंध असावा, असं दिसतं. माहिती संकलनासाठी लेखिकेने इंग्रजी, फ्रेंच, संस्कृत, तिबेटी आणि जपानी अशा तब्बल १५० ग्रंथांचा आधार घेतलेला दिसतो. त्यामुळे ग्रंथ विविध प्रकारची माहिती आणि उत्कृष्ट आर्ट पेपरवर छापलेली कृष्णधवल छायाचित्रं यांनी खच्चून भरलेला आहे; परंतु माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. पीएचडीच्या प्रबंधलेखनाची एक ठरलेली पद्धत असते. भरपूर माहिती गोळा करायची आणि त्या माहितीच्या आधारावर काही एक निष्कर्ष काढून तो विद्यापीठासमोर ठेवायचा. तो निष्कर्ष नवीन, चिंतनीय वाटला, तर विद्यापीठ पीएचडी पदवी देतं. पण म्हणजे तो निष्कर्ष- ते इंटरप्रिटेशन बरोबर असेलच असं नव्हे.
एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या विशिष्ट विषयावर संशोधनात्मक लेखन करते, तेव्हा तिची त्या विषयासंबंधी काय पात्रता आहे, हे पहिल्यांदा पाहावं लागते. उदाहरणार्थ, हल्ली अनेक लोक छत्रपती शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्याबाबत मोठमोठे ग्रंथ लिहितात. तपशीलात गेल्यावर असं दिसतं की, या लोकांना छत्रपती शिवराय, त्यांचा काळ, त्यांचं कर्तृत्व याबद्दल कसलीही सखोल माहिती नसते आणि आधुनिक मॅनेजमेंट या विषयाचं त्यांचं ज्ञान तर बहुतेक इंटरनेटवरून वाचलेलं तेवढंच असतं. फक्त या लोकांचे राजकीय लागेबांधे तगडे असतात.
तसंच, एलिस गेटी या नावाच्या या कुणी ब्रिटिश किंवा अमेरिकेन बाई, १९३६ च्या काळात एकदम गणपती या विषयावर संशोधन करायला का बरं प्रवृत्त झाल्या? त्यांची या विषयातली पूर्वतयारी काय? याबाबत तपासणी करताना असं दिसतं की, या बाईंनी प्रथम १९१४ साली पॅरिसमधून ‘दि गॉडस् ऑफ नॉर्दन बुद्धिझम’ हा ग्रंथ लिहिला. त्याची दुसरी आवृत्ती १९२८ साली ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या क्लॅरेंडन प्रेसने काढलेली दिसते. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बाईंनी आल्फ्रेड फुशिये आणि सिल्वन लेवी या दोन विद्वानांचे आभार मानलेले आहेत.
आपल्या प्रस्तुत गणेशा या ग्रंथाला आल्फ्रेड फुशिये या विद्वानाची प्रदीर्घ प्रस्तावना आहे आणि सिल्वन लेवीच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्या ऐवजी, मी ही प्रस्तावना लिहीत आहे, असं फुशिये म्हणतो.
या दोन फ्रेंच विद्वानांच्या उल्लेखामुळे आपल्याला एलिस गेटी बाईंच्या गणपती संशोधनाची पार्श्‍वभूमी समजते. तसंच एकंदरित पाश्‍चिमात्त्य विद्वानांची पौर्वात्य हिंदू आणि बौद्ध धर्मांकडे पाहण्याची दृष्टी दिसते. सिल्वन लेवी या फ्रेंच विद्वानाचा जन्म १८६३ सालचा आणि मृत्यू १९३५ सालचा. हा पॅरिस विद्यापीठात संस्कृत भाषेचा सर्वोच्च प्राध्यापक होता. क्षेमेेंद्र कवीच्या ‘बृहत्कथामंजिरी’ या ग्रंथाचा त्याने फ्रेंच अनुवाद केला. आल्फ्रेड चार्लस ऑगस्ट फुशिये हाही फ्रेंच विद्वान. त्याचा जन्म १८६५ चा आणि मृत्यू १९५२ चा. दुर्दैवाने, हे दोघेही विद्वान युरोपीय लोकांच्या वर्णश्रेष्ठत्वाच्या अहंगंडाने पछाडलेले होते. युरोपीय गोरे लोक हे आर्यांचे वंशज आहेत आणि भारतीय लोक हे मूळ स्थानिक अनार्य आणि आक्रमक आर्य यांचे वंशज आहेत, हा सिद्धांत त्यांना मान्य होता. १९२२ साली तत्कालीन अफगाणिस्तान सरकार आणि फ्रेंच सरकार यांच्यातल्या एका करारानुसार आल्फ्रेड फुशिये गांधार कला या विषयाचा अभ्यास करण्यासाठी अफगाणिस्तानला आला. अफगाणिस्तानात ठिकठिकाणी सापडणार्‍या भगवान गौतमबुद्धाच्या मूर्ती कलादृष्ट्या फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांना गांधार शैली असंच म्हटलं जातं. आल्फ्रेड फुशियेने लगेच सिद्धांत मांडला की, इतक्या सुंदर मूर्ती घडवणं या पठाणांना कसं जमणार? तेव्हा या मूर्ती ग्रीक शैलीच्या आहेत. त्यांना त्याने ग्रीको-बुद्धिस्ट आर्ट असं नावही देऊन टाकलं. आधुनिक युरोपीय गोरे लोक आपल्या सर्व परंपरा या रोमन आणि ग्रीक संस्कृतीला नेऊन भिडवतात. जे जे काही चांगलं आहे ते रोमन किंवा ग्रीक आणि जे जे वाईट किंवा प्राथमिक, अर्धप्रश्‍न, अर्धरानटी असेल ते आशियाई; असं ठरवून टाकायचं, अशी खोडच या पाश्‍चिमात्त्य विद्वानांना असते.
अशीच त्यांची दुसरी श्रद्धा म्हणजे, आजचं जग हे इसवी सन पूर्व ४००४ या वर्षी २३ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ९ वाजता निर्माण झालं. बाप रे! केवढं अचूक गणित! याला आधार काय? तर जेम्स अशर नावाच्या आयर्लंडमधल्या एका आर्यविशपने १६५४ साली, बायबलमधल्या काही उल्लेखांवरून हा दिवस नि ही वेळ निश्‍चित केली. आता हे गोर्‍या लोकांच्या एका आर्यविशपने केलेलं महान संशोधन असल्यामुळे त्याला श्रद्धा म्हणायचं बरं का! खबरदार कुणी अंधश्रद्धा वगैरे म्हणाल तर!
तर आता येशूच्या जन्मापूर्वी ४००४ वर्षं ते येशूच्या जन्मानंतरची ही १८००-१९००-२००० वर्षं एवढ्या काळातच जगातल्या सर्व संस्कृतींचा इतिहास कोंबायचा. त्यासाठी वाटेल त्या बौद्धिक कसरती करायच्या. ग्रीक आणि रोमन या प्राचीन संस्कृती ठरवायच्या, तर त्यातला सर्वात मोठा अडथळा म्हणजे भारतीय संस्कृती. मग वैदिक संस्कृतीला गुराख्यांची संस्कृती म्हणायच.
रामायण-महाभारताला काल्पनिक ठरवायचं, आर्य आणि द्रविड असा काल्पनिक संघर्ष उभा करायचा. दक्षिण भारतातल्या द्रविड देवता आणि उत्तर भारतातल्या आक्रमक आर्यांच्या देवता यांचा मिलाफ आर्यांमधल्या ब्राह्मण पुरोहित वर्गाने घडविला आणि स्वतःच्या पोटापाण्याची सोय केली, अशी उघड उघड टिंगल करायची; इत्यादी गुणांनी! आल्ङ्ग्रेड ड्‌गुशिये महाशयांची प्रदीर्घ प्रस्तावना अगदी नटलेली आहे. या प्रस्तावनेतच लेखिका ड्‌गलिस गेटी यांचा संशोधन ग्रंथ लिहिण्याचा हेतूही ड्‌गुशिये महाशयांनी सांगून टाकला आहे. भूत, यक्ष, राक्षस अशा कनिष्ठ योनींमधून देवत्वाप्रत उत्क्रांत होत गेलेल्या गणपती नामक हिंदू देवतेबद्दल भारत आणि आग्नेय आशियाई देशांंमध्ये काय काय माहिती उपलब्ध आहे, काय-काय लोककथा, पुराणकथा, समजुती प्रचलित आहेत, हे युरोप, अमेरिकेतल्या लोकांसमोर मांडणे; बस् एवढंच लेखिकेला अपेक्षित आहे. म्हणजेच त्याचं देवत्व, त्याचं सांकेतिक स्वरूप, त्याच्या असंख्य उपासना अशा तपशीलात तिला शिरायचंच नाहीये. तिला फक्त गणपतीबद्दल बाह्य माहिती घ्यायची आहे. तेवढं संशोधन पीएचडीला पुरेसं आहे आणि पाश्‍चिमात्य वाचकांनाही पुरेसं आहे. पण आमचं काय? हत्तीचं मस्तक, मोठं पोट, आखूड पाय असलेला गणपती बाप्पा हा कुणी भूत-पिशाच्च, राक्षस, यक्ष नसून; त्याचं हे वरकरणी विचित्र भासणारं रूप हे सांकेतिक आहे, हे आम्ही समजून घेणार आहोत की नाही? ‘गणानां त्वा गणपतिं हवामहे’ इतक्या स्पष्ट शब्दांत त्याचा उल्लेख ‘ऋग्वेद’ या आद्यग्रंथात असूनही आम्ही त्याला पाचव्या-सहाव्या शतकातला देव म्हणत राहणार आहोत का? आणि तेही एलिस गेटीच्या आधारावर? गोर्‍या लोकांंचं संशोधन हेच खरं मानण्याची ही गुलामी मनोवृत्ती आम्ही कधी सोडणार आहोत?
तो बुद्धिदाता गजानन आपणा सर्व हिंदूंना सुबुद्धी देवो, हीच प्रार्थना.
– मल्हार कृष्ण गोखले