तव्याखालचा जाळ केव्हाच विझला आहे!

0
122

आधी देश, मग पक्ष आणि सगळ्यात शेवटी मी, असा संदेश भाजपाचे नेतृत्व आपल्या कार्यकर्त्यांना देत असताना, कॉंग्रेस देश खड्‌ड्यात घालायला निघाली आहे. आज देशाला ज्याची आवश्यकता आहे, ते भाजपाकडून केले जात आहे. याउलट, विरोधासाठी विरोध करायचा म्हणून आंधळी झालेली कॉंग्रेस देशहित खुंटीला टांगून जनमानसात विद्वेष पसरविण्याचे काम करीत आहे. मुस्लिमांच्या मनात हिंदूंबद्दल द्वेषभावना पसरवून कॉंग्रेस स्वत:ची राजकीय पोळी शेकू पाहात आहे. पण, कॉंग्रेसला हेच माहिती नाही की, तव्याखालचा जाळ जनतेने केव्हाच विझविला आहे!
स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेला कॉंग्रेस पक्ष आज अस्तित्वाची लढाई लढत आहे. देशातला सगळ्यात जुना पक्ष अशा प्रकारे अस्तित्वासाठी लढाई लढत आहे, ही भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने खरेतर चांगली बाब नाही. सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करून आणि भारतीय जनता पार्टीवर टीका करून जनता आपल्याकडे आकर्षित होऊ शकत नाही, हे कॉंग्रेसच्या नेत्यांना कळेनासेच झाले आहे. २०१४ ची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या अनेक विधानसभांच्या निवडणुकीत झालेल्या पराभवातून कॉंग्रेस अद्यापही सावरलेली दिसत नाही. सगळ्यात जुना राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉंग्रेसला आज प्रत्येक राज्यात प्रादेशिक पक्षाचा आधार घेऊन भाजपाचा मुकाबला करण्याची बुद्धी व्हावी, हे त्या पक्षाचे दुर्दैवच!
ज्या ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, त्या सर्व राज्यांत स्थानिक पक्षांसोबत एकत्र यावे आणि भाजपाच्या विरोधात जनमत पेटवून द्यावे, ही जी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची कल्पना आहे, ती कॉंग्रेसमधल्या अनेक मोठ्या नेत्यांना मान्य नाही. प्रत्येक राज्यात कॉंग्रेसने जर प्रादेशिक पक्षाशी युती केली, तर स्वत:चे अस्तित्व गमावले जाण्याची भीती कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांना सतावत आहे. त्यामुळेच स्वत:चे अस्तित्व कायम टिकवून ठेवण्यासाठी भाजपाविरुद्धची लढाई स्वबळावर लढावी, असा काही बड्या नेत्यांचा आग्रह आहे.
ज्या उत्तरप्रदेशने कॉंग्रेसला पंतप्रधानपदाचे सर्वाधिक उमेदवार दिलेत, त्या उत्तरप्रदेशात गेल्या कित्येक वर्षांपासून कॉंग्रेस सत्तेबाहेर आहे. पराकोटीचे प्रयत्न करूनही तिथे कॉंग्रेसला सत्ता मिळवता आलेली नाही. उत्तरप्रदेशात कधी समाजवादी पार्टी, कधी बहुजन समाज पार्टी आणि कधी भाजपाची सत्ता राहिली आहे. सध्या उत्तरप्रदेशात भाजपा सत्तेत आहे. देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्यात कॉंग्रेस सातत्याने सत्तेबाहेर राहिल्याने कॉंग्रेसचे मनोधैर्य खच्ची झाले आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान या राज्यांमध्येही कॉंग्रेसला जनतेने नाकारल्याने कॉंग्रेसमध्ये नैराश्य आले आहे. गुजरातमध्ये तर २००२ पासून कॉंग्रेस पराभूतच होत आली आहे. त्यातून कसे सावरायचे, असा प्रश्‍न कॉंग्रेसच्या नेत्यांना सतावत आहे.
बिहारमध्ये विरोधी ऐक्याची मोट बांधून भाजपाला पराभूत करण्यात कॉंग्रेसला, लालू आणि नितीशकुमार यांच्या मदतीने यश मिळाले होते. तब्बल वीस महिने कॉंग्रेस-राजद-जदयू या महाआघाडीचे सरकार बिहारमध्ये राहिले. लालूपुत्र तेजस्वी यादव यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचे निमित्त करत नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते महाआघाडीतून बाहेर पडले. दुसर्‍याच दिवशी त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत युती करून मुख्यमंत्रिपदाची पुन्हा शपथ घेतली. त्यांच्या या चालीने राजदचे लालूप्रसाद यादव आणि कॉंग्रेसचे राहुल गांधी घायाळ झाले नसते तरच नवल! ज्या नितीशकुमारांचे लालूंनी कालपर्यंत गोडवे गायले होते, त्याच नितीशकुमारांवर लालूंनी जबरदस्त चिखलफेक केल्याने लालूंचे ढोंगही उघडे पडले. नितीशकुमार यांची प्रशंसा करताना न थकणारे राहुल गांधीही नितीशकुमाारंवर आसूड ओढू लागले. वीस महिन्यांचा संसार तुटला अन् राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
नितीशकुमार यांनी भाजपाशी युती केल्याबरोबर रालोआत मात्र प्रवेश केला नव्हता. पण, गेल्या आठवड्यात पक्षाचे संमेलन घेऊन नितीशकुमार यांनी ठराव पारित करवून घेत रालोआतही प्रवेश घेतला. नितीशकुमार यांचा भाजपासोबत जाण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांना पसंत पडला नव्हता. त्यांनी तशी नाराजी व्यक्तही केली होती. पण, नितीशकुमार यांनी ठरवून निर्णय घेतल्याने अन् शरद यादव यांना भाव न दिल्याने शरद यादव दुखावले जाणे स्वाभाविक होते. जदयूचेच एक राज्यसभा सदस्य अली अन्वर यांनाही नितीशकुमारांचा निर्णय पटलेला नव्हता. त्यांनी पक्षाविरुद्ध उघड भूमिका घेतल्याने नितीशकुमार यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. आता शरद यादव हेही बंडाच्या पवित्र्यात आहेत. मध्यंतरी त्यांनी दिल्लीत ‘साझा विरासत संमेलन’ घेतले. या संमेलनात कॉंग्रेसकडून राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारखे बडे नेते सहभागी झालेतर खरे, पण या संमलेनातही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भाजपावर जुनेच आरोप करण्यात आले. नवे काहीच नव्हते. नितीशकुमारांवरही तेच आरोप करण्यात आले.
शरद यादव यांना नितीशकुमारांचा निर्णय अजीबातच मान्य नसल्याने ते हळूहळू बंडखोरीच्या तयारीत आहेत. त्यांनी नितीशकुमारांच्या नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी कंबर कसताना कार्यकर्त्यांनी आपल्यासोबत यावे, असे आवाहनही केले होते. परंतु, आजवर तरी कार्यकर्त्यांनी शरद यादव यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला दिसत नाही. शरद यादव हे फारसा जनाधार असलेले नेते नाहीत आणि म्हणून अशा जनाधार नसलेल्या नेत्याने आयोजित केलेल्या ‘साझा विरासत संमेलनात’ राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि गुलाम नबी आझाद यांनी हजर राहणे, कॉंग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना रुचलेले नाही. शरद यादव आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न जरूर करीत आहेत, पण अद्यापतरी त्यांना यश मिळू शकलेले नाही. कारण, कार्यकर्त्यांची फौजच त्यांच्या मागे नाही! शरद यादव वेगळा पक्ष स्थापन करतात की अन्य राजकीय पक्षात जातात, हे अद्याप निश्‍चित नसले, तरी विरोधी ऐक्य साधण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत, हे दिसतेच आहे. राहुल गांधी, गुलाम नबी आझाद आणि मनमोहनसिंगांसारख्या नेत्यांनी शरद यादवांच्या संमेलनात उपस्थिती लावून आम्ही विरोधकांचे ऐक्य साधू इच्छितो हे दाखवून दिले असले, तरी ज्या नेत्याला जनाधारच नाही, त्या नेत्याने आयोजित केलेल्या संमेलनाला हजेरी लावून उपयोग काय, असा प्रश्‍न कॉंग्रेसमधले अन्य नेते विचारत आहेत. या प्रश्‍नाचे उत्तर पक्षश्रेष्ठींना द्यावेच लागेल.
शरद यादव यांनी जसे संमेलन बोलावले होते, तशीच एक बैठक याआधी सोनिया गांधी यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बोलावली होती. त्या वेळी १३ पक्षांचे बडे नेते तिथे एकत्र जमले होते. त्या वेळी जी वक्तव्ये सर्व नेत्यांनी केली होती, तशीच वक्तव्ये शरद यादवांच्या संमेलनातही सर्व नेत्यांनी केली. मोदींवर आणि भाजपावर टीका करताना नवा कोणताही मुद्दा नव्हता. आता पुन्हा सोनिया गांधी यांना असे वाटते आहे की, जिथे जिथे भाजपाचे राज्य आहे, त्या राज्यांमध्ये असे ‘साझा विरासत संमेलन’ घ्यावे. पण, याला कॉंग्रेसमधल्याच अनेक नेत्यांचा विरोध आहे. आता या विरोधाला सोनिया आणि राहुल गांधी किती जुमानतात, यावरच विरोधाचे अन् कॉंग्रेसचेही भवितव्य अवलंबून आहे. आजची कॉंग्रेस ही क्षीण झालेली आहे. विरोधी ऐक्याचे नेतृत्व करण्याचीही क्षमता कॉंग्रेस पक्षात राहिलेली नाही. जे शरद यादव नितीशकुमारांच्या ऐकण्याबाहेर गेले आहेत, ते कॉंग्रेसचे नेतृत्व मान्य करतील, याचीही शक्यता दिसत नाही. शरद यादव असतील, अजितसिंग असतील, नवीन पटनायक असतील, ममता बॅनर्जी असतील, हे सगळे स्वयंभू नेते आहेत. ते मोदीविरोधासाठी जरूर कॉंग्रेससोबत एकत्र येतील. पण, कॉंग्रेसचे कितपत ऐकतील, याबाबत शंकाच आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत लालू-नितीश यांनी जेवढ्या जागा फेकल्या तेवढ्याच कॉंग्रेसने स्वीकारल्या. केवळ ४० जागा कॉंग्रेसला लढवता आल्या, ही तर कॉंग्रेससाठी फार नामुष्कीच गोष्ट होती. आता बिहारमध्ये कॉंग्रेसचे अस्तित्व काय? भाजपा आणि नितीश एकत्र आल्याने पुढची लोकसभा आणि त्यानंतरची विधानसभाही कॉंग्रेस गमावणार, हे निश्‍चित!
सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करून कॉंग्रेससह सगळेच विरोधी पक्ष स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार उत्तम कामगिरी करीत आहे आणि आज निवडणुका झाल्या तर भाजपाला ५४३ पैकी २९८ जागा मिळतील अन् भाजपा पुन्हा केंद्रात सत्तेत येईल, असा निष्कर्ष एका दूरचित्रवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आला आहे. मोदींनी देशहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. २०२२ पर्यंत त्यांना देशातील प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर द्यायचे आहे. संपूर्ण भारतात स्वच्छता अभियान राबवून त्यांना निरोगी भारताचे निर्माण करायचे आहे, प्रत्येक घरात गॅस पोहोचेल याची व्यवस्था करायची आहे, प्रत्येक गावात वीज पोहोचेल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रकारची कुठलीही योजना देशवासीयांपुढे सादर करण्याची कुवत आज कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांमध्ये असल्याचे दिसत नाही. आम्हाला सत्ता दिली तर आम्ही काय करू, हे जनतेला सांगण्याऐवजी पंतप्रधानांवर टीका करण्यातच विरोधक सगळी ऊर्जा वाया घालवत आहेत. जनतेला असा प्रकार आवडत नाही, ही बाब विरोधकांच्या लक्षातच येत नाहीय् आणि त्यामुळेच मोदींची लोकप्रियता घसरण्याऐवजी वाढत चालली आहे. एखादा मजबूत असा पर्यायी कार्यक्रम, जो देशहिताचा असेल, तो जनतेपुढे ठेवला आणि त्याची अंमलबजावणी कशी करणार हे जर तुम्ही जनतेला सांगितले, तर ते जास्त आवडेल अन् त्याचा फायदाही तुम्हाला होईल, हे लक्षात घ्यायलाच कॉंग्रेस तयार नाही.
देशात दीर्घ काळ कॉंग्रेसचीच सत्ता राहिली आहे. पण, सत्ता उपभोगताना कॉंग्रेसने या देशातील बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाकडे दुर्लक्ष करीत अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण करण्याचे धोरण स्वीकारले. कॉंग्रेस डाव्या विचारांकडे झुकत गेली. आज आपल्या देशात डाव्या विचारसरणीचे अस्तित्व धोक्यात आले असताना कॉंग्रेसने मध्यममार्ग सोडत डावीकडे झुकण्यात धन्यता मानल्याने त्या पक्षाची काय दुर्गती झाली आहे, हे आपण पाहतोच आहोत. पक्षाचे उपाध्यक्ष आणि भावी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात तर पूर्णपणे डावी विचारसरणीच ठासून भरल्याचे दिसते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह, देशात राष्ट्रवादी विचारसरणी ठासून रुजविण्याचा प्रयत्न करीत असताना, कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्ष त्याविरुद्ध रान उठवण्याचा प्रयत्न करीत देशात असहिष्णुता आल्याचा डांगोरा पिटत आहेत. आधी देश, मग पक्ष आणि सगळ्यात शेवटी मी, असा संदेश भाजपाचे नेतृत्व आपल्या कार्यकर्त्यांना देत असताना, कॉंग्रेस देश खड्‌ड्यात घालायला निघाली आहे. आज देशाला ज्याची आवश्यकता आहे, ते भाजपाकडून केले जात आहे. याउलट, विरोधासाठी विरोध करायचा म्हणून आंधळी झालेली कॉंग्रेस देशहित खुंटीला टांगून जनमानसात विद्वेष पसरविण्याचे काम करीत आहे. मुस्लिमांच्या मनात हिंदूंबद्दल द्वेषभावना पसरवून कॉंग्रेस स्वत:ची राजकीय पोळी शेकू पाहात आहे. पण, कॉंग्रेसला हेच माहिती नाही की, तव्याखालचा जाळ जनतेने केव्हाच विझविला आहे!
उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टी आणि बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राजदसोबत युती करून कॉंग्रेसने कधीही भरून न निघणारे नुकसान करवून घेतले आहे, असे कॉंग्रेसचे अनेक नेते खाजगीत बोलत असतात. प्रादेशिक पक्षांसोबत युती केल्याने तिथले कॉंग्रेसचे कार्यकर्ते निराश झाले आहेत. त्यांच्यात आता लढण्याचे चैतन्यच राहिलेले नाही. नेते उसने अवसान आणून लढण्याचा आव आणतात. पण, त्यांच्यातही आता लढण्याचा स्वाभिमानी बाणा राहिलेला नाही. कोणताही प्रादेशिक पक्ष कॉंग्रेससाठी जास्त जागा सोडायला तयार नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या नेतृत्वात आता विरोधी ऐक्य घडून येईल, अशी भाबडी आशा बाळगणेही चूकच ठरणार आहे…!
– गजानन निमदेव