घामाची फुले…

0
35

कल्पवृक्ष
लहानपणी ‘घामाची फुले’ नावाची एक सुंदर गोष्ट वाचली होती. एका वर्गात शिक्षक मुलांना विचारतात, सर्वात चांगले पाणी कोणते? मुले विहीर, तलाव, नदी, गंगा, अशी वेगवेगळी उत्तरे देतात. मग गुरुजी त्यांना एक गोष्ट सांगतात. आताचे शिक्षक मुलांना गोष्टी का सांगत नाहीत, हा एक प्रश्‍नच आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या ओझ्याखाली ती दबलेली आहेत, की मुळातच त्यांना गोष्टी माहीत नाहीत, हा संशोधनाचा विषय आहे. आपल्या गोष्टीतला शिक्षक मात्र मुलांना एक गोष्ट सांगतो. राम वनवासात असताना शबरीच्या आश्रमात जातात. त्या आश्रमाभोवती रंगीबेरंगी, सुगंधी व सुंदर छोटी छोटी फुले असतात. ती पाहून रामालाही फार आनंद होतो. तो त्या फुलांची चौकशी करतो. शबरी रामाला त्या फुलांचा इतिहास सांगते. अनेक वर्षांपूर्वी त्या ठिकाणी एका ऋषींचा आश्रम होता. विद्यार्थी त्या आश्रमात शिकत असत. पावसाळा जवळ आला की, चार महिन्यांची लाकडे आश्रमात जमा करून ठेवणे आवश्यक असते. ऋषी, विद्यार्थांना तसे सांगून ठेवतात. पण, विद्यार्थी कंटाळा करत होते. शेवटी गुरुजी स्वत:च एक दिवस सकाळी खांद्यावर कुर्‍हाड टाकून जंगलात निघाले. त्यांच्या मागे विद्यार्थीही गेले. दिवसभर त्यांनी लाकडे तोडली. मोळ्‌या बांधल्या व त्या डोक्यावर घेऊन सायंकाळी ते परत आले. आज ते खूप दमले होते. गुरुजींनी अभ्यासाला सुटी दिली व त्यांना झोपण्याची परवानगी दिली. सकाळी उठल्यानंतर काही मुलांना आश्रमाच्या बाहेर सुंदर रंगीत सुगंधी फुले दिसली. ऋषींसह सर्वच ती पाहण्याकरिता बाहेर आले. कारण ती फुले आजच उगवली होती. रात्री ज्या वाटेने ते जंगलातून परत आले होते, त्या मार्गावर गुरुजी त्यांना घेऊन गेले. त्या पूर्ण मार्गावर सुंदर फुले उमलली होती. गुरुजी म्हणाले, काल तुम्ही खूप मेहनत केली, तुमचा घाम या मार्गावर पडला. त्याचीच ही फुले झाली आहेत. शबरी म्हणाली, ‘‘रामा, त्या फुलांची आता जंगलात असंख्य फुले झाली आहेत.’’ गोष्ट संपल्यानंतर गुरुजींनी मुलांना पुन्हा तोच प्रश्‍न विचारला. ‘‘सर्वात चांगले पाणी कोणते?’’ मुले एका स्वरात म्हणाली, ‘‘घामाचे.’’ साने गुरुजींची ही गोष्ट आहे. आजही पुन्हा एकदा नव्याने ती सांगण्याची गरज आहे. ज्या काळात त्यांनी ही गोष्ट सांगितली, त्या काळात काही प्रमाणात घाम गाळणे, शारीरिक मेहनत करणे अपरिहार्य होते. आज घाम गाळणे तर सोडाच, शरीराने काही काम करणेही आपण विसरत चाललो की काय, अशी स्थिती आली आहे.
म. गांधी, विनोबाजी यांच्या शिक्षणपद्धतीत श्रमाला महत्त्व होते. गांधीजींसारखा विश्‍वविख्यात नेता आश्रमात शौचालय साफ करण्यापासून सर्व प्रकारची कामे करायचा, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. विनोबाजी गांधीजींना प्रथम भेटायला गेले त्या वेळी ते भाजी चिरत होते. थोडी भाजी व विळी त्यांनी विनोबाजींसमोर सरकवली. ते भाजी कसे चिरतात, याचे गांधीजी निरीक्षणही करत होते.
शरीर हा मन व बुद्धी यांचा पाया आहे. प्रत्यक्ष शारीरिक श्रमाचे मनुष्याच्या विकासात महत्त्व आहे, ही गोष्ट आपण विसरत चाललो आहोत. आपल्याला हात आहेत. पाय आहेत. त्यांना विशिष्ट ठिकाणी सांधे आहेत. आपल्याजवळ ज्ञानेंद्रिये आहेत, कर्मेंद्रिये आहेत. रोज त्यांचा नित्य नेमाने, विभिन्न प्रकारे उपयोग केल्यानेच इंद्रिये कार्यक्षम व कुशल होतात. सर्व ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून हाताने काम करणे, त्या कामाकरता बुद्धीचा उपयोग करणे व मनाने त्याचा आनंद अनुभवणे, हे सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक असते. शरीरश्रम व बुद्धिमत्ता यांचा संयोग झाला पाहिजे. यातूनच कार्यक्षमता व कृतिशीलतेचा विकास होतो. आपल्या दैनंदिन जीवनाचे निरीक्षण केले तर काय स्थिती आहे? डोळ्यांचा उपयोग मोबाईल, टीव्ही पाहण्याकरिता सर्वाधिक होतो. हात असून आपण काम करत नाही. पाय असून चालत नाही. किमान रोज दहा हजार पावलं चालणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञ सांगतात. आपल्या रोजच्या जगण्याकरिता आवश्यक असलेली सर्व प्रकारची कामे सक्षमपणे व कुशलतेने आपल्याला करता येतात का? पालकही मुलांना पंगू बनवतात. मुलांनी घरातल्या कामात सहभाग देणे तर सोडाच, मुलांची कामे ही पालकच करतात. अशाने जबाबदारीची जाणीव कशी निर्माण होणार? अनेक ठिकाणी आजकाल सेल्फ सर्व्हिस असते. आपल्यालाही सर्व प्रकारची कामे आली पाहिजेत, कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडायला नको. स्वच्छता, कपडे धुणे, स्वयंपाक करणे, बटन लावणे, शिवणे, भांडी घासणे, चादरीची घडी करणे, पॉलिश करणे, नळ बदलणे, इस्त्री करणे… अशा सामान्य वाटणार्‍या कितीतरी गोष्टी उत्तम आल्या पाहिजेत. महिला आज घराबाहेर सर्व प्रकारची कामे करतात. पण, घरात मात्र अजूनही ‘ही महिलांची कामे, ही पुरुषांची कामे’ असा भेद कायम आहे. मुळात अशा कामांचे महत्त्व आपल्या लक्षात येत नाही. काम केल्याने शरीर झिजत नसते, ते कार्यक्षम होत असते. छोटी वाटणारी हीच कामे बुद्धी व सौंदर्यदृष्टी वापरून मनापासून केली तर कौशल्य, नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, नियोजन अशा अनेक गुणांचा विकास होतो. मग मोठ्या कामातही त्याचे प्रतिबिंब दिसते. मोठे काम म्हणजे शेवटी अनेक छोट्या कामांची साखळीच असते. या सवयी लागल्या म्हणजे घरातील प्रत्येक गोष्ट जागेवर राहते. शोधण्याकरिता घर डोक्यावर घ्यावे लागत नाही. महत्त्वाचा वेळ वाया जात नाही. चपलासुद्धा रांगेत सुंदर लावलेल्या असतात. जबाबदारी पडली की ताण येत नाही. अडचणीतून मार्ग काढण्याची सवय लागते. काम करणार्‍याविषयी एक जाणीव व संवेदनशीलता निर्माण होते. घाम आणणारी शारीरिक कामे करण्याची आता गरजच पडत नाही. पण, घाम येईल, इतका व्यायाम करता येतो. या घामातून शरीर व मन निरोगी झाल्यामुळे आनंदाची फुले उमलल्याशिवाय राहणार नाहीत, हे नक्की!
रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११