जाग कधी येणार?

0
45

कल्पवृक्ष
नेपोलियन लढाईला निघाला होता. एका नदीच्या किनार्‍यावर तो आपल्या सैन्यासह येऊन पोचला. त्याने आपल्या मुख्य इंजिनीअरला बोलावले आणि विचारले, ‘‘नदीच्या पात्राची रुंदी किती असेल?’’ इंजिनीअर म्हणाला, ‘‘महाराज, सांगता येणार नाही. माझे सगळे साहित्य मागे राहिले आहे. आपण आठ-दहा मैल पुढे आलो आहोत.’’ नेपोलियनने पुन्हा फर्मावले, ‘‘नदीची रुंदी ताबडतोब मोजा.’’ इंजिनीअर घाबरून म्हणाला, ‘‘पण साहेब…’’
नेपोलियनला कोणतीही सबब नको होती. तो म्हणाला, ‘‘नदीची रुंदी ताबडतोब सांगा, नाहीतर तुम्हाला काढून टाकावे लागेल.’’ इंजिनीअरला उपाय सुचला. त्याने आपले हेल्मेट काढले व गणिताच्या नियमांचा उपयोग करून त्याने रुंदी सांगितली. त्याचे म्हणणे नेपोलियनला पटले. त्याने त्याला बढतीही दिली. शिक्षणाचा, ज्ञानाचा आपण व्यवहारात किती उपयोग करू शकतो, हेच शेवटी महत्त्वाचे असते. शिक्षण घेतल्यानंतर कोणकोणत्या क्षमतांचा, कौशल्यांचा आपल्यात विकास झाला, त्याचा आपण कसा आणि कुठे उपयोग करू शकतो, यावरच शिक्षित होण्याचा अर्थ अवलंबून आहे. एकदा, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणांच्या एका कार्यक्रमात जाण्याचा योग आला. एका चर्चासत्रात त्यांना काही प्रश्‍न विचारले. सुरुवातीला देशाच्या इतिहासाविषयी काही प्रश्‍न विचारले. सामान्य ज्ञानाविषयी विचारले. त्यांना इंग्रजी व मराठी भाषा किती प्रमाणात लिहिता, बोलता येते, यासंबंधी चाचपणी केली. संगीत, क्रीडा, कला या क्षेत्रात कोण कोण निपुण आहे, असा प्रश्‍न विचारला. दहा-बारा टक्के तरुण समाधानकारक उत्तरे देऊ शकले. त्यांना मी प्रश्‍न केला, ‘‘शेवटी तुम्हाला काय येते? स्वत:चा अभिमान बाळगावा, असे तुमच्याजवळ काय आहे? कोणती ताकद तुमच्या मनगटात आहे? जीवनाच्या संघर्षात कोणत्या आधारावर तुम्ही उभे राहणार आहात? तुमच्या कुटुंबाची जबाबदारी कशी पेलणार? देशाच्या प्रगतीकरिता तुम्ही नेमका कसा हातभार लावणार?’’ या प्रश्‍नांनी अनेक तरुण अंतर्मुख झाले. ‘‘आतापर्यंत कधी या प्रश्‍नांचा गंभीरपणे आम्ही विचारच केला नव्हता,’’ अशी कबुली अनेकांनी दिली. केजी वनपासून पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत अठरा-वीस वर्षे शिक्षणाकरिता घालवल्यानंतर कुठल्याही क्षमतांचा विकास होणार नसेल, तर ते शिक्षण निरुपयोगी ठरले, असाच निष्कर्ष काढावा लागेल. पदवी आहे पण पात्रता नाही, प्रमाणपत्र आहे पण गुणवत्ता नाही. नोकरीकरिता नेत्यांच्या मागे वणवण फिरणारे लाचार तरुण पाहिले की खंत वाटते. लाखो, करोडो तरुण या देशाच्या उत्पादनक्षमतेचा भाग नसतील किंवा होऊ शकत नसतील, तर आपण खडबडून जागे होण्याची गरज आहे.
काही दिवसांपूर्वी एका मोठ्या कंपनीचे सीईओ असलेले परिचित भेटले. ते सांगत होते, ‘‘फक्त सात टक्के इंजिनीअर्स सक्षम असतात.’’ आज दरवर्षी लाखो इंजिनीअर्स बाहेर पडतात, अशा स्थितीत त्यांचे भवितव्य काय? ‘‘तुमच्याकडे नोकरीकरिता येणारा तरुण नेमका कुठे कमी पडतो?’’ असा प्रश्‍न मी त्यांना विचारला. ते सांगत होते, ‘‘पदवी घेतल्यानंतरही त्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट नसतात. सखोल तांत्रिक माहिती नसते. ‘प्रॅक्टिकल नॉलेज’ कमी असते. ग्राहकांकरिता आवश्यक असलेल्या संवादकौशल्याचा अभाव असतो. तांत्रिक समस्या निर्माण झाली तर ज्ञानाचा उपयोग करून ती सोडवता येत नाही. आपल्या क्षेत्रातील अद्ययावत माहिती नसते. म्हणजे अर्थशास्त्रात एम. ए. झालेल्या तरुणाला जगात सुरू असलेल्या अर्थव्यवस्थेतील बदलांची माहिती नसते.’’ या समस्या केवळ व्यवस्थेशी संबंधित नाहीत. आपली मनोवृत्तीही त्याला कारणीभूत आहे. म्हणून शिक्षणपद्धती किंवा शिक्षणव्यवस्थेला नावे ठेवून परिस्थिती बदलणार नाही. तरुणांनी स्वत:पासूनच बदलाला सुरुवात केली पाहिजे. आजची प्रसारमाध्यमे आपल्याला प्रेरणा देऊ शकत नाहीत. नट-नट्या, क्रिकेट, राजकारण, भ्रष्टाचार यांनीच त्यांचा वेळ व्यापलेला असतो. आपणही या क्षुल्लक आणि थिल्लर मनोरंजनाच्या नादी लागून आपले तारुण्य नासणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मूठभर लोकसंख्या असलेल्या इस्रायल देशाने सर्व क्षेत्रात प्रचंड झेप घेतली आहे. याचे कारण त्या देशातील माणसेही प्रचंड क्षमतावान आहेत. एकच माणूस वैज्ञानिक असतो, तोच शेतकरीही असतो आणि वेळ पडली तर तोच लढण्याकरिता शस्त्रसज्ज सैनिकही होतो! आजपर्यंत सर्वाधिक नोबेल पुरस्कार ज्यू लोकांना मिळाले आहेत. आपण फक्त आपल्या प्राचीन विज्ञानाचा अभिमान बाळगतो. आजचे सगळे शोध भारतात पूर्वीच लागून गेले आहेत, अशा थाटात आपण बोलत असतो! पूर्वजांचे फक्त गोडवे गायल्याने क्षमता निर्माण होत नसतात. भूतकाळाची प्रेरणा घेऊन आपला वर्तमानकाळ कठोरपणे घडवावा लागतो आणि तो केवळ स्वप्नरंजन केल्याने घडत नाही. आपण कुठे कमी पडलो, याचा शोध घेऊन त्या उणिवा दूर केल्या पाहिजेत. प्रयत्नांनी ते निश्‍चितच साध्य होते.
‘असाध्य ते साध्य, करीता सायास,
कारण अभ्यास तुका म्हणे|’
प्रयत्न आणि अभ्यास हा मंत्र तुकारामांनी आपल्याला दिलेलाच आहे. ‘एज्युकेशन इज द कपॅसिटी टु सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स इन लाईफ,’ अशी शिक्षणाची व्याख्या आहे. हा संदर्भ लक्षात घेऊन कधीतरी आपल्या कपॅसिटीचा विचार केला पाहिजे. आपल्या अपयशाचे खापर दुसर्‍या कुणावरतरी फोडणे बंद केले पाहिजे. प्रचंड क्षमतेतूनच आत्मविश्‍वास, आत्मनिर्भरता व आत्मसन्मान निर्माण होत असतो. त्या अभावी असतो तो केवळ पोकळ अहंकार. उपकृत असलेला मिंधा, सुमार माणूस कधीही राष्ट्र घडवू शकत नाही. खरा आत्मसन्मान आणि खरा आत्मविश्‍वास असलेला स्वावलंबी माणूसच राष्ट्राचा उद्धार करू शकतो. म्हणून कोणत्याही स्थितीत आपल्या जीवनाची प्राथमिकता हीच असली पाहिजे.
– रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११