… फक्त ‘लढ’ म्हणा!

0
53

कल्पवृक्ष
कुसुमाग्रजांची ‘कणा’ नावाची एक सुंदर कविता आहे. पुराच्या पाण्यामुळे त्यांच्या एका विद्यार्थ्याच्या घराची वाताहत झाली. जीवनात कुणाच्याही वाट्याला अनपेक्षित संकटे येऊ शकतात, त्याचे प्रतीकात्मक वर्णन या कवितेत फार समर्थपणे केले आहे. पुराचे पाणी संपूर्ण घरात शिरले. घरात होते नव्हते ते सारे वाहून गेले. बायकोही पुरात अडकली होती, ती मात्र वाचली. घराच्या भिंती खचल्या, चूल विझली, दोन घास कसे खावे, हाच प्रश्‍न उभा झाला. नदी जाताना फक्त ‘पापण्यांमध्ये पाणी’ ठेवून गेली. त्याने आता बायकोसोबत पुन्हा जीवनाचा लढा सुरू केला. तो चिखल व गाळ काढतो आहे. खचलेल्या भिंती पुन्हा बांधतो आहे. तरीही त्याचा नदीवर राग नाही. तो म्हणतो, ‘‘गंगामाई घरट्यात राहून गेली, माहेरवाशिणीसारखी घरात नाचली.’’ संकटांकडेही कसे धीरोदात्तपणे पाहावे, याचे हृदयस्पर्शी वर्णन या ओळीत आहे. माणूस, आलेल्या परिस्थितीला तोंड देतोच, पण पापण्यांमध्ये साचलेल्या पाण्याला कुठेतरी वाट मिळावी आणि स्वच्छपणे पुन्हा जीवनाकडे पाहता यावे, अशी ओढ अंतर्मनात असतेच. म्हणूनच तो आपल्या शिक्षकांकडे जातो. त्यांच्यासमोर मन मोकळे करतो. ओढवलेली सारी परिस्थिती सांगतो. शिक्षकही अस्वस्थ होतात. आणि त्याला आर्थिक मदत करण्याकरिता ते खिशात हात घालतात. आपण माणसांची किंमत फक्त पैशात करतो. लोकांनाही फक्त पैसा हवा असतो, असाच आपल्या छोट्या मेंदूचा समज असतो. पण, त्या विद्यार्थ्याने व्यक्त केलेली अपेक्षा, मानवी जीवनातील एक विलक्षण सत्य सांगून जाते. म्हणूनच कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या या आशयसंपन्न ओळी मराठी साहित्यात अमर आहेत. ते लिहितात,
खिशाकडे हात जाताच, तो हसत हसत उठला
पैसे नकोत सर, सहज एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा
पाठीवर हात ठेवून नुसते ‘लढ’ म्हणा…
आज आपलेपणाने पाठीवर हात ठेवून ‘लढ’ म्हणणारे, आधार देणारे हात झपाट्याने कमी होत आहेत. एकटेपणा वाटला तर ज्यांच्या खांद्यावर विश्‍वासाने डोके ठेवता येईल, असे खांदे दुर्मिळ होत आहेत आणि कदाचित त्यामुळेच आपसातील संबंधांची वीण विरविरीत झाली आहे. माणूस असुरक्षित आणि भयग्रस्त होत आहे. आपल्या जवळच्या माणसांचा विश्‍वास वाटत नाही. मग कुठलातरी बाबा, बापू आधाराकरिता शोधावा लागतो. कुठल्यातरी कळपात स्वत:ला बांधून घ्यावे लागते. निरोगी समाजाचे हे लक्षण नसते.
माणूस एकटा जन्माला येतो. एका असुरक्षित, अनिश्‍चित जगात. नशिबात असेल तर आईवडिलांच्या अत्यंत सुरक्षाकवचात तो मोठा होतो. पण, या जगात कोणत्याही गोष्टीची हमी देता येत नाही. कदाचित म्हणूनच जन्मापासून आश्‍वासक हातांची त्याला गरज भासते. उत्तम कुटुंब, जिव्हाळा देणारे नातेवाईक, संवेदनशील व सुसंस्कृत समाजात ती गरज पूर्णही होते. आधार मागणारे हात, आधार देणारेही होतात. आयुष्याच्या प्रवासात कितीतरी प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. संकटांनी माणूस त्रस्त होतो. वेदनांनी खचून जातो. पण, ‘‘चिंता करू नको, मी आहे ना.’’ हे शब्द सगळी ताकद गोळा करून समोर जायची हिंमत देतात. अनामिक शक्ती असते त्या शब्दांमध्ये! माणसं आसुसलेली असतात त्या शब्दांकरिता. फार गरज असते, ते जाणीवपूर्वक सांगण्याची. विरेन एका औषधी कंपनीत अधिकारी होता. कायम टारगेट आणि प्रवासाच्या ओझ्याखाली दबलेला. तशातच मधुमेह झाला आणि एक दिवस अचानक डोळे गेले. त्याचे सारे जगच अंधारात ढकलले गेले. मुलं लहान होती. काही उपाय नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले. बायकोच्या पायाखालची जमीन घसरली. पण ती लगेच सावरली. तिने नवर्‍याला सांगितले, ‘‘आता तुम्ही चिंता करू नका, मी आहे ना.’’ त्या शब्दांनी विरेनला जीवदान मिळाले. आज तो फिट आहे. नव्या जीवनाशी जुळवून घेत सक्रिय आहे. घरातल्या वृद्धांना, अपयश आलेल्या मुलांना, मोठा आजार असलेल्या रुग्णांना, आपत्तीत सापडलेल्या मित्रांना, हे सांगण्याची गरज असते. कुटुंबापासून सुरू झालेले हेच वर्तुळ समाजापर्यंत विस्तारित होत जाते.
सामाजिक जीवनातही याची गरज असते. भगिनी निवेदिता यांनी विवेकानंदांच्या प्रेरणेने इंग्लंड सोडून पूर्ण वेळ भारतात येऊन काम करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी स्वामीजी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे होते. निवेदिता यांना पाठवलेल्या पत्रात स्वामीजी लिहितात, ‘‘उडी घेण्यापूर्वी तुम्ही नीट विचार करणे आवश्यक आहे. तुम्हाला जर या कार्यात अपयश आले किंवा कार्याचा उबग आला तर मी आमरण तुमच्या पाठीशी राहीन, एवढे मी तुम्हाला निश्‍चित सांगतो… मग तुम्ही भारतासाठी कार्य करीत असा की नसा, वेदान्त मानीत असा की नसा. हत्तीचे सुळे एकदा बाहेर आले म्हणजे पुन्हा काही आत जात नाहीत. त्याप्रमाणे, खर्‍या पुरुषाच्या तोंडून एकदा शब्द बाहेर पडले म्हणजे ते तो कधीही मागे घेत नाही. माझे हे तुम्हाला अभिवचन आहे.’’ किती ठामपणे विवेकानंद त्यांच्या मागे उभे आहेत! आणि विशेष म्हणजे कार्य सोडण्याचा प्रसंग आलातरी. संघटनेकरिता आयुष्याची बाजी लावणार्‍या कार्यकर्त्यांना थोडेही मतभेद झाले तरी वार्‍यावर सोडणारे नेते आज फार मोठ्या संघटनांमध्येही दिसतात. लोकांच्या सुखदु:खात सहभागी झाले पाहिजे, अशी भाषणे देणारे वेळेवर पळ काढतात. पाठीचा कणा मोडून लाचार होणार असाल, तर ते तुमच्या पाठीशी उभे राहायला तयार असतात.
आयुष्यात प्रत्येकालाच असा ‘लढ’ म्हणणारा मिळेलच असे नाही. शेवटी आपल्या पायावरच आपल्याला उभे राहायचे असते, हे लक्षात ठेवले पाहिजे. आपल्याला जन्माला घालणारा परमेश्‍वर निराधार ठेवणार नाही, यावर पूर्ण श्रद्धा ठेवायची असते. आणि ताठ कण्याने निर्भयपणे जीवनाचा लढा देण्यासाठी सिद्ध व्हायचे असते.
रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११