सगळ्यांनीच धडा घ्यावा!

0
81

अग्रलेख
आश्रमातील साध्वींवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात, डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम याला एकूण २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणांमधील सर्व साक्षीदारांची साक्ष नोंदविल्यानंतर आणि सर्व पुरावे तपासल्यानंतर जेवढी शिक्षा देता येणे शक्य होते, तेवढी शिक्षा सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सुनावली आहे. भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत बाबा राम रहीमने जो गुन्हा केला, तो अमानवीय आणि अतिशय घृणित आहे असे मानत, न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. बाबा राम रहीमला ज्या दिवशी दोषी ठरविण्यात आले, त्या दिवशी बाबाच्या गुंडांनी जो हैदोस घातला, तो लक्षात घेत, शिक्षा सुनावण्याच्या दिवशी हरयाणा सरकारने २५ ऑगस्टची पुनरावृत्ती टाळण्यासाठी २८ ऑगस्टला सुरक्षाव्यवस्था अतिशय कडेकोट केली होती. हरयाणा सरकारने आधीच्या चुकीतून धडा घेत असा बंदोबस्त केल्याने, २८ ऑगस्टला आणि काल २९ ऑगस्ट रोजी कुठेही अनुचित घटना घडली नाही, हे बरे झाले. हरयाणात जे घडले, ते देशाच्या कुठल्याही भागात घडू शकते, ही बाब लक्षात घेत हरयाातील घटनेतून धडा घेत सर्व राज्यांनी प्रसंगानुरूप सुरक्षाव्यवस्था सज्ज ठेवली पाहिजे. अन्यथा, पुन्हा पंचकुलासारखे प्रकार घडतच राहतील अन् नागरिकांच्या खाजगी मालमत्तेचे, तसेच सार्वजनिक संपत्तीचे विनाकारण अतोनात नुकसान होत राहील. शिवाय, प्राणहानी होते ती वेगळीच. असले प्रकार टाळणे ही सरकारच्या हातची गोष्ट आहे. हिंसाचाराच्या घटना घडतात, तेव्हा हिंसा घडवून आणणारे कोण आहेत, ते कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या धर्माचे आहेत, हे न पाहता सरकारने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी वेळीच कठोेर उपाय केले पाहिजेत. हरयाणात २५ ऑगस्टला सरकारचा अंदाज कुठेतरी चुकला, हे म्हणायला जागा आहे. पण, २८ ऑगस्टला सरकारने जे उपाय केले, त्यामुुळे हरयाणात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. बाबा राम रहीमला कठोर शिक्षा झाल्यामुळे राजाश्रय लाभलेल्या गुन्हेगारांमध्येही एक कठोर संदेश गेला आहे. शिवाय सीबीआय आणि सीबीआय न्यायालयावरील नागरिकांचा विश्‍वासही दृढ झाला आहे. २५ ऑगस्टला बाबाला दोषी ठरविल्यानंतर बाबाच्या गुंडांनी जो हिंसाचार घडवूून आणला, तो अतिशय भयानक आणि मानवतेला काळिमा फासणारा होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या कारवाईत आणि हिंसक घटनांमध्ये जे लोक मरण पावले वा जखमी झालेत, त्यात बहुतांश लोक डेराचे समर्थक वा बाबाचे गुंडच होते, अशी माहिती हरयाणा पोलिसांनीही दिली आहे. हिंसाचारामुळे आपलेच नुकसान झाले आहे, ही बाब बाबा समर्थकांना उशिरा का होईना, लक्षात आली हे बरे झाले. त्यामुळे शिक्षा सुनावण्याच्या दिवशी बाबाचे गुंड रस्त्यावर कुठे दिसलेच नाहीत! गुंडांनी आणि त्यांच्या भेकड समर्थकांनी एक बाब कायम लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे हिंसाचारात समाजाचे जेवढे नुकसान होते, त्यापेक्षा जास्त नुकसान आपले होते. हिंसाचार झाला नसता तर कदाचित बाबाच्या मालकीची संपत्ती जप्त करण्याचा आदेश हरयाणा आणि पंजाब उच्च न्यायालयाने दिलाच नसता. हिंसाचार घडवून आणल्याने हरयाणासह चार राज्यांमध्ये खाजगी तसेच सरकारी संपत्तीचे जे नुकसान झाले आहे, ते बाबाची संपत्ती विकून भरून काढले जाणार आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हटली पाहिजे. यातून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बाबांनी आणि त्यांच्या गुंड समर्थकांनी धडा घेतला पाहिजे. एका व्यक्तीला त्याच्या घृणित कृत्याबद्दल न्यायालय शिक्षा करते आणि त्यामुळे संतापून त्याचे समर्थक चार-पाच राज्यांमध्ये उभा धिंगाणा घालतात, याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. हरयाणा सरकारने २५ ऑगस्टला परिस्थिती नीट हाताळली असती, तर २८ ऑगस्टसारखेे यश मिळाले असते, असे आता म्हटले जात आहे. ते योग्यही आहे. २५ ला जी चूक झाली, ती २८ च्या उपाययोजनांनी धुऊन निघू शकत नाही. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यास जे कोणी कारणीभूत आहेत, त्या सगळ्यांवर हरयाणा सरकारने कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. बाबा राम रहीमप्रकरणी २५ ऑगस्ट रोजी फैसला सुनावला जाईल, ही बाब १७ ऑगस्ट रोजीच स्पष्ट करण्यात आली होती. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या होत्या, त्यासाठी हरयाणा सरकारकडे आठ दिवसांचा कालावधी होता. सरकारने सुरक्षेचे उपाय केलेही होते. ते दिसत होते. पण, तरीही हिंसाचार रोखण्यात अपयश का आले, याचा सखोल तपास झाला पाहिजे. देशातल्या कुठल्याही भागात असा प्रकार भविष्यात घडू नये, या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहे. जे घडले ते घडले, ते आता मागे घेता येण्यासारखे नाही. पण, यातून शिकण्यासारखे नक्कीच आहे. डेरा सच्चा सौदाच्या समर्थकांनी जो हिंसाचार घडवून आणला, त्यामुुळे डेराची प्रतिष्ठा पार धुळीस मिळाली आहे. डेराची विश्‍वसनीयताही धोक्यात आली आहे. शिवाय, धर्म आणि भक्तीच्या नावावर जो जमाव जमला आणि त्याने हिंसाचार केला, त्यामुळे भक्तीलाही काळिमा फासला गेला आहे. डेराच्या गुंडांनी जो हिंसाचार केला, त्यामुळे एकट्या पंजाबमध्ये दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बाकी राज्यांमधील नुकसानीचा आकडा समोर यायचाच आहे. तो आल्यानंतर हाहाकारच माजणार आहे. डेराची सगळी संपत्ती विकूनही नुकसान भरून निघेल काय, हा प्रश्‍नच आहे. हायकोर्टाने संपत्ती जप्त करण्याचा जो आदेश दिला आहे, तो हरयाणा सरकारने अंमलात आणावा आणि डेराला नेस्तनाबूूत करावे. २५ ऑगस्टला जे काही घडले, त्याचे हेच पापक्षालन ठरेल. हरयाणातील पंचकुलाच्या ज्या जिमखाना क्लब मैदानावर डेराचे समर्थक एकत्रित आले होते, तिथे त्यांनी झाडांच्या मोठ्या फांद्या तोडून लाठ्या तयार केल्या, आसपास ज्या भिंती होत्या, त्या भिंती तोडून तिथल्या दगडविटांचा वापर त्यांनी हिंसाचारासाठी केला. त्या हिंसक जमावाकडे पाहून क्षणभर असे वाटले की, हे युद्धमैदानच आहे की काय? अगदी न्यायालयासमोर हे मैदान आहे. तिथे वार्तांकनासाठी मोठ्या प्रमाणात पत्रकार जमले होते. न्यायालयाने बाबाला दोषी ठरविताच हिंसक जमावाने सगळ्यात आधी पत्रकारांनाच लक्ष्य बनविले. पत्रकारांना वार्तांकन सोडून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पळावे लागणे, ही लोकशाही गणराज्यात सगळ्यात दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. अहिंसा, सेवा आणि सामाजिक समरसतेसाठी ओळखला जाणारा डेेरा सच्चा सौदा आता हिंसाचारासाठी ओळखला जाईल! आता या हिंसक जमावात काही असामाजिक तत्त्वही सामील झाले होते, असा संशय व्यक्त करत डेरासमर्थक स्वत:ची प्रतिष्ठा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, डेराच्या समर्थकांनी अशा असामाजिक तत्त्वांना हुडकून काढत पोलिसांच्या हवाली करण्याचा प्रयत्न केल्याचे एकही उदाहरण अजूनतरी समोर आलेले नाही. एकूणच काय की, जे काही झाले, घडले, घडवून आणले गेले, त्याने कुणाचेही भले झालेले नाही. त्यामुळे देशवासीयांनी यातून धडा घेत पुढची वाटचाल करावी, एवढेच!