बापरे, बाप! सर्पमित्राने पकडले २० हजार साप!

0
55

सालेकसा तालुक्यात संजू शेंद्रेचा सर्पजीवदानयज्ञ
प्रमोद नागनाथे 
गोंदिया, ३० ऑगस्ट 
पुराणात राजा परीक्षिताला ऋषीच्या शापाने तक्षक नागाच्या दंशाने मृत्यू आला म्हणून त्याचा पुत्र जन्मेजयाने सर्पयज्ञ केला आणि पृथ्वीवरचे सर्वच सर्प नष्ट करण्याचा चंग बांधला होता. त्यावेळी तक्षक हा इंद्राच्या आसनामागे दडला. तेव्हा मग यज्ञ करणार्‍या ऋषींनी ‘इंद्राय तक्षकाय स्वाहा:़’ असे आवहन केल्याची कथा आहे. गोंदिया जिल्ह्यांत दुर्गम आदिवासी भागात एका युवकाने मात्र सापांना जीवदान देण्याचाच यज्ञ आरंभ केला नि आतावर जवळपास २० हजार सापांना त्याने जीवदान दिले आहे.
सर्पजीवदान यज्ञ अविरत करणार्‍या या युवकाचे नाव आहे संजू शेंद्रे. गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरचा छत्तीसगड राज्याच्या सिमेला लागून असलेला आदिवासीबहूल, नक्षलग्रस्त संवेदनशील, अतिदुर्गम तालुका अशी सालेकसा तालुक्याची ओळख आहे. तालुका निसर्गसंपत्तीच्या बाबत तालेवार आहे. अशिया खंडातील सर्वात मोठी ‘कचारगडची’ गुफा आणि पावसाळी व साहसी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला हाजराफॉलही याच तालुक्यात आहे. सर्वत्र घनदाट जंगलाने व्यापलेल्या या तालुक्यात मानागड, दर्रेकसा, डोमाटोला, दंडारी, पिपरीया, बोदलबोडी हा भाग सर्वाधिक जंगलव्याप्त आहे. जंगलांनी व्यापलेल्या या भागात साप कधीही आणि कुठेही निघतात. अर्थात दिसला साप की ठेच, हीच मानवाची प्रवृत्ती आहे, मात्र संजूने त्यात परिवर्तन आणले. आता साप दिसला की लोक संजूला बोलावतात. तो ते सर्प पकडतो आणि त्यांना सुरक्षित जंगलात साडून देतो. दहा वर्षांचा होता तेव्हापासून तो हे काम करतो. १९९५ मध्ये दर्रेकसा पोलिस ठाण्यात निघालेला साप पकडून त्याने जंगलात सोडला होता. यावेळी त्या सापाने संजूला दंशही केला होता, मात्र आयुर्वेदिक औषधांची माहिती असल्याने त्याने लगेच जवळच्या एका झाडाची पाने चावून स्वत:चे प्राण वाचविले होते. आतापर्यंत त्याने तस्कर, ऐराज, कवड्या नाग, डोंगरवेल्या, मांडवळ, धामण आदी विषारी-बिनविषारी सांपाना पकडून वनविभागाच्या साहाय्याने जंगलात सोडून जीवनदान दिले आहे. अशा प्रसंगांची नोंद तो डायरीत ठेवतो.  १९८६ पासून त्याने १९ हजार ८८६ सापांना जीवदान दिले आहे.
संजूची सेवा अदखलपात्र
तालुक्यातील एकमेव सर्पमित्र म्हणून संजू शेंद्रे याची ओळख असून त्याच्याकडून सापांना पकडून जंगालत सोडण्याचे काम नियमित सुरू आहे. त्याने आत्तापर्यंत पकडून जंगलात सोडलेले सापाची आकडेवारी पाहता शासनाने याची दखल घेवून त्याची सर्पमित्र म्हणून ओळख व्हावी, याकरिता त्याला वनविभागाच्या माध्यमातून ओळखपत्र व मानधन द्यावे, अशी मागणी या परिसरातील गावकरी करतात. संजूलादेखील वाटते की त्याच्या कामाची शासकीय पातळीवर दखल घेतली जावी.