तरुणाईचा नवा मंत्र!

0
50

कल्पवृक्ष
आज भारताची ६० टक्के लोकसंख्या तरुण आहे आणि हीच जगात आपली सर्वात मोठी ताकद आहे! २५ वर्षांपेक्षा कमी वय असलेली तरुणांची पिढी भारताचेच नव्हे, तर जगाचे भवितव्य ठरविणार आहे. प्रश्‍न इतकाच आहे की, कोणत्या उद्दिष्टांनी ही तरुण मनं भारलेली आहेत आणि स्वत:ला आकार देण्याकरिता ते काय करीत आहेत? ज्यांनी आजचा आधुनिक भारत घडवला, अशा वैज्ञानिकांच्या कार्याचा आणि विचारांचा तरुणांनी अभ्यास केला पाहिजे आणि स्वत:करिता ठोस उद्दिष्ट व कृतियोजना ठरवली पाहिजे. डॉ. रघुनाथ माशेलकर अशांपैकीच एक स्फूर्तिदायक नाव आहे!
एका अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ते ६ वर्षांचे असतानाच त्यांचे वडील वारले. मुलाला घेऊन त्यांची आई मुंबईला आली. अक्षरश: मोलमजुरी करून तिने मुलाला शिकवले. अनेकदा दोन वेळचे जेवण मिळणेही मुश्कील होते. बारा वर्षांचे होईपर्यंत त्यांनी पायात चप्पलही घातली नव्हती. मॅट्रिकला ते बोर्डातून अकरावे मेरिट होते. त्या वेळी त्या आधारावर नोकरी मिळणे सहज शक्य होते. पण, त्यांच्या आईने मुलाचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. बी. टेक्., एम. टेक्., पीएच्. डी. असा एक एक टप्पा पूर्ण झाल्यावर माशेलकर आईला विचारायचे, ‘‘आई, आता नोकरी करू का?’’ आईचा प्रश्‍न असायचा, ‘‘शिक्षण पूर्ण झाले काय?’’ पीएच. डी.नंतर त्यांनी पोस्ट डॉक्टरेट रीसर्च केल्यानंतर त्यांनी आईला सांगितले की, आता औपचारिक शिक्षण संपले. त्यानंतर आईने नोकरीकरिता परवानगी दिली. अर्थात, त्यांचे शिक्षण कधीच थांबले नाही. कायम ते संशोधनात मग्न राहिले. विशेष म्हणजे विदेशात जाऊन संशोधन केलेल्या या माणसाने परदेशातील मोठ्या पगाराच्या संधी नाकारल्या आणि आपल्या देशाकरिता कमी पगारात भारतात राहणे पसंत केले. कॉलेजमध्ये असताना त्यांना टाटा ट्रस्टकडून ६० रुपये महिना शिष्यवृत्ती मिळत असे. पुढे टाटा मोटर्स या कंपनीचे ते संचालक झाले.
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ भारतरत्न प्रो. सी. एन. आर. राव हेही त्यांचे गुरू होते. माशेलकरांना संशोधनाकरिता अनेक जागतिक दर्जाचे पुरस्कार मिळाले आहेत. कोणताही सन्मान मिळाला की, ते त्यांना दाखवायला जात असत. प्रो. राव फक्त ‘‘नॉट बॅड,’’ असे दोन शब्द म्हणत आणि कामाला लागत. माशेलकरांना रॉयल सोसायटीची फेलोशिप मिळाली. हा खूप मोठा सन्मान समजला जातो. आतापर्यंत फक्त सात भारतीयांना तो मिळाला. त्यानंतर फक्त नोबेलच उरतो. आता तरी प्रो. राव खूश होतील, आपले कौतुक करतील, असे माशेलकरांना वाटले. पण, याही वेळी ते म्हणाले, ‘‘नॉट बॅड.’’ शेवटी माशेलकरांनी त्यांना विचारले, ‘‘मी काय केले म्हणजे तुम्हाला कौतुक वाटेल?’’ यावर प्रो. राव त्यांना म्हणाले, ‘‘सर्वोत्तमता, उत्कृष्टता यांची शिडी अमर्याद असते. त्यावर तुम्ही चालतच राहायचं असतं. रोज नवनवे पराक्रम करत ही शिडी चढतच राहायची असते. कधीतरी ते सर्वोत्तम, तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट असं तुम्हाला गवसतं.’’ माशेलकर म्हणतात, ‘‘त्या दिवशी पुन्हा एकदा जीवनातला महत्त्वाचा धडा मिळाला.’’
प्रो. राव यांनाही नोबेल सोडून जगातले सर्व पुरस्कार मिळाले आहेत. हा तपस्वी वैज्ञानिक आजही ८३ व्या वर्षी रोज बारा-तेरा तास प्रयोगशाळेत काम करत असतो.
माशेलकर पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक होते. ही रसायनशास्त्रामधील, देशातील सर्वोत्तम प्रयोगशाळा होती. त्यांनी तिला आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा केले. एखाद्या विषयावर संशोधन करण्याचा विचार केला तर अमेरिका, युरोप, जपान, जर्मन येथे त्यावर संशोधन झाले आहे काय? मग आपण कसे करणार? असे प्रश्‍न लोक उपस्थित करायचे. नक्कल करायची सवय हा सर्वात मोठा अडथळा होता. पण, माशेलकरांनी तेथील संशोधनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिली. अनेक पेटंटस् मिळवून दिले. जागतिक कंपन्यांची दृष्टी भारताकडे वळविली. त्यांची भागीदारी मिळवली. भारताजवळही प्रतिभा, बुद्धिमत्ता आहे, हे कर्तृत्वाने सिद्ध केले. माशेलकर किंवा डॉ. अब्दुल कलाम यांच्या मार्गानेच भारत विश्‍वगुरू होऊ शकतो. केवळ भाषणबाजी, घोषणाबाजी, कार्यक्रम किंवा गर्दीचा भाग होऊन हे घडत नसते.
माशेलकर तरुणांना तीन शब्दांचा एक मंत्र देतात. इनोव्हेशन, पॅशन आणि कम्पॅशन, या तीन गोष्टी आत्मसात करण्याचा ते सल्ला देतात. इनोव्हेशन, नवनिर्माणाचा संबंध बुद्धीशी आहे. बुद्धीला एका चौकटीत, चाकोरीत न बांधता नवनिर्मितिक्षम व सृजनशील बनविले पाहिजे. पॅशनचा संबंध मनाशी, मानसिकतेशी आहे. एखादे ध्येय गाठण्यासाठी झपाटल्यासारखे काम करावे लागते. शंभर टक्के जीव ओतावा लागतो. ते साध्य करण्याची मनामध्ये आग पेटली पाहिजे. कम्पॅशन म्हणजे करुणा. त्याचा संबंध हृदयाशी आहे. माझ्या प्रयत्नातून समाजातील गोरगरीब, दीनदलित, शोषित यांचा विकास होणार आहे, ही आकांक्षा हृदयात असते. या तीन गुणांची तरुणांनी जोपासना करावी, असे ते वारंवार म्हणतात.
डॉ. माशेलकर तरुणांना आवाहन करतात, ‘‘तरुणांनो, तुमच्या प्रत्येकाकडे प्रचंड क्षमता आहे. क्षमता ताणून त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. प्रो. राव यांचे ‘लिमिटलेस लॅडर ऑफ एक्सलन्स’ हे शब्द कायम लक्षात ठेवा. आपल्यापैकी प्रत्येक जण हनुमान आहे. प्रत्येकाची शक्ती ‘अमर्याद’ आहे. फक्त प्रश्‍न इतकाच आहे की, तुम्हाला तुमच्या शक्तीचा विसर पडला आहे. कोट्यवधी हनुमान जागे झाले आणि त्यांनी त्यांच्या क्षमतांचा वापर केला तर भारत कुठल्या कुठे जाईल. म्हणूनच जागे व्हा, सर्वोच्च राष्ट्राच्या पंक्तीत भारताला नेऊन बसवा.’’ हनुमानाला शक्तीचे स्मरण करून देणारा जाम्बुवंतही महत्त्वाचा असतो. त्याच भूमिकेचा हा छोटासा
प्रयत्न आहे.
रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११