ट्रम्प यांचा गर्भित इशारा!

0
83

अग्रलेख
उत्तर कोरियाचा क्रूरकर्मा हुकुमशहा किम जोंग उन याच्या, अमेरिकेला डिवचण्याच्या सवयीची परवा हद्द झाली. उत्तर कोरियाने मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी जपानच्या भूभागाच्या हद्दीवरून केली आणि ते उत्तर पॅसिफिक महासागरात पडले. किम जोंग उनच्या या कृत्यामुळे अमेरिका खूपच खवळली असून, अमेरिकेने आपले सर्व पर्याय मोकळे ठेवले असल्याचा गंभीर आणि गर्भित इशारा दिला आहे. मंगळवारी उत्तर कोरियाने मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केल्याबरोबर बुधवारी अमेरिकेनेही आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. हा किम जोंग उनला सज्जड इशाराच म्हटला पाहिजे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ‘‘उत्तर कोरियाने जपानच्या भूभाभावरून क्षेपणास्त्र नेणे म्हणजे शेजारी राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाला आव्हान तर आहेच, पण संयुक्त राष्ट्रांच्या सर्व देशांचाही अपमान आहे. उत्तर कोरियाच्या या कृतीने आंतरराष्ट्रीय वर्तणुकीच्या संकेतांना पायदळी तुडविले आहे.’’ उत्तर कोरियाला कोणत्या पद्धतीने उत्तर द्यायचे, यासाठी आम्ही सर्व पर्याय खुले ठेवले आहेत, असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी तत्काळ ट्रम्प यांच्याशी ४० मिनीटे बोलणी करून व्यूहरचनात्मक कारवाईबाबत चर्चा केली. तसेच तातडीने संयुक्त राष्ट्रसंघाची तातडीची बैठक बोलविण्याचेही ठरले. या बैठकीत किम सरकारवर सर्व निर्बंध लागू करावेत हा अमेरिकेचा अजेंडा आहे. किम जोंग उन हा गेल्या वर्षभरापासून अमेरिकेवर अणुक्षेपणास्त्र सोडण्याच्या धमक्या देत आहे. अधूनमधून तो जपान आणि दक्षिण कोरियालाही दम भरत असतो. जपान आणि दक्षिण कोरिया हे अमेरिकेचे मित्रराष्ट्र आहेत. त्यामुळे किमच्या मनात या दोन्ही देशांविषयी प्रचंड आकस आहे. किमने उद्या जर अमेरिकेसोबत आगळीक केली, तर त्याला जपान आणि दक्षिण कोरियाचाही सामना करावा लागणार आहे, हे निश्‍चित! अशा वेळी चीन कोणती भूमिका घेणार, याविषयी अजून अनिश्‍चितता आहे. चीन हा देशही पाकिस्तानवगळता, जगात एकाकी पडला आहे. त्याला कारण म्हणजे, चीनही उत्तर कोरियासारखीच दादागिरी करीत आहे. उद्या जर चीनचे एखाद्या देशाशी युद्ध छेडले गेले, तर सर्वात आधी तो उत्तर कोरियाचा ढालीसारखा वापर करेल, यात शंका नाही. मागे किमने अशीच अमेरिकेला डिवचण्याची भाषा केली असता, ट्रम्प यांनी ‘फायर ऍण्ड फ्युरी’ याची जाणीव ठेवावी, अशा कठोर शब्दांत किमला खडसावले होते. त्याचे कारण म्हणजे, अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकून हिरोशिमा आणि नागासाकीचा विध्वंस केला होता. बदलत्या काळात आता जपान आणि अमेरिकेचे वैमनस्य संपले असून, दोघेही एकमेकाचे मित्र झाले आहेत. उत्तर कोरियाच्या तुलनेत अमेरिकेजवळ स्टेल्थसारखी बॉम्बर विमाने आहेत आणि ती क्षेपणास्त्रे वाहून नेणारी आहेत. शिवाय अमेरिकेजवळ अणुबॉम्ब आहेत आणि ते विमानातून डागले, तर अवघ्या काही तासांत उत्तर कोरियाचे नामोनिशाण मिटू शकते. चीनला नेमकी याचीच धास्ती आहे. किमच्या, अमेरिकेला वारंवार धमकीसत्रामुळे चीनही चिंतित आहे. कारण, किमच्या या धमक्यांमुळे अमेरिकेने दक्षिण कोरियामध्ये क्षेपणास्त्र निष्प्रभयंत्रणा उभारली आहे. त्यामुळे चीनचा जळफळाट झाला आहे. किममुळेच आपल्याही देशाला धोका उद्भवू शकतो, असे चीनला वाटते. किमला अमेरिकेच्या शक्तीची पूर्ण कल्पना आहे. किमला क्षेपणास्त्रांच्या चाचण्या खेळणीसारख्या वाटतात. मागे किमने अमेरिकेच्या अधिपत्याखालील गुआम या लहानशा बेटावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. गुआम हे ओशियाना बेटसमूहात असून याचे क्षेत्रफळ फक्त ५४४ चौरस कि. मी. असून लोकसंख्या केवळ एक लाख ६२ हजार आहे. सामरिकदृष्ट्या हे बंदरांचे शहर अमेरिकेसाठी फार मोलाचे आहे. गुआम येथे अमेरिकेचा लष्करी तळ आहे आणि किमच्या धमकीनंतर येथे सैन्यबळ आणि संसाधने वाढविण्यात आली आहेत. गुआममधील वायुसेनेच्या तळावर स्टेल्थ बॉम्बर आणि लढाऊ विमानांची एक मोठी शृंखला अमेरिकेने तैनात केली आहे. तसेच अण्वस्त्रसज्ज एक विमानवाहू नौका आणि पाणबुड्या, वेगाने चाल करून जाणार्‍या युद्धनौका तैनात केल्या आहेत. स्टेल्थ विमाने सतत दक्षिण चीन सागरावर घिरट्या घालीत असतात. गुआम हे शांत बेट आहे. पर्यटन हा इथला मुख्य व्यवसाय. अमेरिकेने समुद्रतटांवर मोठा खर्च करून ते आकर्षक बनविले आहे. त्यामुळे ते पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरले आहे. पण, किमने धमक्या दिल्यानंतर आता त्याला वेगळेच महत्त्च प्राप्त झाले आहे. गुआमपासून उत्तर कोरिया हे ३४३० कि. मी.वर आहे. गुआमवर हल्ला करायचा झाल्यास आंतरखंडीय क्षेपणास्त्राची गरज आहे. किमजवळ हे क्षेपणास्त्र आहे काय? उत्तर कोरियाने गेल्या ४ जुलै रोजी अशा आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला आहे. हे तंत्रज्ञान किम सरकारला चीनने दिले, यात शंका नाही. केवळ तंत्रज्ञानच नव्हे, तर अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्रे वाहून नेणारे ट्रक आणि अन्य संसाधनेही दिली आहेत. अनेक तयार क्षेपणास्त्रेही चीनने पुरविली आहेत. उत्तर कोरियाजवळ असलेली क्षेपणास्त्रे ही चीनच्या क्षेपणास्त्रांसारखे हुबेहूब आहेत, हे सिद्ध झाले आहे. याचे अनेक पुरावे संरक्षणक्षेत्रातील जाणकारांनी दिले आहेत. उद्या जर उत्तर कोरियावर अमेरिकेने हल्ला केला, तर तो फार मोठा हल्ला असेल, यात शंका नाही! अशा वेळी चीन जर उत्तर कोरियाच्या मदतीस धावून आला, तर या भागात एक छोटे महायुद्धच होण्याची दाट शक्यता आहे. चीनने आगळीक केल्यास दक्षिण चीन समुद्राच्या जवळ असलेले १९ देशही या युद्धात अमेरिकेच्या बाजूने उभे राहतील, यात शंका नाही. यामुळे चीनला मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. चीन किमला क्षेपणास्त्र तंत्रज्ञान पुरवीत असला तरी आंतराष्ट्रीय वर्तुळात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. चीन पाकिस्तानला जसे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान पुरवीत आहे, तसेच ते किम सरकारलाही देत आहे. दक्षिण चीन समुद्रात दादागिरी करण्यासाठी चीन उत्तर कोरियाला समोर करीत आहे. पण, जर अमेरिकेने उत्तर कोरियाला बेचिराख केले, तर ही बाब चीनला फार महागात पडणारी आहे. चीनने म्हटले आहे की, युद्ध झाल्यास कुणीही विजेता असणार नाही. नुकसान दोहोंचेही होईल. किमने निर्माण केलेल्या या अस्थिरतेच्या वातावरणामुळे जरी चीन शांत असल्याचे दाखवत असला, तरी त्याला परिणामांची कल्पना पुरेपूर आहे. म्हणूनच चीनने किमला सल्ला देताना, संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला किम किती मानतो, यावर पुढील घडामोडी अवलंबून राहणार आहेत. तिकडे अमेरिका व्यूहरचना आखीत आहे… चीनने जर उत्तर कोरियाला आवरले नाही, तर मग आम्ही त्याला आवरू, असाही इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. यातील मथितार्थ स्पष्ट आहे.