चैन्नईच्या बालिकेसाठी विघ्नहर्त्याची धाव

0
180

२० लाखात एकाचा जुळणारा ब्लड स्टेम सेल यशपालचा
निलेश जोशी
अकोला, ३१ ऑगस्ट
अकोल्याचा यशपाल जाधव बंजारा कॉलनीतील एक सामान्य किराणा दुकानदार. त्याच्या भाचीला झालेला थॅलेसेमिया आजार बरा व्हावा यासाठी यशपाल धडपडत होता. बोनमॅरो डोनर किंवा ब्लड स्टेम सेल डोनर मिळावा किंवा आपले स्वतःचे स्टेमसेल भाचीशी जुळावे याकरिता त्याचे प्रयत्न सुरू होते. हे प्रयत्न सुरू असतानाच त्याचे स्टेमसेल भाचीशी न जुळता रक्ताच्या कर्करोगाने आजारी असलेल्या चेन्नईच्या चार वर्षीय मुलीशी जुळले; अर्थात वैद्यकीय भाषेत त्यांचे एच.एल.ए.टायपिंग मॅच झाले. त्यानंतर यशपालने क्षणाचाही विलंब न लावता स्टेमसेल दान केले. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर यशपालच्या रूपात या बालिकेच्या मदतीला साक्षात विघ्नहर्ताच धावून आला आहे.
अकोला थॅलेसेमिया सोसायटीने काही महिन्यांपूर्वी थॅलेसेमिया रुग्णांच्या उपचाराकरिता दात्री या संस्थेच्या मदतीने एचएलए मॅचिंग शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात थॅलेसेमिया रुग्णांचे जवळचे नातलग सहभागी झाले. या नातलगांचा बोनमॅरो किंवा स्टेम सेल रुग्णांशी जुळतो का? अर्थात त्यांचे एचएलए टायपिंग मॅच होते का? याकरिता अकोला थॅलेसेमिया सोसायटीने या शिबिराचे आयोजन केले होते. दात्री या संस्थेने शिबिरातील अनेक व्यक्तींचे नमुने तपासणीकरिता घेतलेे. शिबिर संपून काही महिने उलटल्यानंतर यशपाल जाधवला मुंबईच्या दात्री संस्थेतून फोन आला. स्वाभाविक या फोनचा आनंद यशपाललाही होता. त्याचे स्टेमसेल जुळल्याचा तो फोन होता. म्हणजेच त्याच्या स्टेमसेलचे एचएलए टायपिंग कुणाशी तरी १०० टक्के मॅच झाले होते. या स्टेमसेलच्या जुळण्याने गरजू व आजारी रुग्णांचे जीवन फुलणार होते. त्या रुग्णाची जगण्याची आशा पल्लवीत झाली होती. यशपालच्या स्टेमसेल दानाने चार वर्षीय चिमुकली रक्ताच्या कर्करोगातून मुक्त होणार होती. परमेश्‍वररूपाने देवदूत बनून यशपाल या चिमुकलीच्या आयुष्यात आला होता. १० हजार ते २० लाखात क्वचितच जुळणारे स्टेमसेल (एचएलए टायपिंग) यशपालचे चेन्नईत कर्करोगाने आजारी मुलीशी जुळले होते.
आपण जीवनदाते ठरू शकतो हे कळल्यावर क्षणाचाही विलंब न लावता यशपालने स्टेमसेल दानाचा निर्धार केला.
या निर्धारानंतर दात्रीने आवश्यक त्या सर्व चाचण्या पूर्ण केल्या व त्यावर उपचार करत त्याचे ब्लड स्टेम सेल शरीरातून बाहेर काढले. यशपालने मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये नुकत्याच त्याच्या ब्लड स्टेम सेल डोनेट केल्या.
या स्टेमसेल दानानंतर गरजू रुग्ण मुलीला प्राणदायी ठरणार्‍या या स्टेमसेल चेन्नई येथे विमानाने पोचविण्यात आल्या. यशपालच्या या दातृत्वाने लहानग्या बालिकेच्या जीवनात प्रकाशाची नवी किरणं तर आलीच, शिवाय तिला पूनर्जीवनही मिळाले. (वृत्तसंस्था)
ब्लड स्टेम सेलचा उपयोग काय?
ब्लड स्टेमसेल हाडांच्या अतिआतील असा एक घटक आहे. ब्लड स्टेम सेलमध्ये मानवी पुनर्जीवनाची शक्ती आहे. स्टेमसेल विविध आजारांसह रक्तदोषातील आजारांवरही रामबाण ठरतो. स्टेम सेल इतके शक्तिशाली असतात की, रुग्णाच्या शरीरातील आजारी सेल पूर्णतः बरे करण्याची त्याची क्षमता असते. रक्ताचा कर्करोग, थॅलेसेमिया आणि सिकलसेल या रुग्णांसाठीही तो निश्‍चितच जीवनदायी आहे. १० हजार ते २० लाख लोकांपैकी एका रुग्णांशी ब्लड स्टेम सेल जुळतो. दात्री या स्वयंसेवी संस्थेकडे पावणे तीन लाख दात्यांची नोंदणी आहे. तर सुमारे २८७ जणांचे ब्लड स्टेम सेल जुळले असून, ते रुग्णांना देण्यात आले आहेत. हे ब्लड स्टेम सेल दिल्यानंतर त्या रुग्णांचा रक्तगट बदलून दात्याचा जो रक्तगट आहे तोच त्याला प्राप्त होतो हे विशेष.