कल्पवृक्ष

0
54

दिवसाची चांगली सुरुवात

एक खूप श्रीमंत माणूस होता. दिवसरात्र एक करून त्याने ५० कोटी रुपये जमविले. त्याचे ते स्वप्नच होते. ज्या दिवशी ही रक्कम पूर्ण झाली, त्या दिवशी तो खूप आनंदात होता. आजपासून आपले आयुष्य आता मजेत जगायचे. ध्यान, योग इत्यादी करून आरोग्य उत्तम ठेवायचे. अजून काय काय करता येईल, याचे तो नियोजन करण्यात, स्वप्न रंगविण्यात दंग झाला होता. इतक्यात दारावरची बेल वाजली. त्याने दार उघडले, समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला त्याने विचारले, ‘‘आपण कोण? आणि पूर्वसूचना न देता असे अचानक का आलात?’’ ती व्यक्ती जोरात हसली आणि म्हणाली, ‘‘मला पूर्वसूचनेची गरज नसते. मी तुम्हाला घेण्याकरिता आलो आहे. तुम्हाला माझ्यासोबत यावेच लागेल. माझा नियमच आहे तसा.’’ तो श्रीमंत माणूस रागाने म्हणाला, ‘‘तुम्ही मला कोण समजता? मी ५० कोटींचा मालक आहे. तुम्ही आहात तरी कोण?’’ दारातील माणूस पुन्हा जोरात हसला आणि सरळ घरात घुसला. त्या श्रीमंत माणसाकडे पाहून म्हणाला, ‘‘मी यम, मृत्यू. माझी निमंत्रण देण्याची हीच पद्धत आहे.’’ ‘‘अरे, पण माझे ५० कोटी कालच पूर्ण झाले. आता तर कुठे मी नियोजन करायला सुरुवात केली आहे. बरं, तुला २५ कोटी देतो. नंतर ये.’’ श्रीमंत म्हणाला. यम म्हणाला, ‘‘माझ्याकडे वशिला, लाच काहीही चालत नाही.’’ तो श्रीमंत काकुळतीने म्हणाला, ‘‘बरं, हे पूर्ण पन्नास कोटी घे, मला फक्त एक महिनातरी दे.’’ यमाने साफ नकार दिला. ‘‘अर्धा मिनिट, फक्त अर्धा मिनिट दे.’’ आणि तो रडायला लागला. यमाने त्याची विनंती मान्य केली. श्रीमंत माणसाने डायरी काढली आणि त्यात नोंद केली, ‘‘आलेला क्षण जगून घ्या. ५० कोटी रुपयांत तुम्ही एक मिनिटही विकत घेऊ शकत नाही. गेलेला एक मिनिटही तुम्हाला परत मिळवता येत नाही.’’ त्याने खाली स्वाक्षरी केली आणि त्याचा अर्धा मिनिट संपला. शेवटच्या क्षणीतरी जगाला अर्थपूर्ण संदेश दिला, याचे समाधान त्याच्या चेहर्‍यावर होते.
खरेच हा संदेश आपण कधी मनावर घेतो का? आपले आयुष्य वर्षात मोजले जाते. पण, वर्ष महिन्यात आणि महिना दिवसात मोजला जातो. शेवटी दिवसच जीवनाचा मूलभूत घटक आहे. या दिवसाचा आपण कधी गंभीरपणे विचार करत नाही. दिवस उगवतो व मावळतो, येतो आणि जातो. दिवसांमागून दिवस निघून जातात. वर्षामागून वर्षं सरतात. एक दिवस जाणवते, बापरे! किती वर्षं निघून गेली! तुकाराम महाराज म्हणतात, ‘नित्य नवा दीस जागृतीचा.’ कसा होऊ शकेल असा प्रत्येक दिवस जागृतीचा? एका तरुणाला प्रत्येक गोष्ट उद्यावर ढकलण्याची सवय होती. प्रत्येक कामात त्याची अशीच चालढकल चालायची. अगदी आणिबाणी आल्याशिवाय तो कोणतेही काम करीतच नसे. मग त्या कामात कधीच गुणवत्ता दिसत नसे. हळूहळू त्यालाही याची जाणीव झाली. त्याने एक दिवस एका परिचित स्वामींना यावर उपाय विचारला. त्यांनी एक अगदी छोटी गोष्ट रोज करायला सांगितली. ते म्हणाले, ‘‘जाग येणे आणि अंथरुणातून उठणे यामधील गॅप, अंतर रोज कमी करायचे. ज्या दिवशी या अंतरावर तुम्ही विजय मिळवाल, ते शून्य होईल, त्या दिवशी चालढकल करण्याच्या प्रवृत्तीवर विजय मिळवलेला असेल.’’ त्या तरुणाने तो प्रयोग केला का, हे माहीत नाही. पण स्वामीजी म्हणाले, हा त्यांचा स्वत:चा अनुभव आहे.
आपल्या सगळ्‌यांचाच हा अनुभव. सकाळी उठतानाच आपलं घोडं पेंड खाते. सकाळी उठल्यावर दोन तासपर्यंत आपली ग्रहणशक्ती तीव्र असते. सकाळच्या या महत्त्वपूर्ण वेळात काय घडायला हवे? आपला संपूर्ण दिवस सार्थकी लागावा म्हणून दिवसाची सुरुवातही चांगलीच झाली पाहिजे. असे म्हणतात की, जेव्हा आपली झोप पूर्ण होते, तेव्हा सकाळी उठल्यानंतर आपले बाह्य मन एकदम शांत असते व सुप्त मन सक्रिय असते. या वेळी आपल्या सुप्त मनात आपण काय पेरतो, त्याला कोणत्या सूचना देतो, सकारात्मक विचारांनी त्याची मशागत करतो की नाही, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.
शाळेत असताना ‘अर्ली टु बेड ऍण्ड अर्ली टु राईज, मेक्स यू हेल्दी, वेल्दी ऍण्ड वाईज.’ असा सुविचार वर्गात लिहिलेला असायचा. पण, मोठे झाल्यावर असे करायचे नसते, असा उगीचच आपला समज होतो. आता आधुनिक विज्ञानही म्हणते, हेच निसर्गनियमाला धरून आहे. निसर्गाची लय आणि आपल्या जगण्याची लय जुळायलाच हवी. सूर्योदयापूर्वी लवकर उठावे, रात्री लवकर जेवावे व लवकर झोपावे. पण, त्याकरिता रात्री निश्‍चित वेळी आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक साधनांना पूर्णविराम दिला पाहिजे आणि उठल्यानंतर किमान दोन तास त्यांचे आक्रमण आपल्या वेळेवर होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. सकाळी जाग आल्यानंतर आपल्यासमोर दोन साधे पर्याय असतात. पहिला पर्याय आहे, परत झोपणे आणि स्वप्न पाहणे. दुसरा पर्याय असतो, जागे होणे आणि स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करणे. निवड आपल्यालाच करायची असते. दुसरा पर्याय निवडला तर सकाळ अत्यंत महत्त्वाची असते. आपला दिवस कसा सुरू व्हावा, याचा विचार केला पाहिजे. हा वेळ आपला स्वत:चा असतो. त्याचा उपयोग स्वत:च्या विकासाकरिता, शरीर, मन व बुद्धीच्या पोषणाकरिता केला पाहिजे. प्रत्येक सकाळ पवित्र, शांत, मंगल, आनंददायी झाली पाहिजे. प्राणायाम, व्यायाम, ध्यान, प्रार्थना, संगीत अशा साधनेने नवीन ऊर्जा प्राप्त करता येते. शांतपणे चिंतन करून आपला दिवस जाणीवपूर्वक जगता येतो. अंतर्मुख होऊन आपल्या क्षमता, ध्येय यावर लक्ष केंद्रित करता येते. चिंतामुक्त होता येते. दिवसभर आपला वेळ कसा वापरणार, याचे स्पष्ट चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. अशा वेळीच कल्पनांना, विचारांना नवे अंकुर फुटतात. नवे मार्ग दिसतात. स्वत:चे सशक्तीकरण करणारी ही सकाळ असते. आपल्या आनंददायी कृतार्थ जीवनाचीच ती पहाट असते…
– रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११