अग्रलेख

0
77

पाऊस… असा आणि तसाही!

पावसाची अनेक रूपं असतात. अर्थात, बहुतेकांच्या स्मरणातला पाऊस हा छान छानच असतो. सुविद्य मराठी जनांना पावसाळा म्हटलं की, मग बालकवींची ‘श्रावणमासी’ हीच कविता वाटत असते. थोडे अधिक गोड शहारे आले नि बालकवींच्या जाणिवांच्याही पलीकडच्या थोड्या प्रौढ जाणिवा आल्या असल्या की, मग पावसाळा म्हणजे, श्रावणात घन निळा बरसला… पर्यंत मजल जाते. गहिवरला मेघ नभी, सोडला गं धीरऽऽऽ अशी ओली आर्तताही पावसात असते. काही मग वर्तमानपत्रातल्या बातम्यांवरून आपल्या जगण्याचा सुखासीन परीघ ओलांडून सुरक्षित जाणिवांचे दार थोडे किलकिले करतात. ऋतू कुठलाही असो, तो आपल्या सुखाच्या कल्पनेला कुरवाळणारा असेल, तर तो आम्हाला छान वाटतो. वास्तव मात्र तसे नसते. यंदाच्या पावसाळ्याने त्याच्या सार्‍याच कळा दाखविल्या आहेत. या पावसाळ्यात पाऊस आला, पण नाहीदेखील आला. त्याने समाधान केले नि रडवलेदेखील. पिकं सुखात ठेवली, पण हंगाम मात्र आनंदाचा राहू दिला नाही. आमच्या कविकल्पनांची हिरवाई त्यानं निर्माण केली. मात्र, येत्या उन्हाळ्याच्या तहानेच्या कल्पनेनं आम्हाला आतापासून हैराण केलं आहे. हा पाऊस राजकारण्यांसारखाही वागला आहे. त्याने नैर्ऋत्य मोसमी वारे अंदमानात दाखल होण्याआधी यंदाचा पावसाळा अत्यंत समाधानकारक आणि सरासरी पर्जन्यमान असणारा आहे, असे भाकीत केले आणि प्रत्यक्षात तसा तो बरसलाच नाही. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग बर्‍यापैकी कोरडा राहिला. काही ठिकाणी तो सरासरीने बरसला आहे. तेही राजधानीच्या शहराजवळ पश्‍चिम महाराष्ट्रात पाऊस छान बरसला. आता महाराष्ट्रातला पाऊस असल्याने त्याने विदर्भाचा बॅकलॉग निर्माण केला. म्हणजे माजी सत्ताधार्‍यांसारखा वागला हा पाऊस. पुणे आणि परिसरातील पवारांच्या स्वराज्यात पाऊस छान पडला. मुंबईत तो सुरुवातीपासूनच चांगला कोसळत राहिला. राज्याची ती राजधानी आहे. तिथे ‘सरकार’ असते. तिथे चतुर नोकरशहासारखा वागला हा पाऊस. आता मात्र त्याने मुबईकरांची तारांबळ उडविली. अर्थात, पुन्हा सत्ताधारी दोन मित्रांपैकी नव्याने मोठा झालेल्या भावाला मुद्दे त्याने दिले. मुंबई महापालिकेत सत्ता असणार्‍या माजी मोठ्या भावाचा या पावसाने मुखभंग केला. अर्थात, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आता धो धो पाऊस येणार, या भीतीनेच रस्त्यांच्या पोटात मोठाले खड्‌डे पडले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी, ‘‘आता मुंबईत जोरदार पाऊस येतो, हा काही महापालिकेचा दोष नाही. त्यामुळे रस्त्यांवर पडणारे खड्‌डे मुंबई महापालिकेने पाडले नाहीत.’’ असा थेट युक्तिवाद केला. मात्र, आता आलेल्या पावसाने महापालिका प्रशासनाला उघडेच पाडले. झाडे कोसळलीत, इमारती पडल्या. पाणी तुंबले, वाहतूक ठप्प झाली, मुंबईतले लाखो चाकरमाने तहान-भुकेने व्याकुळ होत, होते तिथेच अडकून राहिले आणि ज्यांनी त्यांच्यासाठी काही करायला हवे ते मात्र मुंबईकर कसे धीराचे आहेत, त्यांनी आतावर अशा अनेक संकटांवर मात केलेली आहे. संकट आले की मुंबईकर कसे एकत्र येतात, एकमेकांच्या मदतीला धावतात, अशी शाबासकीची थाप वाजवून नागरिकांनी अशा संकटात नगर प्रशासनाला अन् महानगराच्या सत्ताधार्‍यांना मदत न मागता अन् त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीवही करून न देता आपले आपण पाहून घ्यावे, तर तो मुंबईकर, असा भाव चलाखपणे निर्माण केला. सिद्धिविनायक ट्रस्ट पावसात अडकलेल्यांच्या मदतीला धावले, ठाण्यात दहिहंडीचा एक गट अन् काही केटरर्सनी नागरिकांच्या जेवणाची अन् काही काळ विसावा घेण्याची सोय केली. महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन नेमके या काळात काय करत होते, हे कुठेच दिसले नाही. मुख्यमंत्री जातीने सर्व मदतकार्यावर लक्ष ठेवून होते. पंतप्रधानांनीदेखील परदेश दौर्‍यावर जाण्याआधी मुंबईला कुठलीही अडचण येणार नाही, याबाबत आश्‍वस्त केले. उद्धव ठाकरे मात्र पाऊस ओसरल्यावर सारवणं घेऊन फिरत राहिले. मंुंबई महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग कसा कर्तबगार आणि सक्षम आहे, याचे फक्त त्यांनाच दिसलेले दाखले ठाकरे देत होते. गेली पंचवीस वर्षे मुंबईवर शिवसेनेचीच सत्ता आहे. त्यांच्या दृष्टीने मुंबई म्हणजेच महाराष्ट्र आहे. मुंबई त्यांच्या ताब्यात असली की, मगच मराठी माणूस सुरक्षित असतो, मराठी भाषाही धोक्यात नसते. असे असताना २६ जुलै २००५ च्या जवळपास ढगफुटीपासून मुंबईच्या या दीर्घकालीन सत्ताधार्‍यांनी नेमका काय धडा घेतला? त्या वेळी खूप योजना वगैरे तयार करण्यात आल्या होत्या. भविष्यात असे अजीबात होणार नाही, हे जलसंकट अखेरचे, असे त्या वेळी शिवसेनेच्या मुखत्यारांनी छातीठोकपणे सांगितले होते. मधल्या बारा वर्षांत पावसाने त्यांची लाज राखली, मात्र आता बारा वर्षांनी पार बारा वाजवून टाकले! त्या वेळी घेण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयापासून कचरा नियोजनाच्या योजनेचे तीन-तेरा वाजले आहेत. दोन दिवस कोसळणार्‍या पावसाने मुंबईची पार डुंबई करून टाकली होती. मुंबईला केवळ अतिरेक्यांचा धोका आहे असे नाही, तर पावसाचाही आहे अन् त्यात दोष पावसाचा नाही, मुंबईच्या बेपर्वा सत्ताधार्‍यांचा आहे. तेव्हा त्याच काळात याबाबत सावधानता बाळगायला हवी होती. आणखी दोन दिवस धो धो पावसाचे हवामानखात्याचे अनुमान खरे ठरले असते, तर मुंबईचे काय झाले असते, असा विचारतरी करून बघावा अन् मग उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाची पाठ थोपटावी. पाऊस तिकडे असा वागला, पश्‍चिम महाराष्ट्राला सुखावले अन् दुखावलेही. विदर्भात दुबार पेरण्या कराव्या लागल्या. जूनच्या सुरुवातीला पावसाने तडन दिली. जुलैच्या मध्यापर्यंत पाऊस पेरण्यांशी खेळतच राहिला आणि मग जुलैच्या मध्यापासून ऑगस्टच्या अखेरपर्यंत दीड महिना पाऊस आलाच नाही. अधूनमधून येऊन त्याने पिकांना सावरून धरले, मात्र धरणे भरली नाहीत. गेल्या वर्षी ऑगस्टपर्यंत विदर्भात ८१७.५ मि.मी. पाऊस पडला होता. यंदा हा पाऊस ५८२.४ मि. मी.च पडला. संपूर्ण विदर्भात सरासरी ३० ते ३५ टक्के पावसाची तूट आहे. वर्‍हाडात तर बुलडाणा, वाशीम, अकोला जिल्ह्यांत अनेक गावांत आताही आठ-पंधरा दिवसांनी एकदा पाणीपुरवठा केला जातो. आता मोसमी पावसाचे फार दिवस उरलेले नाहीत. सप्टेंबरातील काही मुहूर्त सोडले, तर मग परतीच्या पावसाचे दिवस येतील. गेल्या वर्षी परतीच्या पावसाने मराठवाड्याला तारले होते. यंदा परतीचा पाऊसही चांगला कोसळला, तरीही विदर्भातील पाण्याची तूट भरून निघेल, असे नाही. रबीचा हंगाम शेतकरी करू शकणार नाहीत. खरिपात दुबार पेरणीने कंबरडे आधीच मोडले आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहेच. तिच्या दुखण्या-खुपण्याकडे थेट पंतप्रधानांनी लक्ष देणे स्वाभाविक आहे, मात्र विदर्भातील हे संकट भीषण ठरू पाहते आहे. तिकडे राज्य आणि केंद्र सरकारने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे, कारण विदर्भाच्या दुखण्याला कधीच आवाज नसतो. इथली माणसंं काहीही न बोलता चुपचाप आत्महत्याच करतात…