भारतीय व्यक्ती सिंगापूरच्या कार्यकारी राष्ट्राध्यक्षपदी

0
232

सिंगापूर, १ सप्टेंबर 
जन्माने भारतीय असलेले ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी जे. वाय. पिल्ले यांची आज शुक्रवारी सिंगापूरच्या कार्यकारी राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याच महिन्याच्या अखेरीस त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
टोनी टॅन केंग याम यांची राष्ट्राध्यक्ष पदावरील सहा वर्षांची कारकीर्द गुरुवारी पूर्ण झाली होती. त्यांच्या जागेवर ८३ वर्षीय पिल्ले यांची नियुक्ती करण्यात आली. पिल्ले आतापर्यंत राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागार परिषदेचे अध्यक्ष होते.
सिंगापूरमध्ये २३ सप्टेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान होणार आहे. तोपर्यंत पिल्ले राष्ट्राध्यक्ष म्हणूनच काम पाहणार आहेत. राष्ट्राध्यक्षपद जेव्हा रिकामे होते, तेव्हा सिंगापूरमधील घटनेनुसार सल्लागार परिषदेचे अध्यक्ष हेच देशाचा कारभार पाहतात. त्यानंतर संसद अध्यक्ष हे दुसर्‍या स्थानावर असतात. १९९१ मध्ये या देशात अध्यक्षीय प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच राष्ट्राध्यक्षांचे पद रिक्त झाले आहे.(वृत्तसंस्था)