‘ सा ऽ रे ऽ ग ऽ म ऽ’ की ‘सारे गम?’

0
55

कल्पवृक्ष
एक माणूस फारच दु:खी होता. तो कायम विचार करायचा, आपल्या वाट्यालाच इतके दु:ख का? दुसर्‍याच्या भाग्याचा त्याला हेवा वाटत असे. त्यांच्यासारखे आयुष्य आपल्याला का मिळाले नाही, असा प्रश्‍न तो मनातल्या मनात देवाला विचारत असे. एकदा देव खरेच त्याच्या स्वप्नात आला आणि त्याला म्हणाला, ‘‘उद्या मी गावातील सर्वांनाच दु:ख निवडण्याची संधी देणार आहे. दु:खाचे गाठोडे बांधून सकाळी मंदिरात ये.’’ त्याला खूप आनंद झाला. सकाळी आपले गाठाडे घेऊन तो मंदिरात निघाला. लहानात लहान गाठोडे कसे घेता येईल, याचे विचार त्याच्या मनात सुरू होते. गावातील सगळेच आपापले गाठोडे घेऊन मंदिराकडे निघाले होते. सारेच एकमेकांकडे आश्‍चर्याने पाहात होते. ज्यांना तो आनंदी समजत होता, त्यांची गाठोडी त्याच्यापेक्षाही मोठी होती. चेहर्‍यावरून नेहमी दिसणारी माणसं आणि त्यांची गाठोडी यांचा मेळ जमत नव्हता. आता मात्र त्याला भीती वाटू लागली. काय काय असेल यांच्या गाठोड्यात, याचा तो अंदाज बांधत होता. मंदिरात पाहोचेपर्यंत त्याचा आनंद पूर्ण मावळला. पण, आता पर्याय नव्हता. त्यानेही आपले गाठोडे तेथे ठेवले आणि जागेवर जाऊन बसला. देव बोलू लागला, ‘‘तुम्ही सर्व लोक तुमच्या दु:खाला कंटाळला आहात. ती तुम्हाला नको आहेत. त्यामुळे ती बदलण्याची एक संधी मी तुम्हाला देत आहे. घंटानाद झाल्यानंतर तुम्हाला हवे ते गाठोडे घेऊन जा. नंतर पुन्हा माझ्या नावाने कुरकुर करू नका.’’ घंटा वाजली आणि सर्व जण धावले. आपले गाठोडे कोणी उचलून नेऊ नये म्हणून हाही जोरात धावला. पण, काय आश्‍चर्य, प्रत्येकाने आपलेच गाठोडे उचलले. कोणाला माहीत, कोणाच्या गाठोड्यात काय आहे? किमान आपल्या दु:खाची आपल्याला ओळखतरी आहे. त्याच्यासोबत जगण्याची सवय झाली आहे, असा विचार सर्वांनीच केला.
आपण सदैव दुसर्‍यांसोबत तुलना करत असतो. ‘मेरे से तुम्हारी कमीज सफेद कैसी?’ हाच आपल्या दृष्टीने कळीचा मुद्दा असतो. एकदा एका जुन्या प्राध्यापकाकडे त्यांचे एके काळचे विद्यार्थी भेटायला गेले. या प्राध्यापकांविषयी सर्वांना खूप आदर होता. त्यामुळे त्यांचे विद्यार्थी त्यांच्याकडे येत. त्यांचे मार्गदर्शनही घेत. गप्पागोष्टींत सरांनी चौकशी केली. सर्वांनाच असमाधान, ताण, दु:ख असल्याचे जाणवत होते. थोड्या वेळाने ते कॉफीची एक मोठी किटली व दहा-बारा कप घेऊन आले. विशेष म्हणजे ते सर्व कप वेगवेगळ्या रंगांचे, आकाराचे होते. ग्लास, क्रिस्टल, मेटल इ. वेगवेगळ्‌या मटेरिअलचे होते. सरांनी सर्व कप भरले व म्हणाले, ‘‘उचला.’’ सर्वांनी कप उचलले. कॉफी घेताना सर्वच एकमेकांच्या कपांकडे पाहात होते. सर त्यांना सांगत होते, ‘‘कपाचा कॉफीच्या गुणवत्तेवर काहीही परिणाम होत नाही. सर्वांना फक्त कॉफीच प्यायची आहे. पण, प्रत्येकाला वाटते माझा कप दुसर्‍यापेक्षा चांगला असावा. तुम्हीही चांगले कप उचलण्याचा प्रयत्न केला. साधे, प्लेन कप तेथेच आहेत. कॉफी म्हणजे जीवन आहे. कप चांगला असायला हरकत नाही. पण, कॉफीच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होता कामा नये. कपांचीच स्पर्धा करण्यात काय अर्थ आहे. तुमचे दु:ख, असमाधान व ताणतणाव यांच्या मुळाशी हेच कारण आहे.’’
आपल्याही दु:खाचे एक कारण, दुसर्‍याशी तुलना हेच असते. आपल्या मुलांचीही दुसर्‍यासोबत तुलना. मग मुलेही आपली तुलना दुसर्‍यांच्या आईबाबांशी करतात. सगळ्यांकडे आहे म्हणून ती गोष्ट आपल्याला हवी असते आणि ती मिळाली नाही की दु:ख होते. ही भावना अधिक तीव्र झाली की, दुसर्‍याचा आनंदही आपल्या दु:खास कारणीभूत होतो. आपले दु:ख इतके गोंजारतो की, जगातील सर्वात दु:खी प्राणी फक्त आपणच! हेवा, मत्सर, द्वेष या भावनाही याच प्रवृत्तीची वेगवेगळी रूपं आहेत. त्यातूनच न्यूनगंड निर्माण होतो. मग वस्तुस्थिती कधीच स्पष्ट दिसत नाही. माणूस दुसर्‍याचे तोंडभरून कौतुकही करू शकत नाही. प्राध्यापकांनी सांगितलेला महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. जीवनाच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. दुसर्‍याने ठरविलेल्या मार्गाने आपण चालणार काय? आपण काय घ्यायचे, काय करायचे, आपला आनंद कशात आहे, हा आपला निर्णय असला पाहिजे. माझ्या एका मित्राने महागडी कार घेतली. खरे म्हणजे त्याला कारची मुळीच गरज नव्हती. तरी त्याने कर्ज काढून घेतली. कारण एकच, त्याच्या ग्रुपमध्ये सर्वांकडे कार होती. प्रत्येक माणसाची परिस्थिती वेगळी असते. प्रत्येकाची सुखदु:खे वेगळी असतात. जीवन जगण्याच्या कल्पना वेगळ्या असतात. प्राथमिकता वेगळ्या असतात. वर वर तुलना करून सुखदु:खाचे मोजमाप कसे करता येईल. माणूस एक चूक नेहमी करत असतो. आपल्या दु:खाची तुलना तो दुसर्‍याच्या सुखाशी करत असतो. त्यामुळे दुसर्‍याचे दु:ख त्याला जाणवत नाही. आपल्या ताटात काय आहे, त्याचा आनंद घ्यावा. श्रीखंड नाही म्हणून लाडूचा आनंद सोडावा का? आपल्या हातात जे पत्ते आले आहेत, त्यानेच खेळ खेळावा लागतो. पूर्ण कौशल्य वापरून डाव रंगवायचा आणि खेळाचा आनंद घ्यायचा, इतकेच आपल्या हातात असते. काही रागांमध्ये काही स्वर वर्ज्य असतात. ते स्वर वाईट नसतात. त्या रागांची ती मागणी असते. म्हणून स्वखुषीने तो स्वर चुकवून तो राग फुलवायचा असतो. काही रागांनाही काळाची बंधनं असतात. त्याच वेळी ते परमोच्च आनंद देतात. एकेका रागाचा एक स्वभाव असतो. प्रकृती असते. जीवनालाही हे सूत्र लागू पडते. हे सूत्र एकदा कळले म्हणजे प्रत्येकाच्याच जीवन संगीताची मैफल बहरल्याशिवाय राहणार नाही. गुलजार यांच्या एका कवितेत फार सुंदर ओळी आहेत-
एक जिंदगी है, जो सा ऽ रे ऽ ग ऽ म ऽ सुनाकर बहला रही थी| और हम है की, सारे ‘गम’ समझकर उसे कोस रहे थे|
रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११