बाबांच्या भक्तांनो…!

0
71

चौफेर
सच्चा डेराचा प्रमुख राम रहीम याने केलेल्या घृणास्पद कृत्याची शिक्षा तब्बल पंधरा वर्षांनी सुनावल्यावरही, पीडितांना न्याय मिळवून दिल्याच्या आविर्भावात स्वत:ची पाठ थोपटून घेणारी न्यायप्रणाली, ‘‘तू जनावरासारखा वागला, तुला माफी नाहीच,’’ असं, इतक्या वर्षांनंतर दिमाखानं त्याच्या तोंडावर सांगणारे न्यायमूर्ती… धर्माच्या नावाखाली उघडलेल्या आश्रमात चाललेले त्याचे उपद्‌व्याप. त्याला बळी पडलेले स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी… या काळात ‘सच्च्या’ डेर्‍यात निष्पापांचे मुडदे पडल्याचा गंभीर आरोप…. आणि त्याचा गोरखधंदा उघडकीस आल्यानंतर कोर्टानं सुनावलेला फैसला मान्य करायचं सोडून गुरमितच्या समर्थनाचे ओंगळवाणे प्रदर्शन मांडत जाळपोळ करून वस्त्या उद्ध्वस्त करत सुटलेले त्याचे भक्तवजा समर्थक… कुणाला दोष द्यायचा, कुणाचा विरोध करायचा अन् कुणाची बाजू घ्यायची? प्रदीर्घ काळचा अभ्यास आणि कठोर साधनेतून कमावलेल्या आध्यात्मिक बळावर मिळणे अपेक्षित असलेल्या, आश्रमातल्या ‘गाद्यां’वर राम रहीमसारखे लोक विराजमान होत असतील, तर एकदा त्या व्यवस्थेचाच पुनर्विचार झाला पाहिजे. ज्याच्यासमोर शेकडो लोक श्रद्धेनं नतमस्तक होतात अशी पदं कुणाच्या स्वाधीन करायची, ही बाब परंपरागत व्यवस्थेच्या चौकटीतच बंदिस्त राहणार असेल, तर मग न्याय-अन्यायाची भाषा बोलण्याचा अधिकारही उरत नाही कुणालाच. पण, मग आपली न्यायव्यवस्था तरी कशाच्या आधारे पाठ थोपटून घेतेय् स्वत:ची? सादर झालेल्या ज्या तक्रारीचा निवाडा करायला ज्याला एक-दोन नव्हे, तर तब्बल पंधरा वर्षे लागली, ती न्यायव्यवस्था संबंधित पीडितांना न्याय मिळवून देण्याचा दावा तरी कशाच्या आधारावर करतेय्? ती तर तक्रार दाखल झाली म्हणून… अन्यथा चर्चा तरी झाली असती या विषयावर? झाली असती मग राम रहीमला शिक्षा? की संपला असता धर्माच्या आडून चाललेला तमाशा? या प्रकरणी निकाल जाहीर होत असताना ढसाढसा रडत दयेची भीक मागणार्‍या राम रहीमसमोर कोर्ट जी कठोर भाषा बोलू शकले, तेच खडे बोल, कुठलाही अधिकार नसलेली समान्य माणसं कधीच का सुनावू शकली नाही त्याला? हा त्या गादीबद्दल असलेल्या नितांत श्रद्धेचा परिपाक मानायचा, की तेवढा दरारा, दहशत अन् मुजोरी होती त्याची?
दीड दशकापूर्वीच्या एका तक्रारीवर आज शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर अन्य साध्वींपासून तर सुरक्षारक्षकापर्यंत सारेच कसे पोपटासारखे बोलू लागलेत बघा. बाबांच्या कारनाम्याचे रंगतदार किस्से सार्‍या जगाला सांगण्यासाठी धडपडणारी ही जमात कालपर्यंत का गप्प होती मूग गिळून? हा बाबा रोज कुठल्यातरी शाळकरी पोरीला आश्रमात आणून तिची अब्रू लुटायचा म्हणे! कित्येक तरुणांना त्यानं नपुंसक केलं होतं, हे आज लोकांदेखत बेधडक सांगण्याची हिंमत बांधणारी माणसं इतकी वर्षं हा तमाशा उघड्या डोळ्यांनी बघत का राहिली होती? आश्रमातले संन्यासी, कर्मचारी, दरबारात येणारे भक्त, ज्यांच्यावर अत्याचार झालेत त्या मुलींचे पालक… यापैकी कुणालाच धाव घ्यावीशी वाटली नाही कधी प्रशासनाकडे? बाबांच्या दहशतीचा परिणाम, की प्रशासनावरचा अविश्‍वास होता तो?
राम रहीमसारखे लोक उगाच मोठे, गब्बर अन् मुजोर होत नाहीत. सभोवतालची माणसंच हातभार लावत त्यांना मोठं करत असतात. प्रत्यक्षात जे नाही अशा त्याच्या प्रतिमेचे स्तोम माजवत त्याच्या थोरवीचा आभास निर्माण करीत असतात. शिवाय, आपल्या अपार भक्तीचा नजराणा सादर करत कुणासमोरही माना तुकविणार्‍या भक्तांचीही महती ती काय वर्णावी? एका बलात्कार्‍याला दोषी ठरवताच आपला क्षोभ व्यक्त करण्यासाठी जाळपोळ करून सार्वजनिक संपत्तीची नासधूस करणारे, वस्त्या उद्ध्वस्त करत सुटलेले लोक खरंच भावभक्तीच्या मार्गाने निघाले आहेत? की हा तमाशा घडवून आणणारा समूह जरासा निराळाच आहे? बलात्कारी असला, लोकांचे शोषण करीत असला, तरी राम रहीमचे त्या गादीवर असण्यातच आपलाही फायदा असल्याची पुरती जाण असलेल्या टोळीने तर हा विध्वंस घडवून आणला नाही ना, भक्तांच्या नावावर? कारण या कृत्याचा ठपका एकदा का भक्तांवर बसला की, बाबाचं मोठेपणही आपसूकच अधोरेखित होतं अन् मग हवा तो धिंगाणा घालायला आपण मोकळे, हे कळायला काही फार हुशार असावे लागण्याची गरज नाही. परवा कोर्टाचा निर्णय घोषित झाल्यानंतर पंजाब- हरयाणात घातला गेलेला हैदोस नेमका ‘सच्च्या’ भक्तांनी घातला की ‘डेरा’च्या लाभात अन् बाबाच्या पापातही भागीदार असलेल्या काही मोजक्या लोकांनी रचलेल्या षडयंत्राचा तो परिपाक होता, याची शहानिशा होण्याची गरज आहे. खरंतर, शक्यता दुसर्‍या शक्यतेचीच अधिक आहे. पण, बदनामी मात्र सच्च्या भक्तांच्या वाट्याला आली आहे. आपल्या समाजातील एक वर्गतर या जाळपोळीचे निमित्त साधून, एकूणच भक्तांच्या भक्तीवर प्रश्‍नचिन्ह उभे करून बसला आहे. त्यांच्यावर तोंडसुख घेणे चालले आहे त्या समूहाचे. अगदी जाणीवपूर्वक. त्यांना उत्तर देण्यासाठी म्हणून नाही, पण या घटनेचा बोध खर्‍या भक्तांनी घेणेही गरजेचे आहे. आपल्या भावभावनांचा कुणी असा बाजार मांडणार असेल, तर त्याला तो मांडू द्यायचा की नाही, हे ठरवण्याचा अधिकार तरी त्यांचा स्वत:चा असावा ना? अगदी परवा परवापर्यंत टीव्हीवरच्या ज्यांच्या प्रवचनाने बहुतांश लोकांच्या दिवसाची सुरुवात व्हायची, ज्यांच्या रसाळ वाणीने भारावलेल्या वातावरणात रममाण होण्याकरिता लाखोंच्या गर्दीत आपले स्थान अबाधित राखण्याकरिता कायम धडपडले, घरातल्या देव्हार्‍यात परंपरागत देवी-देवतांसोबत या संतांच्या तस्बिरींना स्थान देऊन त्यांच्या आरत्या ओवाळल्या, त्या मंडळींच्या चारित्र्यावर उडत असलेले शिंतोडे मनाला खचीतच वेदना देणारे आहेत. स्त्रियांचे शोषण केल्याच्या आरोपाखाली त्यांचे कारागृहातले वास्तव्य तर अजूनच दु:खदायक आहे.
राम रहीमला दोषी ठरविण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पंचकुला, सिरसामध्ये उसळविण्यात आलेला हिंसाचार, करण्यात आलेली जाळपोळ ही परमेश्‍वराच्या अस्तित्वावर अगाध श्रद्धा असलेल्या ‘सच्च्या’ भक्तांनी केली नसेल, याबाबतची जनमानसातली खात्री दृढ होईलच कधीतरी, पण तो प्रकार घडला या भक्तांच्याच नावाने, हे वास्तव कसे नाकारायचे? हे असे घडू शकले, याला कारण भक्तांची आंधळी भावना आहे? इथे भावनिक आवाहन करीत कुणाच्याही भक्तीला साद घालता येते, हा समज खरा की खोटा? सूर अन् ताल भक्तिरसाचाच असला, तरी त्यावर फेर धरताना जराशी सावधगिरी बाळगायला हवी ना लोकांनीही! थेट देव्हार्‍यात कसे कुणालाही स्थान देऊन बसतो आम्ही? अन् असे कसे कुणाच्याही आरत्या ओवाळायला तयार होतात लोक? कालपर्यंत ज्याला डोक्यावर धरून नाचलो, तो ‘आसाराम’ किंवा ‘राम रहीम’ निघाला की मनातल्या श्रद्धेच्या पाऽऽर चिंधड्या उडतात. कुणाच्या तरी हसण्याचा विषय ठरते आमची भावना. आधीच या देशात हिंदूंची श्रद्धा हा खिल्ली उडविण्याचा विषय असतो. कुणी धर्माच्या नावावर बकर्‍या कापल्या काय अन् कुणी येशूच्या नावाचं ताबीज हाताला बांधल्यानं तब्येत सुधारण्याचा दावा केला काय, त्याला आव्हान द्यायला कुणीच उतरत नाही इथे मैदानात. एकदा बड्या शहरातल्या मेडिकल स्टोअर्सचे सर्वेक्षण घ्या. कोणत्या धर्माच्या प्रार्थनाघराशी संबंधित लोक सर्वाधिक कंडोम्स खरेदी करतात, याचा शोध लागेल. पण, त्याबाबत ना हाक ना बोंब! आसारामसारख्या चित्रफितीही जारी होत नाहीत त्यांच्या. त्यामुळे त्यांचे चारित्र्य पांढर्‍या कपड्यांआड दडून जाते… वस्त्रं भगवी असली की मात्र अपेक्षा वाढतात लोकांच्या. हे एका अर्थाने चांगलेही आहे. भगव्याची महती व्यक्त होते त्यातून. त्यामुळे धारण करणार्‍यांनीही कसोटीच मानली पाहिजे ही. तरुणाईसमोर बोलताना एकदा अण्णा हजारे म्हणाले होते, ‘‘ब्रह्मचर्य हे व्रत आहे. साधना आहे. दुधारी तलवार आहे. त्याचा स्वीकार करताना दहा वेळा विचार करा. समाजसेवा करायला ते व्रत स्वीकारलंच पाहिजे असा आग्रह नाही. त्यामुळे नच जमलं तर सोडून द्या. पण, स्वीकार करून त्याला उणेपण आणू नका…’’
जे अण्णांना कळते, ते अध्यात्माचा कळस गाठल्याचा दावा करणार्‍यांना कळत नसेल, भक्तांचा आडोसा घेऊन तेच ब्रह्मचर्याची खिल्ली उडवीत असतील, तर मग या प्रकारावर आळा घालण्याची जबाबदारी भक्तांनीच स्वीकारली पाहिजे…
– सुनील कुहीकर
९८८१७१७८३३