२८ तासांनी थांबवले बचावकार्य

0
62

भेंडीबाजार इमारत दुर्घटना
बळीसंख्या ३४, मृतांमध्ये २० दिवसांचे बाळही
मुंबई, १ सप्टेंबर 
भेंडीबाजार इमारत दुर्घटनेचे बचावकार्य अखेर २८ तासानंतर थांबवण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या अथक प्रयत्नांनंतर ३४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये २० दिवसांच्या बाळासह तीन वर्षांच्या दोन मुली आणि सहा वर्षांच्या एका मुलाचा समावेश आहे. तर १५ जखमींना ढिगार्‍याखालून बाहेर काढले असून त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हुसैनी इमारत जमीनदोस्त
भेंडीबाजार पाकमोडिया स्ट्रीटवरील ११७ वर्षे जुनी असलेली पाच मजली हुसैनी इमारत गुरुवारी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास कोसळली. या इमारतीच्या रिकाम्या असलेल्या गाळ्यांमध्ये आजूबाजूच्या हॉटेलात काम करणारे लोक राहात होते. काही ठिकाणी जेवण बनवण्याचे कामही होत होते. इमारतीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावर पाच कुटुंबे वास्तव्यास होती. इमारतीत १२ खोल्या आणि २० गोदामे असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे याच इमारतीत एक प्ले स्कूलही चालवण्यात येत होते, जे १० वाजता सुरू व्हायचे. पण त्याआधीच इमारत कोसळल्याने अनेक चिमुकल्यांचे जीव वाचले आहेत.
अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलिस बचावकार्यात
इमारत कोसळल्याची माहिती मिळताच महापालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या दोन तुकड्या बचावकार्यासाठी दाखल झाल्या होत्या. बचावकार्य सुरू असताना अग्निशमन दलाचा एक, तर एनडीआरएफच्या पथकातील ६ जवान जखमी झाले. इमारत कोसळल्यानंतर आजूबाजूच्या तीन इमारतींना तडे गेले होते. त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. (वृत्तसंस्था)