पहिले हिंद केसरी बाबू रामचंद्रांच्या जीवनावर चित्रपट

0
37

– धर्मेंद्रसह नामवंत कलावंतांचा सहभाग
रवि नवलाखे
धारणी, २ सप्टेंबर 
विदर्भात चित्रपटसृष्टी निर्माण होण्याच्या संदर्भात चर्चा जोरात आहे. या भागातील लोकेशन्स ‘व्हर्जिन’ आहेत, असेही त्या क्षेत्रातील जाणत्यांचे मत आहे. अमरावती जिल्ह्यांत तर अनेक ठिकाणी चित्रीकरण झालेही आहे. आता या परिसरात चक्क धर्मेंद्र चित्रीकरणासाठी येणार असल्याच्या चर्चेने ऐन पावसाळ्यात वातावरण गरम झालेले आहे.
देशाच्या प्रथम हिंद केसरीचा बहुमान प्राप्त असलेल्या बाबू रामचंद्र यांच्या जीवनावर हिंदी चित्रपट काढण्याचा निर्णय मुकेश चौकसे यांनी घोषित केल्याने, पूर्व निमाडसह धारणी भागात माहोल तयार झाला आहे. पावसाळा ओसरताच चित्रीकरण सुरू होणार असून धर्मेंद्र हे पाहुणे कलाकार म्हणून बर्‍हाणपूर व नेपानगरला चित्रीकरणासाठी येणार असल्याची चर्चा आहे.
धारणीपासून ६० किमी अंतरावरील नेपानगर, मध्यप्रदेश येथील भारतीय कुस्तीतज्ज्ञ बाबू रामचंद्र यांनी १ जून १९५८ मध्ये हैदराबाद येथे ऑल इंडिया एमोच्योर रेसलिंग फेडरेशनच्यावतीने आयोजित स्पर्धेत हिंद केसरीचा प्रथम बहुमान पटकावला होता. आज ते ८५ वर्षांचे आहेत. निमाड येथे या वयातही तरुणांना कुस्तीचे डावपेच शिकवितात. निमाडचे चित्रपट निर्माते मुकेश चौकसे यांनी त्यांच्यावर चित्रपट बनविण्याचा निर्णय घोषित केला. या चित्रपटात शक्ती कपूर, प्रेम चोपडा, हेमंत बिरजे, शाहबाज खान, मुश्ताक खान, रणजित यांच्यासह पाहुणे कलाकार म्हणून धर्मेंद्र काम करणार आहेत. लाल मातीतील भारतीय कुस्ती लोकप्रिय करण्यासाठी आणि आधुनिक जीमकडे आकर्षित होणार्‍या तरूण पहेलवानांना पुनश्‍च भारतीय कुस्तीकडे वळविण्यासाठी हा चित्रपट नक्कीच काम करेल, अशी आशा निर्मात्यांना आहे.
१९५० मध्ये कर्नाटकच्या राज्यपालांच्या हस्ते १५ किलो वजनाची चांदीची गदा स्मृतिचिन्ह म्हणून रामचंद्र यांना मिळाली होती. ती गदा घेऊनच पत्रपरिषदेत बाबू उपस्थित होते. लहानमोठ्या अशा ३०० दंगली त्यांनी आपल्या काळात जिंकलेल्या आहेत. प्रसिद्ध टी. व्ही. मालिका महाभारतमध्ये महाबली भीमाचे काम करण्यासाठी बी. आर. चोपडा यांनी बाबू रामचंद्र यांना ऑफर केली होती. मात्र, ऑडिशनच्या आदल्या दिवशीच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने ते मुंबईला जाऊ शकले नव्हते. तेव्हा मालिकेत झळकण्याची संधी हातून सुटली मात्र, आता त्यांच्याच जीवनावर चित्रपट निर्माण होतो आहे.