रशियाच्या तटस्थ भूमिकेमुळेच चीनची माघार

0
316

-• डोकलाम वाद
मॉस्को, २ सप्टेंबर 
बदलत्या जागतिक राजकीय समिकरणामुळे पाकिस्तान आणि चीनने रशियाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना जवळजवळ यशही आले होते. डोकलाम मुद्यावर चीनने भारताला थेट युद्धाची धमकी दिली. भारताचा प्रामाणिक मित्र असलेल्या रशियाला ही बाब मान्य झाली नाही. चीनने भारताविरोधात रशियाला भडकविण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र, रशियाने चीनचे समर्थन न करता तटस्थ भूमिका घेतली. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली कणखर भूमिका यामुळेच डोकलाम वादात चीनवर तोंडघशी पडण्याची वेळ आली.
डोकलाममधून आपले जवान माघारी घेण्याची भूमिका जाहीर करण्याच्या काही तास आधी चीनमधील रशियन राजदूत ऍण्ड्रे डेनिसोव्ह यांनी रशियाची भूमिका स्पष्टपणे विशद केली होती. डोकलाम सीमेवरील परिस्थितीची आम्हाला चिंता वाटते. भारत आणि चीन या वादावर तोडगा काढतील. त्यांना मध्यस्थाची गरज असल्याचे आम्हाला वाटत नाही, असे डेनिसोव्ह यांनी रशियन पत्रकारांना सांगितले.
चीनने कुटनीतीचा वापर करून रशियाला सोबत घेतले आणि भारताविरोधात आघाडी उभारण्याचा प्रयत्न केला. पण रशियाच्या तटस्थ भूमिकेमुळे चीनला यश आले नाही. आपल्याप्रमाणेच रशियादेखील अमेरिकेचा विरोधक असल्याने आणि सध्याच्या स्थितीत भारत व अमेरिका अतिशय जवळ आले असल्याने रशिया डोकलाम वादात आपल्याला नक्कीच साथ देईल, अशी चीनची धारणा होती. पण, ती फोल ठरली, असे सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)