रविवारची पत्रे

0
29

स्वातंत्र्य चळवळीतील बालकांचा सहभाग
१९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात महत्त्वाचा सहभाग असलेल्या अल्पवयीन, अज्ञानी, अशिक्षित बालकांची देखील नोंद जर घेतली तर त्यांना खूप खूप आनंद होईल. त्यांच्या कृतीचे बक्षीस त्यांना त्याचसमयी मिळाले असल्यामुळे आणखी कोणत्या बक्षिसाची अपेक्षा नाही. फक्त नोंद घेतली जावी, एवढीच अपेक्षा. एक सत्य घटना देत आहे.
अमरावतीमधील अंबापेठेत तांबे यांचा वाडा होता. वाड्यात देवधर, बापट, ओक, मोहरील, गट्टावार, मुळे, कोल्हेकर असे सात भाडेकरू राहत होते. घटनेच्या दिवशी आम्ही बालके वाड्यासमोरील गल्लीमध्ये संध्याकाळी खेळत होतो. काही वेळाने आम्हाला दिसले की, दहा ते बारा व्यक्ती धावत येत आहेत. आम्ही सर्व बालके घाबरून एकीकडे झालो. त्या १०-१२ व्यक्ती धावत धावत कुठे जात आहेत, हे पाहण्यासाठी आम्ही देखील त्यांच्या मागे गेलो. त्या. १०-१२ व्यक्ती वाड्यातील तीन संडासामध्ये लपल्या. त्यांनी आतून कड्या लावल्या. आम्ही बाहेरून कड्या लावल्या. तेवढ्यात पोलिस त्या व्यक्तींना शोधत शोधत आमच्यापर्यंत आले. संडासांना बाहेरून कड्या लावल्या असल्याने पोलिसांना संशय आला नाही. पोलिसांनी इकडे तिकडे शोध घेऊन तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर वाड्यातील ज्येष्ठ आले. त्यांनी आम्हाला सांगितले की, संडासांच्या कड्या काढून टाका. आम्ही बालकांनी कड्या काढल्या. त्यानंतर आतील १०-१२ व्यक्ती बाहेर आल्या. त्या व्यक्ती एवढेच म्हणाल्या, ‘शाबास बालकांनो, तुमच्या कृतीमुळे आम्ही जेलमध्ये जाण्यापासून बचावलो. एक-दोन तासानंतर वाड्यातील ज्येष्ठ मंडळी चर्चा करीत होती व आम्ही बालके ऐकत होतो. वसंत देवधरचा मोठा भाऊ प्रभाकर देवधर याला पोलिसांनी पकडून नेले. जेलमधून सुटून आल्यानंतर प्रभाकर यांना न्यू हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी मिळाली व तेथूनच ते मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून मान मिळाला. स्वातंत्र्य चळवळीत अशा प्रकारे बालकांचा अप्रत्यक्ष सहभाग नोंद घ्यायला लावणारा आहे.
विनायक वासुदेव मोहरील
७२१८२०२५०२

पुणे येथे हे उणे!
परवा पुण्याहून अकोला येथे येण्यासाठी रेल्वेच्या प्रवासाचा योग आला, त्यावेळचा हा अनुभव! पुणे-नागपूर एक्सप्रेसमध्ये ए. सी.च्या बोगीमध्ये आमचे रिझर्व्हेशन होते. सायंकाळी ५.३० ची गाडी पकडण्यासाठी एक तास आधीच स्टेशनवर पोहोचलो. जोरदार पाऊस सुरू होता. सामान व पत्नीला सांभाळत प्लॅटफॉर्म क्र. १ वर आलो. तेथे गाडीबद्दल चौकशी केली, तर एका कर्मचार्‍याने सांगितले की, पुणे-नागपूर एक्सप्रेस बहुतेक प्लॅटफॉर्म नं. ४ किंवा ५ वर येईल. कसरत करीत जिना चढून ४/५ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर गेलो. नंतर उद्घोषणा झाली की, गाडी ६ नंबरवर येत आहे. धावपळ करीत तिकडे गेलो तर काय… वरून पाऊस पडतोे आहे, संपूर्ण प्लॅटफॉर्म ओला झाला आहे. लोक दाटीवाटीने कसेतरी गाडीची वाट पाहात उभे आहेत, सामान खाली ठेवण्यास कुठेही कोरडी जागा नसल्याने प्रत्येकाने आपले सामान हातात घेऊन ठेवले आहे, छोट्या प्लॅटफॉर्मवर अर्धवट शेड उभारले असल्यामुळे शेडमधूनही पाणी गळत आहे. एवढेच नव्हे, तर प्लॅटफॉर्म इतका घाणेरडा की किळस यावी! पुण्यासारख्या शहरात आणि पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या स्वच्छ भारतच्या घोषणेच्या पार्श्‍वभूमीवर हे विसंगतच वाटते.
प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही! नेहमीप्रमाणे गाडीचे आगमन होण्यापूर्वी प्लॅटफॉर्मवरील इंडिकेटर्सवर गाडीची पोझिशन डिस्प्ले झाली. प्रवासी पुन्हा धावपळ करून आपापल्या आरक्षणानुसार संबंधित जागेवर जाऊन उभे राहिले. गाडी आली तेव्हा प्रत्यक्षात ठरावीक जागेवर डबे उभे न करता पुढे जाऊन थांबली! कल्पना करा, पाऊस पडत आहे, वरून पाणी गळत आहे, हातात सामानाचे ओझे आहे, म्हातारे, महिला, लहान मुले यांनी काय करावे? पुन्हा धावपळ करून आपापल्या डब्यापर्यंत जाऊन, जागा पकडण्यामध्ये किती तारांबळ उडाली असेल, हाल झाले असतील…
सोबतच्या प्रवाशांशी चर्चा केली तर ते म्हणाले, अहो हे नेहमीचंच आहे. उन्हाळ्यात उन्हाचे चटके अन् पावसाळ्यात पाणी अंगावर घेतल्याशिवाय एसीच्या डब्यात आरामशीर प्रवास करताच येत नाही. रेल्वे प्रशासनाला या गोष्टीची जाणीव नसावी का? आतापर्यंत कुणीच तक्रार केली नाही का?
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या, रेल्वे प्रवाशांच्या सुविधांबाबत सतत नवनवीन घोषणा होत असतात. त्या पार्श्‍वभूमीवर या साध्या व छोट्या छोट्या सुधारणा केल्यात तरी प्रवाशांच्या सोयीचे होईल. रेल्वेप्रशासन व संबंधित अधिकार्‍यांनी नोंद घेऊन आवश्यक कारवाई करावी, हाच या लिखाणामागील हेतू!
विनायक दि. राजंदेकर
तापडियानगर, अकोला

ती सध्या काय लिहिते?
डॉ. पद्मरेखा धनकर हिचा आकांक्षा पुरवणीतील ‘ती सध्या काय लिहिते?’ लेख वाचला. लेख हृदस्पर्शी आहे. स्त्रीच्या गुलामगिरीवर पुरुषाने केलेल्या हुकुमतीवर प्राचीन स्त्री पिचली गेली होती. तिला केंद्रस्थानी ठेवून फार कमी काव्यलेखन आतापर्यंत झाले आहे. डॉ. धनकरांच्या मते खरी सुरुवात निरजापासून झाली. याचे कारण आपल्या समाजव्यवस्थेतच दडले आहे. ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ या प्रकारातून आजची स्त्री बरीच पुढे आली आहे. पद्मरेखाने आजची स्त्रीवादी कवितेचे अंत:करण थोड्याफार फरकाने उलगडून दाखविले आहे. अश्‍विनी धोंगडे, प्रज्ञा दया पवार, मल्लिका अमरशेख यांच्या कविता स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून लिहिल्या गेल्या आहेत. प्रभा गणोरकर ही स्त्रीवादी लेखिकाच आहे. वरील सर्व लेखिकांच्या कविता स्त्रीवादी फ्रेममध्ये बसविल्या तरी फ्रेममध्ये नसलेल्या चित्रासारखी त्यांची कविता आहे. ‘संभोगातील दारुण लावण्य’, ‘माणूसपणाचं भिंग बदलल्यावर’-नीरजा आणि अश्‍विनी धोंगडे यांच्या कविता स्त्रीसूक्त आळवतात. धनकरचा लेख वाचल्यावर मलाही नीरजा व अश्‍विनी धोंगडे यांचे कवितासंग्रह वाचावेसे वाटले, हेच तिच्या लेखाचे यश आहे. धनकरने सोप्या भाषेत, कवितेतील स्त्रीकेंद्रित्व कसे आहे हे उलगडून दाखवले आहे. अशा स्त्रीचा आवाज व्यक्त करणार्‍या कविता समाजात निर्माण व्हाव्यात, असे तिला वाटते. लेख अतिशय मननीय व वाचनीय आहे.
वैशाली विजय रावळे
९४२२८३५९३७

मोदींची सिंहगर्जना!
भारतातील एका सिंहाने डरकाळी फोडली. नुसतीच डरकाळी नव्हती, त्यात ताकद, जोश होता. होणार्‍या प्रयत्नांना तोंड देण्याची धमक होती. राज्यात स्त्रियांना मान मिळालाच पाहिजे, ही शिवाजी महाराजांची शिकवण लक्षात घेतली. मुस्लिम समाजात तीन वेळा तलाक म्हटले की झाले नवरा-बायको अलग! तलाक म्हणण्याचा अधिकार फक्त पुरुषांना. ही प्रथा कायद्याने रद्द करावी, अशी परखड भूमिका न्यायालयात मांडली. स्त्रियांना त्यांचा संसार करण्याचा अधिकार मिळवून दिला. हा निर्णय घेणे सोपे नव्हते. मतांवर परिणाम होईल किंवा देशात गोंधळ माजेल, काही समाजातील लोक धुमाकूळ घालतील, याची त्यांनी पर्वा केली नाही. भारताचा सिंह नरेन्द्र मोदी यांनी स्तुत्य, ऐतिहासिक निर्णय घेतला. मतांसाठी स्वार्थीपणा केला नाही. सावरकर, आगरकर यांनी सतीची चाल बंद केली. जोतिबा फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला. राजकारण म्हणजे फक्त पक्षाचे हित पाहणे नव्हे, तर देशातील लोकांची सुरक्षा, सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे. मुस्लिम स्त्रियांचा संसार वाचविला. कठीण समयी जो धावून येतो तोच भाऊराया!
मोदीजी, आपण निधड्या छातीचे, योग्य निर्णय घेणारे, अस्सल राजकारणी आहात. नोटबंदी करून काळा पैसा बाहेर काढला. राम रहीमला २० वर्षे सश्रम सजा झाली. तिहेरी तलाकला विरोध करण्याचा निर्णय धाडसीपणे घेतला. आपल्या कुशाग्र बुद्धीला सलाम! भारत निधर्मी देश आहे. येथे जातिभेद नाही. तेव्हा जातीच्या आधारावर असलेले आरक्षण बंद करा. एका समाजाची प्रगती करताना दुसर्‍या कमकुवत समाजावर अन्याय का? आर्थिक आधारावर आरक्षण द्या.
निर्मला गांधी
९४२१७८०२९०

गणेशोत्सव आणि हंगामी पर्यावरणप्रेम
सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवादरम्यान वर्तमानपत्र व सोशल मीडियावर काही हंगामी पर्यावरणप्रेमींच्या प्रतिक्रिया वाचल्या. आता यांना हंगामी संबोधण्याचे कारण असे की, १२ महिने कचरा हा कचरापेटीत न टाकता रस्त्यावर टाकणारे, पान, गुटखा, खर्रा खाऊन रस्त्यावर किंवा भिंतींवर पिचकारी मारणारे, शौचालयाचा वापर न करता रस्त्याचा आडोशाला पॅन्टची चेन खाली करणारे, लग्नामध्ये जोरजोरात डीजे वाजवणारे, सार्वजनिक कार्यक्रमात रस्त्यावर डिस्पोझेबल पेले, वाट्या इत्यादींचा कचरा करणारे, घरात कचरा होतो म्हणून चिमण्यांची घरटे मोडणारे, आपल्या घरच्या पाळीव कुत्र्यांना रस्त्याने फिरवून त्यांची विष्ठा तिथेच रस्त्यावर करवणारे इत्यादी मंडळी गणेशोत्सवादरम्यान गणेशोत्सव हा पर्यावरणाला कसा हानिकारक आहे याबद्दल आपापली फुकट मतं व्यक्त करताना दिसतात.
कुणी एक म्हणे ते मूर्ती बनवताना जे रासायनिक रंग वापरतात त्यांनी पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होतं. बरं मग रोज कचरा होतो म्हणून, रस्त्याचे काम सुरू झाले की वा इतरत्र कारणांनी जी झाडं तोडली जातात, अनावश्यक ठिकाणी गाड्यांचा वापर केल्याने जो हवेतील ऑक्सिजन कमी होतो त्याचे काय? रासायनिक रंगांबद्दल तर असे बोलताय जसे स्वत: अगदी सात्त्विक गोष्टी वापरतात (रसायनाने पिकवलेली केळी, रासायनिक खते वापरून पिकवलेली धान्ये, रसायन मारलेल्या भाज्या) बरं ते बारमध्ये बसल्यावर घेतलेले रसायन सिगारेट, तंबाखू हे नसतं का हो हानिकारक?
तसेच तो एक सण आला की लाखो जनावरांची कत्तल होते, तेव्हा कुणीच मातीची बकरी बनवा व कापा, पर्यावरणाची हानी टाळा असे मत देताना समोर आलेलं दिसत नाही. तेव्हा मात्र सर्वजण चिडीचूप. कितीतरी पर्यावरणप्रेमी संस्था या विसर्जनस्थळी निर्माल्य संकलन, मूर्ती स्वीकारणे इत्यादी कामे गाजावाजा न करता पार पाडतात. किमान त्यांचा आदर्श ठेवून आपण अशा ग्राऊंड लेव्हलवर कामे करावीत. नुसता सोशल मीडियावर पर्यावरणाबद्दल संदेश देऊन काय उपयोग?
मी या होणार्‍या प्रदूषणाचा समर्थक नाही. विरोध हा तुमच्यातल्या दुटप्पीपणाचा आहे. विरोध करायचा असेल तर पर्यावरणाला धोकादायक प्रत्येकच बाबीचा करायला हवा. हिंदू फक्त सहिष्णू आहे म्हणून नेहमी त्यालाच किती झोडपणार? बरं शिकवलं तरी आधी स्वत: आपण किती पर्यावरणाचं संरक्षण करतो ते तरी आधी बघा, किमान एक झाड लावा, मग बोला.
समीर कारंजेकर
नागपूर

न्यायपालिका आणि सामान्य नागरिक!
माजी राष्ट्रपती महोदयांनी दयेचा अर्ज फेटाळलेल्या राष्ट्रद्रोही गुन्हेगारासाठी मध्यरात्री न्यायमंदिराचे दरवाजे उघडणारी न्यायपालिका! फुटीरतावादी हुर्रियत नेत्यांकडून पैसे घेऊन भारतीय जवानांवर दगडफेक करणार्‍या काश्मिरी तरुणांविरुद्ध वापरल्या जाणार्‍या पॅलेट गन बघून हळवी होणारी न्यायपालिका! भुरट्या चोराला त्याच्या आजारी मातेला भेटायला जाण्यासाठी जामीन मंजूर करताना खळखळ करणारी, परंतु तथाकथित सेलिब्रिटींना तातडीने जामीन देणारी न्यायपालिका!… याच न्यायपालिकेची अलीकडच्या काळातील सक्रियता आणि पुढाकार वाखाणण्यालायक आहे. पाकिस्तानसारख्या इस्लामिक देशातही अस्तित्वात नसलेली तीन तलाक पद्धत भारतात अस्तित्वात होती. ती घटनाबाह्य असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय भारतीय मुस्लिम महिलांना सन्मानाने जगण्याचा मार्ग मोकळा करून देणारा आहे. या निवाड्यामुळे यापूर्वी शाहबानू प्रकरणी मुस्लिम महिलांवर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्याची संधी रालोआ सरकार आणि विरोधकांना चालून आली आहे. मुस्लिम महिलांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेताना सर्व पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवले पाहिजेत.
राष्ट्रहितापुढे व्यक्तिगत गोपनीयता गौण असली तरी व्यक्तिगत गोपनीयता हा व्यक्ती व नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा असाच ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आपले कुकर्म लपवण्यासाठी नागरिकांनी त्याचा दुरुपयोग करू नये अशीच न्यायालयाची अपेक्षा असणार!
हरयाणातील बाबा राम रहीम गुरमीत सिंग प्रकरणात तर न्यायपालिकेचे अत्यंत आक्रमक रूप बघायला मिळाले. लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना चार खडे बोल ऐकवण्याची हिंमत न्यायालयाने दाखवली आहे. गुरमीत सिंग याच्या अनुयायांनी केलेल्या हिंसाचारात झालेल्या हानीची भरपाई डेराच्या संपत्तीचा लिलाव करून भरून काढावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पाच वर्षांपूर्वी रझा अकादमीच्या अनुयायांनीही मुंबईत यापेक्षा भयंकर हिंसाचार माजवून कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान केले होते. त्यांच्यावरही अशीच कठोर कारवाई केली पाहिजे. न्यायपालिकेने तिथे कच खाल्ली तर वेगळा संदेश जाईल आणि तो न्यायपालिकेची अप्रतिष्ठा करणारा असेल. असो.
वरील सर्व न्यायनिवाड्यांना किरकोळ अपवाद वगळता जनतेचे व्यापक समर्थन मिळत असले तरी न्यायपालिका आणि कायदेमंडळ यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू नये अशी अपेक्षा आहे. आर्थिक, लैंगिक, नैतिक, सामाजिक भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं न्यायालयात अजूनही प्रलंबित आहेत. गुरमीत सिंगप्रमाणे आरोपींची राजकीय, सामाजिक, धार्मिक प्रतिष्ठा विचारात न घेता सर्व प्रकरणं तातडीने निकाली काढून न्यायपालिकेची प्रतिष्ठा वाढवावी. सर्वसामान्य माणसाला किचकट न्यायालयीन प्रक्रिया नीट समजत नाही, परंतु वर्षानुवर्षे रेंगाळणारे खटले, सजाप्राप्त लब्धप्रतिष्ठित गुन्हेगारांचे जामिनावर समाजात वर तोंड करून वावरणे सामान्य माणसाला बुचकाळ्यात टाकणारे आहे. जे आरोप सिद्ध झाल्यावर जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा होऊ शकते, त्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कर्नल पुरोहितांना तब्बल नऊ वर्षांनी जामीन मिळतो आणि चारा घोटाळ्यात तुरुंगवासाची शिक्षा झालेले लालूप्रसाद यादव सतत जामिनावरच असतात! हे कोडे भल्याभल्यांना सुटेनासे झाले आहे. तरीही न्यायपालिकेवर जनतेचा अजूनही अढळ विश्‍वास आहे. त्याला तडा जाता कामा नये. ही न्यायपालिकेचीच जबाबदारी आहे.
सोमनाथ देविदास देशमाने
९४२१६३६२९१

वांझ सारवासारव
मुंबईत प्रलयंकारी पावसाने केलेला कहर आणि मुंबईकरांचे झालेले अतोनात हाल या पार्श्‍वभूमीवर आपल्या गचाळ कारभाराबद्दल माफी न मागता उलट पालिकेच्या कामाचे उद्धव ठाकरेंनी केलेले कौतुक म्हणजे मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. उद्धव यांच्या असंवेदनशीलतेचा आणि असंबद्धतेचा प्रत्यय आजपर्यंत अनेकदा आला आहे. मुंबई जलमय झाली याचा संबंध त्यांनी उत्तर प्रदेशातील ७० बालमृत्यू झाले याच्याशी लावला! असंबद्धतेचा हा कळस झाला. बिहारमध्ये झालेल्या महापुराशी केला असता तर ठीक होते. तसेच ‘मी काल सतत आयुक्तांशी संपर्कात राहून मदतकार्याची माहिती घेत आहे,’ असे ते म्हणाले. पण, मूळ प्रश्‍न हा आहे की, १२ वर्षांनंतरही अशी परिस्थिती येऊ नये म्हणून काय ठोस उपाययोजना केली? यावर उत्तर देणे त्यांनी हेतूपूर्वक टाळले आणि ‘अगोदर’ काय केले यापेक्षा ‘नंतर’ काय केले यावर त्यांनी भर दिला. शाब्दिक खेळ न करता सरळसरळ माफी मागितली असती तर मुंबईकरांना थोडा तरी दिलासा मिळाला असता. पण वांझ सारवासारवीमुळे शिवसेनेला पालिकेवर निवडून देऊन आपण चूक तर केली नाही ना अशी सध्या मुंबईकरांची भावना झाली आहे.
अरविंद दि. तापकिरे
कांदिवली (प.), मुंबई