जमाते पुरोगामीची मोडस ऑपरेण्डी…

0
74

मंथन
केरळातील ‘लव्ह जिहाद’ हा विषय काही वर्षांपूर्वी ऐरणीवर आला, तेव्हा प्रथम मुस्लिमांपेक्षा पुरोगामी टोळी त्यावर तुटून पडलेली होती. अशी काही गोष्टच अस्तित्वात नसल्याचा प्रचार जोरात सुरू झालेला होता. देशात वा केरळात कुठेही अन्य धर्माच्या मुलींना प्रेमाच्या पाशात गुंतवून मुस्लिम केले जाते, असा मूळचा आरोप होता. पण, त्याची छाननी करण्यापेक्षा, असे काही होत नसल्याचाच दावा करताना हिंदुत्ववादी संघटनांवर धर्मद्वेषाचा प्रत्यारोप करण्यात आला होता. साहजिकच अशा प्रकरणात पोलिस तपास वा कुठलीही कारवाई करण्यातच अडथळे येऊ लागले. ही आता पुरोगामी मंडळींची एक मोडस ऑपरेण्डी झालेली आहे. कुठलाही गुन्हेगार एका ठरावीक शैलीने काम करतो, त्यासाठी हा इंग्रजी शब्द आहे. पुरोगामी धर्मांध मुस्लिमांच्या कारवाईला व उचापतींना पाठीशी घालताना, नेमकी हीच शैली पुरोगामी वापरताना दिसतील. आधी कुठलीही अशी भानगड पुढे आली, मग तिचा साफ इन्कार करायचा आणि उलट हिंदुत्ववाद्यांचे मुस्लिमांना बदनाम करण्याचे कारस्थान असल्याचा प्रत्यारोप करायचा, ही शैली होऊन गेलेली आहे. त्याप्रमाणेच लव्ह जिहाद ही हिंदू संघटनांची कपोलकल्पना असल्याचा आरोप झालेला होता. अर्थातच त्यांचेच भाईबंद तेव्हा माध्यमातून बोकाळलेले असल्याने, अशा शब्द व भानगडीवर पांघरूण घालण्याचा आटापिटा झाला. त्यामुळे शेकडोच्या संख्येने बिगरमुस्लिम मुलींचे धर्मांतर करून त्यांना इराकला पाठवले जाईपर्यंत स्थिती बिघडत गेली. पण, पुढे इसिसच्या जिहादमध्ये सहभागी व्हायला गेलेल्यांचा तपास सुरू झाला आणि त्यात अशा धर्मांतरित मुलींचा समावेश असल्याचे उघडकीस आले. म्हणून त्याचा थोडाफार गंभीरपणे तपास सुरू होऊ शकला. आता तर सुप्रीम कोर्टानेच त्याचा छडा लावण्याची जबाबदारी राष्ट्रीय तपास यंत्रणेवर सोपवलेली आहे. साहजिकच असे काही नाहीच बोलणार्‍यांना तोंडघशी पडण्याची वेळ आल्यास नवल नाही.
मुली वयात आल्यावर प्रेमात पडतात आणि त्यासाठी धर्म बघितला जाण्याचे कारण नसते. एखाद्या मुलाला वा मुलीला विरुद्ध लिंगाची व्यक्ती आकर्षक वाटल्यास काही गैर नाही. ती धर्मातीलच असावी असाही आग्रह आजच्या जमान्यात कोणी धरत नाही. पण, हे करताना मुद्दाम त्या वयातील हळवेपणाचा फायदा घेऊन धर्मांतर होत असेल, तर ते आक्षेपार्ह असते. कारण एकदा धर्मांतर झाले, मग जन्मदातेही त्या मुलीकडे पाठ फिरवत असतात आणि तशा मुलीला माघारी फिरायचे दरवाजे बंद होत असतात. साहजिकच तिला उद्या पश्‍चात्ताप झाला, तरी तिथेच खितपत पडावे लागत असते. ही एखाद्दुसरी घटना असली तरी सत्य गोष्ट होती. पण, अलीकडे अशा घटना संख्येने वाढू लागल्या, तेव्हा त्यात इतरांना लक्ष घालावे लागले. अशाच एका पित्याने, आपल्या मुलीला पद्धतशीर कारस्थान करून धर्मांतरित केल्याचा आरोप कोर्टात घेऊन जावा लागला. तिथे बारीकसारीक छाननी झाली असता, त्यात तथ्य आढळले होते. म्हणूनच हायकोर्टानेच त्या मुलीच्या अशा प्रेमविवाहाला अमान्य करून ते लग्न रद्दबातल केले. त्या निकालाला तिच्या पतीने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. मात्र, त्यामुळे हा प्रकार अधिकच चव्हाट्यावर आलेला आहे. त्यात ही सुशिक्षित मुलगी किती मानसिक परिवर्तनातून गेली, त्याची प्रचीती आली. वय वाढल्याने अक्कल येते असे नाही आणि भावनिक वा अन्य प्रभावाखाली माणसे सत्य बोलतात असेही नाही. सुप्रीम कोर्टानेही तोच प्रश्‍न उपस्थित केला. ही मुलगी शहाणी व स्वत:च्या बुद्धीने बोलत असेल, तर आपल्या जबानीमध्ये वारंवार आपले नेमके नावही कशाला बदलते? असा सवाल करून सुप्रीम कोर्टाने अशा धर्मांतरणाचा न्यायालयीन तपास करण्याची कामगिरी एनआयए या संस्थेवर सोपवली आहे. याचा अर्थ, लव्ह जिहाद नावाचा प्रकार ही भाकडकथा नसून, त्यात तथ्य असण्यालाच मान्यता दिलेली आहे.
या संदर्भात पुढे आलेली माहिती धक्कादायक आहे. काही मुस्लिम संस्था व संघटना त्यांच्या धर्मातील तरुणांना प्रयत्नपूर्वक अन्य धर्मातील तरुण मुलींना मुस्लिम धर्मात आणण्यासाठी सक्रिय करत असल्याच्या बातम्या होत्या. त्यासाठी विविध सुविधा व निधीही दिला जातो. शिक्षणसंस्था किंवा अन्य मार्गाने अशा मुलींना गोळा केले जाते. मग त्यातल्या ज्या मुली आपल्या घरात समाधानी नाहीत वा अस्वस्थ असतात, त्यांना लक्ष्य करून एखादा मुस्लिम तरुण त्यांच्याशी जवळीक वाढवणार आणि पुढे प्रेमविवाह म्हणून तिला धर्मांतराला भाग पाडणार, अशी ही कार्यपद्धती आहे. अशा कुठल्याही आरोपातले गांभीर्य ओळखून त्याची चौकशी करायला कुठली हरकत असायचे कारण नव्हते. पण, या बाबतीत मुस्लिम धर्मियांकडून आक्षेप घेतला जाण्यापूर्वीच पुरोगामी जमातीने पहिला आक्षेप घेतला. लव्ह जिहाद हा शब्द बोलणेसुद्धा गुन्हा असल्यासारखा गदारोळ करण्यात आला. पण, त्यामुळे आणखी काही मुलींचा बळी गेलेला आहे. एकट्या केरळात अशा धर्मांतरित वा प्रेमविवाहातून इस्लाम स्वीकारलेल्या २० मुली बेपत्ता आहेत. एका संशयानुसार त्यांना यापूर्वीच इराक-सीरियात धाडण्यात आले, असेही म्हटले जाते. तिथे जगभरचे जिहादी लढाया करतात, त्यांच्या लैंगिक सेवेसाठी अशा मुलींचा सरसकट वापर केला जात असतो. थोडक्यात, प्रेमात पडल्यानंतर त्यांच्या वाट्याला जणू नरकवास येण्याचीच खात्री देता येते. पण, त्याची चौकशीसुद्धा नको म्हणणारे गुन्हेगार नाहीत काय? अशा रीतीने मुलींना बहकवून त्यांचे शोषण करण्याला कुणी संस्था हातभारही लावत असेल. पण, त्या गुन्ह्यावर पांघरूण घालणारे कमी दोषी असतात काय? हिंदुत्वाचा बागुलबुवा करून इस्लामी धर्मांधतेला खतपाणी घालण्याच्या याच दिवाळखोर पुरोगामित्वाने समाजाचे नुकसान केले आहे. पण, हळूहळू त्यांनाच त्याची किंमत मोजावी लागणार आहे.
केरळात केवळ हिंदू मुलींनाच असे लव्ह जिहादचे लक्ष्य केले जात नाही. त्याचप्रकारे ख्रिश्‍चन व दलित मुलींचीही शिकार चालते. पण, तिथे कुठलाही राजकीय पक्ष त्यात लक्ष घालायला राजी नाही. तेच काम संघ व भाजपाने हाती घेतल्यावर अशा सर्व पीडित समाजातून गांजलेल्या पालकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यातूनच भाजपाची शक्ती केरळात वाढलेली आहे. अनेकांना आठवत असेल तर मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी चाललेल्या प्रचारात नरेंद्र मोदी केरळच्या दौर्‍यावर गेले होते. त्यांची एक प्रचारसभा तिथल्या काही ख्रिश्‍चन धर्मगुरूंच्या संस्थेने योजलेली होती. कारण, केरळी ख्रिश्‍चन समाजालाही या लव्ह जिहादने ग्रासलेले आहे. पण, अन्य कोणी राजकीय नेता त्याची दखल घेत नसल्यानेच या धर्मगुरूंनी मोदींना पाचारण केलेले होते. बाकी सर्व पक्ष पुरोगामी जमात आहे. म्हणजे त्यात कॉंग्रेस, डाव्यांसहित मुस्लिम लीगचाही समावेश होतो. थोडक्यात, आता पुरोगामी जमात हा एक मुस्लिम धर्मप्रचाराचा पंथ झाल्यासारखी स्थिती आहे. त्याच्याच परिणामी अन्य धर्मियांना पुरोगाम्यांपासून सावध होण्याची व त्यांच्यापासून दूर होण्याची वेळ आलेली आहे. सुप्रीम कोर्टानेच या तपासाचे आदेश दिलेले असल्याने, यात गुंतलेल्या मुस्लिम नेते व संघटनांचे मुखवटे फाटतीलच. पण, पुरोगामी बुरखे परिधान करून इस्लामी धर्मांधतेची पाठराखण करणार्‍यांनाही उघड्यावर आणले जाणार आहे. यात पुरोगामी अशासाठी गुन्हेगार आहेत, की त्यांनी गुन्हे करणार्‍यांना पाठीशी घालण्याचा गुन्हा केलेला आहे. हे नाटक जितके अधिक आवेशात रंगवले जाईल, तितकेच हिंदुत्ववादी नसलेले हिंदू व अन्य लहानसहान धर्मपंथातले लोकही भाजपाच्या पंखाखाली येत जाणार आहेत. म्हणूनच पुरोगाम्यांनी सुधारण्याची अपेक्षा भाजपाने कधीही करू नये. कारण, ही पुरोगामी मोडस ऑपरेण्डीच भाजपाला देशातील सर्वात मोठा व्यापक पक्ष बनवण्यास बहुमोलाची मदत करत आहे…!
भाऊ तोरसेकर