गणपतीची सुटका…

0
85

अग्रलेख
सुटका म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांची आग्य्राहून सुटकाच आठवते. सुटका ही तुरुंगातून, यातनांमधूनच होत असते. कुणाच्या नकोशा सहवासातून, छळातून कुणाची सुटका झाली की मग माणसे, ‘सुटलो बुवा एकदाचा!’ असा सुटकेचा नि:श्‍वास वगैरे टाकतात. याचा अर्थ छळ, यातना यांच्यात श्‍वास अडकलेला असतो. आता गणरायाची सुटका म्हणताना भक्तांच्या अतिरेकी श्रद्धेतून त्याची सुटका झाली, असेच म्हणायचे आहे. बघता बघता दिवस संपतही आलेत, असे भक्तांना वाटत असेल मात्र गणरायाला, ‘‘अय्यायगऽऽ अजून दोन दिवस शिल्लकच आहेत…’’ असे वाटत असावे. भक्त त्याच्या आगमनाची वाट बघत असतात. आता या जगातले कुठलेच नाते हे गरजेशिवाय निर्माण होत नाही अन् गरज नसली तर ते टिकतही नाही. आता दरवर्षी भादव्यातले हे दिवस आलेत की गणरायाच्या आगमनाची वाट भक्त बघत असतात. अत्यंत आतुरतेने बघत असतात. आता त्यामागे गरज असते आणि प्रत्येकाची गरज ही प्रामाणिकच असते. याचा अर्थ ती स्वच्छही असतेच असे अजिबात नाही. आता गणरायाची वाट बघण्यामागे अनेकांची अनेक कारणे असतात. मंडळवाल्यांपासून मंडपवाल्यांची अनेकानेक कारणे असतात. मंडळवाल्यांना आपला एक उत्साह असतो. त्यांची त्यांच्या वर्तुळातली लिडरशीप त्यांना गणपतीच्या निमित्ताने वार्षिक रिचार्ज मारायची असते. गणपती आला की वर्गणी मागण्यापासून त्यांचा जनसंपर्क होत असतो. आजकाल गणपती स्पॉन्सर्ड असतो. त्यासाठी मग आयोजक आपले प्रायोजक शोधत असतात. हा साराच व्यवहार असतो. आता हरिनामाचा आहे, असे दाखविले जात असले तरीही हा व्यवहारच असतो. त्यातही नफा-तोटा असतो. लेन-देन असते. त्यामुळे मंडळवाल्या मंडळींना गणेशाची वाट असतेच. नंतर ते त्याची वाट लावतात, ती वेगळीच. मंडपवाले, हारतुरे, डेकोरेशन, विविध कार्यक्रम करणारे, फुलवाले, वाजंत्रीवाले, आचारी, भटजी-पुरोहित… अशी ही लांबलचक यादीच आहे. व्यवहाराच्या या साखळीत आपला गणरायदेखील बांधला गेला असतो. अरे हो! मूर्तिकारांचे नाव तर घेतलेच नाही आपण. त्यांचा या भक्तीच्या व्यवहारात महत्त्वाचा वाटा असतो. आजकाल काय इकोफ्रेंडली सण साजरे करण्याच्या नावाने सारखी बोंध मारत असतात सारेच. अगदी टीव्हीपासून तर रेडिओ-वर्तमानपत्रे सार्‍याच ठिकाणी पर्यावरणपूरक सण साजरा करा, असे सांगणार्‍या जाहिराती दिसत होत्या. म्हणजे आपले पर्यावरण खाते काय करते तर पर्यावरण रक्षणासाठी दणक्यात जाहिराती करते. जनहितार्थ काय करायचे? तर आजकाल लोक जाहिरातीच जास्त करतात. काम कमी करा; पण दाखवा भरपूर, हा आजचा ट्रेंड झाला आहे. म्हणजे लोकल हिंदीत एक म्हण आहे ना, ‘खाया पिया कुछ नही, गिलास फोडा बारा आना’ तसेच हेही असते. करायचे चाराणे अन् गायचे बाराणे, हा आजच्या जगाचा मूलमंत्र आहे. म्हणजे घरी बायकोने भाकरीही केल्या (म्हणजे विकत आणल्या असे म्हणायचे नसते) तरीही त्या लगेच फोटो काढून समाजमाध्यमांवर फिरवायच्या असतात. ‘आज घरी दणक्यात कच्चं भरीत अन् भाकरीचा बेत केला होता सौंनी’, असे झळकवायचे आपले एफबी आणि व्हॉट्‌स ऍपवर. वर्षभर मग अधूनमधून रविवार पाहून तोच फोटो नव्या तारखेसह टाकायचा… म्हणजे आम्ही बघा कसे पर्यावरणपूरक आहोत, हे दाखवायचे. आता सरकार असो की सामान्य माणूस, करायचे कमी अन् गायचे जास्त, हे ठरलेले आहे. पर्यावरणपूरक गणपती साजरा करा, हे सांगण्यासाठी जितक्या प्रकारातून जाहिराती करता येतील तितक्या प्रकारात त्या केल्या गेल्या आहेत. म्हणजे सिनेमा थिएटरपासून रस्त्यावरच्या होर्डिंग्जपर्यंत सगळीकडे कसे पर्यावरणपूरक सणांचे धडे देणे सुरू आहे. सार्‍या जगाला वाटेल की हा देश किती पर्यावरण सजग वगैरे आहे. या जाहिरातींवर खर्च करण्यात आलेल्या पैशांत मोठी योजना राबवून झाडे वगैरे लावता आली असती. प्रत्यक्षात काही दिसले असते, झाले असते, घडले असते… (असे एकाच अर्थाचे तीन-चार वाक्य, शब्द ओळीने वापरलीत ना की एकदम कसे भरीव ज्ञानी वगैरे वाटतो, वक्ता किंवा लेखक) तर प्रत्यक्षात असे काही प्रकट झाले असते) पण जाहिरातींवर निधी किमान खर्च तरी होतो. प्रत्यक्षात गणरायच अडकले होते सार्‍याच प्रदूषणात. आता जाहिरातीत सांगण्यात येत होते की, प्लास्टिक, थर्मोकोल, काचा, रासायनिक रंग, पीओपी असे काहीही सजावटीसाठी आणि मूर्तीसाठी वापरू नका. प्रत्यक्षात मात्र या सार्‍या वस्तू धडल्लेसे (हिंदी कसे एकदम सनी देओलच्या ठोस्यासारखे जबरी वाटते ना!) विकल्या आणि खरेदी केल्या जात होत्या. गाणी तर अशी वाजत होती… बरे त्यातल्या त्यात गणरायाचे कान हत्तीचे. म्हणजे त्याने झाकूनही घेतले तरीही कुठल्यातरी बाजूने ‘तरारारा’ किंवा ‘झिंगाट’ वगैरे त्याच्या कानांच्या पोकळीतून मेंदूवर आदळणारच. बरे भक्तांना जाऊन काही म्हणावे तर तेही म्हणतात, ‘‘हात्तीच्या… एवढेच ना? दहा दिवस तर आहेत ना हे. मग बाकी वर्ष कसे शांत शांतच तर असते ना. आता यात हात्तीच्या हा शब्द गणरायासाठी आहे की आपल्यासाठी की मग ते सर्वनाम आहे, हे कळायला मार्ग नाही. पर्यावरणपूरक म्हणजे काय केवळ माती आणि पाणीच काय? ते तर तसेही वर्षभर आम्ही प्रदूषित करतच असतो. म्हणजे आमच्या कारखान्यांतून वाहणारे रासायनिक पाणी देशाच्या औद्योगिक प्रगतीच्या नावाने सर्रास नदी, नाले, तलाव यांच्यात सोडले जात असते. दिवसागणिक फुगतच चाललेल्या शहरांमधील घराघरांत होणारे प्रात:काळचे उत्सर्जन नाल्या आणि गडर यांच्यातून नद्या, तलाव आणि समुद्रातच सोडले जात असते. बरे आमच्या घराघरांतून एरवी निर्मिती कशाची होत असते? म्हणजे जपान, चीन या देशात घरोघरी काहीतरी गृहउद्योग होत असतो. भारत म्हणे आता पाच-सात वर्षांत जागतिक महाशक्ती वगैरे होणार आहे. त्याच त्या अव्वल स्थानी राहून अमेरिकेला कंटाळा आला आहे आणि चीनची इच्छा असूनही भारतासारखे त्यांचे काहीच नसल्याने ते नंबर वन होणार नाहीतच. कारण भारतात घरोघरी कचरानिर्मिती होत असते. त्यातही आम्ही ओला कचरा अन् कोरडा कचरा असा भेद करत नाही. देशाची प्रगती होत असल्याने उंचच उंच इमारती झाल्या आहेत. वरच्या मजल्यांवरून ओला-सुका सगळाच कचरा थेट आभाळात उधळला जातो. पृथ्वीने या वेळी पर्यावरपूरक वागायला हवे. आपली गुरुत्वाकर्षण शक्ती काही वेळ थांबवायला हवी. ती तसे करत नाही त्यामुळे बाल्कनीतून फेकलेला कचरा खाली जमिनीवर येऊन पडत असतो. त्यामुळे नदी, तलाव, विहिरी यांचे प्रदूषण करायला आम्ही काही गणपतीचीच वाट बघत नाही. ध्वनिप्रदूषणासाठीही काय केवळ गाणीच वाजवावी लागतात का? कारखान्यांचे अवजड आवाज असतात, आमच्या वाहनांचे ध्वनी असतात आणि बाकीही कल्ला काही कमी नसतो. गणपतीच्या गाण्यांनी ध्वनिप्रदूषणाला थोडा चेंज मिळतो आणि तो सुसंस्कृत असा बदल असल्याने आपण तो स्वीकारायला हवा. यंदा तर आम्ही कसले कसले गणपती करण्यात पुढचे पाऊल टाकले आहे. तिकडे कुठेतरी लोण्याचा गणपती तयार करण्यात आला. दक्षिणेत २० टन उसाचा गणपती तयार करण्यात आला आणि तो तयार करायला म्हणे चार महिने लागले. सुपार्‍यांचा, शोच्या बटनांचा असे गणपतीही करण्यात आलेच. आता असे कशाकशाचे गणपती तयार करून संकटमोचक गणरायावर संकटे टाकणार्‍या अत्यंत पर्यावरणपूरक अशा भक्तांच्या प्रेमळ तावडीतून गणरायाची सुटका झालेली आहे.