महाबँकेकडून गृह, वाहन कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ

0
32

पुणे, २ सप्टेंबर 
बँक ऑफ महाराष्ट्रने गृह आणि वाहन कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधी दरम्यान मंजूर होणार्‍या कर्जासाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. सणासुदीनिमित्त जाहीर करण्यात आलेल्या या योजनेच्या कालावधी दरम्यान दुसर्‍या बँकेचे गृहकर्ज बँक ऑफ महाराष्ट्रकडे वर्ग केल्यास त्यावरचे प्रक्रिया शुल्क माफ केले जाणार आहे. उत्सवांच्या काळात बँकेचा व्यवसाय विस्तारण्याच्या हेतूने ही सवलत जाहीर करण्यात आली आहे.बँकेने त्यांच्या गृह कर्ज विभागात तिमाहीगणिक स्थिर वाढ साध्य केली आहे, तर वाहन कर्ज विभागात, मार्च २०१७ रोजी संपलेल्या तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०१७-१८ पहिल्या तिमाहीत २८.२२ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाहन कर्ज विभागात वैयक्तिक वाहनांचा मोठा वाटा आहे. गृहकर्ज केवळ एका आठवड्यात, तर वाहन कर्ज ४८ तासांत उपलब्ध करणे शक्य व्हावे यासाठी बँकेने आपल्या प्रादेशिक कार्यालयांत खास पथके तयार केली आहे.२००२ पर्यंत सर्वांना घर मिळवून देण्यासाठी सरकारने आखलेल्या ‘प्रधानमंत्री आवास’ योजनेला बळकटी देण्यासाठी बँकेने केलेल्या प्रयत्नांमुळे गृहकर्ज पोर्टफोलिओच्या वाढीला चालना मिळाली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण १४०० खाती समाविष्ट करण्यात आली असून एकूण व्यवसाय २२१ कोटी रुपयांचा आहे. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आपल्या द्वैमासिक आर्थिक धोरणात २५ बीपीएस रेपो रेट कपात जाहीर केल्यानंतर सर्व कर्ज दरात ५ ते १५ बेसिस पॉइंट्सची (बीपीएस) घट करणारी बँक ऑफ महाराष्ट्र ही पहिली बँक ठरली होती.
घरखरेदीचे स्वप्न पाहाणार्‍या संभाव्य ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने गृह तसेच वाहन कर्जात आवश्यक बदल केले आहेत. कर्जासाठी लागणार्‍या कागदपत्रांची पूर्तताही सोपी केली असून त्यामुळे या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्‍या मोठ्या ग्राहक वर्गाला प्रोत्साहन देण्याची अपेक्षा आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. मराठे म्हणाले की, धोरण उपक्रमांचा लाभ सर्वसामान्य माणसाला मिळावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो. या सणासुदीच्या काळात सर्व प्रकारच्या आर्थिकस्तरातील ग्राहकांना आपले घर किंवा कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता बहाल करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. दरम्यान, आम्ही आमच्या प्रत्यक्षातील भागधारकांबरोबर असलेला संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत, ज्यातून त्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार आमच्या सेवा तयार करण्यासाठी व पर्यायाने या विभागात विकास साधण्यास मदत होईल. (वृत्तसंस्था)