नोकर्‍यांमध्ये मराठींना प्राधान्य द्या : राज ठाकरे

0
50

मुंबई, २ सप्टेंबर 
महाराष्ट्रात तयार होणार्‍या नोकर्‍यांत मराठी मुला-मुलींना प्राधान्य दिले तर आरक्षणाची गरजच नाही. जो आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे त्याला आरक्षण द्यावे, असे माझे ठाम मत आहे. अशी रोखठोक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली. मनसे-शिवसेना भविष्यात एकत्र येणार का, या प्रश्‍नावर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. मी हात पुढे केला होता पण, त्यांनी हाताला फक्त गुदगुल्या केल्या असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली. भाजपा शिवसेनेला किंमत देत नाही हे शिवसेनेला कळायला हवे. कोणी काय खावे हे सरकारने किंवा इतर कोणीही ठरवू नये. पर्यूषणचा काळ आहे म्हणून कत्तलखाने चालवू नका हे म्हणणे चुकीचे आहे. उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र हे राज्य आहे. गुजराती माणूस इथे व्यापार करायला आला कारण इथे पोषक वातावरण आहे, असे सांगत राज ठाकरेंनी यावेळी पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या मुद्यावर लक्ष्य साधले. राजकीयदृष्ट्या राहुल गांधी जोवर अस्तिवात आहेत, तोवर भाजपा अस्तिवात असेल, अशी मार्मिक टीकाही यावेळी राज ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि भाजपावरही केली. ठाकरे यांनी अनेक विषयावर शिवसेना आणि राज्यसरकारवर अप्रत्यक्षरित्या शरसंधान साधले.