साप्ताहिक राशिभविष्य

0
413

३ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर २०१७
मेष- चांगल्या वार्ता मिळणार
या आठवड्यात काही चांगल्या वार्ता कानी पडण्याची शक्यता आहे. विशेषतः मुला-मुलींच्या लग्नकार्याबाबत काही ठोस पावले उचलली जातील. काहींना घर, फ्लॅट तर काहींना छोटे-मोठे वाहन खरेदी करण्याचा योग येऊ शकतो. स्वतःच्या वास्तूत रहावयास जाण्याचे योग यावेत. काहींचे सांपत्तिक वाद निकाली निघण्याची शक्यता आहे. शिक्षण संपवून नोकरीच्या शोधार्थ असलेल्या युवकांना  उत्तरार्धात चांगले योग संभवतात. स्पर्धा परीक्षांमध्ये सरशी होईल. सरकारी अथवा खाजगी नोकरीत असलेल्यांना हा कालावधी फारसा अनुकूल नसला तरी तो निराश करणारा देखील नाही.
शुभ दिनांक- ५,६,७,८.
वृषभ- प्रकृतीला त्रासदायक
या आठवड्यातील ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. राशीस्थानावर एकीकडे गुरूची शुभदृष्टी असतानाच दुसरीकडे शनीचीही दृष्टी आलेली आहे. या ग्रहस्थितीचा परिणाम आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. घरातील वृद्ध मंडळींचे आरोग्य देखील जपावे लागू शकते. धनेश बुध अस्तंगत आहे . त्यामुळे मोठे आर्थिक व्यवहार करताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे. आर्थिक सतर्कता महत्त्वाची आहे. पैशांची देवाण-घेवाण करताना अनोळखी व्यक्तीवर विश्‍वास टाकणे धोक्याचे राहील. कुणाला जामीन राहण्याचे टाळावे.
शुभ दिनांक- ३,४,८,९.

मिथुन- आर्थिक फळी मजबूत
या आठवड्यातील ग्रहमान आपली आर्थिक फळी मजबूत राखणारे आहे. राशीस्वामी भाग्याला पाहणार असल्याने आपले मनोबल उत्तम राहील. आर्थिक बळ कायम असल्याने आपला आत्मविश्‍वास देखील दुणावेल. त्यामुळे छोट्या-मोठ्या समस्यांचा आपण सहज सामना करून यश पदरात पाडून घेऊ शकाल. दरम्यान कुटुंब, परिवारात काही वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. ते विकोपाला जाऊन सौहार्द्र बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. काहींच्या स्वभावात चिडचिडेपणा निर्माण होऊ शकतो. तेव्हा आपल्या बोलण्याने कोणी दुखावला तर जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
शुभ दिनांक- ५,६,७,८.

कर्क- उपयुक्त संधी मिळणार
हा आठवडा आपणास बर्‍याच अनुकूल घटनाक्रमांनी युक्त असणार आहे. आपल्या नोकरी-व्यवसायात आर्थिकदृष्ट्या काही उपयुक्त संधी निर्माण करू शकेल. काहींना नोकरीचे उत्तम योग लाभू शकतात. व्यवसायात असलेल्यांना व्यवसाय विस्ताराच्या संधी लाभून आर्थिक यश प्राप्त होऊ शकेल. आर्थिक उलाढालही वाढू शकेल. आयात-निर्यातीशी तसेच द्रव पदार्थांच्या व्यापारात असणार्‍यांना चांगल्या व्यावसायिक संधी लाभू शकतील. काहींना प्रसंगी परदेश गमन करावे लागू शकेल.  यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आनंद व उत्साह राहू शकेल.
शुभ दिनांक- ३,४,८,९.

सिंह-आर्थिक शुभयोग
या आठवड्यात आपणास अनुकूल ग्रहस्थिती लाभली आहे. आपल्या राशीत चार ग्रहांची जमघट आहे, ते आर्थिक शुभयोग निर्माण करीत आहे. नोकरी-व्यवसायातील लाभासाठी गुरू अतिशय अनुकूल आहे. त्यामुळे पैशांची आवक उत्तम राहील. कार्यक्षेत्रात काही शुभ वा उपयुक्त बदल होऊ शकतील. काहींना वारसा हक्क, भाऊबंदकीतून मिळणारी संपत्ती व पैसा लाभू शकेल. कोर्टाची काही प्रकरणे प्रलंबित असतील तर त्यात वेगवान प्रगती होऊन न्याय दृष्टिपथात येऊ शकेल. काहींना त्यांच्या योजनांच्या पूर्ततेसाठी छोटा-मोठा प्रवास देखील करावा लागू शकतो.
शुभ दिनांक- ५,६,८,९

कन्या-  महत्त्वाकांक्षांना बळ
या आठवड्यातील ग्रहमान आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षांना बळ देणारे राहील असे दिसते. नोकरी-व्यवसायात व्यवस्थित नियोजन करून वाटचाल केल्यास अपेक्षित यश पदरी पाडून घेता येऊ शकेल. काहींना नवी नोकरी, नोकरीत बदल, व्यवसाय विस्ताराबाबत विचार करता येऊ शकेल. व्यवसायात नवीन संकल्पना, तंत्राचा वापर करणे लाभदायक ठरावे. यामुळे आपली कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. सतत कार्यमग्नता राहील. मात्र याचमुळे कुटुंबात छोठ्या-मोठ्या कारणावरून तणावाची, मतभेदाची स्थिती निर्माण होऊ शकते. स्वभावात काहीसा चिडचिडेपणा निर्माण होऊ शकतो.
शुभ दिनांक- ३,४,७,८.

तुला-  कार्यक्षेत्रात महत्त्व वाढेल
या आठवड्याचा उत्तरार्ध आपणास तुलनेने अधिक सुखकर ठरू शकतो. राजकारण व समाजकारणाशी जुळलेल्या व्यक्तींना सुरुवातीचा काळ बराच तापदायक ठरू शकतो. उत्तरार्धात मात्र चांगले योग येऊ शकतात. आपल्या कार्याची योग्य दखल घेतली जाईल. नोकरी-व्यवसायात आपले महत्त्व वाढताना दिसेल. अधिकारी वर्गाची मर्जी राहील, तसेच आपल्या कार्यपूर्ततेत सहकार्‍यांची उत्तम मदत होऊ शकेल. स्वतःचे समाजात, जनमानसात स्थान निर्माण करण्याच्या आपल्या प्रयत्नांना यश मिळावे. कुटुंबात हर्षोल्हासाचे वातावरण राहील.
शुभ दिनांक- ३,७,८,९.

वृश्‍चिक-  कार्यक्षेत्रात जैसे थे
दीर्घकाळापासून जे परदेश गमनाचा विचार करीत होते, त्यातील काहींना या आठवड्यात चांगले योग संभवत आहेत. पासपोर्ट, व्हिसा वगैरेची कामे वेगाने व सहजतेने पूर्ण होतील. शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने विदेशात जायचे असेल तर त्यासाठी भरकस प्रयत्न करावयास हरकत नाही. दरम्यान, या काळात हवामानाच्या बदलाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः काही ज्येष्ठ मंडळींच्या बाबतीत काळजी घ्यावी लागू शकते. साथीचे आजार, सांध्यांची दुखणी त्रस्त करू शकतात.  नोकरी-व्यवसायात जैसे थे स्थितीच कायम राहण्याची शक्यता आहे. शुभ दिनांक- ४,६,७,९.

धनु-  मधला मार्ग नको
या आठवड्यातील भ्रमण उपयुक्त ठरणार आहे. नोकरी- व्यवसायात अगोदर जे परिश्रम घेतले, व्यवसायात जी गुंतवणूक केली त्याला आता सफलतेची फळे लागताना दिसू लागतील. परंतु हा साडेसातीचा काळ असल्याने या सफलतेसाठी कुढलाही मधला मार्ग शोधण्याच्या नादात जाऊ नका. काही मोहमयी प्रसंग आपणास खुणावू लागतील, पण त्यांच्यापासून दूर राहणेच योग्य. नवविवाहित दाम्पत्यांना संततीयोग येऊ शकतो. तसेच युवा वर्गास विवाहासाठी अनुकूल स्थळे व योग येताना दिसतील. या सार्‍यामुळे कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. शुभ दिनांक- ३,४,५,६.

मकर-  अनपेक्षित बदल
या आठवड्यात कुटुंब-परिवारात काही तणाव निर्माण होऊ शकतो. तसेच काहींना छोट्या- मोठ्या अपघाताचे वा अन्य आरोग्य विषयक तक्रारी निर्माण होण्याचे भय राहू शकते. दरम्यान, नोकरी-व्यवसायात काही अनपेक्षित बदल होऊ शकतात. काहींना अनपेक्षितरीत्या स्थानांतरण करावे लागू शकते. व्यवसायात देखील असा काहीसा बदल होऊ शकतो. विशेषतः छोट्या व्यापार्‍यांनी याबाबत सतर्क रहावयास हवे. भागीदारीच्या व्यवसायात असणार्‍यांना अधिक पारदर्शक व्यवहार व परस्पर विश्‍वासातूनच यशाचा मार्ग चोखाळावा लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दिनांक- ३,४,५,६.

कुंभ-  आरोग्य सांभाळा
हा आठवडा विशेषतः आरोग्याच्या दृष्टीने फारसा हितावह नाही. सध्याचे ग्रहयोग आरोग्याची पुरेशी काळजी घेण्यास सुचवीत आहेत. आठवड्याच्या उत्तरार्धात उपचारांना यश मिळू शकेल. मात्र तोपर्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे. व्यवसायात काही आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. काहींच्या स्वभावात निर्माण होणारा उग्रपणा त्यांच्यात प्रगतीत बाधा उत्पन्न करणारा ठरू शकतो. त्यामुळे स्वभावात अनुकूल बदल करणे हितावह राहील. कुटुंबात, परिवारात तसेच आपल्या कार्यस्थळी सौहार्द्रपूर्ण वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.
शुभ दिनांक- ५,६,७,८.

मीन -वेगवान घटनाक्रम
या आठवड्यात काही वेगवान घटनाक्रम अनुभवास येऊ शकतात. युवावर्गास नोकरी, विवाह, घ़र व वाहन खरेदीबाबत काही चांगले योग येतील. काहींना विदेशवारी घडू शकते. विशेषतः विवाहानंतर विदेशात जाण्याचे योग काही तरुणींना लाभू शकतात.  नोकरी- व्यवसायातून होणार्‍या आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. काहींना अधिक पगाराची नोकरी लाभू शकेल, तर व्यवसाय विस्तार करण्यासाठी अनुकूल संधी येईल. नोकरदार वर्गावर विशेष भार सोपविला जाऊन त्याच्या सफलतेतून मान, पैसा प्राप्त होऊ शकेल. वाहने सावधपणे चालवावीत.
शुभ दिनांक- ४,७,८,९
– मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६

SHARE
Previous articleपंचांग
Next article