0
37

‘याच दिवशी याच वेळी’
पार्श्‍वभूमी
आजच्या समाजाचं आयुष्य ‘इडियट बॉक्स’मध्ये बंदिस्त झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. मानवी जीवनातील रोजच्या ‘घटना, प्रसंग व प्रश्‍नोत्तरे’ यासाठी प्रत्येकजण आज पूर्णत: ‘छोटा पडदा’ या भिंतीवरील चौकोनावर अवलंबून आहे. सकाळी उठल्यापासून आरत्या, भजन, भूपाळी, ताज्या बातम्या, मनोरंजन, ज्ञान संपादन, लहान मुलांची करमणूक, नवनवीन पदार्थांच्या रेसिपीज, आरोग्यविषयक सल्ला, व्यवसाय वृद्धीसाठीचे ज्ञान, सामाजिक प्रश्‍नांवर चर्चा अशा मानवी जीवनाशी निगडित विविधांगी विषयांच्या संबंधात बहुतांशी जनता या चौकोनाकडे मोठ्या आशेन बघत असते आणि त्यांच्या समाधानासाठी विविध चॅनेल्समध्ये अहमहमिका चाललेली आढळून येते. परिणामस्वरूप मानवाच्या ‘स्कूल ऑफ थॉट्स, वैचारिक प्रगल्भता आणि वर्तणूक’ यावर आक्रमण झालेलं दिसतं. चॅनेल्सच्या नवनवीन संकल्पनांचा शोध आणि माणसाची त्यात वाढत असलेली गुंतवणूक, हा सिलसिला अथकपणे चालूच राहणार आहे. मानवासाठी आता परतीचा मार्ग बंद झालेला असून, अधिकाधिक मानवी जीवन आपल्यामध्ये सामावून घेण्यात हा ‘चौकोन’ यशस्वी होईल असं खात्रीपूर्वक म्हणता येईल. ‘माणसाचं वास्तव आणि व्हर्चूअल जीवन’ याची सरमिसळ होऊन सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे. त्यात आता इंटरनेटचीही भर पडल्याने आभासी जीवनाकडे माणसाचा कल वाढला आहे. स्मार्ट मोबाईलमुळे ‘करलो दुनिया मुठ्ठीमें’चा नारा प्रत्यक्षात आणताना ‘छोटा पडदा ते मुठीतला पडदा’ हा प्रवास इतका वेगात झाला. मग काय टीव्ही मालिकांतली पात्रं छान छान चेहर्‍यांनी साकारल्याने हे समस्त ‘टीव्हीभक्त’ आपल्या आयुष्यातील चिंता विसरून सिरीयलमधील गुंता सोडवण्याची जबाबदारी शिरावर पेलून आहेत. मग त्यांच्याच सारखं बोलणं व वागणं कॉपी करण्यात धन्यता मानत आहे. ‘ऍट द रिझल्ट’ कौटुंबिक व सामाजिक जीवन उद्ध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे उपदेशाचे साधे डोस तर सोडाच हो, कानीकपाळी ओरडूनही यांच्या प्रवृत्तीमध्ये काहीही फरक दिसण्याच्या आशा आता संपुष्टात आल्या आहेत.
कथासंहिता
लेखक व नाटककार अभिराम भडकमकर याने याच पार्श्‍वभूमीवर एकुणात आजच्या समाजमनाचं, माणसाच्या असंवेदनशील प्रवृत्तीचं व प्राप्त परिस्थितीचं मर्मभेदक असं चित्र आपल्या समोर मांडण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सुरेंद्र व अनघा या नोकरदार व मध्यमवयीन कुटुंबाच्या सहजीवनाच्या माध्यमातून सद्यस्थितीचं दर्शन मांडताना त्याच्या आडून आजच्या समाजाची खिल्ली अजिबात न उडवता त्याने कळत नकळत दिलेलं हे आशयघन बोधामृत गळी उतरवण्याची मानसिकता आपल्यामध्ये असण्याची अपेक्षा त्याने निश्‍चितच बाळगली आहे. या दोघांच्या आयुष्यात त्यांच्यावर गुदरलेले प्रसंग, त्यातून निर्माण झालेले परिस्थितीजन्य पेच, त्याच्याशी निगडित सभोवारचे रेफरन्सेस आणि बिघडत जाणारा त्यांच्या कुटुंबाचं एकुणात प्रवास यावर या नाटकाचं कथानक बेतलेलं आहे.
नाटकातील नाट्य
ग्लोबलायझेशनमुळे भारतात, या समाजात व यातील कुटुंबात जी काही उलथापालथ झाली आहे त्याचं एक प्रातिनिधिक स्वरूप नाटककाराने या नाटकातून मांडलेलं आहे. मी, मला आणि माझं याच वर्तुळात फिरणारी मनोवृत्ती भारतामध्ये रुजत आहे. मानवी जीवन मूल्यांचा र्‍हास झाल्याने कौटुंबिक व सामाजिक संवेदनशीलता नष्ट होऊन चंगळवाद व व्यक्तिवादाला बढावा मिळतो आहे.
यातील व्यक्तिरेखा
सुरेंद्र – याही परिस्थितीत स्वप्नपूर्तीसाठी तत्त्वमूल्यांशी केलेली तडजोड, जिवाची घालमेल, अहोरात्र अत्यंत कष्टाने सामना करत सुरेंद्र आपलं अस्तित्व, महत्प्रयासाने उभारलेलं विश्‍व टिकवण्यासाठी धडपडतोय.
अनघा – ही तर चंगळवादाचा पुरस्कार करणारी, सध्यातरी ही टीव्हीमय जीवनात, मालिकांमधल्या व्यक्तिरेखांमध्ये गुंग, त्यांना ‘ब्लाइंडली फॉलो’ करत जीवन जगते आहे.
विशाखा – अनघाची मैत्रीण, हीसुद्धा तशीच, टीव्हीवरील जाहिरातींना सत्य मानत त्यांच्या भूलथापांवर विश्‍वास बाळगून त्यातून प्रसिद्ध होणारी ‘जीवनमूल्ये असो की प्रॉड्क्ट सेल’ ही हमखास बळी पडणारी व त्यातूनच उद्भवलेल्या असुरक्षिततेच्या भावनने पोखरलेली.
मानस – सुरेंद आणि अनघाचा मुलगा – सध्या पौगंडावस्थेतील होणार्‍या बदलाशी झगडतो आहे आणि त्याची मैत्रीण प्रियाकडे आकृष्ट झालेला आहे. त्याच्या या परिस्थितीला कोणीच समजून घेत नसल्याने त्याच्यामध्ये बंडाची भावना निर्माण झाली आहे.
प्रिया – ही एक अत्याधुनिक विचार व ‘युज ऍन्ड थ्रो’ मनोवृत्तीची मुलगी आहे.
केवळ स्वत:चाच विचार करत असल्याने एकमेकांशी संवाद हरवलेल्या कुटुंबाचं वास्तवदर्शी चित्रण रंगभूमीवर बघताना काही प्रसंगातून भयंक वास्तवाची जाणीव होते, अविश्‍वसनीयही वाटतं, परंतु सावकाशपणे आपण त्या व्यक्तिरेखांच्या जागी असल्याची स्पष्ट जाणीव व्हायला लागते आणि संवेदनशील प्रेक्षक जागीच हादरून जातो, इतका डार्कनेस या लेखनात व सादरीकरणात समाविष्ट आहे.
सादरीकरण
दिग्दर्शक कुमार सोहोनी आणि नाटककार अभिराम भडकमकर हे दोघेही एन.एस.डी.चे विद्यार्थी त्यामुळे त्यांच्यातील वैचारिक समन्वय निश्‍चितच उत्तम आहे. अभिरामला अपेक्षित नाट्य सादर करण्यासाठी खरं तर कुसोंना तेवढेच ताकदवर कलावंत अपेक्षित होते. परंतु हे नाटक मुंबई विद्यापीठातील ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या दुसर्‍या वर्षाच्या विद्यार्थ्यांना सादर करायचं असल्याने थोडे फार रिस्ट्रिक्शन्स आले तरीही हा प्रयोग अतिशय नेटका बांधला गेल्याने अपेक्षित परिणाम साधला गेला आहे. अर्थात सुयोग्य पात्रांची निवड झाली नसल्याने काही प्रसंग व त्यातील नाट्य सादर करण्याचे दिग्दर्शकाने जाणीवपूर्वक टाळलं असल्याचं उगीचच वाटून जातं. मानवाचं वास्तव जीवन व मालिकांमधील प्रसंग यात प्रचंड तफावत असल्याचं स्पष्ट करण्यासाठी कोपर्‍यातील टीव्हीवरील प्रोग्रामच्या दाखवण्याची आयडिया खूपच मस्त आणि पूरक ठरते. त्यामुळे मालिकांमधली कृत्रिम व पोकळ संवाद, भाषा व वास्तव जीवन यातला फरक जाणवतो व अधोरेखित होतो. याच दरम्यान ‘टीव्हीमल्लिकांच’ स्वरूप उघड केल्याने नाटककाराला व दिग्दर्शकाला अपेक्षित परिणाम साधला जातो. हे सगळं नाट्य घडतांना सुरेंद्र व मानस यांची घालमेल प्रेक्षकांना जाणवते.
अभिनयानुभव
प्रसाद माळी याने सुरेंद्रची एकुणात परिस्थिती, मानसिकता, स्वत:शी व बाहेरच्या जगाशी चाललेला संघर्ष, या गोंधळातून निर्माण झालेली चिडचिड हे सगळं समर्थपणे उभारलेलं आहे. अनघाच्या भूमिकेसाठी आवश्यक देहबोली, टीव्हीतील मालिकांशी नातं जोडून त्याच्याच आहारी गेलेली, अनुकरण व अंगीकरण करण्याची प्रवृत्तीची प्रातिनिधिक स्त्री मस्त साकारलेली आहे. श्रद्धा तपकिरे हिने विशाखा हे पात्र रंगवतांना चंगळवादी, असुरक्षित व विमनस्क स्त्रीची मानसिकता जाणून, समजून घेऊन अभिनय केला आहे व तो आवश्यक परिणाम साधतो. सौरभ ठाकरे याने मानसची पौगंडावस्थेतल्या मानसचं पालकांशी संवाद तुटल्याने भरकटलेपण, भविष्याविषयीचा गोंधळ, यातून निर्माण झालेली निष्क्रियवृत्ती, वैफल्यातून उमटलेली सहज हिंस्र प्रतिक्रिया अधिक तीव्रतेने दाखवलेली आहे. ऋजुता धारपने प्रिया साकारताना, ग्लोबलायझेशनच्या रोगाची बळी, तिची वापरा व फेका ही उपभोगवादी वृत्ती व डामाडौल परिस्थिती चोखपणे दाखवलेली आहे. सोबतच किरण पावसकर (सावित्री), रोहन आनंद (करण), सांची जीवने (सुमन), अंकिता नरवणेकर (नेहा), सुरभी बर्वे (आशाताई व निवेदिका), कोमल सोमारे (सौ. चौघुले), समीर रामटेके (योगशिक्षक), एकनाथ गीते (योगविद्यार्थी) यांनी टीव्हीवरील कलाकार त्यांच्या खास लकबींनिशी उत्तम रीत्या साकारले.
तांत्रिक बाजू…
टीव्ही मालिकांचं जग आणि कौटुंबिक जीवन या दोन वेगवेगळ्या लेव्हल्सवर नाटक घडवण्यासाठीचं नेपथ्य ‘राजन भिसे’ यांनी उत्कृष्ट उभारलेलं आहे. परंतु या दोन लेव्हल्समुळे पात्रांच्या मुव्हमेंट्समध्ये अडचणी निर्माण झाल्या असाव्यात असं वाटतं. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना कथानक, दोन स्तर व नेपथ्य याला पूरक व परिपूर्ण अशीच आहे तर त्याला अरविंद हसबनिसांच्या पार्श्‍वसंगीताची जोड लाभल्याने प्रसंग उठावदार होतात. दीपाली विचारे यांचं नृत्यदिग्दर्शन, पूर्णिमा ओक यांची वेशभूषा व उलेश खंदारे यांची रंगभूषा चोख झाल्याने पात्रांना सुयोग्य स्वरूप प्राप्त होतं आणि त्यांच्या अभिनयाला देखणेपणा प्राप्त होतो.
सारांश
आज समाजातील प्रत्येक घरात करमणुकीच्या नावाखाली जागा बळकावलेल्या ‘इडियट बॉक्स’ने आपल्या ‘पोकळ, फोल व कृत्रिम’ आश्‍वासनांवर माणसाचं हृदय काबीज करून त्यांच्या खाजगी जीवनावर नकळतपणे घाला घातला आहे. याबाबत समाजधुरिणांनी व तत्त्ववेत्त्यांनी कितीही डोकेफोड केली तरीही ढिम्म प्रतिसाद देणार्‍या आजच्या समाजाचे वास्तव प्रदर्शन या नाटकाच्या माध्यमातून होतं. किमान आता तरी लोक जागे होऊन उघड्या डोळ्यांनी आपलीच परिस्थिती न्याहाळतील, समजतील व समजावून घेतील या आशेने नाटककाराने हा समाजप्रबोधनाचा एक यशस्वी प्रयत्न केला आहे. बघू या पुढे काय घडते ते… परंतु या नाटकाला व्यावसायिक व हौशी रंगभूमीवर सादर केल्यास हा विषय सर्वदूर पसरेल अशी आशा बाळगण्यास काय हरकत आहे.
– एनसी देशपांडे /९४०३४९९६५४