काश्मिरी पंडितांच्या भळभळणार्‍या वेदना!

0
115

तिसरा डोळा
१९९० मध्ये राज्यातील दहशतीपुढे मान तुकवून, अत्याचारांच्या भयापोटी, महिलांवरील बलात्काराच्या आणि सामूहिक हत्यांच्या भीतीमुळे केवळ जीव वाचवण्यासाठी काश्मिरी पंडितांनी खोर्‍यातून पलायन केले. कट्टरपंथीयांनी, काश्मिरी पंडित हे काफीर आहेत, असे जाहीर केले होते. इस्लाम स्वीकारण्यासाठी त्यांच्यावर बळजबरीही करण्यात येत होती.

जम्मू-काश्मीरचा विचार करता, जे अनेक मुद्दे डोळ्यांपुढे येतात, त्यात या राज्यांतून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांचा मुद्दा प्राधान्याने चर्चिला जातो. खोर्‍यातील दहशतवादामुळे ज्या काही समस्या निर्माण झाल्या, त्यात काश्मिरी पंडितांच्या निष्कासनाची, विस्थापनाची समस्या फार मोठी आहे. १९९० मध्ये राज्यातील दहशतीपुढे मान तुकवून, अत्याचारांच्या भयापोटी, महिलांवरील बलात्काराच्या आणि सामूहिक हत्यांच्या भीतीमुळे केवळ जीव वाचवण्यासाठी काश्मिरी पंडितांनी खोर्‍यातून पलायन केले. कट्टरपंथीयांनी, काश्मिरी पंडित हे काफीर आहेत, असे जाहीर केले होते. इस्लाम स्वीकारण्यासाठी त्यांच्यावर बळजबरीही करण्यात येत होती. इस्लाम स्वीकारा नाहीतर काश्मीर सोडा, अशी धमकावणीची भाषा वापरली जात होती. तेवढ्यावर ते थांबत नव्हते, तर त्यांनी काश्मीरमध्ये नंगानाच घातला होता. निरपराध पंडित आणि त्यांच्या कुटुंबीयांचे शिरकाण केले जात होते. आज काश्मिरी पंडितांच्या निष्कासनाला २७ वर्षे झाली, तरी खोर्‍यात परतण्यासाठी जे वातावरण निर्माण व्हायला हवे, ते झालेले नाही आणि खोर्‍यात काही ठिकाणी त्यांच्या स्वतंत्र वसाहती उभारण्याचे प्रयत्नही रखडलेले आहेत. पुनर्वसनाच्या आघाडीवर काश्मिरी पंडितांच्या पदरात अपयशच पडत असताना, गेल्या २७ वर्षात पंडितांच्या झालेल्या हत्यांबद्दल अपराध्यांना शिक्षादेखील झालेली नाही.
जम्मू-काश्मीरच्या प्रवेशद्वारावर दहशतवादाची चाहूल लागल्यापासून, काश्मिरी पंडितांच्या आजवर झालेल्या शेकडो हत्यांची चौकशी पुन्हा सुरू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात फेटाळून लावली. १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत झालेल्या शिखांच्या सामूहिक हत्याकांडाच्या चौकशीला परवानगी दिली जाते, तत्कालीन सरकारने बंद केलेेल्या फाइल्स पुन्हा उघडल्या जातात, मग काश्मिरी पंडितांच्या हत्यांची चौकशी का केली जाऊ शकत नाही? काश्मिरींच्या मृत्यूची सरकारदरबारी आणि न्यायमंदिराच्या पायरीवर काहीच किंमत नाही का? खरेतर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडित काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा न्याय नाकारला गेला आहे.
‘रूट्‌स इन काश्मीर’ या काश्मिरी पंडितांच्या संघटनेने काश्मिरी पंडितांच्या आजवर झालेल्या शेकडो हत्यांची आणि या सदर्ंभात दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशी अहवालांची चौकशी जम्मू-काश्मीर राज्याच्या बाहेर नेण्याची किंवा याबाबतची चौकशी सीबीआय किंवा एनआयएतर्फे व्हावी, अशी मागणी केलेली आहे. कारण, गेल्या २७ वर्षांत जम्मू-काश्मीर पोलिसांनी चौकशीच्या आघाडीवर फारशी पावलेच टाकलेली नाहीत. पंडितांच्या झालेल्या निष्कासनाला २७ वर्षे झाली असून, त्यांच्यावरील अत्याचारांचे पुरावे आज उपलब्ध होणे अशक्य आहे, असे कारण न्या. जे. एस. खेहर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी ‘रूट्‌स इन काश्मीर’ची याचिका फेटाळून लावताना म्हटले आहे. तथापि, काहीही झालेतरी काश्मीरमध्ये परतणारच, असा निर्धार करणार्‍या कार्यकर्त्यांच्या मते, हत्या झालेल्या काश्मिरी पंडितांचे नातेवाईक, त्यांची बायको-मुले आणि मित्रपरिवार आजही हयात असून, तेच या हत्यांचे खरे साक्षीदार आहेत. पुरावे हवे असतील, तर त्यांच्याकडून घ्यायला हवेत. आप्तस्वकीयांच्या हत्यांनी काश्मिरी पंडितांच्या वेदनेच्या जखमा आजही भळभळत आहेत. त्यावर मलम लावण्याचे कार्य विद्यमान पीडीपी-भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने करावे, अशी अपेक्षा बाळगली जात आहे.
‘रूटस् इन काश्मीर’ची याचिका फेटाळली गेल्याचे दुःख जम्मू-काश्मीर कोऍलिजन ऑफ सिव्हिल सोसायटीलादेखील आहे. काश्मिरी पंडितांच्या हक्कासाठी लढा देणार्‍या संघटनेने एक निवेदन जारी करून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वस्तुस्थितीपासून पळ काढणारा आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. गुन्हा कधीच मरत नसतो आणि हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार न्यायासाठी कुठलीही समयसीमा निर्धारित केली जाऊ शकत नाही, असा दाखला या संघटनेने दिला.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी २००८ मध्ये स्वबळावर केलेल्या एका सर्वेक्षणात, १९८९ नंतर दहशतवाद्यांनी २०९ काश्मिरी पंडितांच्या हत्या केल्या असून, त्यातील १०९ हत्या एकट्या १९९० मध्ये झालेल्या आहेत. १४० हत्यांबाबत राज्यातील निरनिराळ्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले असून, केवळ २४ प्रकरणांमध्ये आरोपपपत्र दाखल झालेले आहेत. ११५ प्रकरणांमध्ये मारेकरी कोण, याचा पत्ताच लागलेला नाही. ज्या २४ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झालेले आहेत, त्यामध्ये ३१ स्थानिक दहशतवाद्यांना अटक झालेली आहे. निवृत्त न्यायाधीश नीलकांत गंजू यांच्या १ नोव्हेंबर १९८९ रोजी श्रीनगरच्या हरिसिंग माहामार्गावर झालेल्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा संस्थापक मकबूल भट याला न्या. गंजू यांनी फाशीची शिक्षा ठोठावली होती. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या नोंदीनुसार, खोर्‍यात काश्मिरी पंडिताची जी पहिली हत्या झाली ती महिला होती. बडगाम जिल्ह्यातील छांदोराजवळच्या नवागारी येथील या महिलेचे नाव प्रभावती असून, तिची हत्या १४ मार्च १९८९ रोजी हरिसिंग हायस्ट्रीटवर झाली होती. आजपर्यंत तिचे मारेकरी अज्ञात आहेत. पोलिसांनी काश्मिरी पंडितांच्या संग्रामपुरा, वंडहामा आणि नंदीमार्ग येथे झालेल्या सामूहिक शिरकाणाचीही नोंद केलेली आहे. २१-२२ मार्च १९९७ च्या रात्री बडगाम जिल्ह्यातील संग्रामपुरा खेड्यात ७ काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. २५ जानेवारी १९९८ रोजी वंडहामा येथे २३ काश्मिरी पंडितांना यमसदनी पाठवण्यात आले आणि २४ मार्च २००३ रोजी नंदीमार्ग येथे २४ काश्मिरी पंडितांचा खात्मा करण्यात आला. वंडहामा सामूहिक हत्याकांडाचे मारेकरी आजवर सापडलेले नाहीत, असे पोलिसांचा अहवाल सांगतो. संग्रामपुरा सामूहिक हत्याकांडाच्या आरोपींची ओळख पटली होती. तथापि, अबू हारिस आणि अबू खालिद हे या कटात सहभागी पाकिस्तानी दहशतवादी २४ मार्च १९९७ रोजी हेवादर येथे पोलसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. नंदीमार्ग येथील हत्या पाकिस्तानाच्या रावलकोट येथे वास्तव्यास असलेल्या झई मुस्ताफा ऊर्फ अब्दुल्ला याने केल्याचे पोलिसांची नोंद सांगते.
१९९० मध्ये झालेले काश्मिरी पंडितांचे हे पहिले निष्कासन नव्हते, आजवर सात वेळा पंडितांना खोर्‍यातून पलायन करण्यास बाध्य केले गेलेले आहे. १९ जानेवारी १९९० ची रात्र तर पंडित बांधव अजूनही विसरलेले नाहीत. ती काळरात्र आठवली की, त्यांच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहात नाही! त्या रात्री काश्मिरातील मशिदींच्या भोग्यांमधून आझादीच्या घोषणा दिल्या जात होत्या आणि पंडितांच्या घराबाहेर पत्रके चिकटवली जात होती. त्यावरील संदेश स्पष्ट होता- ‘‘काश्मीरमध्ये वास्तव्य करायचे असेल, तर ‘अल्लाहो अकबर’ म्हणावे लागेल. आम्हाला काश्मिरी महिलांसह त्यांच्या पुरुषांशिवाय पाकिस्तान हवे आहे. येथे मोहम्मद पैगंबराच्या नीतीनुसार राज्यकारभार चालेल. इस्लाम आमचे ध्येय आहे, कुराण आमचे संविधान आहे आणि जिहाद हा आमचा मार्ग आहे.’’ याशिवायही अनेक आक्षेपार्ह बाबी त्या पत्रकात लिहिल्या होत्या. आपली मायभूमी, राहती घरे सोडल्याशिवाय आपला जीव वाचणे शक्य नाही, याची कल्पना भयभीत झालेल्या पंडितांच्या परिवारांना आलेली होती. टिकालाल टप्पू आणि इतर लोकांच्या झालेल्या हत्यांमुळे पंडितांवर आधीच आघात झालेले होते. या धर्मांध लोकांपुढे आपला टिकाव लागणे अशक्य आहे, हे ओळखून १९ जानेवारी १९९० ला एक लाख ६० हजार काश्मिरींनी आपलं घरदार सोडून पलायन केले. त्यानंतरही खोर्‍यातील सुमारे सात लाख काश्मिरी पंडित विस्थापित झाले. आज केवळ ४ ते ५ हजार कुटुंबं काश्मीर खोर्‍यात जीव मुठीत घेऊन जगत आहेत. राज्यात मेहबुबा मुफ्ती यांचे सरकार आल्यानंतर पुनर्वसनासाठी नव्याने प्रयत्न सुरू झाले. पण, काश्मिरी पंडित ना सध्याच्या, ना पूर्वीच्या सरकारवर विसंबून राहू शकत. जोवर सुरक्षिततेची पूर्ण खात्री पटणार नाही, तोवर ही मंडळी परतणार नाहीत. आजवर सुमारे ६० हजारावर परिवारांनी खोर्‍यातील आपल्या मूळ गावी परतण्याची तयारी दर्शविली आहे. पण, हे सारे करताना सरकारला त्यांच्या निवासाची, त्यांच्या रोजगाराची आणि सुरक्षेचीदेखील ग्वाही द्यावी लागणार आहे. बुरहान वाणीच्या हत्येनंतर खोर्‍यात जो हिंसाचार आणि दगडफेकीचे प्रकार झाले, त्यामुळे तब्बल ५ महिने काश्मीर खोरे धगधगत होते. दरम्यानच्या काळात सुमारे २६ शाळा विघटनवाद्यांनी जाळून टाकल्या. आझादीच्या मागणीसाठी कुठल्याही थराला जाण्याची येथील मानसिकता झालेली आहे. या सार्‍या घटनांच्या धसक्याने आणखी काही पंडितांच्या परिवारांनी पलायनाचा मार्ग स्वीकारला. केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर विघटनवाद्यांजवळील गंगाजळी आटली. पैशांच्या स्रोतांवर घाला घातल्यामुळे हिंसक कारवायांमध्ये घट झाली. त्याचप्रमाणे विघटनवादी नेते, जे आंदोलनकर्त्यांना पैसा पुरवायचे, त्यांना अटक करण्यात आल्याने आंदोलनाची हवाच निघून गेली! दगडफेकीचे प्रकार थांबल्याने खोरे पुन्हा शांततेच्या दिशने मार्गक्रमण करू लागले आहे. पण, काश्मिरी पंडितांनी पुन्हा येऊन खोर्‍यात वसावे, काश्मिरी पंडितांच्या झालेल्या सामूहिक हत्याकांडासाठी जबाबदार असलेले कायद्याच्या कक्षेत यावेत, अशा वातावरणाची निर्मिती व्हावयास अजून बराच कालावधी आहे. तसे वातावरण केव्हा निर्माण होते, याचीच काश्मिरी पंडितांना वाट आहे. आपल्या गतवैभवासाठीचा शांततायुक्त मार्गाने जाणारा त्यांचा लढा सुरू आहे…
– चारुदत्त कहू/ ९९२२९४६७७४