गणेशविद्या

0
269

गणेशविद्या आत्मसात झाली की कोणतीही विद्या आणि कला शिकणं सोपं. म्हणून विद्यारंभ करताना श्रीगणेशाय नमः लिहिण्याची परंपरा आहे. ब्राह्मी लिपीत लिहिला जाणारा ॐकार हा गणपतीच्या अधिक जवळ जाणारा आहे हे नक्की!
धुंधुरक्या प्रकाशात डोळे किलकिले होत आणि रात्री कोसळकोसळ कोसळून विसावलेल्या पावसाच्या ओलसर धापा कानी पडत. अंगणात फुललेल्या जाई-जुई-चमेली-सायली एकमेकांच्या सुरात सूर मिसळावा तशा दरवळत. पारिजातकाच्या झाडाखाली पसरलेल्या हरळीवरची फुलं वेचणारी आई, दूर्वा खुडणारी काकू, पत्री गोळा करणारी मृणालआत्या त्या फुलांतल्याच एक झाल्यागत वाटत. बाबा, अरूकाका, चारूदादा, अण्णा ही सारी मंडळी मखर सजवटीवर शेवटचा हात फिरवत असत. स्वयंपाकघरातून बाहेर पडणार्‍या, हरतालिकेसाठी शिजणार्‍या सुवासिक तांदळाच्या घमघमाटी सुगंधासोबत आजीचा सोवळ्यातला दरारा सर्वदूर पसरलेला असे आणि या सगळ्यानंतर आजोबांच्या धीरगंभीर आवाजात अथर्वशीर्षाची आवर्तनं ऐकू येत.
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं॥ अनुस्वार: परतर:॥ अर्धेन्दुलसितं॥ तारेण ऋद्धं॥ एतत्तवमनुस्वरूपं॥
गकार: पूर्व रूपं अकारो मध्यरूपं| अनुस्वारश्‍चान्त्य रूपं॥ बिन्दुरूत्तर रूपं॥ नाद: संधानं॥ संहिता संधि: सैषा गणेश विद्या॥
(प्रथम ध्वनिगणांचा उच्चार करून, नंतर (त्याच क्रमाने) वर्ण म्हणजे तेच ध्वनी रंगाने लिहून काढावेत. त्यानंतर त्या वर्णातून (मंत्ररूपासाठी) शेवटी अनुस्वार काढावा. वर्णांचे अवयव अर्धचंद्राकृती किंवा अर्धचंद्रयुक्त असावे, त्यांचा उच्चार तार स्वरात म्हणजे मोठ्याने करावा, ॐकारातून वाढत जाणारं हे तुझं मूर्तस्वरूप आहे. त्याचे आद्यरूप गकार= व्यंजनांश, मध्यमरूप अकार दर्शवणारा दंड= स्वरांश आणि अंतिम अवयवबिन्दुरूप अनुस्वार असावा. या सर्वांना एकत्रित करून त्यांचा संयुक्त उच्चार करावा हीच ती गणेशविद्या)
नंतर कधीतरी दसर्‍याच्या दिवशी मिनूवर विद्यारंभ संस्कार करताना आईनं तिच्याकडून सरस्वती नामोस्तुभ्यं श्‍लोक म्हणवून घेतला आणि तिच्या हाताला धरून धूळपाटीवर लिहवून घेतलं श्री गणेशाय नमः. तेव्हा मला ते चीटिंग आवडलं नव्हतं. म्हणजे प्रार्थना सरस्वतीला करायची आणि पाटीवर नाव मात्र लिहायचं गणपतीचं. मी त्या वेळी स्ट्रॉंगच ऑब्जेक्शन घेतलं होतं. तेव्हा आजोबा हसून म्हणाले होते, तू मोठी हो आणि त्या वेळी मी असेन तर नक्की समजावून सांगेन तुला की प्रार्थना सरस्वतीला आणि लिहिताना गणपतीचं नाव का लिहायचं ते.
मोठी म्हणजे किती मोठी हे काही सांगितलं नव्हतं त्यांनी. कसं कोणजाणे पण मला आता बर्‍यापैकी अक्कल आली आहे, अशी त्यांची खात्री पटल्यावर त्यांनी त्यांची पोतडी उघडली. माझ्या हाती त्यांच्या हस्ताक्षरातले काही सुटे कागद ठेवले आणि म्हणाले, हे माझ्या आवडत्या लिपी आणि भाषाशास्त्रज्ञाचं संशोधन आहे. लक्ष्मण श्रीधर वाकणकर. हे वाच, मग तुला कळेल की आपले पूर्वज भाषाशास्त्र या विषयात किती प्रगत होतो ते.
गणेश-विद्या : ध्वन्यात्मक लेखनाची भारतीय परंपरा- ल. श्री. वाकणकर. असं त्याचं शीर्षक होतं.
भारतीय ज्ञानपरंपरेनुसार या विश्‍वाची निर्मिती ॐकारातून म्हणजेच नादब्रह्मातून झाली. प्राणिसृष्टीत आवाजाचा वापर करूनच संदेशांची देवाणघेवाण होत असते. जसं कुत्रा भुंकतो, हत्ती चीत्कारतो, वाघ डरकाळतो, तर पक्षी किलबिलतात. माणूसही त्याला अपवाद नव्हता. पण, त्यानं स्वतःची अशी विशिष्ट पद्धत विकसित केली. स्वरयंत्र, तालू, जीभ, दात, ओठ इत्यादी तोंडातले आणि नाक हे अवयव वापरून वेगवेगळे आवाज काढणे आणि त्या आवाजांची वेगवेगळी क्रमवारी लावून एका क्रमाला एक अर्थ असं देत शब्द तयार झालेत. उदाहरण- कंठातून निघणारा क, ओठांवर ओठ दाबून निघणारा म आणि जिभ टाळूला लावून निघणारा ळ हे तीन आवाज या क्रमानं आले की तयार होतो कमळ शब्द आणि त्याचा अर्थ= पाण्यात उगवणारी कंदवर्गीय वनस्पती व त्या वनस्पतीचं फूल. असे असंख्य शब्द तयार झालेत आणि या शब्दांना एकापाठोपाठ एक लावून एक वाक्य तयार झाले. अशी असंख्य वाक्यं तयार झालीत. त्यालाच भाषा असं म्हणतात. भाषा आधी बोलल्या गेली, पण बोललेलं हवेत विरून जातं हेही सत्य उमगलं. आधीच्या पिढीच्या स्मृतीत साठवलेले माहितीचे तुकडे याच भाषेचा वापर करून पुढल्या पिढीकडे सोपवले जायचे.
माणसाला जसं जसं हे जग कळू लागलं पिढ्यान्‌पिढ्या जपलेला माहितीचा साठा फुगू लागला, तसं तसं मेंदूचं, बुद्धीचं आणि स्मृतीचं कामही वाढू लागलं. माहिती जपून ठेवण्यासाठी मेंदू अपुरा पडू लागला इतक्या प्रमाणात माहिती गोळा झाली, ती हरवून जाऊ नये म्हणून काहीतरी बाह्य साधन असावं अशी गरज भासू लागली. मग चित्र काढणं सुरू झालं आणि त्यातूनच लेखनकलेचाही जन्म झाला. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं, तर जो आवाज तोंडाच्या पोकळीतून बाहेर पडतो त्या प्रत्येक आवाजाला एक चिन्ह ठरवण्यात आलं. म्हणजे क हा ध्वनी ब्राह्मीत + असा, तर रोमन मध्ये घ असा लिहिला जातो. आधुनिक भाषाशास्त्री याच प्रक्रियेला ध्वनिलेखन म्हणजे फोनोलॉजी असं म्हणतात. लिपी विकसित होण्याची ही पहिली पायरी होती. माहिती, विचार, चिंतन, ज्ञान या सगळ्या अमूर्त गोष्टींना लिखित स्वरूपात म्हणजेच मूर्त रूपात आणणारी आणि ते सारं पुढच्या पिढीला सोपवणं सोपं करणारी ही लेखनकला.
ऋग्वेदात चौसष्ट अक्षरं असल्याचे उल्लेख आहेत आणि एक कथाही प्रसिद्ध आहे. चिदंबरम्‌च्या मंदिरात आनंद-तांडव करणार्‍या नटराजाच्या डमरूतून बाहेर पडलेली चौदा सूत्रं व्याकरणकार पाणिनीला ऐकू आलीत. त्यानं त्यांना दिलं माहेश्‍वर सूत्र. भारतीय लिखाणाची संपूर्ण परंपरा याच माहेश्‍वर सूत्रांवर आधारित आहे. तोंडाच्या पोकळीत असलेले अवयव आणि त्यांचा वापर करून होणार्‍या उच्चारांनुसार कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दन्त्य, ओष्ट्य अशी व्यंजनांची वर्गवारी म्हणजे गण असणारी वर्णमाला आणि स्वरांना काना, वेलांटी किंवा मात्रांच्या रूपात दाखवणं, अनुस्वारासाठी बिंदू या वैशिष्ट्यांसह ते वर्ण अर्धचंद्रांच्या मेळातून रेखणं हे सारं ज्या लेखनपरंपरेत आहे अशी माहेश्‍वर सूत्रांना मूर्त रूप देणारी गणेशविद्या. शिवस्वरूप अव्यक्त अमूर्तज्ञान, व्यक्त मूर्तस्वरूपात प्रस्तुत करणारी लेखनप्रक्रिया म्हणजे गणेशविद्या. गणपती हा लिखित संवादाचा अधिष्ठाता आहे. शंकर आणि गणपतीचा मूळ संबंध हा आहे. असा एकूण त्यांच्या लेखनाचा गोषवारा होता.
गणादिं पूर्वमुच्चार्य या पदात ही सारी प्रक्रियाच नमूद केली आहे. गण म्हणजे वर्ग, प्रकार= कॅटेगरी. पंचज्ञानेन्द्रियांच्या मदतीनं जे जे काही आपल्याला माहीत होतं आणि आपला मेंदू त्याचं आकलन करतो ते ते सारं या गण म्हणजे विविध प्रकारांच्या माध्यमातून होत असतं. ते व्यक्त करण्यासाठीही गणांचाच वापर होतो. हे गण व्यंजनांचे असतात.
एकुणात, ही गणेशविद्या आत्मसात झाली की कोणतीही विद्या आणि कला शिकणं सोपं. म्हणून विद्यारंभ करताना श्रीगणेशाय नमः लिहिण्याची परंपरा आहे. ब्राह्मी लिपीत लिहिला जाणारा ॐकार हा गणपतीच्या अधिक जवळ जाणारा आहे हे नक्की! गणेशविद्येचा हा अधिपती या वर्षीही आपल्या सगळ्यांवर प्रसन्न होवो, हीच प्रार्थना!
– डॉ. रमा गोळवलकर
९४२२११४६२०