ध्येयसमर्पित उषाताई

0
115

वं. उषाताई चाटी एक समर्पित, सरळ, सौम्य, सात्त्विक, सहनशील, सहिष्णू, सोशीक व्यक्तित्व! ९१ वर्षांचं कृतार्थ जीवन जगून दिनांक १७-८-२०१७ ला पक्व फळ झाडा-देठापासून सहज विलग व्हावं तसाच कृतार्थ जीवात्मा देहापासून वेगळा झाला- नव्या जोमानं पुन्हा भारतमातेच्या चरणी अर्पण होण्यासाठी…

देणं ईश्‍वराचं
परमेश्वरानं सुंदर गव्हाळ रंग-रूप, कुरळे केस आणि मधुर, पण तरीही खणखणीत पहाडी आवाज, असं सारं उत्तमोत्तम देणं मुक्तहस्तानं दिलं होतं. प्रसन्नता, माधुर्य, आत्मीयता ही जणू त्यांच्या रोमारोमांतून ओसंडत होती. त्यांच्याकडे बघणार्‍याला त्यांचं हसू केव्हा त्याला आपलंसं करी, हे कळतही नसे. व्यथा घेऊन येणाराही परत जाताना हसतमुखानं जाई. एक सामान्य सेविका म्हणून आणि नंतर स्वाभाविकपणे उत्तरोत्तर येत गेलेल्या दायित्वानंतरही त्यांच्या वागण्यात तसूभरही अंतर पडलं नाही. त्या घरी आल्या तरीही कोणी अधिकारी व्यक्ती आली अशा दडपणापेक्षा आपली मावशी-आत्या असंच कुणीतरी मायेचं घरी आल्यासारखं वाटत असे. त्यांचा जन्म भंडार्‍याचा. वैनगंगेच्या तीरावरचा. वं. मावशींना मातृतुल्य अशा नानी कोलते यांच्या अंगणात-वाड्यात बाबासाहेब व नानी यांच्या पुढाकारानं समिती शाखा सुरू झाली अन् नानींच्या तालमीत वयाच्या १२ व्या वर्षापासून उषाताईंचं व्यक्तित्व आकार घेऊ लागलं. सामाजिक बांधिलकी, संघटनेचे संस्कार होऊ लागले.
घर असावे घरासारखे
त्या काळानुसार लौकरच त्यांचा विवाह श्री. बाबाजी चाटी यांच्याशी झाला आणि उषा फणसे सौ. सुलभा गुणवंत चाटी झाली. त्यांच्या स्वभावानुकूल नाव त्यांना दिलं गेलं. आपल्या नावाप्रमाणेच त्या ‘सुलभा’ होत्या. कुणालाही त्या सहजसुलभतेनं भेटत. त्यांच्याशी भेटताना त्यांच्या मोठेपणाचं दडपण कधीही कोणावर आलं नाही. आपल्या मनातल्या, आतल्या कप्प्यातील गोष्टीसुद्धा त्यांच्याशी सहजच बोलल्या जात. चाटी कुटुंबही त्या वेळी भंडारा येथेच होतं. कालांतरानं चाटी कुटुंब नागपुरात स्थायिक झालं. बाबाजींना डी.ए.जी.पी.टी.त नोकरी होती. नागपूरचे ते घोषप्रमुख होते. त्यांचा संपर्क खूप व्यापक होता अन् घराघरांतून प्रेमाचे संबंध होते. समितीच्या घोषाकडेही त्यांचं लक्ष असे. मुलींनी शंखवादन करायचं नाही, यावर ते ठाम होते.
मोठी काकू
बाबा आणि उषाताई दोघांनीही स्वत:च्या घराव्यतिरिक्त असंख्य परिवार जोडले अन् आपला स्वत:चाही परिवार एकसंध ठेवला. सासरमाहेर दोन्हीकडची मुलं शिकायला त्यांच्याजवळ होती. जातं किंवा चाक-आसाभोवती फिरतं- त्याकरता ‘आस’ स्थिर असावा लागतो. या परिवारातले बाबा आणि मोठी काकू (त्यांचा पुतण्या उदय त्यांना मोठी काकू म्हणायला लागला अन् संपूर्ण हनुमाननगरच्याच त्या मोठी काकू झाल्या) हे ‘आस’ होते. १९८२ साली बाबांच्या निधनानंतरही उषाताई त्या घराचा मजबूत आधार होत्या. आपल्या भाचे-पुतण्यांनाच त्यांनी आपलं मानलं. त्यांच्यावर मायेचा वर्षाव केला. घरकाम-अध्यापन अन् समिती कार्य या तिहेरी धाग्यांनी त्यांचा जीवनगोफ विणला जात होता. गोळाभात, थालीपीठ हे या घराचे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ. १९८८ च्या आसपास मा. मोरोपंत उषाताईंना म्हणाले, ‘‘वहिनी, एकदा आमच्या आचार्‍याला ‘गोळाभात’ कसा करायचा ते शिकवा हो.’’ मा. मोहनजी भागवतांनीही त्यांच्या ‘गोळाभाता’ची आवर्जून आठवण केली. मला वाटतं एवढंच पुरेसं आहे.
परस्परपूरकता
त्यांचं दाम्पत्य जीवन हे परस्परपूरक होतं. दोघंही हिंदू राष्ट्र संघटित व्हावं, या एकाच वेडानं  झपाटलेले. बाबाजी म्हणत, मी संघाचा स्वयंसेवक आहे, पण समितीचा संपर्कप्रमुखही आहे. जसं यांना कुठे कुठे गाठीभेटींकरता घेऊन जातो. वं. मावशींच्या रामायण प्रवचनाचं मोठ्या पूलवर ऑडिओ रेकॉर्डिंग केलं ते त्यांनीच. त्यामुळेच वं. मावशींच्या प्रवचनांना पुस्तकरूप प्राप्त झालं. त्याकरता ते पूर्णवेळ तिथे थांबत असत. दोघांपैकी एकानंच काम करावं, अशी त्या उभयतांची संकल्पना नव्हती. परस्परांच्या कार्याला छेद न जाऊ देता दोघंही कार्य करीत राहिले. उषाताई उन्हाळ्याच्या सुट्टीत पूर्णवेळ वर्गावर जात असत.
 हनुमाननगरचं वास्तव्य
नागपूरला राहायला आल्यावर हा परिवार महालात राहात असे. पुढे त्या हनुमाननगरला राहायला गेल्यावर त्यांनी तिथे  दैनिक शाखा सुरू केली. इतर सर्व कार्यक्रमांबरोबरच हनुमानगरात मोठ्या प्रमाणात वैदर्भीय वैशिष्ट्य असणारी भराडीगौर व्हायची. त्याकरता त्यांनी एकदोन गीतंही केली होती. त्यातील एक म्हणजे- आली बाई श्रावणमासात| गौर भराडी थाटात|   दासनवमीच्या वेळी नऊ दिवस प्रभातफेरी निघायची. कालिदासकाका पातुरकर अन् उषाताई असे आळीपाळीनं दणदणीत आवाजात मनाचे श्‍लोक सांगत. खेळाच्या विविध स्पर्धांचे आयोजन, मुलांकरता संस्कारवर्ग, प्रबुद्ध महिलांकरता अभ्यासमंडळ, त्याच्यावतीनं शारदा नावाचं एक हस्तलिखितही काढत असत. तिथल्या गृहिणी समाजातही त्यांचा सहभाग होता.
हिंदू मुलींच्या शाळेतील पर्व
विवाहोत्तर त्यांनी एक वर्ष भारत महिला व नंतर हिंदू मुलींच्या शाळेत अध्यापनाचं काम केलं. त्या बी. ए., बी. टी. होत्या. शिक्षिका कक्षात होणार्‍या चर्चेतही त्या कधी म्हणत, अगं, असं काहीबाही बोलण्यापेक्षा प्रत्येकीत असलेले चांगले गुण लक्षात घ्या, आठवा.
१२ ऑगस्ट १७ ला शाळेत निरोप दिला की, शिक्षिकांनी एकदा भेटून जावं. त्या दिवशी तब्येत नरमगरमच होती. सकाळपासून त्या डोळेही उघडत नव्हत्या. पण, शाळेतील शिक्षिका आल्या तशी त्यांची कळी खुलली. (पान २ वर)४आणिबाणीत सत्याग्रह
१९७६ साली आणिबाणीच्या विरोधात अनेक सत्याग्रह झाले. अशाच एका तुकडीत उषाताई सहभागी झाल्या. बाबाजी आधीच मिसाबंदी झाले होते. या सत्याग्रहाचा नोकरीवरही परिणाम होऊ शकणार होता. पण, दृढनिश्‍चयानं त्या सत्याग्रहात गेल्या. त्या तिथे आल्यानंतर सर्वांचे सूर संवादी झाले, असं महिलांच्या चर्चेत येई. उषाताईंची तुकडी मुक्त होणार, अशी बातमी आली. त्याला थोडा अवकाश होता. दुसर्‍या दिवशी उखाणे घेण्याची टूम निघाली त्या वेळी उषाताईंनी- ‘‘घरी जायचंय म्हणून मन झालंय उदास,
कारण इतके दिवस जेलमध्ये गुणवंतराव होते जवळपास.’’
असा उखाणा घेतला. मिसाबंदीच्या घरी त्यांच्या नियमित भेटीगाठी चालत.

संगीत कळा मज दे रे राम
उषाताई लौकिकार्थानं गाणं शिकल्या नव्हत्या. पण कोणतंही गीत उचलून धरणं, चाल लावणं, कुणाचाही स्वर ठीक करणं त्यांना सहज शक्य होई. समर्थांनी म्हटल्याप्रमाणं ते ‘देणं ईश्‍वराचं’ होतं. ‘वंदे मातरम्’ची चाल सेविकांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपर्‍यात पोचवणं, याचं श्रेय त्यांचंच आहे.  संगीततज्ज्ञ राजाभाऊ कोगजे यांच्याकडून त्या काही गाणी शिकल्या-
‘घे राधे मुखावरी शेला, गडे चतुर्भुज हरी झाला,’ हे त्यापैकी एक. आकाशवाणीवरही त्यांनी काही गीतं गायलीत. वं. मावशी गेल्यानंतर उषाताई लिमये लिखित गीतलक्ष्मीचा कार्यक्रम शाम देशपांडे व काही सेविका यांच्यासह देवी अहल्या मंदिरात केला. त्यातील-
‘राखेतून पक्षिण उठली अन् भिडली आकाशाला’ 
या त्यांच्या गीतानं सार्‍यांच्या डोळ्याला धारा लागल्या. अहल्या मंदिरचा कोपरा न् कोपरा त्यांच्या स्वरानं निनादित आहे. सुखदु:खाची सारी गाणी त्यांनी या वास्तूत गायली. यमूताई, वं. मावशींची श्रद्धाजंली गीतं तर ताईंच्या अमृतमहोत्सवाचं ‘स्पर्श चंदनाचा ताई आज अम्हां द्यावा’… हे ही गीत त्यांनी गायलं. अहल्या मंदिरचा कर्मचारी गोपाळच्या मुलीच्या लग्नात त्यांनी विहिण म्हटली. १३-१०-२०१६ ला गाडीचालक विठ्‌ठलच्या बायकोच्या- राधाच्या- डोहाळजेवणात डोहाळे म्हटले. गाण्याची चाल शिकवायला त्या सदैव तत्पर असत.

समिती असे माझी अन् मी तिची
उषाताईंचे समितीचे शारीरिक प्रशिक्षण नागपूरलाच झाले. वर्गावर मिळणार्‍या ओल्या हरबर्‍याचा नाश्ता. भिडे कन्या शाळेतून बाकं (डेस्क) किंवा तख्तपोस नेऊन नॉर्मल स्कूलच्या मैदानावर नेऊन उभा केलेला मंच, सिंध तसेच कश्मीर प्रांतातून आलेल्या सेविका, त्यांची मानसिकता, श्रद्धा, निष्ठा याबाबत त्या सांगत.
विदर्भात त्यांचा सघन प्रवास होत असे. १९७७ ला वं. मावशींनी वेगवेगळ्या भारतीय अधिकार्‍यांना एकेका प्रांताचं पालक अधिकारी म्हणून दायित्व सोपवलं. त्यात उषाताईंकडे पूर्व व पश्‍चिम दोन्ही उत्तरप्रदेशाचं दायित्व आलं. पूर्वी व पश्चिमी उत्तरप्रदेश हे दोन्ही ६० ते ६५ जिल्हे असलेले प्रांत. त्या काळी उत्तराखंड वगैरे वेगळे नव्हते. उन्हाळ्याची पूर्ण सुट्‌टी, दिवाळीच्या सुट्‌ट्या या इथल्या प्रवासाकरता राखून ठेवत असत. पूर्वी उ.प्रदेशमध्ये रेखाताई आणि पश्चिमी उ.प्रदेशात डॉ. शरद रेणु अशा दोघी काम करायला तयार झाल्या- पूर्णवेळ काम करू लागल्या. वर्गापूर्वी प्रवास- बैठकी- नंतर अनुवर्ती प्रवास असं चाले. उ.प्र.चे काम कठीण, महिलांनी बाहेर पडावं अशी संकल्पनाच नाही. अशा भागात नऊवारी नेसणार्‍या उषाताई व प्रमिलताईंनी या भागात एक मोठी क्रांतीच घडवली, असं म्हटलं पाहिजे. कालांतरानं त्या सहप्रमुख संचालिका झाल्यानंतर उत्तरप्रदेशऐवजी संपूर्ण भारतवर्षच भ्रमणाचं क्षेत्र झालं.
नवीन कार्यांना त्यांचा नेहमीच सकारात्मक पाठिंबा असे. एखादी व्यक्ती आली नाही, तर तर ती आली नाही असा विचार, राग-नाराजी त्यांच्या मनात नसे, तर तिच्याकडे काय अडचण आली असेल म्हणून ती येऊ शकली नाही, असाच विचार त्या करीत. (कधीकधी त्यांच्या या मवाळपणाचा त्रास होई) पण, याचा अर्थ असाही नव्हता की, त्या व्यक्तीच्या उणिवा त्यांना माहीत नव्हत्या. प्रसंगाप्रसंगात त्या त्याची जाणही तिला देत असत. पण, व्यक्ती सांभाळून घेणं, ती तुटू न देणं महत्त्वाचं. त्याकरता स्वत:ला कितीही झीज सोसावी लागली तरी त्या सोसत.
त्यांच्या कार्यकाळात जिजामाताच्या ४०१ व्या पुण्यतिथीनिमित्त झालेला डाकतिकीट लोकार्पण कार्यक्रम, ३ मे २००२ ला गुजरात येथील भूकंपानंतर ‘मयापुर’ या गावातील ८१ घरांचं नवनिर्माण, लोकार्पण अशा अनेक गोष्टी झाल्या. ६ जानेवारी १९९१ ला अयोध्येला महिलांनी एक मोठा सत्याग्रह केला. वि. हिं. प.च्या वतीनं  विजयाराजे शिंदे, दुर्गावाहिनीच्या वतीनं साध्वी ॠतंभराजी व समितीच्या वतीनं वं. उषाताईंनी नेतृत्व केलं. तालिबाननं अनेक बुद्ध मूर्ती उद्ध्वस्त केल्या त्या वेळी त्याच्या निषेधार्थ दीक्षाभूमीवर बुद्धमूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन करून एक मौन मानवी शृंखला समितीनं आयोजित केली. वं. उषाताई त्या शृखंलेत उभ्या होत्या.

सहज बोलणे हितोपदेश
त्यांचं बौद्धिकही सरळ, साधं, मनाला भिडणारं. बोलत असे तो त्यांचा अनुभव. एकदा सुफला म्हणाली, ‘‘शारीरिकबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, त्याच्यामुळे मनगटात बळ येतं. कोणत्याही परिस्थितीला न डगमगता आपण सामोरं जाऊ शकतो. छोट्या मुली म्हणून त्यांनी उदाहरण दिलं की, घरी अचानक जास्त पाहुणे आले तरी गडबडायला होत नाही.’’ त्यांच्या बोलण्याचं मला प्रत्यंतर आलं. ती म्हणाली त्या वयात ते उमगलं नाही. पण, लग्नानंतर त्याची प्रचीती येत गेली. पाहुणे येताच अन्य गृहिणींची होणारी त्रेधातिरपिट आणि माझं परिस्थितिनुसार निर्णय घेऊन सहज वागणं, हे अन्यांना जाणवायचं. असं झालं की, उषाताईंच्या या वक्तव्याची आठवण येई. सहज बोलणे- हितोपदेश, असं त्यांचं सांगणं.
 देवी अहल्या मंदिरात वास्तव्य
१९८४-८५ साली वं. ताईंनी उषाताईंच्या सासूबाई ताई चाटींजवळ, उषाताईंनी देवी अहल्या मंदिरात यावं, असा विषय मांडला. घर सोडणं हे स्त्रीकरता अत्यंत अवघड. छोट्या छोट्या वस्तूही तिनं अगत्यानं अन् परिश्रमानं जमवल्या असतात. त्या सोडणं हे अतिशय दुर्धर, पण उषाताईंनी ते फार सहजतेनं केलं. उषाताई राहायला आल्या त्या काळात त्या देवी अहल्याबाई स्मारक समितीच्या कार्यवाहिका होत्या. त्याच वर्षी नुकतंच छात्रावास सुरू केलं होतं. (जुलै १९८१ पासून मी देवी अहल्या मंदिरात राहात होते.) एकदोन आठवडे गेले असतील, उषाताईंनी मला सांगितलं, ‘‘चित्रा, शाळेत जाण्यापूर्वी किंवा आल्यानंतर मी … ही ही कामं करू शकेन. तू या कामांची चिंता करू नकोस.’’ दिवाळीच्या वेळी मुलींना अहेरीला सोडायला जाणं असो वा गरज पडली तर धान्य आणणं असो, कोणतंही काम करायची त्यांची तयारी असे.
१९८२ मध्ये बाबाजींचं आकस्मिक निधन, हा चाटी कुटुंबीयांकरता नव्हे, हनुमाननगर नव्हे, नागपूरलाच जबरदस्त हादरा होता. उषाताईंना शाळा सुटल्यावर ते मोटरससायकलने घरी घेऊन आले. संपर्काकरता जाऊन आले. राजाभाऊंना (धाकट्या भावाला) ‘बुलेट’नं पोचवायला जायचं तर ‘बुलेट’ चालू होईना, मग घरात आले, झोपले. रात्री अस्वस्थ वाटायला लागलं. गरम पाणी, ओवा देऊन झालं. नंतर जवळच असलेल्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला नेलं. तिथे गेल्यावर खेळ संपला. स्वत:च्या पायानं चालत गेलेली व्यक्ती ‘आता जगात नाही’ हे पचायला किती कठीण. पण, ते पचवत त्या ताईंचा विचार करू लागल्या. ताईंना हा धक्का सहन होणार नाही म्हणून त्या त्यांच्या मनाची तयारी करत राहिल्या. उपचार सुरू आहेत, बाकी सर्व तिथे आहेत म्हणून मला घरी पाठवलं इत्यादी. पण, पार्थिव घरी येण्याच्या काही काळ आधी ‘‘ताई, आपल्या प्रयत्नांना यश आलं नाही,’’ असं क्रमाक्रमानं सांगत राहिल्या. भेटायला येणार्‍यांनाही त्या आधी ताईंशी बोला, असं आवर्जून सांगत. पुत्रवियोगाचं दु:ख मोठं आहे, असा त्यांचा भाव होता. त्या चारपाच दिवसांच्या काळातच रेखाताई राजेचे वडील गेल्याचा निरोप आला. उषाताईंनी लगेच तिला पत्र लिहिलं. ताईची मानसिकता मी समजू शकते. आज मीही त्याच दु:खातून जाते आहे.
 परिवर्तन
दिनांक २२ जुलै २००६ ला सकाळी बरोबर ८.३० ला ध्वजारोहण झालं. प्रार्थनेनंतर सहजतेनं वं. उषाताईंनी आपलं हृद्गत प्रकट केलं- वं. ताईंनी  माझ्यावर प्रमुख संचालिकापदाचं दायित्व सोपवलं. यथाशक्ती यथामती मी कार्य केलं आणि आज एका तपानं हा पदभार मा. प्रमिलताई मेढेंना सोपवीत आहे. आज मी त्यांना मा. प्रमिलताई नव्हे, वं. प्रमिलताई म्हणते. त्यांनी आपलं दायित्व योग्य व्यक्तीच्या हाती सोपवून एक सेविका म्हणून दिनक्रम सुरू होता. या वर्षी गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी त्यांना गुरुपूजनाला खाली येववलं नाही. पण, दिनांक २४ ला एन. सी. आय. ला जाण्यापूर्वी त्यांनी प्रभात शाखेत गुरुपूजन करून, दक्षिणा समर्पण केली.
अहंकार चित्ती कर्तृत्व नाही जे
शेवटपर्यंत त्यांचं स्मरण कायम होतं. एक दिवस ‘देहाची समई’ म्हणत असताना एक ओळ आठवेना. लगेच त्यांनी सांगितलं ‘अहंकार चित्ती कर्तृत्व नाही जे, झाडिली पाहिजे काजळी ते’ त्यांच्या तोंडून जणू त्यांची स्वभावठेवणच व्यक्त झाली. अहंकाराचा वारा न लागो माझिया राजसा- अशाच त्या होत्या. अहंकाराचा स्पर्शच त्या जिवाला नव्हता- होतं ते फक्त समर्पण. उषाताईंचा जन्म गणेशचतुर्थीचा. तो गणनायक आहे. तसेच त्यांचेही नेतृत्व कुशल होते आणि त्याला मातृत्वाचे अस्तर होते. खर्‍या अर्थानं त्या जीवनव्रती होत्या. घरप्रपंच करतानाही आपण व्रतस्थ होऊ शकतो, हा आदर्श त्यांनी आपल्यासमोर ठेवला. त्यांच्यासारखंच स्वीकृत कार्याकरता ‘स्वधर्मे स्वमार्गे परं श्रद्धया’ चालत राहणं, हीच त्यांना उचित श्रद्धांजली!
– चित्रा जोशी / अ. भा. सहकार्यवाहिका, रा. से. समिती