उत्तर कोरियाची हायड्रोजन बॉम्ब चाचणी यशस्वी

0
206

•६.३ तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा •अमेरिकेसह अनेक देशांकडून टीका
सेऊल, ३ सप्टेंबर
अमेरिका आणि अन्य महासत्तांना न जुमानता उत्तर कोरियाने आज रविवारी अणुबॉम्बची सहावी यशस्वी चाचणी केली. विशेष म्हणजे, आज या देशाने ज्या बॉम्बची चाचणी केली तो चक्क हायड्रोजन बॉम्ब होता. या अतिशय शक्तिशाली बॉम्बच्या चाचणीमुळे ६.३ इतक्या तीव्रतेच्या भूकंपाच हादरे बसले आहेत.
उत्तर कोरियाने आतापर्यंत पाच अणुबॉम्बच्या चाचण्या केल्या आहेत. त्यानंतर आज सहावी चाचणी पार पाडली. या पाच चाचण्यांच्या तुलनेत आजच्या सहाव्या चाचणीची क्षमता दहा पट जास्त होती. अमेरिका आणि चीनसह अनेक देशांनी या चाचणीवर प्रखर टीका केली आहे.
अज्ञात ठिकाणी घेण्यात आलेल्या या चाचणीच्या काळात उत्तर कोरियन नेते किम जोंग उन स्वत: उपस्थित होते. अमेरिकेत दूरपर्यंत प्रचंड विध्वंस करण्यासाठी आमचा हा बॉम्ब सक्षम असल्याचा दावा किम जोंग यांनी यावेळी केला.
उत्तर कोरियाच्या या चाचणीनंतर ६.३ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला असल्याचे अमेरिकन भूगर्भशास्त्रज्ञ विभागाने म्हटले असले तरी सेऊल येथील अधिकार्‍यांनी हा धक्का ५.६ इतक्या तीव्रतेचा असल्याचा दावा केला आहे.
जपानकडूनही पुष्टी
उत्तर कोरियाने केलेल्या या हायड्रोजन बॉम्बच्या यशस्वी चाचणीची जपान सरकारनेही पुष्टी केली. जपानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री तारो कोनो यांनी सांगितले की, हवामान खाते आणि अन्य ठिकाणांहून आलेल्या माहितीनंतर उत्तर कोरियाने अणुचाचणी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
क्षेपणास्त्राने वाहून नेण्याची सोय
आज चाचणी करण्यात आलेल्या या बॉम्बची रचना नव्याने विकसित करण्यात आलेल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रावरून सहजपणे वाहून नेता येईल, अशाच पद्धतीने करण्यात आली आहे.
चाचणीच्या आधीच छायाचित्र जारी
दरम्यान, या चाचणीच्या काही तासांपूर्वीच उत्तर कोरियन नेते किम जोंग उन यांनी हायड्रोजन बॉम्बसोबतचे छायाचित्र शेअर केले होते. या छायाचित्रात काळा पोशाख परिधान केलेले किम जोंग उन हायड्रोजन बॉम्बचे परीक्षण करताना दिसत आहेत.
हायड्रोजन बॉम्ब म्हणजे काय?
हायड़्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्बपेक्षा अनेक पटीने संहारक असतो. अणुबॉम्बचा स्फोट घडविण्यासाठी अणुविखंडनाची प्रक्रिया वापरली जाते, तर हायड्रोजन बॉम्बमध्ये केंद्रकीय संमिलन (फ्युजन) प्रक्रियेद्वारे स्फोट घडवून आणला जातो. फ्युजनची प्रक्रिया अणुविखंडनापेक्षा किचकट असते. ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज असते. त्यामुळे हायड्रोजन बॉम्बमध्ये संमिलन घडविण्यासाठी अणुस्फोट केला जातो. त्यामुळे हा स्फोट झाल्यानंतर हायड्रोजनची समस्थानिके असलेल्या ड्युटेरियम, ट्रिटीयम यात शृंखला अभिक्रिया होऊन मोठ्या प्रमाणात ऊर्जा मुक्त होते. शीतयुद्धाच्या काळात १९५२ मध्ये अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती. त्यानंतर १९६१ मध्ये रशियाने या बॉम्बची चाचणी घेतली होती.