कल्पवृक्ष

0
47

नवे नायक…

आपली मुले मोठी व्हावीत, यशस्वी व्हावीत, असे सर्वच पालकांना वाटत असते. आपला देश जगात महाशक्ती व्हावा, असे स्वप्न आज आपण पाहतो. पण, आपल्या तरुणांसमोर कोणते आदर्श आहेत? कोणते ‘आयडॉल’ आहेत? राजकीय नेते, क्रिकेट प्लेअर्स, चित्रपट अभिनेते यापलीकडे आपली नजर जात नाही. आजचा आधुनिक भारत ज्यांनी घडविला, त्याकरिता कठोर परिश्रम केले, दूरदृष्टीने योजना केल्या, त्यांचे आदर्श जाणीवपूर्वक नव्या पिढीसमोर आणण्याची गरज आहे. ते कसे घडले, याचा अभ्यास पालक व शिक्षकांनीही केला पाहिजे. जेआरडी टाटा हे अशांपैकीच एक महत्त्वाचे नाव आहे.
त्यांच्या आईवडिलांनी त्यांना जाणीवपूर्वक घडविले. जेआरडींनी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला. आपल्याला मिळालेला वारसा काय आहे, याचे त्यांना भान होते. त्या लायक आपण झालो पाहिजे, हा त्यांना ध्यास होता. जमशेटजी टाटा जेआरडींचे आजोबा. भारतात औद्योगिक विकासाची पायाभरणी त्यांनीच केली. पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिश कंपन्यांना टक्कर देत त्यांनी पोलाद कारखाना सुरू केला. देशातीलच नव्हे, तर जगात अग्रगण्य असलेली बंगलोर येथील ‘ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ त्यांच्या प्रतिभेतूनच उभी झाली. या संस्थेविषयी जमशेटजी आपल्या मृत्युपत्रात लिहितात- ‘‘माझा हा देश जेव्हा स्वतंत्र होईल त्या वेळी त्याला विपूल प्रमाणात फार चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळालेले तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ लागतील. त्याशिवाय माझा हा देश उभा राहू शकणार नाही. मी या संस्थेला माझा तिसरा मुलगा मानतो. माझ्या स्थावर-जंगम संपत्तीचा तिसरा हिस्सा ही संस्था उभी करावयास खर्च करावा.’’ काय दूरदृष्टी आणि देशभक्ती होती त्यांची! आपल्या डोक्यात कार्य, देशभक्ती यांच्या व्याख्या ठरलेल्या असतात. त्यामुळे अशी उदाहरणे आपण कधी सांगत नाही. याही पुढे असलेली एक गोष्ट फारच थोड्यांना माहीत असेल. या संस्थेचे प्रमुख संचालक व्हावे म्हणून त्यांनी स्वामी विवेकानंदांना गळ घातली होती. २३ नोव्हेंबर १८९८ रोजी त्यांना पाठविलेल्या पत्रात जमशेटजी लिहितात, ‘‘आदरणीय स्वामीजी, जपान ते शिकागो या प्रवासात बोटीवर काही काळ आपल्या सहवासात राहण्याची सुसंधी मला मिळाली, हे आपल्याला कदाचित आठवत असेल. विज्ञान क्षेत्रात जागतिक दर्जाचे शिक्षण देणारी एक सुसज्ज संस्था मला बंगलोर येथे उभी करावयाची आहे. मात्र, तेथेच ‘मानवीय विज्ञानावर’ संशोधन करण्यात आपले आयुष्य वेचतील अशा आश्रमांची व निवासस्थानांची स्थापना केली जावी, असे मला वाटते. आपण याचे प्रमुख आचार्य हे पद स्वीकारले तर धर्म आणि विज्ञान या दोहोंचीही प्रगती होईल…’’ विवेकानंदांसारखा माणूस एखाद्या संस्थेत अडकणे शक्य नव्हते. पण, जमशेटजींच्या ‘धर्म व विज्ञान’ यासंबंधी विचारांची झेप आपल्या लक्षात येते, तेही स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षेआधी! हाच वारसा जेआरडींनी पुढे चालवला. ‘‘मला टाटांच्या लायकीचे व्हायला हवे.’’ असे ते वारंवार स्वत:ला बजावत. त्यांच्या आईवडिलांनीही लहानपणापासून त्यांच्यावर तसे संस्कार केले. आपल्या सामान्य माणसांच्या कल्पनेपलीकडे ऐश्‍वर्यसंपन्न असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पण, सामान्य माणसांच्या विश्‍वाचे भान त्यांनी कधीही नजरेआड होऊ दिले नाही. भारतातील पहिली एअरलाईन्स सुरू करणार्‍या टाटांचे पाय मात्र कायम जमिनीवर राहिले.
लहानपणी त्यांना सांभाळायला एक आया होती. त्यांच्याकडून एक चूक झाली आणि त्यांची आया त्यांना रागावली. जेआरडींनाही खूप राग आला, तेही तिच्या अंगावर ओरडले, तिला अपमानजनक बोलले. तिची गरिबी काढली. आईने त्यांचे वडील रतन टाटा यांना ही गोष्ट सांगितली. समोरच्या व्यक्तीचा आदर केलाच पाहिजे, हे सांगून त्यांच्या वडिलांनी त्यांना चांगलाच चोप दिला. जेआरडींचे नाव जहॉंगीर होते. पुढे शिक्षणाकरिता ते फ्रान्स व इग्लंड येथे गेले. ते विदेशात व त्यांचे वडील भारतात असल्यामुळे त्यांच्यात पत्राद्वारे अखंड संवाद होता. एक उद्योगपती बाप मुलाची कशी जडणघडण करत होता व एक भावी उद्योगपती कसा घडत होता, याचे अनुकरणीय दर्शन या पत्रव्यवहारातून पाहायला मिळते. फ्रान्समधून लंडनला ते शिक्षणाकरिता गेले. तेथे शिकणार्‍या इतर मुलांविषयी त्यांनी पत्रातून काही वाईट प्रतिक्रिया लिहिल्या. त्यावर त्यांच्या वडिलांनी लिहिले होते, ‘‘तू खुल्या मनाने वाग. तुला तेथे जाऊन जेमतेम आठवडा झालाय्. इतक्यात तू मुलांना ‘खोटारडी’, ‘मनापासून काहीही न करणारी’ असा शिक्का मारलास, तर तू लोकांचे घाईघाईने आणि वरवरचे मूल्यमापन केल्यासारखे होईल. आणि याच स्वभावातून पुढे जेव्हा तू कर्ता पुरुष म्हणून जगात प्रवेश करशील, तेव्हा अपयशी ठरशील. त्यामुळे पिता म्हणून माझा आग्रह आहे की, पूर्वग्रह बनवून कोणापासूनही दूर राहू नको. त्यांच्याशी मैत्री कर. हे करून पाहिलंस तर हीच मुलं मुला निराळी भासतील.’’ कॉलेजमध्ये त्यांच्या काही वस्तू हरवत असत. ते वडिलांना आईकडून नंतर कळत असे. यावर एकदा ते लिहितात, ‘‘माझा मुलगा, जो मला व्यवसायातून मदत करणार आहे, तो इतका निष्काळजी कसा असू शकतो? वाईट याचे वाटते की, तू या गोष्टी माझ्यापासून लपविल्यास. काहीही घडले तरी कधी खोटे बोलू नकोस.’’ व्यायाम आणि प्रार्थना करून मुलांना शारीरिक व मानसिक आरोग्य लाभावे, याबाबत ते आग्रही होते. वक्तशीरपणाच्या बाबतीतही आर. टी. टाटांनी कधीही तडजोड केली नाही. सकाळी ८.३० वाजता ते कार्यालयात जाण्याकरिता कारमध्ये बसत. जेआरडींना अनेकदा हातात टोस्टचा तुकडा घेऊन, धावत वडिलांना गाठावे लागे. एक मिनिटही ते मुलाकरिता थांबत नसत. तेच संस्कार जेआरडींमध्ये झिरपले. ‘भारतरत्न’ जेआरडी टाटांची आणि त्यांच्या टाटा समूहाची जडणघडण देशासाठी प्रेरणादायी आहे.
रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११