दिल्ली दिनांक

0
101

डोकलामचा समारोप : शेरास सव्वा शेर!

गुजरातमधील गिरचे जंगल जगप्रसिद्ध आहे. आशिया खंडातील सर्वाधिक सिंह या जंगलात वास्तव्यास आहेत. काही वर्षांपूर्वीची घटना. गिरच्या जंगलात सिंह पाहण्यासाठी भेट दिली. सकाळी एका उघड्या जिप्सीत बसून फेरफटका सुरू झाला. सोबत एक गाईड होता. त्याच्या हाती एक जाडजूड दंडुका होता. वाटेत सिंह आला तर त्याला हाताळण्यासाठी त्याने तो घेतला होता. मी त्याला विचारले, सिंहाने रस्ता अडवला तर हा दंडुका काय कामाचा? त्याने दिलेले उत्तर फार मोलाचे होते. गाईड म्हणाला, सिंह चालून आला तर हा दंडुका कामाचा नाही हे बरोबर आहे. पण, एखाद्या सिंहाने रस्ता अडविलाच तर आम्ही जिप्सीतून खाली उतरतो आणि सिंहासमोर जात जोरजोराने दंडुका जमिनीवर आपटतो. असे काही वेळ केल्यावर सिंहाला वाटते, आपल्यालाही आव्हान देणारा समोर आला आहे. तो नक्कीच आपल्यापेक्षा शक्तिवान असला पाहिजे. काही वेळाने तो निमूटपणे निघून जातो.
डोकलाममध्ये हेच झाले. ७३ दिवस भारत-चीन समोरासमोर होते. चीन स्वत:ला आशियाचा राजा समजत होता. भारत किती दिवस आपल्याला आव्हान देणार असे त्याला वाटत होते. पण, मोदी यांनी चीनचा रस्ता असा काही रोखून धरला की, भारत आपल्याला भारी पडेल असे चीनला वाटले आणि त्याने निमूटपणे भूतानचा रस्ता मोकळा केला. दोन्ही देशांच्या वतीने एक लहानसे प्रसिद्धिपत्रक जारी करण्यात आले व त्यात दोन्ही देश आपापल्या फौजा मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली.
पूर्ण तयारी होती
डोकलाममध्ये भारताने चिनी सैन्याचा रस्ता रोखल्यानंतर चीनने मोर्चेबांधणी सुरू केली होती. चिनी ड्रॅगनच्या गर्जना सुरू होत्या. चीन घात करू शकतो याची कल्पना भारतालाही होती. चीनने आक्रमण केल्यास त्याला उत्तर देण्याची तयारी भारताने सुरू केली होती आणि ही तयारी चांगली मजबूत होती. लष्कर, नौदल, वायुदल या तिन्ही सेनादलांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले होते आणि दरम्यानच्या काळात पेचप्रसंग सोडविण्याचे प्रयत्नही केले जात होते. भारत आणि चीन ही दोन्ही जबाबदार राष्ट्रे असल्याने दोन आण्विक व आर्थिक शक्तींमध्ये युद्धाचा भडका उडणे कुणाच्याही हिताचे ठरणार नाही हे दोन्ही देशांना ठावूक होते. त्यातूनच चीनला शहाणपणा सुचला आणि भारताने डोकलाममधून तर चीनने डोकलामच्या सीमेवरून सैन्य काढून घेण्याची घोषणा केली.
धोका कायम
डोकलाम प्रकरण निवळले असले तरी ते संपलेले नाही. चीन केव्हाही हे प्रकरण उखरून काढू शकतो याची कल्पना भारताला असल्याने लष्कराला सज्जता कायम ठेवण्याचा आदेशही देण्यात आला आहे. चीनचा इतिहास दगाबाजीचा राहिलेला आहे. भारताने डोकलामचा रस्ता रोखल्याने चीन आपली विस्तारवादी भूमिका सोडून देईल असे समजण्याचे कारण नाही. चीन आता वेगळ्या तंत्राचा वापर करू शकतो. नवी आघाडी निवडू शकतो असे मानले जाते.
वर्षभरापूर्वी पाकिस्तान
वर्षभरापूर्वी, सप्टेंबर महिन्यात मोदी यांनी पाकिस्तानच्या विरोधात सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेतला. जगातील एकाही देशाने त्याचा विरोध केला नाही. पाकिस्तानच्या कारवाया सुरू असल्या तरी सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय आपण घेऊ शकतो हे मोदी यांनी पाकिस्तानला व जगाला दाखवून दिले. त्या निर्णयाने भारताच्या लष्करी सामर्थ्याची जाणीव जगाला झाली. जगात भारताचा दबदबा वाढला.
आता मुत्सद्देगिरीचा विजय
पाकिस्तानच्या विरोधात भारताचा विजय हा लष्करी सामर्थ्याचा होता तर डोकलाममध्ये तो भारताच्या मुत्सद्देगिरीचा होता. मात्र, चीनला हाताळणे एक मोठे आव्हान आहे. चीन एक महाशक्ती म्हणून उदयास आला आहे. आर्थिक शक्ती व लष्करी शक्ती या दोन्ही बाबी चीनने साध्य केल्या आहेत. चीनच्या दबावासमोर न झुकणे हे मोदींसमोरील एक मोठे आव्हान होते. चीनने भारतावर दबाव आणण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न केले. मोदी त्यात वाकले नाहीत. हा भारताचा पहिला विजय होता. भारत सरकार माघार घेण्याच्या मन:स्थितीत नाही हे चीनच्या लक्षात आल्यानंतर त्याने चर्चा करण्याची तयारी दाखविली. चीनची ही पहिली माघार होती. त्यानंतर चर्चा सुरू झाली आणि दोन्ही देशांनी म्हणजे चीनने डोकलामपासून माघार घेण्याचा निर्णय घेतला. आपण माघार घेतली नाही हे जगाला दाखविण्यासाठी चीनने गुरगुरणे सुरू ठेवले असले तरी जे झाले ते सार्‍या जगाला दिसले आहे.
शेजारी राष्ट्रांवर परिणाम
मोदी सरकार आल्यापासून जगात भारताची प्रतिमा उंचावत होती. पाकिस्तानविरुद्धच्या सर्जिकल स्ट्राईकने त्याला बळ मिळाले. आणि आता चीनबरोबरच्या शीतयुद्धात भारताने बाजी मारल्याने भारत जगाच्या नकाशावर महत्त्वाच्या स्थानी विराजमान झाला आहे. जगाच्या राजकारणात अमेरिका, रशिया, चीन, जर्मनी, ब्रिटन यांच्या भूमिकांचा विचार होत होता. त्यात आता भारतही सामील झाला आहे. भारताच्या शेजारी राष्ट्रांवर याचा परिणाम होणे स्वाभाविक आहे. भूतान हा लहानसा देश असला तरी त्याचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे आहे. भूतानला भारतासारखा मित्र मिळाला आहे. बांगलादेश भारतासोबत राहणार आहे. चीनकडे झुकलेला नेपाळचा लंबक मध्यावर आला आहे. अफगाणिस्तान पाकिस्तानच्या विरोधात भारताकडे आला आहे. श्रीलंका अद्याप चीनकडे असल्याचे मानले जाते.
महाशक्तीचा उदय
डोकलाम प्रकरणाचा निष्कर्ष म्हणजे जागतिक राजकारणात भारताचा उदय झाला आहे. लंडनहून प्रसिद्ध होणार्‍या द इकॉनॉमिस्टच्या ताज्या अंकाच्या मुखपृष्ठावर वाघावर स्वार झालेले मोदी दाखविण्यात आले आहेत. यात भारताच्या व मोदींच्या शक्तीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी हे मुखपृष्ठ भारताच्या वाढत्या प्रभावाला दाखविणारे असे आहे. भारत वाघावर स्वार तर झाला आहे, आता त्याला वाघावरून खाली उतरणे कसे जमणार असा या मुखपृष्ठ कथेचा आशय आहे. आपण वाघावर स्वार होऊ शकतो व वाघावरून खालीही उतरू शकतो हे मोदींनी डोकलाममध्ये दाखवून दिले आहे.
बवानाचा संकेत
राजधानी दिल्लीत लागोपाठ दुसर्‍या विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने आपली स्थिती सुधारली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या राजौरी गार्डन विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराने २५ हजाराहून अधिक मते मिळविली होती. बवानात कॉंग्रेसला ३१ हजार मते मिळाली. बवानात भाजपाला विजय मिळेल अशी अपेक्षा होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मनपा निवडणुकीत भाजपाने शानदार कामगिरी बजावली होती. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नियोजनाचा तो परिणाम होता. दिल्लीत आम आदमी पक्षाची लोकप्रियता ओसरत असताना अचानक बवानात आपची लाट आली. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत आपला १ लाख ९ हजार मते मिळाली होती. या वेळी आपला ५४ हजार मते मिळाली. भाजपाला जवळपास ६० हजार मते मिळाली होती. या वेळी ३४ हजार मते मिळाली. कॉंग्रेसला १४ हजार मते मिळाली होती. या वेळी पक्षाला १७ हजार अधिक म्हणजे ३१ हजार मते मिळाली. कॉंग्रेसची व्होटबँक आपकडे सरकली होती, ती पुन्हा आपकडे परतत असल्याचे बवानात दिसले आहे. बवानातील विजय अरविंद केजरीवाल यांच्यासाठी संजीवनी ठरणार आहे तर भाजपासाठी हा निकाल डोकेदुखीचा ठरणार आहे.
– रवींद्र दाणी