उजळले समाजाचे मन, ज्ञाना झालासे पावन!

0
59

चंद्रकांत लोहाणा
वाशीम, ४ सप्टेंबर
‘माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो…’ असे एक सुभाषित आहे. मग त्याने शिक्षक कधी व्हायचे? विद्येपासून, ज्ञानापासून वंचित असणार्‍यांना आपल्यकडे आहे ते कधी द्यायचे? असा प्रश्‍न सहसा कुणाला पडत नाही. ज्यांना असे प्रश्‍न पडतात ते मग आपले आणि इतरांचेही आयुष्य उजळून काढतात. डॉक्टर आणि शिक्षक असलेल्या दोन वाशिमकरांना हा प्रश्‍न पडला आणि शेकडो होतकरू वंचित विद्यार्थ्यांची आयुष्य त्यामुळे उजळून निघाली.
शिक्षक म्हणजे शाळेच्या चार भिंतीत शिकवितो तोच नसतो… समाजशिक्षकाचीही एक भूमिका असते आणि आपण स्वीकारली पाहिजे, या विचारांनी भारलेल्या डॉ. नीलिमा घुनागे व विठ्ठल जोशी यांनी गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याचीच शाळा करून टाकली आहे.
आपण समाजाकडून सतत घेतच राहतो, मग देशाचे समाजाचे देणे देण्यासाठी देणार्‍यांचे दानत असलेले हातही एक दिवस स्वीकारले पाहिजेत, या निर्मळ वृत्तीने अनसुया माता सेवा प्रतिष्ठानद्वारे तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. घरची परिस्थिती बेताचीच असणार्‍या विद्यार्थ्यांना शाळेची फी भरायलाच पैसा नसतो, पुस्तके व इतर शालेय वस्तूही त्यांना मिळत नाहीत, अशांनी शाळेतील सुखवस्तू सहध्यायींसोबत सहलीला कसे जायचे? प्रश्‍न खूपच नाजूक आहे. अशा विद्यार्थ्यांना सहलीला नेण्याचा उपक्रम हे प्रतिष्ठान दरवर्षी राबविते. निसर्गाच्या माध्यमातून मुलांवर उत्तम संस्कार घडवून आणता येतात. त्यांच्या विचारांना सकारात्मक दिशा दिली जाऊ शकते. मुलांमधील आपापसातील संवाद यामुळे वाढीला लागतो. अर्थातच मुलांची निसर्गसहल एक संस्कार साधन ठरू शकते. त्यामुळे प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी वेगवेगळ्या निसर्गरम्य ठिकाणी मुलांच्या अभ्यासपूर्ण सहलींचे आयोजन करण्यात येते. यामध्ये १२५ ते १५० मुला-मुलींचा सहभाग असतो.
प्रवासादरम्यान वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांकडून विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येते. पैनगंगा पक्षी अभयारण्यात विविध वनस्पतींची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्यात येते.
सहलीप्रमाणेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मान्यवरांचे मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या गुणंाना वाव मिळावा यासाठी मागील दोन वर्षांपासून स्नेहसंमेलन घ्यावयास सुरुवात केली. यामध्ये दरवर्षी विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.
शिक्षणवाटेत गुणवत्ता प्राप्त करून मोठे यश मिळविणारे विद्यार्थीही आपल्यासारखेच असतात, हा आत्मविश्‍वास वाढविणारा साक्षात्कार घडविण्यासाठी परिस्थितीवर मात करून डॉक्टर, इंजिनियर, आयएएस, आयपीएस होणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या प्रकट मुलाखतींच्या माध्यमातून वंचिता घरच्या मुलांमध्ये आत्मविश्‍वास जागा करण्याचे कामही ट्रस्टद्वारे केले जाते. शिक्षक असलेले विठ्ठल जोशी व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निलीमा घुनागे यांनी हा दानयज्ञातून ज्ञानयज्ञ गेल्या पाच-सात वर्षांपासून सुरू केला आहे.
मुले हुशार असतात. पण ऐपत नसते. शिक्षणाचा खर्च भागविणे हे त्यांच्यासाठी एक महाकठीण कर्म असते. अशा होतकरू विद्यार्थ्यांसाठी विठ्ठल जोशी यांनी एक पाऊल पुढे जात शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणाचा ध्यास असणारे अनेक ‘ज्ञाना’ समाजात असतात, त्यांना विद्यादान देऊन खर्‍या अर्थाने पावन करण्याचे काम अनुसुया ट्रस्ट करते आहे.