कल्पवृक्ष

0
54

उजेडाचा गाव…

शिक्षक दिन आला की, शाळेतल्या आठवणी पुन्हा ताज्या होतात. कोणे एके काळी शाळेतले दिवस खूप आनंददायक असायचे. मास्तर छड्या मारणारे असले, तरी त्यामागे निर्व्याज प्रेम असायचे.
अडगळींच्या खोलीमधलं
दप्तर जेव्हा आजही दिसतं;
मन पुन्हा तरुण होऊन
बाकांवरती जाऊन बसतं…
आणि असे एकदा बाकावर बसल्यानंतर समोर हमखास दिसतात वेगवेगळे शिक्षक. असे म्हणतात की, शिक्षक सर्वात दीर्घायुषी असतो. कारण कुणीतरी आजोबा आपल्या नातवाला त्यांच्या लहानपणच्या शिक्षकांची नाव घेऊन गोष्ट सांगत असतो. किती पिढ्या तो शिक्षक मनामनांत जिवंत असतो. त्यांनी केलेले संस्कार विद्यार्थी जपत असतो.
पण, या सगळ्या शिदोरीवरच
बाई आता रोज जगतो
चुकलोच कधी तर तुमच्यासारखं
स्वत:लाच रागावून बघतो
दोन बोटं संस्काराचा
समास तेवढा सोडतो आहे
फळ्यावरच्या सुविचारासारखी
रोज माणसं जोडतो आहे…
अशा कितीतरी अनामिक कवींच्या ओळी शिक्षक दिनाचा उत्सव मनात साजरा करतात. अनेक मोठ्या माणसांच्या आयुष्याला केवळ शिक्षकांमुळे वळण मिळाले. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. माशेलकरांच्या जीवनाला त्यांच्या भावेसरांमुळे वळण मिळाले. एका सायन्स कॉंग्रेसमध्ये माशेलकरांनी भाषणात त्यांच्या भावेसरांची आठवण सांगितली. पंतप्रधान अटलजीही त्या कार्यक्रमात होते. त्यांनी ‘भावेसरांसारखे शिक्षक आज कुठे गेले?’ अशी खंत व्यक्त केली होती. डॉ. कलाम रामेश्‍वरच्या शाळेत शिकत होते. तेथे आठवीपर्यंतच शाळा होती. एक दिवस त्यांचे शिक्षक शिवसुब्रमण्य अय्यर यांनी त्याला घरी जेवावयास बोलाविले. एका मुस्लिम मुलाला बोलावल्यामुळे त्यांच्या पत्नीने वाढलेही नाही. शिक्षकांनीच त्याला वाढले आणि जेवताना त्याने पुढे शिकणे किती आवश्यक आहे, हे समजावून सांगितले. कलामांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्यांचे शिक्षण तेथेच थांबले असते. पण, अय्यर सरांनी त्यांच्या वडिलांनाही ते पटवून दिले. अत्यंत बुद्धिमान असलेला हा मुलगा शिकावा, या शिक्षकांच्या आग्रहामुळेच कलामांचे जीवन बदलले. विशेष म्हणजे तो मुसलमान असूनही त्यांनी भेद केला नाही. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. ‘वुई कॅनॉट चूज अवर पेरेण्टस् बट वुई कॅन चूज अवर टीचर्स.’ असे म्हणतात ते अगदी खरे आहे. समाजातल्या प्रत्येक मुलाला उत्तम शिक्षक मिळेल, अशी व्यवस्था आपल्याला उभी करता आली पाहिजे. देशाच्या विकासाची ती पूर्वअट असते. कोणत्याही राष्ट्राची उंची त्या देशातल्या शिक्षकांच्या सरासरी उंचीपेक्षा जास्त असू शकत नाही, अशा अर्थाची एक म्हण आहे. आज त्यावर प्रकर्षाने विचार करण्याची वेळ आली आहे.
विवेकानंद मुंबईला असताना एक तरुण त्यांना भेटायला गेला. तो शिक्षक असल्याचा परिचय त्याने करून दिला होता. वार्तालाप झाल्यानंतर जाताना तो स्वामींजींना म्हणाला, ‘‘मला काही संदेश द्या.’’ स्वामीजी त्याला म्हणाले, ‘‘जितक्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर ही नोकरी सोडून दुसरी एखादी नोकरी किंवा उद्योग पाहा.’’ ते ऐकून सर्वांना धक्का बसला. स्वामीजी पुढे म्हणाले, ‘‘इफ वन डझ द वर्क ऑफ टीचिंग फॉर अ लॉंग टाईम, ही गेटस् ब्लंट इन इन्टलेक्ट.’’ मर्यादित ज्ञानाचा दीर्घकाळ उपयोग केला तर माणूस बुद्धिमंद होतो. नव्या ज्ञानाची, नावीन्याची नोंद घेतली नाही, तर बुद्धिक्षीणता वाढीस लागते.’’ अगदी थोड्या वेळातच त्या शिक्षकाची पात्रता त्यांनी ओळखली होती. त्याचे शिक्षक म्हणून कायम राहणे, विद्यार्थ्यांवर अन्यायकारक ठरले असते. ही घटना शिक्षकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहे.
शोध घेतो तो शिक्षक, असे विनोबा म्हणायचे. आचार्य आचारवान असतो. त्याच्याकडे पाहून आचरणाचे धडे घ्यायचे असतात. शिक्षणाची जबाबदारी त्यानेच अंगावर घ्यायची असते. शिक्षणव्यवस्थेच्या अपयशाची कारणे व त्याची उत्तरेही त्यानेच शोधायची असतात. सैनिक राष्ट्राचे संरक्षण करण्याकरिता सीमेवर लढत असतो. अत्यंत विपरीत परीस्थितीत डोळ्यांत तेल घालून तो सदैव जागा असतो. पण, राष्ट्राचे संरक्षण म्हणजे केवळ सीमांचे संरक्षण नव्हे! राष्ट्र संस्कृतीमुळे बनत असते. म्हणूनच सांस्कृतिक मूल्यांचे संरक्षण व संवर्धन आवश्यक असते. ते शिक्षणातून घडत असते. म्हणूनच शिक्षकही राष्ट्राचे संरक्षण करणारा शूर सैनिक आहे. सीमेवरील सैनिकाप्रमाणे सदैव जागे राहून शिक्षकांनी कोणत्याही परिस्थितीत सीमांचे संरक्षण केलेच पाहिजे. त्यांनीच सीमारेषा ओलांडल्या तर पतन अटळ आहे. हजारो छोट्या वर्गखोल्यांमध्ये राष्ट्र सामावलेले असते. तेथे शिक्षक नावाचा एक नायक वावरत असतो. तो काय करतो, तेथे काय चालते, यावर भावी भारताचे भवितव्य अवलंबून आहे. विदेशातील एका विमान कंपनीने वैमानिकांच्या कॉकपिटवर एक वाक्य लिहिले आहे- ‘बियॉण्ड धीस पॉईंट, यू आर नॉट सपोझ्ड् टू टेक युअर वरिज इनसाईड.’ प्रवाशांचे जीवन पायलटच्या हातात असते. त्यामुळे चिंता, काळज्या त्याने बाहेर ठेवल्या पाहिजे. कारण विमान चालवण्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. वर्गात प्रवेश करताना शिक्षकांनीही हेच लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्या निरागस मुलांचे भवितव्य पालकांनी विश्‍वासाने त्यांच्या हाती सोपविले आहे. कौटुंबिक अडचणी, शाळेतले राजकारण, व्यवस्थापनातले मतभेद, सहकार्‍यांशी बेबनाव, मुख्याध्यापकाचा जाच, अशा गोष्टींचा परिणाम वर्गखोलीत दिसता कामा नये. कारण…
शिक्षक म्हणजे काय असतो,
उजेडाचा गाव असतो
ज्ञानामृत पाजणारा,
विद्यार्थ्यांचा देव असतो…
रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११