कर्करोगावर रामबाण ‘लक्ष्मीतरू’

0
193

– •सहा दशकांपेक्षा जास्त काळ संशोधन
– •शेतकर्‍यांसाठी वरदान
•- लक्ष्मीतरूविषयी लोकशिक्षणाची आवश्यकता
रेवती जोशी-अंधारे
नागपूर, ४ सप्टेंबर
महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या ४ कोटी वृक्षलागवडीनंतर राज्यभरात पर्यावरणाविषयी मोठ्या प्रमाणात जागरूकता आली आहे. याच निमित्ताने काही बहुगुणी रोपांचीही लागवड करण्यात आली आणि त्यात प्रामुख्याने लक्ष्मीतरूचा उल्लेख करावा लागेल. सीमारोबा ग्लाडका असे शास्त्रीय नाव असलेल्या या वृक्षाचे आर्थिक, पर्यावरणीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक उपयोग लक्षात घेता, आध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी या वृक्षाला ‘लक्ष्मीतरू’ हे नाव दिले आहे. महाराष्ट्रात आणि आता विदर्भात लक्ष्मीतरूच्या लागवडीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पुण्याच्या शिंदेवाडीतील शाश्‍वत विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर जगताप, सुरेश पलुस्कर आणि आदित्य सिंग भगीरथ प्रयत्न करत आहेत.
या वृक्षाच्या विविध फायद्यांचा सखोल अभ्यास आणि माहिती मिळवून तयार केलेला अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला. पण, साधारण ५ वर्षांनंतर या वृक्षापासून उत्पन्न सुरू होत असल्याने शेतकर्‍यांनी त्याकडे पाठ फिरविली. शिवाय, मादी झाडाला भरपूर फळे येत असली तरी नर आणि मादी झाडांमधील फरक ओळखण्यासाठी कोणतीही चाचणी नव्हती. शिवाय, बियांवर असलेल्या कठीण कवचामुळे त्यांच्या अंकुरणाचा कालावधी जास्त असल्याने शेतकर्‍यांनी या बहुपयोगी वृक्षाची लागवड टाळली. मात्र, आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे जनुकीय चाचणीच्या माध्यमातून रोपट्यांमधील नर-मादी हा भेद ओळखणे शक्य झाले आहे. मूळ मध्य अमेरिकेतील असलेल्या आणि पडीक जमिनीतही आनंदाने वाढणार्‍या या झाडाला पाणी कमी लागत असल्याने गेल्या ३ वर्षांपासून दुष्काळाला तोंड देणार्‍या विदर्भात लक्ष्मीतरूचे रोपण विशेष लाभदायक ठरणार आहे.
लक्ष्मीतरूचे आयुष्य साधारण ६५ ते ७० वर्षे असून ते ४५ फुटांपर्यंत उंच होते. वर्षभर हिरव्यागार पानांची सावली देणार्‍या या झाडाला जांभळांसारखी फळे द्राक्षाप्रमाणे घोसात लागतात. या फळांच्या आठोळीत ६० ते ७० टक्के खाद्यतेल असते, हे विशेष! शिवाय, तेल काढल्यानंतरची पेंडी आणि लक्ष्मीतरूची पाने यापासून दर्जेदार खतनिर्मिती होते. झाडाच्या बुंध्याचा घेर दीड ते अडीच मीटरपर्यंत असून त्याच्या सालीपासून उत्कृष्ट औषध तयार होते. या झाडाचे लाकूड नैसर्गिक रीत्याच वाळवी प्रतिबंधक असल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करता येऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे मृदासंवर्धन आणि जमिनीचा कस वाढविण्याचे काम या झाडाची मुळे करत असल्याने विशेष लाभ मिळतो. लक्ष्मीतरू इतर झाडांच्या तुलनेत ५० टक्के अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड शोषत असल्याने ओझोनचा थर कायम राखण्यात मदत होत असल्याचा संशोधकांचा निष्कर्ष आहे.
या झाडाच्या उपयुक्ततेवरील संशोधन अमरावतीत १९६० मध्येच सुरू झाले. कर्नाटकातील डॉ. श्यामसुंदर जोशी यांनीही याविषयी तब्बल ६० वर्षे संशोधन करून अहवाल तयार केले. या कार्यासाठी त्यांना पद्‌म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कर्करोगावर लाभदायी
गेल्या काही वर्षात आपल्या देशात कर्करोगग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. उपचार महागडे असल्याने अनेक रुग्ण त्या अभावीच दगावतात. मात्र लक्ष्मीतरूची पाने आणि फळांच्या अर्कापासून कर्करोगावर यशस्वी उपचार केले जाऊ शकतात. या दृष्टीने मागील काही वर्षांपासून संशोधन सुरू आहे. सुरेश पलुस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्करोगाच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील रुग्णाला लक्ष्मीतरूपासून तयार औषधाचा लाभ मिळविता येईल. कमी किमतीत आणि सुलभतेने उपलब्ध होणार्‍या या औषधाचा सामान्य नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कर्करोगासह अस्थमा, गॅसट्रायटिस, पित्तरोग, चिकन गुनिया, मलेरिया, स्वाईन फ्लू आणि काविळीवर उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या या झाडाची लागवड व्हायला हवी.
६ बियांपासून ८६ हजार वृक्षांपर्यंत
वर्ष २००६ मध्ये श्री श्री रविशंकर यांनी पलुस्करांना लक्ष्मीतरूच्या सहा बिया दिल्या होत्या. त्यांच्या या कार्यापासून प्रेरणा घेत, त्या ६ बियांची आज ८६ हजार झाडे झाल्याचे पलुस्कर अभिमानाने सांगतात. या झाडाच्या बियांवर विशिष्ट प्रक्रिया करावी लागते आणि नंतरच त्यांच्यापासून रोपटी तयार करता येते. पेरणीपूर्वी बी २४ ते ४८ तास पाण्यात भिजवून ठेवावे लागते, अशी माहिती त्यांनी दिली. सध्या नागपुरात आणि चंद्रपुरासह गोसेखुर्दमध्ये १५ एकर जमिनीवर त्यांनी लक्ष्मीतरूची लागवड केली आहे. नजीकच्या भविष्यात विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये प्राधान्यक्रमाने या वृक्षाची लागवड केली जाईल. त्यासाठी, शिवार फेरी आणि स्थानिकांच्या भेटीतून जागृती करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
लक्ष्मीतरूचे अर्थशास्त्र
एक एकर परिसरात लक्ष्मीतरूची दोनशे रोपटी लावता येतात. या रोपट्यांना पाण्याशिवाय काहीही देण्याची आवश्यकता नसल्याने प्रति रोपटे संगोपनाचा खर्च फार तर ३० रुपये येतो. यानुसार, झाड फळाला येईपर्यंत जास्तीत जास्त ८० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. या झाडाच्या फळांना किलोमागे २५ ते ३० रुपये किलोचा भाव मिळत असल्याने पाच वर्षाची गुंतवणूक केवळ फळांच्या विक्रीतून मिळविता येईल. शेतकर्‍यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी लक्ष्मीतरूची मोठीच मदत होणार असल्याची माहिती पलुस्कर यांनी दिली. शिवाय, खत आणि औषधी उपयोगांसाठी झाडाची पाने आणि सालाची विक्री उत्पन्नाचे चांगले साधन आहे. त्यासोबतच, खाद्यतेल, बायोडिझेल, सौंदर्य प्रसाधने आणि लाकडावर प्रक्रिया करून विक्री केल्यास शेतकर्‍यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.