दहशतवादाविरोधात संघटित कृती हवी

0
183

ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदींचे आवाहन
शिमेन, ५ सप्टेंबर 
दहशतवाद हीच आजच्या जगापुढील सर्वात मोठी समस्या असल्याने त्याविरोधात संघटित आणि समन्वयाच्या आधारावर कृती करण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी येथे केले.
ब्रिक्स देशांच्या विकसनशील अर्थव्यवस्था आणि बाजारपेठ यावरील बैठकीत बोलताना मोदी म्हणाले की, भारत आपला आर्थिक विकास करताना ब्रिक्समधील सदस्य देशांनाही आवश्यक ते सहकार्य करण्यास नेहमीच तयार असेल. आपण जे काही करणार आहोत, त्याचा थेट प्रभाव उर्वरित जगावर होणार असल्याने एकेक विट (ब्रिक) किंवा विटांचा (ब्रिक्स) थर लावून चांगल्या जगाची निर्मिती करणे हेच आपले धेय्य असायला हवे.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ सबका विकास’चा नारा दिला. जगाच्या आर्थिक विकासासाठी सबका साथ, सबका विकास आवश्यक आहे. पुढील दशक आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. पुढील दशक सुवर्ण व्हावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
आमच्या विकासाची संकल्पना ‘सबका साथ सबका विकास’ याच सिद्धांतावर आधारित आहे, असे सांगताना त्यांनी हवामान बदलाचा गंभीर मुद्दाही उपस्थित केला आणि हरित जगासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
उत्तर कोरियाचा निषेध
उत्तर कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीचा ब्रिक्समध्ये निषेध करण्यात आला. या मुद्यावर शांततेने आणि राजनयिक तोडगा काढला जावा, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
पंतप्रधान म्यानमारला रवाना
ब्रिक्स राष्ट्र परिषदेच्या समारोपानंतर पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या म्यानमारच्या दौर्‍यावर रवाना झाले. पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच म्यानमार भेट आहे. संरक्षण आणि दहशतवादविरोधील लढ्यासह द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यावर मोदी या दौर्‍यात भर देणार आहेत. घ(वृत्तसंस्था)