ट्रम्प रद्द करणार डीएसडी योजना

0
221

अमेरिकेतील ७ हजार भारतीयांवर टांगती तलवार
वॉशिंग्टन, ५ सप्टेंबर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प डेफर्ड ऍक्शन फॉर चिल्ड्रन अरायव्हल (डीएसडी) योजना रद्द करण्याच्या तयारीत आहेत. लवकरच या संदर्भातील घोषणा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतीय वंशाच्या जवळपास सात हजार अमेरिकन नागरिकांवर प्रत्यार्पणाची टांगती तलवार लटकत आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अवैध रीतीने अमेरिकेत दाखल झालेल्या मुलांना प्रत्यार्पणापासून बचाव करण्यासाठी डीएसडी योजना सुरू केली होती. अमेरिकेच्या ‘पॉलिटिको’ या वृत्तपत्राने ट्रम्प यांनी ही योजना रद्द केल्याचा दावा केला आहे, तर ‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या मते, प्रवासी कार्यक्रम रद्द करण्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी कॉंग्रेसला (अमेरिकन संसद) सहा महिन्याचा कालावधी दिला होता. या काळात यासंदर्भात नवीन नियम आणि कायदे केले जावेत, यासाठी हा वेळ देण्यात आला होता. कारण, डीएसडीअंतर्गत जवळपास ८ लाख लोकांना प्रत्यार्पणापासून सुरक्षा बहाल करते.
दरम्यान, प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष आणि सत्तारूढ रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते पॉल रेयॉन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ट्रम्प यांनी डीएसडी योजना रद्द करण्याचा निर्णय घेऊ नये. कारण, या योजनेचा लाभ मिळवणारी मुले अमेरिका सोडून इतर देशात जाऊ शकत नाहीत. त्यामुळे माझ्या मते, ते असे करणार नाहीत. हा एक असा मुद्दा आहे, ज्यावर कॉंग्रेसने गांभीर्याने विचार केला पाहिजे.
दुसरीकडे, डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांच्या वर्णद्वेषावर टीका केली आहे. देशभक्त आणि धाडसी तरुणांना प्रत्यार्पणाची सक्ती करणे देश आणि अर्थव्यवस्थेसाठी घातक असल्याचे डेमोक्रॅटिक पक्षाने म्हटले आहे. विशेष म्हणजे, ऍप्पलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी डीएसडीच्या संदर्भातील ट्रम्प यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, ‘ऍप्पलचे २५० कर्मचारी ड्रीमर्स आहेत. मी त्यांच्यासोबत आहे. ते सर्व समान हक्काचे अधिकारी आहेत. या समस्येवर अमेरिकेच्या मूल्यांच्या आधारेच तोडगा निघाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, तर मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांनीही ट्रम्प यांच्या भूमिकेची निंदा केली आहे. एका अधिकृत आकडेवारीनुसार, डीएसडी योजना रद्द केल्यास अमेरिकन अर्थव्यवस्थेला तब्बल २०० अब्ज डॉलर (तब्बल १३ लाख कोटी रुपये) नुकसान सोसावे लागू शकते. (वृत्तसंस्था)