मुलीसाठी सात वर्षांपासून तो केवळ नूडल्सवर!

0
252

बीजिंग, ५ सप्टेंबर

आपल्या अपत्यांसाठी केवळ आईच मोठा त्याग करीत असते असे नाही. मुलांसाठी अनेक प्रकारचा त्याग करणारे, कष्ट झेलणारे पिताही या जगात आहेत. चीनच्या हुबेई प्रांतातील असाच एक पिता आपल्या मुलीसाठी गेल्या सात वर्षांपासून रोज निव्वळ नूडल्स खाऊनच जीवन जगतो आहे. मुलीला मोठी जिम्नॅस्ट करण्याची त्याची इच्छा आहे. त्यामुळे पैशांची बचत करण्यासाठी तो पिनी नूडल्सचा साधा पारंपरिक आहारच घेत आहे.४९ वर्षांच्या होऊ यनवेई हा माणूस पालिकेतील स्वच्छता कर्मचारी आहे. रस्ता झाडणे हे त्याचे काम. गरिबी असली तरी त्याला आपली कन्या मोठी खेळाडू व्हावी, असे वाटते. स्वतः होऊलाही क्रीडाक्षेत्रात रस आहे. त्याने सांगितले, माझी कन्या अकरा वर्षांची आहे. ती चार वर्षांची असल्यापासून तिला जिम्नॅस्टिकमध्ये रस आहे व त्या वेळेपासून ती सराव करते आहे. तिला या खेळाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची माझी आर्थिक ताकद नाही. त्यामुळे या मुलीसह मी एका छोट्या घरात राहतो. माझी कमाई महिन्याला दोन हजार युआन इतकी आहे. त्यापैकी तीनशे युआन घरभाड्यालाच जातात. त्यामुळे स्वतःवरील खर्च कमी करून मी तिच्यासाठी पैसे जमवतो आहे. गेल्या सात वर्षांपासून मी केवळ साधे नूडल्सचाच काय तो आहार घेत आहे आणि बचत केलेल्या पैशातून तिचा ट्रेनिंगचा व शिक्षणाचा खर्च करतो. (वृत्तसंस्था)