पोपट आणि कावळा

0
85

कल्पवृक्ष

एका जंगलात एका डेरेदार वृक्षावर खूप पोपट राहात असत. मधूनमधून एक शिकारी तेथे येत असे. झाडाखाली तो जाळे लावत असे. त्या जाळ्यात डाळिंबाचे छान लाल लाल दाणे टाकत असे. पोपट ते दाणे खाण्याकरिता त्यावर झेप घेत व त्या जाळ्‌यात अडकत. शिकारी त्यांना पकडून पिंजर्‍यात बंद करून विकत असे. एका साधूला हे पाहून दु:ख होत असे. यावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे, असे त्याला वाटे. एक दिवस त्याने शिकार्‍याकडून काही चांगले पोपट विकत घेतले व त्यांना आश्रमात घेऊन गेला. त्या पोपटांवर चांगले संस्कार करायचे, त्यांना शिकवायचे, असे त्याने ठरविले. पोपटांना त्याने बोलायला शिकवले- ‘‘शिकारी येईल, दाणे टाकील, आम्ही दाणे खाणार नाही, शिकार्‍याच्या जाळ्‌यात अडकणार नाही.’’ हे वाक्य त्यांच्याकडून पाठ करून घेतले. आणि नंतर ते पोपट झाडावर सोडून दिले. पोपट ते वाक्य कायम बडबडत असत. थोड्याच दिवसांत झाडावरचे सर्वच पोपट ते वाक्य बोलायला शिकले. साधूला फार आनंद झाला. एक दिवस शिकारी आला. पाहतो तर काय, झाडावरचे सारे पोपट जोराजोरात ओरडत होते, ‘‘शिकारी येईल, दाणे टाकील, आम्ही दाणे खाणार नाही, शिकार्‍याच्या जाळ्‌यात अडकणार नाही.’’ शिकारी निराश झाला. आज एकही पोपट मिळणार नाही, याची त्याला खात्री होती. पण, आलोच आहोत तर नेहमीप्रमाणे जाळे लावून दाणे टाकून ठेवू, असा त्याने विचार केला. जाळे लावले, दाणे टाकले आणि दूर जाऊन बसला. आणि काय आश्‍चर्य! थोड्याच वेळात सारे पोपट दाणे खाण्याकरिता झेपावले व जाळ्‌यात अडकले. तोंडाने मात्र दाणे खाणार नाही, अडकणार नाही, असा जप सुरूच होता. तत्त्व माहीत असणे, पाठ असणे म्हणजे संस्कार नव्हे, त्या साधूकरताही हा एक धडाच होता.  कळणे आणि वळणे यामध्ये अंतर असते. पोपटांच्या अंतर्मनापर्यंत त्याचा अर्थ कधीच पोचला नव्हता. दाण्यांच्या मोहामुळे आपण पिंजर्‍यात बंदिस्त होतो, हे त्यांना कळले नाही. सवयी इतक्या बलवान असतात की, तसे वागणे कधी शक्य होत नाही. पण, ही जाणीव झाली की हळूहळू का होईना, कळण्याकडून वळण्याकडे प्रवास सुरू होतो. पण, असेही काही महाभाग असतात की, ते फक्त पोपटपंची करण्यातच धन्यता मानतात. त्यांना त्याचा अहंकारही होतो.या संदर्भात महाभारतात एक सुंदर कथा आहे.  एका तीर्थक्षेत्री धर्मपाल नावाचा सज्जन माणूस राहात असे. भुकेल्यांना तो रोज अन्नदान करत असे. पशू, पक्षी, भिक्षेकरी, वाटसरू, बैरागी, असे जे जे येतील त्या सर्वांना तो अन्न देत असे. त्याला या दानाचा मुळीसुद्धा अहंकार नव्हता. तेथे रोज एक कावळाही खाण्याकरिता येत असे.  धर्मपालाच्या कृपेने परान्न खाऊन तो चांगलाच पुष्ट झाला होता. सगळेच व्यवस्थित असल्यामुळे तो स्वत:ला महान समजायला लागला. तेथे येणार्‍या साधू, संन्याशांचे संवाद ऐकून त्याला बर्‍याच गोष्टींची माहितीही झाली होती. त्यामुळे त्याचा अहंकारही वाढला होता. एकदा तेथे राजहंसांचा थवा आला. भुकेची वेळ होतीच. कावळ्‌याने राजहंस प्रथमच पाहिले होते. आपलेच अन्नछत्र असल्याच्या थाटात कावळा त्यांना, अन्न ठेवलेल्या जागेवर घेऊन गेला. कावळा त्यांना म्हणाला, ‘‘बहुधा तुम्हाला उड्‌डाण कसे करावे, हे माहीत नाही, असे दिसते.’’ एक राजहंस म्हणाला, ‘‘का?’’ कावळ्‌याने त्यांना उड्‌डाणाचे किती प्रकार आहेत, हे विचारले. ते म्हणाले, ‘‘आम्हाला फक्त आकाशात उडता येते, प्रकार माहीत नाहीत.’’ कावळ्याने त्यांच्याकडे तुच्छतेने पाहिले आणि विचारले, ‘‘उड्‌डीयन माहीत आहे?’’ राजहंस नाही म्हणाले. कावळ्‌याने पुन्हा विचारले, ‘‘प्रडीन तरी?’’ बिचार्‍या राजहंसांनी नकारार्थी मान हलवली. मग कावळ्याने त्यांना आवडीन, प्रडीन, डीन, समडीन, तिर्यक्डीन, असे उड्‌डाणाचे प्रकार समजावून सांगितले. हळूहळू आकाशात जाणे, झपाट्याने खाली येणे, सरळ वर, खाली, तिरके, असे उडण्याचे प्रकार सांगितले. राजहंस म्हणाले, ‘‘आमच्यासाठी हे ज्ञान अगदीच नवीन आहे. आम्हाला हे सारे करून दाखवा.’’ जवळच असलेल्या समुद्राच्या दिशेने हंस उडाले. कावळाही त्यांच्यासोबत उडत होता. केवळ दोन पंखांत राजहंस उंच आकाशात गेले. कावळा पंख मारता मारताच थकून गेला. खाली समुद्र असल्यामुळे थांबायचीही सोय नव्हती. तो पाण्यात पडला. गटांगळ्‌या खाऊ लागला. राजहंसांनी विचारले, ‘‘हा उड्‌डाणाचा कोणता प्रकार आहे?’’ कावळा वाचवण्याकरिता गयावया करायला लागला. राजहंसांना त्याची दया आली. त्यांनी त्याला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्या कावळ्‌याला मात्र शहाणपण आले. माहिती आणि प्रत्यक्ष क्षमता या दोन वेगळ्‌या गोष्टी असतात, हे त्याला कळले.जीवनात स्वत:ला ओळखणे आवश्यक असते. तत्त्वाकडून व्यवहाराकडे व माहितीकडून क्षमतांकडे आपला प्रवास झाला पाहिजे. पोपटपंची करणारे पोपट आणि माहितीचा अहंकार बाळगणारे कावळे स्वत:चेही भले करू शकत नाहीत. कावळे शिखरावर बसले तरी गरुड होत नाहीत, अशा अर्थाचे एक सुभाषित आहे. याचा अर्थ कावळे शिखरावर बसतात, हे सत्य आहे. एकदा ते तेथे बसले की सर्व विषयांवर ते मार्गदर्शन करतात. ‘या विषयातला मी तज्ज्ञ नाही.’ हे प्रांजळपणे कबूल करण्याइतका मोठेपणा तर नसतोच, पण सर्वांनी आपल्याला विचारले पाहिजे, हा अहंकार मात्र असतो. मनातून आत्मविश्‍वासही नसतो, मग व्यवस्था, रचना, असे मोठे मोठे तांत्रिक प्रश्‍न उभे करून ती उणीव भरून काढली जाते. म्हणूनच कोणी मतभेद व्यक्त केले की तो त्यांना आपल्या अधिकाराचा अधिक्षेप वाटतो. धर्म, संस्कृती, तत्त्वं नेहमीच चांगली असतात. त्याबाबत वाद नसतोच. प्रश्‍न जेव्हा व्यवहाराचा येतो, तेव्हाच खरी समस्या निर्माण होते. पोपट आणि कावळे जेव्हा आदरणीय बनतात, तेव्हा संस्थांचे, संघटनांचे व समाजाचे स्वास्थ्य बिघडले आहे, असे खुशाल समजावे.

रवींद्र देशपांडे,८८८८८०३४११