सबका साथ सबका विकास…

0
110

एकात्मभाव

 ‘सबका साथ सबका विकास’ या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तत्त्वज्ञानाचे सर्व जगाने स्वागत केले. पण, गोरक्षणावरून हिंदुत्वावर पुन्हा टीका सुरू झाली. विरोधकांनी असा कांगावा सुरू केला की, भाजपा आता भारताचे धर्मनिरपेक्ष धोरण बदलून हिंदुत्वाचे धोरण या देशातील नागरिकांवर थोपवेल व संघाचे हिंदुराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करेल. त्यांचा खरा राग मोदींवर आहे. कारण मोदींनी लोकसभा आणि अनेक विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्षवाद्यांना पराभूत केले. मोदींनी कायदा हातात घेणार्‍या कथित गोरक्षकांना कडक शासन करा, असा संदेश सर्व राज्यांना दिल्यानंतरही यांची ओरड कमी झालेली नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘सबका साथ सबका विकास’ या तत्त्वज्ञानामागची भूमिका समजून घेण्यासाठी हिंदुत्व, धर्मनिरपेक्षता आणि ‘सबका साथ सबका विकास’ या तीनही तत्त्वज्ञानांचे विश्‍लेषण करणे आवश्यक आहे.सर्वांनाच भारतीय सभ्यतेचा इतिहास समजवून घ्यावा लागेल. भारतीय सभ्यतेची सुरुवात सिंधू-सरस्वती नदीच्या काठी झाली. त्या काळात भारताच्या अन्य नदींच्या काठी वसलेल्या विविध जमातींची जीवनपद्धती भिन्न होती. त्यांचे रहनसहन, आचारविचार, रीतिरिवाज, प्रथा-परंपरा आणि भाषा-उपासनापद्धती वेगळी होती. प्राचीन भारतीय ऋषी-मुनींनी भारतातील त्या सर्व जाती-जमातींच्या जीवनपद्धतींना जोडून एक व्यापक जीवनपद्धती निर्माण करण्याचे अशक्य काम केले. सोबतच समन्वयता, परिवर्तनशीलता, विज्ञान, अध्यात्म, धर्म, सहिष्णुता, सर्वधर्म समभाव आणि विविधतेत एकतासारख्या तत्त्वांनी व्यापक जीवनपद्धती बनवली.  पूर्व राष्ट्रपती स्व. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी लिहिले आहे… हिंदुत्वाने त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व जाती-जमातींच्या रीतिरिवाज आणि विचारधारांना हळूहळू आत्मसात केले. हे आध्यात्मिक विचारांचे व अनुभवांचे चार-पाच हजार वर्षांपेक्षाही जास्त दाब आणि ताण दर्शवतात. हिंदुत्वाने कट्‌टर धार्मिकतेऐवजी उदारतेची मानसिकता बनवली.हिंदुत्वाच्या तत्त्वज्ञानामुळेच आज भारतीय सभ्यतेमध्ये आस्तिक, नास्तिक, निर्गुण- निराकार, सगुण-साकार उपासनापद्धती, एकेश्‍वरवादी, अनेकेश्‍वरवादी, वेदप्रमाण्यवादी, वेदविरोधक, द्वैतवादी, अद्वैतवादी, विविध उपासनापद्धती, अनेक संप्रदाय, साहित्य, धार्मिक ग्रंथ, वंश, वर्ण, प्रदेश, भाषा, जाती तथा अनेक विचारधारा नांदत आहेत आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने हिंदू धर्म नसून एक जीवनपद्धती आहे, असा निकाल दिला. पण, जेव्हापासून हिंदुत्वाला संकुचित, सांप्रदायिक आणि जातीयवादी ठरवून त्याची पाळेमुळे उखडून टाकण्याचा प्रयत्न व्हायला लागला, तेव्हापासून भारताची एकात्मता आणि अखंडतेला तडा जायला लागला.धर्मनिरपेक्षतेमध्ये दोन मूळ संकल्पनांचा समावेश आहे. पहिली, राज्याला धर्मापासून वेगळे करणे व दुसरी म्हणजे भिन्न धर्मांचे लोक आणि त्यांच्या विश्‍वासाला राज्याच्या नियमांपुढे समान मानणे.धर्मनिरपेक्षता हे पाश्‍चिमात्य तत्त्वज्ञान, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पाश्‍चिमात्य देशात वाढलेल्या, शिकलेल्या आणि पाश्‍चात्त्य संस्कृतीचा प्रभाव असलेल्या राज्यकर्त्यांनी स्वीकारले. राज्यकर्त्यांनी धर्मनिरपेक्षतेचा दुरुपयोग करून भारतीय जीवनपद्धती उद्ध्वस्त करण्याचे काम केले. धर्मनिरपेक्षता अंमलात आणण्यासाठी प्रथम भारतातील हिंदुत्वाची पाळेमुळे उखडून फेकण्याचे काम केले. त्यासाठी त्यांनी भारतात मॅक्समुलरच्या आर्य आक्रमण सिद्धांतावर आधारलेला भारताचा इतिहास शिकवला, मेकॉलेची शिक्षणपद्धती आणली. आपल्या मतांच्या राजकारणासाठी कॉंग्रेसने अल्पसंख्यकांचे, दलितांचे आणि मागासवर्गीयांचे तुष्टीकरणाचे राजकारण केले. धर्माचे, जातीचे आणि असहिष्णुतेचे राजकारण करून समाजात पूट पाडली. ‘सबका साथ सबका विकास’ हे मोदींचे तत्त्वज्ञान म्हणजे हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षता या दोन्ही तत्त्वज्ञानाचे मिश्रण होय. पाश्‍चात्त्य देशात वाढलेल्या, शिकलेल्या आणि पाश्‍चात्त्य संस्कृतीचा प्रभाव असलेल्या राज्यकर्त्यांनी पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञान स्वीकारले. पण, भारतात हिंदुत्वाची पाळेमुळे इतक्या खोलवर रुजली आहेत की, त्यांच्यासमोर पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञानाचा निभाव लागत नव्हता. तेव्हापासून धर्मनिरपेक्षतावादी हिंदुत्वाचा विरोध करत असतात. आज हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षता तत्त्वज्ञानाच्या समर्थकांत चाललेल्या संघर्षामुळे भारताचे अतोनात नुकसान होत आहे. भारताचा विकास घडवून आणायचा असेल, तर दोन्ही तत्त्वज्ञानांमध्ये समन्वय साधणे आवश्यक झाले होते. आज भारताच्या एकात्मता, अखंडता आणि विकासामध्ये जितके हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान आवश्यक आहे तितकेच धर्मनिरपेक्षतेचे  आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हे मोदींचे तत्त्वज्ञान न्यू इंडियाचा पाया आहे!
वीरेन्द्र कुमार,९९२३२९२०५१