पाहुण्यांना देतात भाड्याने मासे!

0
213

ब्रुसेल्स, ६ सप्टेंबर

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काही हॉटेल मालक भन्नाट ऑफर जाहीर करतात. बेल्जिअममधील एका हॉटेलने पर्यटकांसाठी जाहीर केलेल्या ऑफरची सध्या जोरदार चर्चा आहे. या हॉटेलने येथे येणार्‍या पाहुण्यांना चक्क मासे भाड्याने द्यायला सुरूवात केली आहे. ‘जर तुम्ही रूममध्ये एकटे असाल आणि तुम्हाला कोणाची सोबत हवी असेल तर तुम्ही गोल्ड फिश भाड्याने घेऊ शकता’, अशी जाहिरात हॉटेलने केली आहे. या अनोख्या जाहिरातीने सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले आहे.ब्रसेल्सच्या चार्लरोई एअरपोर्ट हॉटेलमध्ये ही भन्नाट ऑफर सुरू आहे. जवळपास २५० रुपये मोजून एका रात्रीसाठी ‘गोल्डफिश’चा बाऊल पाहुण्यांना भाड्याने घेता येतो. एकटेपणा घालवण्यासाठी किंवा विरंगुळा म्हणून अनेक पाहुणे भाड्याने बाऊल विकत घेत आहेत. या ऑफरला पाहुण्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. हॉटेलमध्ये येणारे अनेक पाहुणे मासे भाड्याने घेतात. अनेक वर्षांपासून अशा प्रकारची ऑफर पर्यटकांना दिली जाते, असे हॉटेल मालकाने ‘द इंडिपेडंट’ला सांगितले. मायकल कूकी या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या फोटोला १३ हजारांहून अधिक यूजर्सने रिट्विट केले आहे. खरे तर अनेक जणांना ही भन्नाट ऑफर आवडली आहे. घ(वृत्तसंस्था)