भारताला १० पदके

राष्ट्रकूल वेटलिफ्टिंग स्पर्धा

0
22

नवी दिल्ली, ६ सप्टेंबर

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टा येथे आयोजित राष्ट्रकूल वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताने तिसर्‍या दिवशी तीन सुवर्णपदकांसह १० पदकांची कमाई केली. ६२ कि.ग्रॅ. वजनगटात युवकांच्या विभागात मुथूपंडी राजाने एकूण २६० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. यात त्याने स्नॅचमध्ये ११० कि. व क्लीन व जर्कमध्ये १५० कि. वजन उचलले. त्याने याच वजनगटातील ज्युनिअर पुरुष विभागात एवढेच वजन उचलून रौप्यपदक  मिळविले. भारताने दिवसाची सुरूवात कांस्यपदकाने केली. ५८ कि.ग्रॅ. वरिष्ठ महिला गटात सरस्वती राऊतने कांस्यपदक मिळविले. तिने स्नॅचमध्ये ८२ कि. व क्लीन व जर्कमध्ये ९७ कि. असे एकूण १७९ कि.ग्रॅ. वजन उचलले. इरा दीक्षिताने ५८ कि.ग्रॅ. वजनगटातून सुवर्णपदक पटकावले. तिने स्नॅचमध्ये ७३ कि. व क्लीन व जर्कमध्ये ९४ कि. असे एकूण १६७ किलो वजन उचलले. दीपक लाथेरने तीन पदके जिंकण्याची सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने ६५ कि.ग्रॅ. वजनगटाच्या युवक मुले व ज्युनिअर पुरुष गटातून सुवर्णपदक, तर वरिष्ठ पुरुष गटातून कांस्यपदक मिळविले. महिलांच्या ६३ कि.ग्रॅ. वजनगटातून वंदना गुप्ताने कांस्यपदक मिळविले, तर याच वजनगटात पी. ओमेश्‍वरीने  यूथ मुली व ज्युनिअर महिला विभागातून प्रत्येकी एक रौप्यपदक मिळविले.मीरा, संजीता चमकल्यासेखोम मीराबाई चानू व संजीता चानूने मंगळवारी आपापल्या गटात सुवर्ण पदके जिंकून पुढील वर्षी आयोजित राष्ट्रकूल  क्रीडा स्पर्धेची पात्रता मिळविली आहे. ४८ कि.ग्रॅ. वजनगटात मीराने स्नॅॅचमध्ये ८५ किलो तसेच क्लीन ऍन्ड जर्क प्रकारात १०४ किलो असे एकूण १८९ किलो वजन उचलले. दरम्यान तिने स्नॅच प्रकारात ८५ किलो वजन उचलताच स्वत:चा आधीचा ८४ किलोचा विक्रम मोडीत काढला. संजीताने महिलांच्या ५३ कि.ग्रॅ. वजनगटात स्नॅचमध्ये ८५ तसेच क्लीन ऍन्ड जर्कमध्ये ११० असे एकूण १९५ किलो वजन उचलले. ज्युनियर गटात अनन्या पाटील आणि जेरेमी लालनिरुंगा यांनी भारतासाठी सुवर्ण पदके जिंकली. (वृत्तसंस्था)